▼

Tuesday, 31 March 2026

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या  औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, देशातून हत्तीरोग निर्मूलन करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीतही  मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.

राज्यात  ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात, ज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजे, काही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) वापरली जात आहे. ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते.

महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असून, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

नागपूर ग्रामीण भागात मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश

महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, पालघर, नंदुरबार, सोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ७५ टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत. सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया.

ट्रीपल ड्रग पॉलिसी (आयडीए) यशाचा दर: नागपूर ग्रामीण भागात या मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर ( एमएफ रेट) २०१४ मधील ४.९१ टक्क्यावरून २०२४ पर्यंत एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘आयडीए’ उपचारामुळे मायक्रोफिलेरिया (परजीवी) कमी करण्यास अधिक परिणामकारक मदत होते, त्यामुळे रोगाचा प्रसार लवकर थांबवता येतो. राज्य शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधे घ्यावीत. समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हत्तीरोग निर्मूलन शक्य नसल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले आहे..

00000000000

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

 

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

 नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 31  : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40 ते 50 किमी वेगाने) तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तसेच, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याच्या वेळी घरात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. खिडक्या व दरवाजांपासून दूर राहावे तसेच सखल भाग, अंडरपास, ड्रेनेज परिसर किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. खराब दृश्यमानतेमुळे पावसात वाहन चालवणे टाळावे आणि विजेच्या तारांपासून तसेच पॉवर लाईन्सपासून दूर राहावे.

वादळ व विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. उंच झाडाखाली, लोखंडी वस्तूजवळ किंवा तात्पुरत्या शेडमध्ये थांबू नये. घरात असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, लँडलाईन फोनचा वापर टाळावा तसेच पाण्याच्या संपर्कात येणे टाळावे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महाकाली यात्रेदरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  विनय गौडा यांनी केले आहे. यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी निवारा क्षेत्राच्या अधिक माहिती करिता मंदिर परिसरातील नियंत्रण कक्षा भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.

०००००००

Monday, 30 March 2026

वन अकादमीकडून कौशल्य विकास प्रशिक्षणातून शाश्वत रोजगार

 

वन अकादमीकडून कौशल्य विकास प्रशिक्षणातून शाश्वत रोजगार

चंद्रपूर, दि. 30 : वन्यजीव परिक्षेत्रातील वन संसाधनांवरील अवलंबित्व कमी करून बेरोजगार युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर वन अकादमीतर्फे व्यापक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

या उपक्रमाचा मुख्य हेतू वन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आत्मनिर्भर व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा आहे. गेल्या तीन वर्षांपासून संचालक एम. एस. श्रीनिवास यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना उद्योगसापेक्ष कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान आणि आत्मविश्वास दिला जात आहे. विशेषतः ग्रामीण व वन क्षेत्रातील युवकांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासही मदत होत आहे. वन परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन वन संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.

मार्च महिन्यात तीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. यात 1) इलेक्ट्रिकल व सोलर पीव्ही इंस्टॉलर कोर्समध्ये इलेक्ट्रिकल मूलतत्त्वे तसेच सोलर पॅनल बसविणे व देखभाल यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून 20 युवकांना नोकरी मिळाली असून त्यांना 18200 रुपये प्रतिमाह वेतनासह निवास व भोजन सुविधा देण्यात येत आहे.

2) ऑटोमोटिव्ह 4-व्हीलर असिस्टंट या प्रशिक्षणामध्ये वाहनांचे भाग, सर्व्हिसिंग व देखभाल याबाबत ज्ञान देण्यात आले. प्रशिक्षित युवकांपैकी काहींना पुणे (भारत बेंझ – चाकण), मालेगाव, नागपूर (गिरनार आयशर) तसेच इरोस हुंडाई येथे 14 ते 15 हजार रुपये प्रतिमाह वेतनावर नोकऱ्या मिळाल्या आहेत. 3) मल्टीफंक्शनल ऑफिस असोसिएट या कोर्समध्ये संगणक, संवाद कौशल्ये व कार्यालयीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. 29 प्रशिक्षित युवकांना गोवा, मुंबई, पुणे व चंद्रपूर येथील विविध नामांकित संस्था, मॉल व रुग्णालयांमध्ये 10 हजार ते 19 हजार रुपये प्रतिमाह वेतनावर रोजगार मिळाला आहे.

अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण, वैयक्तिक मार्गदर्शन व कामाचा अनुभव दिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. या उपक्रमामुळे युवकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळत आहे.

०००००००

शिष्यवृत्तीची 60 टक्के रक्कम महाविद्यालयात जमा करावी

 शिष्यवृत्तीची 60 टक्के रक्कम महाविद्यालयात जमा करावी

Ø समाजकल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

चंद्रपूर, दि. 30 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून सुधारीत निधी वितरण कार्यपध्दती अवलंब करावयाची आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत अर्ज संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत मंजूर झाल्यानंतर त्या शैक्षणिक वर्षाची अनुज्ञेय शिष्यवृत्ती रक्कम प्रणालीद्वारे निश्चित करण्यात येते. सदरहु मंजूर करण्यात आलेली संपुर्ण शिष्यवृत्तीची रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्क इत्यादी) तसेच विद्यार्थ्याला देय असणारा भाग (निर्वाह भत्ता) या दोन्ही भागांच्या एकत्रित रक्कमेचा केंद्र हिस्सा 60 टक्के या प्रमाणात लाभाची रक्कम केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरीत महाविद्यालयास देय असलेली 60 टक्के रक्कम सात दिवसांच्या आत महाविद्यालयाकडे जमा करावी, यासाठी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून अर्जामध्ये नोंद असलेल्या एकूण शुल्काची रक्कम पाहावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

‘दिव्यांग सहायक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन


 

‘दिव्यांग सहायक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 30 :  महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने राज्यातील दिव्यांग व्यक्तींना, सर्व सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकाभिमुख ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ विकसित केले आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सदर पोर्टल समावेशक, पारदर्शक व सुविधा आधारित यंत्रणा आहे. या पोर्टलवर लाभार्थ्यांकडून नोंदणी करण्यात येत असून विविध सक्षमीकरणात्मक योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यानुसार चंद्रपुर जिल्हयातील विविध संस्था, दिव्यांग पुनर्वसन केंद्रे, दिव्यांगांच्या शाळा, दिव्यांगांची कौशल्य विकास केंद्रे तसेच दिव्यागांचे इतर उपक्रम यांच्यामधील दिव्यांग लाभार्थी, विद्यार्थी तसेच दिव्यांग प्रशिक्षणार्थी यांनी ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर’ 31 मार्च 2026 पर्यंत divyangsahayak.maharashtra.gov.in या वेब संकेतस्थळावर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.

००००००

ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन

 ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन

Ø एनएक्सजी कॉईन प्रा. लिमि. फसवणूक प्रकरण

चंद्रपूर, दि. 30 : एनएक्सजी कॉईन एस.डी. हब (ओपीसी) प्रा. लिमिटेड मध्ये गुंतवणूक सांगून आयडी तयार करण्याकरीता 50 हजार रूपये व महिंद्रा एक्सयुव्ही 300 वाहन देण्याचे खोटे आमिष दाखवून आरोपी रमेश सखाराम भाष्कर, मंगलदास तुलाराम वरखडे यांनी, फिर्यादी कार्तीक रमेश खंगार इतर गुंतवणुकदारांची 14 लक्ष  रूपयाची आर्थिक फसवणुक केल्याबाबतचा गुन्हा पोलिस स्टेशन रामनगर येथे नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे.

आरोपीच्या चौकशीमध्ये चंद्रपुर जिल्हयातील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून फसवणूक केल्याचे कबूल केले आहे. तरी गुंतवणूकदाराची ठेवी परत करण्याकरीता महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधिल हितसंबंधांचे सरंक्षण) अधिनियम सन 1999 अन्वये कार्यवाही करीता एनएक्सजी कॉईन, एस.डी. हब (ओपीसी) प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ठेवी परत मिळण्याकरीता आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथे वैध दस्ताऐवजासह ठेवी परत मिळण्याचा फार्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी प्रमोद चौगुले, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अभिषेक बागडे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर श्रीरामे, पोलिस हवालदार प्रभाकर तलांडे हे करीत असून नमुद आरोपी रमेश सखाराम भाष्कर (वय 33 वर्षे) रा. स्नेहनगर परळी वैद्यनाथ जि. बीड, आणि मंगलदास तुलाराम वरखडे, (वय 49 वर्षे), रा. हनुमान मंदीर जवळ लोहारा ता. जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे.

००००००

Sunday, 29 March 2026

उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा

 



उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा

Ø पालकमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश ;

Ø नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 : गत पंधरवड्यापासून जिल्ह्यात दैनंदिन तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम थेट मानवी शरीरावर होत असून योग्य काळजी घेतली नाही तर उन्हाच्या तिव्रतेमुळे कधीकधी मृत्युही होऊ शकतो. त्यामुळे उष्माघात नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययेाजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. नागरिकांनीसुध्दा उन्हापासून संरक्षणासाठी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. 28) उष्माघात नियंत्रण कृती आराखडाबाबत आयोजित बैठकीत डॉ. वुईके बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे आदी उपस्थित होते.

उष्माघाताबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, उष्माघाताची लक्षणे, घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये आदी बाबी नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. उष्माघाताबाबत संपर्क करायचा असल्यास जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक व उष्माघात संपर्क अधिकाऱ्यांची यादी सुद्धा नागरिकांपर्यंत पोहचवा. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांसाठी राखीव खाटा, रेफरल साठी रुग्णवाहिकेची उपलब्धता, कुलरसह थंड खोलीची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस व औषधीसाठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

उष्णतेची लाट : जागतिक हवामान संघटनेनुसार सलग पाच दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस दररोज कमाल तापमान, सरासरी कमाल तापमानापेक्षा 5 अंश सेल्सीअसने जास्त असते, तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मैदानी भागात तापमान किमान 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर उष्णतेची लाट मानली जाते.

उष्णतेच्या लाटेसंबंधी आजाराची लक्षणे : 1) चक्कर येऊन पडणे, 2) फेफरे किंवा झटके येणे, 3) झोपेतून उठण्यास त्रास होणे / उठता न येणे, 4) गोंधळल्यासारखे बोलणे / वागणे, 5) श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, 6) शरीराचे तापमान 105 अंश फॅरनहिट (40.5 अंश सेल्सिअस) पेक्षा अधिक होणे, 7) स्नायुत पेटके येणे, 8) चिडचीड होणे, 9) डोकेदुखी, अशक्तपणा येणे, 10) मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे.

काय करावे : 1) शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे, 2) डोक्यावर टोपी, रुमाल, टॉवेल किंवा छत्री वापरावी, 3) उन्हात बाहेर जातांना डोळ्यावर गॉगल्स लावावा, 4) कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावी.

काय करू नये :  1) दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर उन्हात जाणे टाळावे, 2) उन्हात अतिकष्टाची कामे करू नये, 3) दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये, 4) गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे, 5) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खावू नये.

येथे करा संपर्क : उष्माघाताबाबत संपर्क करावयाचा असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर कॉल सेंटर दूरध्वनी क्रमांक 07172 – 250400.

०००००००

पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा एकात्मिक पर्यटन सर्किट अहवालाचे विमोचन


 

पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा एकात्मिक पर्यटन सर्किट अहवालाचे विमोचन

Ø ‘सर्वविधपर्यटनानुभवाय चन्द्रपूरं आगच्छत’।

चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन सर्किट अहवालाचे विमोचन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश, महास्ट्राईड टीमचे जिल्हा प्रमुख अभिलाष अलोणी, पर्यटन तज्‍ज्ञ तन्वी पाटील, डेटा सायंटिस्ट शुभम पंचभाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

हा उपक्रम जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. तन्वी पाटील आणि अभिलाष अलोणी यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटनाच्या संधी ओळखण्यासाठी आणि त्यांची रचना करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. या अहवालाचे जिल्हा कृती आराखड्यामध्ये नियोजन करून येणाऱ्या वर्षांत चंद्रपूर एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्यास उपयोगी पडेल.

सदर अहवाल तयार करण्यात उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी व उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला केंद्रस्थानी ठेवून, पर्यटकांना आणखी विविध पर्यटन अनुभवांचा आनंद घेता येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे. हा अहवाल भविष्यातील गुंतवणूक, धोरणात्मक निर्णय आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मार्गदर्शन करेल, ज्यामुळे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या आणि आर्थिक संधींना लक्षणीय चालना मिळेल व अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल.

अहवालातील प्रमुख निष्कर्ष : 1) वन्यजीव, पर्यावरणपूरक पर्यटन, सांस्कृतिक, वारसा आणि ग्रामीण पर्यटनासह विविध पर्यटन अनुभवांना चालना. 2) पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संतुलन सुनिश्चित करून शाश्वत आणि जबाबदार पर्यटन पद्धतींचा प्रसार. 3) निश्चित केलेल्या पर्यटन मार्गांवर पायाभूत सुविधा आणि शेवटच्या टप्प्यातील संपर्क व्यवस्थेची मजबुती. 4) सामुदायिक सहभाग आणि स्थानिक उपजीविका निर्मितीला प्रोत्साहन. 5)  चंद्रपूरसाठी पर्यटन स्थळाचे ब्रँडिंग आणि गुंतवणुकीची क्षमता वाढवणे, हा आहे.

०००००००

Saturday, 28 March 2026

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचा मुबलक साठा





जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचा मुबलक साठा

Ø 7.05 लक्ष लिटर पेट्रोल, 5.93 लक्ष लिटर डिझेल तर 6774 सिलिंडर उपलब्ध

Ø पालकमंत्र्यांनी घेतली पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सी मालकांची बैठक

Ø अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 28 : आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर पेट्रोलियम पदार्थ व इंधन पुरवठ्याबाबत अफवांचे पीक आले आहे. मात्र नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. आजघडीला जिल्ह्यात पेट्रोल, ‍डिझेल आणि गॅस सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात असून 7 लक्ष 5 हजार 861 लिटर पेट्रोल, 5 लक्ष 93 हजार 892 लिटर डिझेल आणि 6774 घरगुती वापराचे सिलिंडर जिल्ह्यात उपलब्ध आहे. तसेच कंपन्यांकडून याचा पुरवठा देखील नियमित होत असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोलपंपधारक, गॅस एजन्सीचे मालक आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत पालकमंत्री डॉ. वुईके यांनी आढावा बैठक घेऊन जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर यांच्यासह पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सीधारक उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेलचा साठा उपलब्ध असून पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवठा नियमित सुरू आहे. व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्याबाबत थोडी अडचण असली घरगुती गॅस सिलिंडरसुध्दा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सीधारकांनी रोजचा आपल्याकडे किती साठा उपलब्ध आहे, त्याची माहिती प्रशासनाला द्यावी. सिलिंडर डिलिव्हरी करणा-यांकडून अपप्रचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एजन्सीधारकांनी आपापल्या स्टॉफच्या माध्यमातून नियमित पुरवठ्याबाबत सकारात्मक संदेश घरोघरी ग्राहकांपर्यंत पोहचवावा. प्रथम बुकिंग करणा-यांना तारखेनुसार सिलिंडर वाटप सुरू आहे. कुठेही टंचाई नाही. क्रमानुसार बुकिंग करणा-यांना सिलिंडरचे वाटप करण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन-प्रशासन आणि पेट्रोलपंप तसेच गॅस एजन्सीधारकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 146 पेट्रोल पंप असून यात 35 एचपीसीएल कंपनीचे, 46 बीपीसीएल, 45 आयओसीएल आणि इतर 20 पेट्रोलपंप यांचा समावेश आहे. आजघडीला (दि. 28) चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोलचा एकूण साठा 9 लक्ष 31 हजार 991 लिटर असून त्यापैकी 2 लक्ष 26 हजार 130 लिटर पेट्रोलची विक्री झाली तर 7 लक्ष 5 हजार 861 लिटर पेट्रोल उपलब्ध आहे. डिझेलचा एकूण साठा 9 लक्ष 76 हजार 927 असून यापैकी 3 लक्ष 83 हजार 35 लिटर डिझेलची विक्री झाली. तर 5 लक्ष 93 हजार 892 लिटर डिझेलचा साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात घरगुती गॅस कनेक्शनची एकूण संख्या 6 लक्ष 49 हजार 313 आहे. यात एचपीसीएल कंपनीचे 1 लक्ष 46 हजार 514 ग्राहक, आयओसीएल कंपनीचे 4 लक्ष 39 हजार 282 ग्राहक तर बीपीसीएल कंपनीचे 63 हजार 517 ग्राहक आहेत. जिल्ह्यात एकूण सिलिंडरचा साठा 14 हजार 352 असून त्यापैकी 7578 सिलिंडरचे वाटप तर 6774 सिलिंडर साठा उपलब्ध आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून नियमितपणे पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडर जिल्ह्यासाठी उपलब्ध होत आहे.

०००००००

इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा - पालकमंत्री डॉ. अशोक वुईके





 

इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा - पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

Ø विठ्ठल मंदिर प्रभाग येथे खोलीकरण अभियान टप्पा 2 चा शुभारंभ

 

चंद्रपूर, दि. 28 : चंद्रपूरच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. मात्र इरई नदीचे खोलीकरण दुर्लक्षित राहून गेले. त्यामुळे गतवर्षी 2025 मध्ये नदीचे खोलीकरण  करण्याचा संकल्प केला. या संकल्पचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे. ही नदी आपली आहे, आपल्या शहराची आहे, ही आपली जीवनदायी आहे, अशी भावना ठेवून चंद्रपूरकरांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभाग येथे इरई नदीचे खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला महापौर संगीता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, उपमहापौर प्रशांत दानव, मनपा स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे,  जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.,  मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभागाचे नगरसेवक भालचंद्र दानव, किरण कोतपल्लीवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, उपायुक्त संदीप चिद्रावार, सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार,  शुभांगी सूर्यवंशी, सीटीपीएसचे प्रभारी मुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे आदी उपस्थित होते.

खोलीकरणाचे  काम यावर्षी लवकर सुरू करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले,  सर्वांनी ही नदी आपली आहे, असे समजण्याची गरज आहे. खोलीकरणासाठी लोकचळवळ निर्माण व्हावी. कोणीही याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करावी. नदीच्या कामात चुका काढण्याची मानसिकता ठेवू नका. नदी ही कायम राहणार आहे, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. या नदीच्या खोलीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही तसेच कामात एका पैशाचाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, अशी ग्वाही  यावेळी  पालकमंत्री अशोक वुइके यांनी दिली. मनपाने प्रभागनुसार व यंत्रणानुसार वेळापत्रक तयार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले,  नदी ही जीवनदायीनी आहे. चंद्रपूर शहरातून ही नदी वाहते. चार किलोमीटरचा खोलीकरणाचा टप्पा  हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागामधूनच शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे कंत्राटदारांनी सर्वात प्रथम वेकोलीच्या ओव्हर बर्डनचा भाग कमी करण्याला प्राधान्य द्यावे. या भागात पूर संरक्षण भिंत बांधण्यात यावी. तसेच येथील घाटाकरिता एक कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे पूजन आणि खोलीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समितीचे सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार उपायुक्त शेषराव टाले यांनी मानले.

असा आहे खोलीकरण कामाचा दुसरा टप्पा : इरई नदी चंद्रपूर शहराला नऊ किलोमीटर समांतर वाहते. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात सन 2026 मध्ये चौराळा पूल  ते माना टेकडी असे एकूण चार किलोमीटर लांबीपर्यंत खोलीकरण करण्यात येत आहे. यात 2 लक्ष  80 हजार टीसीएम गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे. गतवर्षी 2025 मध्ये पहिल्या टप्प्यात रामसेतू पूल ते चौराळा पूल पर्यंत अडीच किलोमीटर लांबीतून एकूण 82.61 टीसीएम गाळ काढण्यात आला होता..

०००००००

Friday, 27 March 2026

28 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

 

28 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

चंद्रपूर , दि. 27 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 28 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

28 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता वन अकादमी येथे राखीव, सकाळी 9.30 वाजता चंद्रपूर येथे इरई नदीतील गाळ काढणे व साफसफाई उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 3 वाजता वन अकादमी येथे राखीव, सायंकाळी 6.30 वाजता प्रियदर्शिनी सभागृह येथे भारतीय सद्विचार प्रचारक मंडळ तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, रात्री सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

००००००

जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशाचे अद्यायावतीकरण उपक्रमात बल्लारपूरची निवड

 


जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशाचे अद्यायावतीकरण उपक्रमात बल्लारपूरची निवड

चंद्रपूर, दि. 27 : राज्यातील जमिनीचे नकाशे आणि सातबारा यामधील तफावत दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय योजना 2024-25 अंतर्गत महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशा अद्ययावत करण्याच्या पथदर्शी प्रकल्पासाठी नागपूर विभागातील बल्लारपूर तालुक्याची पहिल्या टप्यात निवड करण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुक्यांची या प्रकल्पासाठी निवड झाली असून एकूण 18 तालुक्यामध्ये हा अद्ययावतीकरणाचा उपक्रम राबविला जाणार आहे. जमिनीच्या सध्याच्या धारकाप्रमाणे पोटहिस्सा मोजणी करून शासकीय अभिलेख अद्ययावत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

निवड झालेल्या बल्लारपूर तालुक्यातील 5 गावांची या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये 1) आष्टी 2) कळमना 3) जोगापूर 4) कोर्टामक्ता 5) कोर्टातुकुम या गावांचा समावेश आहे. बल्लारपूर तालुक्यात निवडलेल्या पाचही गावातील सर्व्हे नंबरचे नकाशे, गटनकाशे, टिपण आणि पोटहिस्सा नकाशे यांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या डिजीटल डेटाची पडताळणी देखील पूर्ण झाली असून पूढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे भुमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक प्रदीप जगताप यांनी सांगितले. तसेच सर्व खातेदारानी पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भूमि अभिलेख बल्लारपूरचे उपअधिक्षक अनिल देशमुख यांनी केले आहे.

प्रकल्पाचे फायदे : 7/12 आणि नकाशा यातील विसंगती संपल्यामुळे जमिनीचे व्यवहार पारदर्शक होतील. पोटहिस्सा मोजणीमुळे जमिनीच्या सिमावरून होणारे वाद कमी होतील. शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा अचुक डिजीटल नकाशा उपलब्ध होईल.

 

००००००

Thursday, 26 March 2026

सन 2026-27 चा जिल्ह्यासाठी वार्षिक पत आराखडा मंजूर ; 9 हजार कोटींचे उद्दिष्ट



सन 2026-27 चा  जिल्ह्यासाठी वार्षिक पत आराखडा  मंजूर ; 9 हजार कोटींचे उद्दिष्ट

चंद्रपूर , दि. 26 : आर्थिक वर्ष 2026-27 साठी जिल्ह्याचा वार्षिक पत आराखडा (अन्युअल क्रेडिट प्लान) जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत बुधवारी (दि. 25) मंजूर करण्यात आला. या आराखड्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 9 हजार कोटी रुपयांचे पत वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

मंजूर आराखड्यानुसार कृषी क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले असून पीक कर्जाचे उद्दिष्ट 1350 कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच कृषी मुदत कर्ज 1400 कोटी, असे एकूण कृषी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 2750 कोटी रुपये ठरविण्यात आले आहे.याशिवाय, प्राधान्य क्षेत्रासाठी (प्रायोरिटी सेक्टर) 5690 कोटी रुपये तर बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी (नॉन प्रायोरिटी सेक्टर) 3310 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

राज्य शासनाच्या विविध योजनांशी संलग्न राहून शेतकरी, महिला बचत गट, लघु उद्योजक आणि स्वयंरोजगार यांना कर्जपुरवठा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.  ग्रामीण भागातील आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि वित्तीय समावेशन वाढविणे, हा या आराखड्याचा मुख्य उद्देश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना :

सर्व बँकांनी दिलेल्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करावे. यावर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे, त्यामुळे बँकांनी जास्तीत जास्त शेतक-यांना पुढील हंगामासाठी कर्जवाटप करावे. तसेच मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी योजनेमध्ये खाजगी बँकांनी आपला सहभाग वाढवावा. जिल्ह्यातील विविध वित्तीय महामंडळांकडून आलेली लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढावी. मत्स्यव्यवसाय करणा-या मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष पोरकुटे, नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा उद्योग केंद्राचे उपमहाव्यवस्थापक श्री. खरमाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

Wednesday, 25 March 2026

जिल्हाधिका-यांकडून बँकर्स प्रतिनिधींचा आढावा

 जिल्हाधिका-यांकडून बँकर्स प्रतिनिधींचा आढावा

चंद्रपूर दि. 25 : डिसेंबर 2025 पर्यंत संपलेल्या तिमाहीत जिल्ह्यातील बँकांनी केलेल्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.25) घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष पोरकुटे, नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा उद्योग केंद्राचे उपमहाव्यवस्थापक श्री. खरमाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावर्षी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे, त्यामुळे बँकांनी जास्तीत जास्त शेतक-यांना पुढील हंगामासाठी कर्जवाटप करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सर्व बँकांना दिले. तसेच मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी योजनेमध्ये खाजगी बँकांनी आपला सहभाग वाढवावा. जिल्ह्यातील विविध वित्तीय महामंडळांकडून आलेली लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढून त्यांना दिलासा द्यावा. विनाकारण कर्ज प्रकरणे अडवून ठेवू नये. मत्स्यव्यवसाय करणा-या मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. पोरकुटे यांनी डिसेंबर 2025 पर्यंतचा सर्व बँकांचा आढावा, शासकीय योजनांची प्रगती, कर्जवाटप, थकबाकी आदींबाबत सादरीकरण केले.

००००००