Wednesday, 7 August 2024

महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना

     



महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Ø  वीजबिल शून्य, वीज विकून उत्पन्नाचीही संधी                  

            चंद्रपूर, दि. 7 :  महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त विपीन पालीवाल, महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजबे, अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता सुहास पडोळे, चंद्रशेखर दार्व्हेकर, विलास नवघरे, सत्यदेव पी., श्री. शहाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राजू नंदनवार आदी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या योजनेंतर्गत छतावरील सौरऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती होणार असून घरगुती वापरापेक्षा जास्त वीज निर्मिती झाल्यास वीजबील शुन्य येईल. तसेच जास्त निर्मित ऊर्जा महावितरणला विकून उत्पन्न मिळविण्याची संधी नागरिकांना आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेबद्दल माहिती द्यावी. ग्रामसभेमध्येही या योजनेबाबत नागरिकांना अवगत करावे. जिल्ह्यातील ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले.

वीज ग्राहकांना असे वितरीत होईल अनुदान :  वीज ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. यात 1 किलोवॅटपर्यंत 30 हजार रुपये,  2 किलोवॅटपर्यंत 60 हजार रुपये, 3 किलोवॅट व  त्यापेक्षा जास्त 78 हजार रुपये (कमाल), गृहनिर्माण संस्था, घर संकुलासाठी  90 लक्ष रुपये (कमाल)

(500 किलोवॅटपर्यंत स्थापित क्षमतेनुसार 18 हजार रुपये प्रति किलोवॅट).

            छतावील सौर उर्जेद्वारे दरमहा वीज निर्मिती : 1 किलोवॅट-120 युनिट, 2 किलोवॅट -240 युनिट, 3 किलोवॅट- 360 युनिट, 25 वर्षांपर्यंत वीज निर्मिती क्षमता.

येथे करा नोंदणी : योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration या वेबसाईटवर नोंदणी करावी. विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्जाची सोय. प्रथम येईल त्याला प्राधान्य.

००००००

No comments:

Post a Comment