▼

Thursday, 30 April 2026

आजपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात




 

आजपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात

Ø 1 ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना करण्याची सोय

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 30 : सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी 1 मे 2026 पासून जनगणनेला सुरवात होत आहे. देशातील ही पहिलीच डिजीटल जनगणना असून 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जनगणना शुभारंभाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) सर्व यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार विजय पवार, प्रभारी नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. विविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सभापती आदींची स्वयं गणना करावी. तसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावे. अधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे. जनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अशी राहील स्वयंगणनेची प्रक्रिया :

1) संकेतस्थळाचा वापर आणि लॉगिन : https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. राज्य / केंद्रशासित प्रदेश निवडा. कॅप्चा प्रविष्ट करा.

2) कुटुंब नोंदणी : कुटुंब प्रमुखाचे नाव. 10 अंकी मोबाईल क्रमांक. ई- मेल आयडी असल्यास प्रविष्ट करा. कुटुंब प्रमुखाचे नाव नंतर बदलता येणार नाही. प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच मोबाईल क्रमांक वापरावा. एकदा नोंदणी झाल्यावर तोच क्रमांक इतर कोणत्याही कुटुंबासाठी  वापरता येणार नाही.

3) भाषा आणि ओटीपी पडताळणी : पसंतीची भाषा निवडा आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा. निवडलेली भाषा नंतर बदलता येणार नाही.

4) स्थानाचा तपशील द्या : जिल्हा निवडा आणि परिसर / गाव / नगर व पीन कोड प्रविष्ट करा.

5) नकाशावर आपले निवासस्थान शोधा : आपली अचूक निवासी इमारत ओळखण्यासाठी आणि स्थानाची पुष्टी करण्यासाठी नकाशावरील लाल मार्कर ड्रॅग करा.

6) प्रश्नावली पूर्ण करा : टूलटिप्स, वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि आवश्यक माहिती टिपांच्या मार्गदर्शनानुसार घरसुची आणि गृह गणना प्रश्नावली भरा.

7) पूर्वावलोकन आणि पुनरावलोकन : प्रविष्ट केलेला सर्व डेटा तपासण्यासाठी पुर्वावलोकन स्क्रीनचा वापर करा. तुम्ही नोंदी संपादीत करू शकता. नंतर सादर करण्यासाठी मसुदा जतन करू शकता किंवा अंतिमरित्या सादर करू शकता.

8) अंतिम सादर करणे : तुमचा डेटा लॉक करण्यासाठी ‘अंतिम सादर करा’ वर क्लिक करा. अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. सादर केल्यानंतर 11 अंकी एस.ई आयडी (एसएमएस) आणि ईमेल दिले असल्यास त्यावर येईल.

9) गणकाची भेट : जेव्हा जनगणना गणक तुमच्या घरी भेट देईल, तेव्हा तुमचा एस.ई. आयडी त्यांना सांगा. जर एस.ई. आयडी विद्यमान नोंदीशी जुळला तर तपशील निश्चित करून सादर केले जातात. अन्यथा गणक नव्याने डेटा गोळा करेल. 

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन : नागरिकांनी दिलेली माहिती गुप्त ठेवली जाईल व केवळ जनगणना कार्यासाठीच वापरली जाईल. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती भरावी. तसेच 15 मे नंतर घरी आलेल्या प्रगणकाला सहकार्य करून या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा



जिल्हाधिका-यांकडून जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा

चंद्रपूर, दि. 30 : जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, पोलिस निरीक्षक अमोल काचारे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यातील पिडीतांना दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच कागदपत्रांची पुर्तता जलदगतीने करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा. पिडीतांना देय असलेल्या लाभाचा पहिला हप्ता त्वरीत देण्याचे नियोजन करावे.

सादरीकरण करतांना सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी, अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत्‍ एप्रिल 2025 ते मार्च 2026 अखेरपर्यंत घडलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. तसेच पोलिस तपासातील गुन्हे, पोलिस फायनल गुन्हे, न्यायालयात दाखल गुन्हे आदींची माहिती बैठकीत दिली.  तसेच गत वर्षातील 20 पिडीतांना पहिला हप्ता तर 29 पिडीतांना दुसरा व तिसरा हप्ता असे एकूण 49 पिडीतांना 41 लक्ष 75 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आल्याचे सांगितले.

००००००

पालकमंत्री यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम


 पालकमंत्री यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 23 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 1 मे 2026 रोजी चंद्रपुरच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्याचा 67 व्या स्थापना दिन समारंभानिमित्त 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. सकाळी 10 वाजता नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक, सकाळी 11.20 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे पालकमंत्री प्रयाण करतील.

००००००

‘नीट’ परिक्षेसाठी उमेदवार आणि पालकांनी सुचनांचे पालन करावे

 ‘नीट’ परिक्षेसाठी उमेदवार आणि पालकांनी सुचनांचे पालन करावे

Ø जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्यात ‘नीट’ (युजी) परीक्षा 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत जिल्ह्यातील 10 नियुक्त केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसंदर्भात उमेदवारांनी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

1) रिपोटिंग आणि प्रवेश  : परीक्षा केंद्रांवर प्रवेश सकाळी 11 वाजेपासून सुरू होईल. अंतिम प्रवेशाची वेळ दुपारी 1.30 आहे. या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारांनी केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.

2) अनिवार्य कागदपत्रे : उमेदवारांनी फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र, एक मूळ वैध फोटो ओळखपत्र सोबत आणावे

3) सुरक्षा आणि शिस्त : प्रवेशद्वारावर कडक तपासणी आणि बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. उमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे आणि शिस्त पाळणे अनिवार्य आहे. पालकांना परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.

4) प्रतिबंधित वस्तू / ड्रेस कोड : उमेदवारांना खालील गोष्टी आणण्यास सक्त मनाई आहे. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्ट वॉच, अभ्यास साहित्य, कागदपत्रे, कॅल्क्युलेटर, बॅग किंवा इतर कोणतीही अनधिकृत वस्तू. तसेच उमेदवारांनी दागिने, अलंकार, घड्याळे किंवा कोणतीही धातूची वस्तू घालू नये. बेल्ट, टोपी किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी नसलेले इतर साहित्य टाळावे. तपासणी सुलभ होण्यासाठी साधे आणि हलके कपडे परिधान करावेत. प्रतिबंधित वस्तू जवळ बाळगल्यास परीक्षेच्या नियमांनुसार कडक कारवाई केली जाईल

5) सुविधा आणि व्यवस्था : सुरक्षा, वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी आणि अखंड वीजपुरवठ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी विशेष वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग उमेद‌वारांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

6) कडक उष्णतेबाबत महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी केंद्रावर येण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा. दीर्घकाळ थेट सूर्यप्रकाशात राहणे टाळावे. उष्णतेमुळे होणारी घाई टाळण्यासाठी केंद्रावर लवकर पोहोचावे. ड्रेस कोडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हलके आणि आरामदायी कपडे घालावे. केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असेल; तथापि, उमेदवार मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वतःची पारदर्शक पाण्याची बाटली सोबत आणू शकतात.

 7) महत्त्वाच्या सूचना : उमेदवारांनी प्रवेशपत्रावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करावे.

8) पालकांसाठी सूचना : पालकांनी परीक्षा केंद्रांजवळ गर्दी करणे टाळावे. उमेदवार वेळेवर केंद्रावर पोहोचतील याची खात्री करावी. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. सर्व उमेदवार आणि पालकांनी या परीक्षेच्या सुरळीत संचालनासाठी वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/ चंद्रपूर, दि. 30 : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

या संदर्भात 13 जुलै 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या 150 अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत महाराष्ट्राला योग्य वाटा देण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा तसेच राज्यातील विविध विभागांतील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

केंद्र शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा मंजूर केली. याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एकूण 29 कोटी 21 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या. कोविड-19 महामारीच्या काळात या प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे मोठी भूमिका बजावली.

याशिवाय, या प्रयोगशाळांमुळे विविध विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत कोविड-19 (37,21,154), डेंग्यू (88,327), चिकनगुनिया (39,817), झीका (3,923), स्क्रब टायफस (7,091), इन्फ्लुएंझा (27,536), एचबीव्ही (1,53,180), रोटाव्हायरस (651) अशा एकूण 40,41,689 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळाली असून भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी राज्य अधिक सक्षम झाले आहे.

००००

Wednesday, 29 April 2026

कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी




कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी

Ø योग्य मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात सकारात्मक बैठक

Ø शेतकरी व माणिकगड कंपनीच्या अधिका-यांची उपस्थिती

चंद्रपूर, दि. 29 : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी (माणिकगड सिमेंट) क्षेत्रातील जमिनीच्या संदर्भात बांबेझरी, कुसुंबी आणि नोकारी येथील शेतक-यांनी मांडलेल्या विषयावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने तोडगा काढत आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 29) जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेतकरी तसेच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे कुसुंबी आणि नोकारी येथे प्रशासनाचे अधिकारी, शेतकरी आणि कंपनीच्या प्रतिनधींसमोर जमिनीची मोजणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पंत यांनी स्पष्ट केले. यावर उपस्थित शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, राजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (जमीन) सचिन कुमावत, भुमी अभिलेख जिल्हा अधिक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार ओमप्रकाश गोंड ( राजुरा), रुपाली मोगरकर (जिवती), पल्लवी आकरे (कोरपना), उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव, पोलि निरीक्षक शिवाजी कदम यांच्यासह माणिकगड कंपनीचे व्यवस्थापक मुकेश गहलोत, शेतक-यांच्या वतीने आबिद अली, भाऊराव कन्नाके, केशव कुडमेथे, सुनील मडावी, सुनील पेंदोर उपस्थित होते.

प्रशासन शेतक-यांच्या बाजुने आहे, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका, असे सांगून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, शेतक-यांप्रती प्रशासनाची भुमिका अतिशय सकारात्मक आहे. एक महिन्याच्या आत बांबेझरी यथे मौका चौकशी करून तेथे कंपनीचे ओव्हर बर्डन आहे का, याची तपासणी केली जाईल. तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, भुमी अभिलेख सर्व्हेअर, वन विभागाचे प्रतिनिधी, पोलिस पाटील, माणिकगड कंपनीचे अधिकारी आणि जमिनीचा गट क्रमांक / सातबारा ज्या शेतक-यांच्या नावावर आहे, त्यांच्या समक्ष कुसुंबी व नोकारी येथे मोजणी करून फोटोसह अहवाल सादर करतील. याबाबत शेतक-यांना अजूनही काही अडचण असेल तर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.

मौजा कुसुंबी, बांबेझरी व नोकारी येथील काही शेतक-यांच्या जमिनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या उत्खनन क्षेत्रामध्ये (लिज) येत असून त्याकरीता मोबदला देण्यात यावा, अशी मागणी गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने करीत आहे. हा विषय सकारात्मक दृष्टीने निकाली काढण्याच्या उद्देशाने यापूर्वी उपविभागीय अधिकारी, राजुरा यांच्या स्तरावर संबधित शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठका घेवून कार्यवाही करण्यात आली. तसेच 3 डिसेंबर 2024 रोजी भूमापन क्र. 43, 44, 45, 46, 47, 48 ची मौक्यावर प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली. त्यामध्ये सदर भुमापन क्रमांकामध्ये अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे कोणत्याही प्रकारचे उत्खनन आढळून आले नाही. तसेच संबंधित शेतक-यांची कोणत्याही प्रकारची वहिवाट सदर भुमापन क्रमांकावर आढळून आले नाही तसा अहवाल उपअधिक्षक भूमी अभिलेख राजुरा यांनी सादर केला आहे. उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर यांनी मौजा बांबेझरी येथील स.क्र.44,45,46,47 व 48 हे संपूर्ण क्षेत्र जंगलाने व्याप्त असून शेती योग्य नाही व वनव्यवस्थापन नकाशा व केएमएल नुसार राखीव वनक्षेत्र क्रमांक 36 मध्ये असल्याचे नमुद केले आहे.

सध्या हे प्रकरण दिवाणी न्यायालय, चंद्रपूर येथे दाखल असून या प्रकरणात दिवाणी न्यायालयाने 26 डिसेंबर 2025 रोजी अंतरिम ऑर्डर पारीत केले आहे. तसेच राज्य मानवी हक्क आयोगासमोर सदर प्रकरण प्रलंबित आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने प्रशासकीय मर्यादा असल्या तरी, शेतक-यांच्या न्याय्य हक्कासाठी शासन कायदेशीर चौकटीत राहून सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे, असेही बैठकीत सांगण्यात आले.

००००००

3 मे रोजी जिल्ह्यातील 10 केंद्रावर ‘नीट’ परिक्षा


3 मे रोजी जिल्ह्यातील 10 केंद्रावर ‘नीट’ परिक्षा

Ø कायदा व सुव्यवस्थेसाठी कलम 163 अन्वये आदेश पारीत

चंद्रपूर, दि. 29 :   नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट (नीट) परीक्षा 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 10 केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. सदर केंद्राच्या ठिकाणी परिक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून 3 मे रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6  वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता2023 चे कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.

नीट (युजी) या परिक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात दुपारी 12 ते सायं 6 वाजेपर्यंत परिक्षार्थी  व्यतिरिक्त्‍ 2 किंवा त्यापेक्षाअधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत.  परिक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरांतर्गत दुपारी 12 ते सायं 6 वाजेपर्यंत नियमित व रोजच्या वाहतूकी व्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहील. सदर परिसरात परिक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी. बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कॉम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील,

ही आहेत जिल्ह्यातील परिक्षा केंद्रे : 1) भवानजीभाई सी.एच. ज्यूनीयर कॉलेज, मूल रोड चंद्रपूर 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ, आर्ट, कॉमर्स, साईन्स दीक्षा भुमी, चंद्रपूर 3) गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बायपास रोड, चंद्रपूर 4) केन्द्रीय विद्यालय, डब्लू, सी. एल दुर्गापुर 5) मातोश्री माध्य व उच्च माध्यमिक शाळा, तुकुम, चंद्रपूर 6) पी.एम.श्री. के. वी.ओ.एफ चांदा, भद्रावती, 7) आर. ए. किडवाई कॉलेज घुटकाळा वार्ड, चंद्रपूर 8) सैनिक स्कुल चंद्रपूर, 9) सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, 10) झेड पी. जुबली हॉय स्कूल, चंद्रपूर.

सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास संबंधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमुद आहे.

०००००००

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

 ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

चंद्रपूर, दि. 29 : ज्ञानभारतम् ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाची एक महत्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार भारतातील हस्तलिखीत वारशाचे सर्वेक्षण, दस्ताएवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेन आणि प्रसार करणे हा आहे.

या अभियानअंतर्गत शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये आणि खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने  देशभरातील हस्तलिखितांचा संग्रह करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. सदर अभियान 16 मार्च, 2026 पासून हस्तलिखीत संग्रहाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

या अभियानात देवस्थान मंडळे, धार्मिक व धर्मदाय संस्था, शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये आणि खाजगी संग्राहक यांच्याकडे सन 1950 पुर्वीचे हस्तलिखीत  ग्रंथ, लेख, लिखाण इत्यादी साहित्य असल्यास त्यांनी गुगल प्ले स्टोरवरून ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) ॲप डॉउनलोड करावे. त्यामध्ये असे कोणत्याही भाषेतील हस्तलिखीत सांस्कृतिक, एतिहासीक, पुराणीक ग्रंथ, लेख, लिखाण माहिती अपलोड करावी. तसेच जिल्ह्यातील राज्य विद्यापीठे, ग्रंथालये, देवस्थान मंडळे, धार्मिक व धर्मदाय संस्था आदींनी यांना सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन  जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी https://gyanbharatam.com या संकेत स्थळाला भेट द्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी डि.एस. कुंभार यांनी कळविले आहे.

0000000

ई-लिलावाद्वारे पोर्टलवर ट्रकची विक्री

 ई-लिलावाद्वारे पोर्टलवर ट्रकची विक्री 

Ø महा. राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, चंद्रपूर कार्यालय अंतर्गत एका ट्रक वाहनांचा 7 मे 2026 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत ई – लिलाव करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ट्रक क्रमांक एम.एच 15 डी .के. 5438 असून  खरेदी वर्ष 1 जून 2013 आहे. ट्रकची अनामत रक्कम 25 हजार रुपये आहे. सदर वाहनाची www.market.neml.in या पोर्टलवर विक्री करण्यात येत  आहे.

अटी /शर्ती  : सदर ई-लिलाव वाहने नियमानुसार आदिवासी भागातील आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार अवजड परवानाधारक गरजू व होतकरु बांधवांना आयोजित करण्यात येत आहे.  लिलावामध्ये जे आदिवासी बांधव सहभागी होतील, अशा बांधवांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे अनिवार्य राहील. वाहने विक्री केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करूनच वाहने हस्तांतरित करण्यात येतील तसेच वाहन ज्या स्थितीत आहे. त्या स्थितीत घ्यावे लागेल. अंतिम बोली मंजूर वा  नामंजूर करण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार प्रादेशिक व्यवस्थापक चंद्रपूर यांनी राखून ठेवलेला आहे. लिलावाशी संबंधीत सर्व बाबतीत प्रादेशिक व्यवस्थापक यांचा अंतिम निर्णय बंधनकारक

सदर ई-लिलावातील इतर अटी - शर्ती  www.market.neml.in या Neml च्या पोर्टलवर उपलब्ध होतील. Neml वर संपर्कासाठी राजरतन बागडे (मो. 8421549842) संदेश वर्मा (मो. 9325440639) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक व्यवस्थापक बी. एस. बरकमकर यांनी कळविले आहे.

००००००

जिल्हाधिकारी कार्यालयात सिनीअर आयटी असिस्टंटसाठी अर्ज आमंत्रित


जिल्हाधिकारी कार्यालयात सिनीअर आयटी असिस्टंटसाठी अर्ज आमंत्रित

Ø मानधन तत्वावरील पद; अंतिम तारीख 5 मे पर्यंत

चंद्रपूर, दि. 29 :  जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सिनीअर आयटी असिस्टंटच्या एका पदासाठी मानधन तत्वावर अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदासाठी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता कम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये पदवी (बी.ई/बी.टेक) असणे आवश्यक. तसेच ई-गव्हर्नन्स (e-Governance) क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

सोबतच शासकीय / निमशासकीय प्रकल्पांवरील अनुभव असणे अपेक्षित, संगणक प्रणाली, नेटवर्किंग, डेटा व्यवस्थापन व सॉफ्टवेअर अंमलबजावणी यांचे ज्ञान, आवश्यक आहे. उमेदवाराची वयो मर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू ) असावी.  दरमहा 40 हजार ते 70 हजार रुपये प्रति महिना मानधन अनुज्ञेय राहील (अनुभव व पात्रतेनुसार निश्चित करण्यात येईल)

इच्छुक उमेदवारांनी 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून) सामान्य शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे अर्ज करावा. अर्जासोबत कम्प्युटर इंजिनियरींगची पदवी, आधार कार्ड झेरॉक्स, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, कामाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.

००००००

क्रीडा विभागाच्या वतीने विविध खेळांचे प्रशिक्षण शिबीर


क्रीडा विभागाच्या वतीने विविध खेळांचे प्रशिक्षण शिबीर

चंद्रपूर, दि. 29 : जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपुरच्या वतीने जिल्ह्यातील उदोन्मुख खेळाडूंना अद्यावत व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याकरिता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पहिल्या टप्प्यात 2 ते 11 मे पर्यंत तर दुसरा टप्पा 12 ते 21 मे 2026 पर्यंत  आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा स्टेडीयम, चंद्रपूर येथे सकाळी व सायंकाळी शिबिराचे आयोजन करण्यात येणार यात व्हॉलीबॉल व बॉक्सिंग, जलतरण, कराटे, बास्केटबॉल, बॅडमिंटन, वुशु या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण, सोबतच खेळाडुंना कौशल्य विकासाचे धडे, समुपदेशन, चर्चासत्र, परिसंवाद तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून देण्यात येईल. सदर प्रशिक्षण शिबिरात 12 वर्षावरील ते 19 वर्षाखालील सर्व मुलामुलींना सहभाग घेता येईल.

शिबिरात भाग घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू विद्यार्थ्यांनी  सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

000000

Tuesday, 28 April 2026

नागरिकांना अधिसुचित सेवा विहित वेळेत द्या - जिल्हाधिकारी वसुमना पंत



नागरिकांना अधिसुचित सेवा विहित वेळेत द्या - जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘सेवा हक्क दिन’

चंद्रपूर, दि. 28 : महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य म्हणून ओळखले जाते. कल्याणकारी राज्यामध्‍ये शासनाच्या विविध सेवा वेळेत देण्याला प्राधान्य आहे आणि तो नागरिकांचा हक्क्‍ सुध्दा आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपापल्या विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांना विहित वेळेत द्याव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित सेवा हक्क दिन (28 एप्रिल) कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

शासन आणि प्रशासन लोकांसाठी काम करते, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये, म्हणून जास्तीत जास्त सेवा ह्या ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र या सेवा ऑनलाईन असल्या तरी संबंधित अधिका-यांनी नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढणे बंधनकारक आहे. शासन स्तरावरून दर महिन्याला याचा आढावा घेतला जातो. यात प्रत्येक जिल्ह्याची रँकिंग कळते. अर्ज निकाली काढण्याची शासकीय विभागांची गती कशी आहे, याचीसुध्दा पडताळणी केली जाते. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा देणे आपले कर्तव्य आहे. लोकांना त्रास न होता सेवा मिळाल्या तर शासन-प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यास मदत होते, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर म्हणाल्या, पूर्वी सर्व सेवा ऑफलाईन होत्या. आता मात्र विविध विभागाच्या सेवा ऑनलाईन आहेत. प्रत्येक विभागाने 100 टक्के काम करून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार म्हणाले, 34 विभागाच्या एकूण 1212 सेवा ह्या ऑनलाईन असून 13 विभागाच्या 113 सेवा ह्या ऑफलाईन आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात आपल्या विभागाच्या अधिसुचित सेवांचा फलक लावणे आवश्यक आहे. तसेच प्रथम अपिलीय, द्वितीय अपिलीय अधिकारी कोण, याची माहिती सुद्धा लावावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रकल्प प्रमुख विकास लालसरे यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी मानले.

नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध सेवेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात लक्ष्मी झोडे, वैष्णवी गभणे, चंदा वैद्य यांना नवीन शिधापत्रिका प्रमाणपत्र, गोविंद सरकार यांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र तर वर्षा कोडापे, प्रतिक्षा चावरे, शुभांगी चवरे यांना पोलिस विभागाचे व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र देण्यात आले.

००००००