▼

Monday, 28 September 2026

ग्रामीण महिला व युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी

 

ग्रामीण महिला व युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी

Ø जिल्हा परिषदेचे ‘ग्रामसमृद्धी’ पोर्टल कार्यान्वित

चंद्रपूर, दि. 28 : ग्रामीण भागातील महिला व युवतींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी जि.प. महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी ‘ग्रामसमृद्धी’ हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

महिला व युवतींच्या कौशल्य विकासाला चालना देणे, रोजगार व स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाचे शाश्वत साधन निर्माण करणे हा या योजनांचा प्रमुख उद्देश आहे. यासोबतच मुला-मुलींना इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचाही विविध योजनांमध्ये समावेश आहे.

आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण : महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेंतर्गत पात्र महिला व युवतींना त्यांच्या आवडी, गरज आणि उपलब्ध संधींनुसार विविध व्यवसाय व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणातून व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याबरोबरच स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधा : या योजनांसाठीची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने gramsamruddhi.in/wcdscheme हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध योजनांची माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा.

पात्र महिलांनी लाभ घ्यावा – पुलकित सिंह

ग्रामीण भागातील अधिकाधिक महिला व युवतींना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र व इच्छुक महिला व युवतींनी ‘ग्रामसमृद्धी’ पोर्टलवर उपलब्ध योजनांची माहिती घेऊन या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment