विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन
चंद्रपूर, दि. 01 : सेवा संकल्प कार्यक्रमाअंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा योजना तसेच पाणी गुणवत्तेबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने ऊर्जानगर येथील नॅशनल गर्ल्स हायस्कूल, राजीव गांधी विघालय वरवट, इंदिरा गांधी विघालयल पडोली येथे इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, चंद्रपूर येथे भेट देऊन गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी कशी केली जाते, याची प्रत्यक्ष माहिती घेतली. पाण्याचे नमुने घेण्याची पद्धत, पाण्यातील विविध घटकांची तपासणी तसेच सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. एफटीके कीट व्दारे गावपातळीवर पाणी नमुने कसे तपासल्या जातात, याबाबतही माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, दूषित पाण्यामुळे होणारे संभाव्य धोके ओळखणे आणि नागरिकांमध्ये पाणी गुणवत्तेबाबत जनजागृती निर्माण करणे, या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील विविध तपासणी प्रक्रिया उत्सुकतेने जाणून घेतल्या. यावेळी तिनही शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित होते.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन प्रकल्प संचालक मच्छींद्रनाथ धस व वरिष्ठ भुवैज्ञानिक लिन बाराहाते यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली इंगळे (रसायनी), नितीन सपाटे (अनुजीव तज्ञ), रजनी पिंपळकर (प्रयोगशाळा सहाय्यक), अंजली डाहुले (जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार ), राखी बोबडे (उपविभाग पाणी गुणवत्ता सल्लागार, राजुरा), तेजल महाडोळे यांनी विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीच्या विविध बाबींची माहिती दिली.
०००००००
#सेवा_संकल्प_अभियान

No comments:
Post a Comment