नायलॉन मांजाचा वापर केल्यास २५ हजारांचा दंड;
विक्री व साठा केल्यास अडीच लाखांचा दंड
नायलॉन व सिंथेटिक मांजावर जिल्ह्यात पूर्णपणे बंदी ;
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आदेश
चंद्रपूर, दि. 13 : मानवी
जीवितासह पशु-पक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन व सिंथेटिक
मांजाच्या वापरावर, विक्रीवर आणि साठवणुकीवर चंद्रपूर जिल्ह्यात पूर्णपणे बंदी
घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार नायलॉन मांजाचा वापर करताना
आढळल्यास २५ हजार रुपये, तर विक्री किंवा साठा करताना आढळल्यास प्रत्येक
गुन्ह्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी सार्वजनिक सूचना जारी केली
आहे.
नायलॉन व सिंथेटिक मांजामुळे नागरिकांना गंभीर दुखापती
होण्यासह जीवितहानीचा धोका निर्माण होतो. तसेच पक्षी व प्राण्यांनाही या मांजामुळे
इजा होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार
जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरासह विक्री व साठवणुकीवर कठोर निर्बंध लागू
करण्यात आले आहेत.
अल्पवयीन मुलांनी वापर केल्यास पालकांना दंड : कोणतीही सज्ञान व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना
आढळल्यास संबंधित व्यक्तीस २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच अल्पवयीन
मुलगा किंवा मुलगी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवताना आढळल्यास २५ हजार
रुपयांचा दंड संबंधित मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांकडून वसूल करण्यात येणार आहे.
विक्रेते व साठेबाजांवर कठोर कारवाई : कोणत्याही दुकानात, ऑनलाइन
प्लॅटफॉर्मवर अथवा व्यक्तीकडे नायलॉन किंवा सिंथेटिक मांजाचा साठा आढळल्यास किंवा
त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विक्रेत्यावर २ लाख ५० हजार
रुपयांचा दंड आकारण्यात येईल. हा दंड प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्रपणे लागू
राहणार आहे.
दंड न भरल्यास महसुली वसुली : दंडाची रक्कम घटनास्थळी जमा न केल्यास संबंधित व्यक्तीला
१५ दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक राहील. निर्धारित मुदतीत दंडाची रक्कम जमा न
केल्यास संबंधित महसूल अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर प्रक्रिया राबवून जमीन
महसुलाप्रमाणे दंडाची वसुली करण्यात येणार आहे.
नागरिकांनी तक्रार नोंदवावी : जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा
ऑनलाइन माध्यमातून अवैध व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ
पोलीस विभागाच्या सायबर सेल अथवा संबंधित क्रमांकावर तक्रार नोंदवावी.
तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
सदर सार्वजनिक सूचनेची माहिती नसल्याचे कारण पुढे करून
दंडात्मक कारवाईबाबत कोणालाही आक्षेप घेता येणार नाही, असेही स्पष्ट
करण्यात आले आहे.
सुरक्षित व पर्यावरणपूरक मांजाचा वापर करण्याचे आवाहन : नागरिकांनी नायलॉन व सिंथेटिक मांजाचा वापर पूर्णपणे
टाळावा. पतंग उडविण्यासाठी केवळ सुरक्षित व पारंपरिक सुती (कापसाच्या) मांजाचा
वापर करावा. मानवी जीविताचे तसेच पशु-पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व
नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
000000

No comments:
Post a Comment