सिमांकन करून शिवपाणंद रस्ता मोकळा करण्यात येईल
Ø म्हसली (विलम) येथील अतिक्रमणाबाबत नागभीड तहसीलदारांचे स्पष्टीकरण
चंद्रपूर, दि. 07 : नागभीड तालुक्यातील म्हसली (विलम) येथील शेतात जाणा-या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतकरी वसंत गुरपुडे यांनी रस्त्यासाठी उपोषण केले होते. याप्रकरणाची तात्काळ दखल घेऊन नागभीड तहसीलदार यांनी कार्यवाही करीत भुमी अभिलेख विभागाकडून सिमांकन करण्याचे आदेशित केले. सिमांकन झाल्यानंतर, रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येऊन सदर रस्ता मोकळा करण्यात येईल, असे नागभीडचे प्रभारी तहसीलदार उमेश कवळे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या आश्वासनानंतर श्री. गुरपुडे यांनी उपोषण मागे घेतले आहे.
विलम येथील गट क्र. 203/1 च्या शेतजमिनीला जाण्याच्या रस्त्यावरून पाण्याचा पाट काढल्याने, शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याचा अर्ज वसंत गुरपुडे यांनी नागभीड तहसील कार्यालय येथे केला. या अर्जाची दखल घेऊन मेंढा किरमीटीचे मंडळ अधिकारी व ग्राम महसुल अधिका-यांना मौका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. भुमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी केल्याशिवाय सदर रस्ता किंवा पाण्याचा प्रवाह सरळ करता येऊ शकत नाही, असा अहवाल मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिका-यांनी सादर केला.
त्यानुसार भुमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीसाठी 4 ऑगस्ट रोजी कळविण्यात आले. मात्र मोजणी प्रकरणातील सर्व तारखा निर्गमित झाल्या असून मोजणी प्रकरणाचे नोटीस संबंधितांना देण्यात आल्यामुळे तात्काळ भुकरमापक कर्मचारी उपलब्ध नाही. मात्र या प्रकरणात 10 ऑगस्ट रोजी मोक्यावर उपस्थित राहून पाणंद रस्त्याची मोजणी करण्यात येईल, असे भुमी अभिलेख कार्यालयाने कळविले.
त्यानुसार आता 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता म्हसली (विलम) येथील अतिक्रमीत रस्त्याची ग्रामपंचायत सचिव व रोजगार सेवकांच्या उपस्थितीत मोजणी होणार आहे. मोजणीच्या वेळी शिवपाणंद रस्त्यावर ज्याचे अतिक्रमण आढळून येईल, त्यांचे अतिक्रमण काढून रस्ता पुर्ववत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे नागभीडचे तहसीलदार श्री. कवळे यांनी म्हटले आहे.
०००००००

No comments:
Post a Comment