▼

Thursday, 12 November 2026

जिल्ह्यात 502 तलावांच्या परिसरात चारा लागवडीचे नियोजन 4708 लाभार्थ्यांच्या माध्यमातून 3.57 लाख मेट्रिक टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट

 



जिल्ह्यात 502 तलावांच्या परिसरात

चारा लागवडीचे नियोजन

 

4708 लाभार्थ्यांच्या माध्यमातून 3.57 लाख मेट्रिक टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट

 

चंद्रपूर, दि. 12 :  जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ५०२ तलावांच्या परिसरात उपलब्ध व योग्य जमिनीवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

 

तसेच विविध योजनांच्या माध्यमातून 4708 लाभार्थ्यांना वैरण बियाण्यांचा लाभ देऊन सुमारे 3 लाख 57 हजार मेट्रिक टन चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात आले आहे. चारा उत्पादनासोबतच उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन, साठवणूक आणि योग्य व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यात चारा लागवडीसाठी एकूण 502 तलावांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या तलावांच्या परिसरातील उपलब्ध व योग्य जमिनीवर विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन  (व्ही.बी.जी- राम -जी) योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सहभागाने चारा लागवडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. चारा उत्पादनातून पशुधनाची गरज भागविण्याबरोबरच ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.

 

वैरण बियाणे वितरणातून 3.57 लाख मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित

 

पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादनासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2633 लाभार्थ्यांना 17 हजार 114 किलो वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असून, त्यातून 1 लाख 68 हजार 510 मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.

 

तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत 2072 लाभार्थ्यांना 27 हजार 877 किलो वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातून 1 लाख 88 हजार 829 मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. अशा प्रकारे दोन्ही योजनांच्या माध्यमातून एकूण 4708 लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून, 3 लाख 57 हजार 339 मेट्रिक टन चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात आले आहे.

 

पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाभर ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात ८ ऑक्टोबर २०२६ रोजी भद्रावती तालुक्यातून करण्यात आली. अभियानांतर्गत कमी पाण्यात चारा लागवड, अझोला उत्पादन, निकृष्ट चाऱ्याची युरिया व एन्झाइम प्रक्रियेद्वारे पौष्टिकता वाढविणे, मुरघास निर्मिती तसेच हायड्रोपोनिक चारा उत्पादन यांसारख्या विषयांवर शेतकरी व पशुपालकांना प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.

 

यासोबतच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे वितरण, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत पशुप्रजनन पूरक खाद्याचा पुरवठा, बहुवार्षिक चारा पिकांसाठी अनुदान, विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप आणि मुरघास वितरण आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. आत्मा विभागामार्फत 2 लाख 40 हजार रुपये खर्चातून निकृष्ट चारा सकस करण्यासंबंधी 120 प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

 

प्रायोगिक तत्त्वावर पाच तलावांच्या परिसरात चारा लागवड

 

मृद व जलसंधारण विभागाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील पाच तलावांची चारा लागवडीसाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही व वायगाव, ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव तसेच भद्रावती तालुक्यातील आष्टी व काटवल तुकूम येथील तलावांचा समावेश आहे.

 

या ठिकाणी पंचायत विभाग, मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि रोजगार हमी योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चारा लागवडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या उपक्रमातून उपलब्ध जलस्रोतांचा उपयोग करून स्थानिक पातळीवर चारा उत्पादन वाढविण्यासोबतच महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

000000


No comments:

Post a Comment