Search This Blog

Friday, 31 July 2026

सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा - गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 



सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा - गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

Ø जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 30 : आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्याचा चांगला आणि वाईट अशा दोन्हीप्रकारे उपयोग करता येतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सायबर गुन्हे वाढत असून सामान्य नागरिकांचे हक्काचे पैसे परस्पर वळविण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. सोबतच अंमली पदार्थाची तस्करी, वाहतूक, विक्री आणि सेवन ही सुध्दा अतिशय गंभीर बाब आहे. या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिस यंत्रणेने विशेष लक्ष देऊन सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ संबंधित गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

पोलिस अधिक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, अतिरिक्त्‍ पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.

सायबर फसवणुकीचे तसेच अंमली पदार्थसंबंधित गुन्हे, हे अतिशय गंभीर विषय आहेत, असे सांगून गृह राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य माणसांच्या हक्काचे पैसे परस्पर दुस-या खात्यात वळविले जातात. त्यामुळे पीडितांचे मोठे आर्थिक नुकसान होते. सोबतच त्यांना मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतो. या पैशाची परतफेड करणे एक आव्हान असते. त्यामुळे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत समाजात जास्तीत जास्त जनजागृती करावी. जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी, वाहतूक, विक्री व सेवन होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. आपापल्या पोलिस स्टेशनच्या क्षेत्रात असे गुन्हे घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

चंद्रपूर हा औद्योगिक आणि राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. त्यामुळे गोवंश तस्करी / हत्या रोखण्यासाठी सीमेवरील नाक्यांवर कडक तपासणी करावी. आवश्यक असल्यास तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियेाजन करावे. नाक्यावरील पथकांद्वारे योग्य कारवाई होते की नाही, हे तपासण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी तेथे अकस्मिकपणे भेटी द्याव्यात. गावागावातील पोलिस पाटलांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना, त्यांच्या जबाबदा-या आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, याबाबत मार्गदर्शन करा, अशा सुचना गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी केल्या.

वेगवेगळ्या घटनेत नागरिकांचे हरविलेले 105 मोबाईल, गत एका महिन्यात पोलिसांनी शोधून काढले आहेत. सदर मोबाईल गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले. यात अनिकेत दुमारकर, प्रेम किटे, मंगेश फटिंग आदींचा समावेश होता.

पोलिसांनी संवादी व्हावे : महिला आणि तरुण मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक अतिशय महत्वाचे आहे. या पथकाने बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात तसेच महिलांची गर्दी असलेल्या इतरही ठिकाणी गस्त वाढवावी. जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल. तसेच पोलिस यंत्रणेने आपले गुप्त खब-यांचे जाळे वाढवावे. नागरिकांशी नियमितपणे संवाद साधला तर ब-याच गोष्टींची माहिती पोलिसांना प्राप्त होते. वरिष्ठ पोलिस अधिका-यांसोबत इतर पोलिसांचा आणि कर्मचा-यांचासुध्दा चांगला संवाद असणे गरजेचे आहे, असेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. 

पोलिस अधिक्षकांनी केले सादरीकरण : यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी सादरीकरणातून उपलब्ध मनुष्यबळ, जिल्ह्यातील क्राईम रेट, दाखल गुन्ह्यांची माहिती, अपघात व त्यात होणा-या मृत्युची संख्या कमी करण्यात पोलिसांना आलेले यश, अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, मोक्काची प्रकरणे, गोवंश प्रकरणे, तडीपारची प्रकरणे, सायबर गुन्हे, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, चारित्र्य प्रमाणपत्र वाटप, स्वसंरक्षणासाठी घेण्यात आलेले प्रशिक्षण, वाहतूक नियम जनजागृती आदींबाबत माहिती दिली.

०००००००

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीबाबत अधिकृत सुचनांवर विश्वास ठेवा

 

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीबाबत अधिकृत सुचनांवर विश्वास ठेवा

Ø जिल्हा महिला व बालविकास विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 31 : महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांची भरती महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमावलीनुसार व शासन निर्णयानुसार पूर्णपणे गुणवत्ता आधारित, पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने करण्यात येत आहे. प्रक्रियेत निवड करून देण्याचे, गुणवत्तेत वाढ करून देण्याचे, नियुक्ती मिळवून देण्याचे किंवा कोणत्याही प्रकारचे आश्वासन देणाऱ्या व्यक्ती, एजंट, दलाल अथवा मध्यस्थ यांच्या भूलथापांना बळी पडू नये.

तसेच कोणत्याही व्यक्तीस भरतीसाठी पैसे, भेटवस्तू किंवा इतर कोणताही आर्थिक मोबदला देऊ नये. अशा प्रकारचा व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यास महिला व बाल विकास विभाग कोणत्याही परिस्थितीत मान्यता देत नाही.  भरती प्रक्रिया केवळ शासनाने निश्चित केलेल्या पात्रता, गुणवत्ता गुणांकन, कागदपत्र पडताळणी व नियमानुसारच पार पडणार आहे. कोणत्याही व्यक्तीच्या शिफारशीमुळे अथवा आर्थिक व्यवहारामुळे उमेदवाराची निवड होणार नाही. जर कोणतीही व्यक्ती अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदावर नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करत असेल किंवा फसवणुकीचा प्रयत्न करत असेल, तर संबंधित उमेदवारांनी तात्काळ महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करावी.

सर्व उमेदवारांनी अधिकृत जाहिरात, शासन निर्णय आणि विभागाकडून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनावर विश्वास ठेवावा. अफवा, सोशल मिडियावरील अप्रमाणित संदेश किंवा अनधिकृत व्यक्तींच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे यांनी केले आहे.

००००००

Thursday, 30 July 2026

31 जुलै रोजी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


31 जुलै रोजी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 30 : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे 31 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

31 जुलै रोजी दुपारी 1.15 वाजता वरोरा येथे आगमन व आमदार करण देवतळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 2.30 वाजता चंद्रपूर येथे आगमन व पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गृह विभागाशी संबंधित कामकाजाचा आढावा, दुपारी 3 वाजता पोलिस अधिक्षक कार्यालय येथे खनिकर्म विभागाशी संबंधित कामकाजाचा आढावा, दुपारी 4 वाजता बल्लारपूर येथील गोंडराजे बल्लाळशहा नाट्यगृहात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, सायंकाळी 6 वाजता बल्लारपूर येथून वर्धा कडे प्रयाण.

००००००

कर्जमुक्ती योजनेसाठी पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य


कर्जमुक्ती योजनेसाठी पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य

चंद्रपूर, दि. 30 : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत गाव पातळीवर प्रसिद्ध झालेल्या व्यापारी बॅकांच्या यादीतील एनपीएनुसार कर्जमाफीस पात्र रक्कमेबाबत शासनाने स्पष्ट केले आहे की, गाव पातळीवर प्रसिद्ध केलेली यादी व योजनेच्या पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या थकबाकी रक्कमेत फरक असल्यास योजना पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी.

कर्जमाफी व एकवेळ समझोता घटकाकरिता योजनेच्या पोर्टलवर राज्यातील बँकांनी एकूण 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती सादर केली आहे. बँकेमार्फत सादर केलेल्या कर्जखात्यांचे महा-आयटीमार्फत संगणकीय संस्करण करून 25 जुलै 2026 रोजी एकूण 16.96 लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 7.03 लाख कर्जखाती व व्यापारी बँकांकडील 9.93 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे. सदर योजनेतील गाव पातळीवर प्रसिध्द झालेल्या याद्यामध्ये, व्यापारी बँकांमधील एनपीए खातेदार शेतक-यांच्या नावासमोर दर्शविलेल्या थकबाकी रक्कम तसेच योजनेच्या पोर्टलवरील रकमेत फरक असल्याचे निदर्शनास आले आहे

त्यामुळे गाव पातळीवर प्रसिद्ध केलेली यादी व योजनेच्या पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या थकबाकी रक्कमेत फरक असल्यास योजना पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी. पोर्टलवर दिसणारी शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. शासनाने सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरच्या व्याजाची रक्कम न आकारणाच्या सुचना दिलेल्या आहेत व सर्व बँकांनी त्या मान्य असल्याचे लेखी कळविले आहे. शेतकऱ्यास योजनेच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास त्यांनी आधार प्रमाणीकरण करावे.

आधार प्रमाणीकरण केल्यानंतर प्रमाणीकरण यशस्वी झाल्याची पावती शेतक-यांना प्राप्त होणार आहे. या पावतीमध्ये शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणाऱ्या रक्कमेची माहिती उपलब्ध आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर 31 मार्च 2026 वरील कर्जबाकीच्या लाभाची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यास कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल. कर्जमुक्ती झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेच्या शाखेत व विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये लावण्यात येतील. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना संबंधित बँकेमार्फत खरीप पीक कर्जाची उपलब्धता होणार आहे.

योजनेच्या पोर्टलवरील रक्कम किंवा पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत इतर कोणताही तपशील शेतकऱ्यास अमान्य असल्यास त्याने पोर्टलवर तक्रारीची नोंद करावी. सदर तक्रारीचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत केले जाईल, असे राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांच्या पत्रात नमुद असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.

०००००००

जात पडताळणी प्रमाणपत्र त्रुटीपूर्तता करण्यासाठी विशेष शिबीर


 जात पडताळणी प्रमाणपत्र त्रुटीपूर्तता करण्यासाठी विशेष शिबीर

Ø 31 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजन

चंद्रपूर, दि. 30 : शैक्षणिक, व्यावसायिक व इयत्ता 12 वी विज्ञान तसेच सेवा प्रकरणी जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज दाखल केलेल्या ज्या अर्जदारांची प्रकरणे अपुर्ण पुराव्याअभावी त्रुटीमध्ये आली आहेतख्‍ त्यांना त्रुटीचे ई-मेल ऑनलाईन प्रणालीद्वारे  पाठविण्यात आले आहेत. तसेच त्रुटीपुर्ततेकरिता पत्रव्यवहार सुध्दा करण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना प्रकरण सादर करून 20 दिवसांचा कालावधी झाला आणि त्यांना अद्याप जातवैधता प्रमाणपत्र ई-मेल द्वारे अप्राप्त आहे. तसेच जे अर्जदार ई-मेल आणि त्रुटीबाबत अनभिज्ञ आहेत, अशा अर्जदारांसाठी 31 जुलै  ते 7 ऑगस्ट 2026 (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून) दरम्यान त्रुटीपूर्तता शिबिराचे आयोजन केले आहे.

ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज दाखल केले आहे, परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांची प्रकरणे त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी दिलेल्या दिनांकास किंवा त्यापुर्वी अर्जाची सद्यस्थिती जाणू घेऊन त्रुटीपुर्तता करून घ्यावी. त्रुटीपुर्ततेअभावी आपला जातीदावा समितीकडुन फेटाळण्यात आल्यास किंवा प्रकरण नस्तीबध्द केल्यास, तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी आणि सेवेसाठी अपात्र ठरल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार उमेदवारांची राहील.         

तरी प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्राअभावी येणाऱ्या अडचणींचा विचार करता, वेळेच्या आत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करावा आणि प्रकरण त्रुटीमध्ये असल्यास त्रुटीची पुर्तता करून घ्यावी. जेणेकरून सत्र 2026-27 मध्ये प्रवेशाकरीता कुठल्याच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ येणार नाही, असे समितीचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.

००००००

Wednesday, 29 July 2026

जिल्ह्यातील 80 शेतक-यांना सलोखा योजनेचा लाभ

 

जिल्ह्यातील 80 शेतक-यांना सलोखा योजनेचा लाभ

Ø नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची योजना

चंद्रपूर, दि. 29 : शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतक-यांमधील आपसी वाद मिटविण्यासाठी तसेच समाजामध्ये सालोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी राज्य शासनाने सलोखा योजना जाहीर केली आहे. चंद्रपूर जिल्हयातील एकूण 16 सह दुय्यम निबंधक कार्यालयात एप्रिल2025 ते जुलै-2026 पर्यंत एकुण 80  शेतक-यांनी सलोखा योजनेचा लाभ घेतला आहे.

शासन किंवा संबंधित विभागामार्फत वाद, तंटे टाळून परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी तयार केलेली ही शासकीय योजना आहे. अशा योजनांचा उद्देश म्हणजे लोकांनी न्यायालयीन प्रक्रिया टाळून वाद, तंटे आपसात किंवा स्थानिक प्राधिका-यांच्या मदतीने मिटवणे हा होय. महाराष्ट्रामधील अनेक जिल्हयात जमिनीच्या वादाबाबतची असंख्य प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यत: मालकी हक्काबाबतचे वाद, शेतबांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरून होणारे वाद, भावा-भावांतील वाटणीचे वाद असे अनेक विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे. सदर वादांमुळे पिढयांचे नुकसान झाले असून, आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत आहे.

महाराष्ट्र शासनाकडून 3 जानेवारी 2023 रोजी सलोखा योजना जाहीर करण्यात आली होती. शासन निर्णयामध्ये सदर योजनेचा कालावधी दोन वर्षाचा असून, सदर योजना 2 जानेवारी 2025 रोजी संपुष्टात आली होती.  पुन्हा एकदा या योजनेस 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडून शेतजमीन संदर्भातील दाखल होणा-या संलेखावर मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क या सवलतीच्या सेवेचा लाभ देण्यात येत आहे.

सदर वाद संपुष्टात येवून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकामेकांतील सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे, यासाठी शासनाने शेत जमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी फी 1 हजार रुपये आकारण्यातबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्यास मान्यता दिली. त्यानुसार आतापर्यंत चंद्रपूर जिल्हयातील एकूण 16 सह दुय्यम निबंधक कार्यालयात एप्रिल 2025 ते जुलै 2026 पर्यंत 80 शेतक-यांनी लाभ घेतला आहे.

०००००००

आदिवासी विद्यार्थ्यांनी तयार केले 2 लाख सीडबॉल


 

आदिवासी विद्यार्थ्यांनी तयार केले 2 लाख सीडबॉल

Ø रिमझीम पावसात जंगल, डोंगर व मोकळ्या जागांवर सीडबॉलचा वर्षाव

Ø पर्यावरण संवर्धनासाठी आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम

चंद्रपूर, दि. 29 : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत येणा-या 8 शासकीय आश्रमशाळा व 24 अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल 2 लाख सीडबॉल तयार केले.

आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले अतूट संबंध, जंगलाबद्दलची आत्मियता आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा लक्षात घेऊन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आखण्यात आला. आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून पर्यावरणाचे रक्षण करणे ही त्यांची जीवनशैली आहे. या संस्कारांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये अधिक दृढ व्हावी आणि त्यांच्यामध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

गेल्या काही वर्षांत वाढती जंगलतोड, कमी होत जाणारे वनक्षेत्र, बदलते हवामान आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ वृक्षारोपण न करता नैसर्गिकरीत्या वृक्षसंवर्धनाला चालना देणाऱ्या सीडबॉल संकल्पनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मार्च महिन्यापासूनच संपूर्ण नियोजन सुरू करण्यात आले.

शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या फावल्या वेळेत कडुलिंब, सुबाभूळ, सीताफळ, जांभूळ, आंबा तसेच विविध स्थानिक वृक्षांच्या बियाण्यांचे संकलन करण्यात आले. त्यानंतर माती, शेणखत आणि बियाण्यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या हस्ते सीडबॉल तयार करण्यात आले. प्रत्येक शाळेला 5 हजार ते 10 हजार सीडबॉल तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.

या उपक्रमात मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून घेत अत्यंत उत्साहाने सीडबॉल तयार केले. या सामूहिक प्रयत्नातून प्रकल्पांतर्गत सर्व आश्रमशाळांनी मिळून सुमारे 2 लाख सीडबॉल तयार करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

28 जुलै रोजी रिमझिम पावसाच्या साक्षीने सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांच्या परिसरात, मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा, डोंगराळ भागात, जंगल परिसरात तसेच गावातील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात सीडबॉलचे विसर्जन केले. पावसाच्या पाण्यामुळे या सीडबॉलमधील बियाणे अंकुरित होऊन त्यांचे रोपट्यांमध्ये रूपांतर होईल आणि भविष्यात हजारो वृक्ष उभे राहण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या श्रम, सहभाग आणि निसर्गप्रेमातून उभी राहिलेली ही हरित मोहीम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, भविष्यात चंद्रपूर जिल्ह्याचा हरित वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचे योगदान देईल. हा उपक्रम दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्व आश्रमशाळांमध्ये नियमितपणे राबविण्यात येणार असून पुढील वर्षी 5लाख सीडबॉल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सांगितले.

०००००००

विद्या समिक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती बंधनकारक

 विद्या समिक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती बंधनकारक

चंद्रपूर, दि. 29 : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती, विद्या समिक्षा केंद्र ऑनलाईन प्रणालीवरच नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर थेट नियंत्रण ठेवणे, उपस्थितीचे अचुक विश्लेषण करणे, आणि शालेय प्रशासनात पारदर्शकता वाढविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षकांनी उपस्थिती नोंदवितांना कोणत्याही तांत्रिक त्रुटी किंवा विलंब टाळण्यासाठी गुगल प्ले स्टोरवरून अधिकृत विद्या समिक्षा केंद्र ॲप  डाऊनलोड करून त्याचा वापर करावा.

इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वीप्ट चॅट या अप्लीकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बॉट द्वारे सर्व वर्गशिक्षकांनी नोंदवावी. सर्व 100 टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे शाळा सुरु झाल्यानंतर ऑफलाईन हजेरी लगेच भरण्यात येते, त्याचप्रमाणे ऑनलाईन उपस्थिती लगेच भरण्यात यावी.

मागील वर्षी  विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर होता. यावर्षी सुध्दा आपला जिल्हा प्रथम क्रमांक राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यात यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

००००००

‘पीएम श्री’ शाळांच्या धर्तीवर जिल्ह्यातील 30 शाळांचा होणार कायापालट

 ‘पीएम श्री’ शाळांच्या धर्तीवर जिल्ह्यातील 30 शाळांचा होणार कायापालट

चंद्रपूर, दि. 29 : ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या 18 व दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या 12 अशा एकूण 30 शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने, इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील, अशा शाळा विकसित करावयाच्या आहेत. पीएम श्री शाळामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशीच्या अनुषंगाने उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

           पीएम श्री योजना ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मुख्य सहा स्तंभावर आधारीत आहे. यात 1) अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र पध्दती व मूल्यमापन 2) प्रवेश आणि पायाभूत सुविधा 3) मानव संसाधन व शालेय नेतृत्व विकास 4) समावेशन आणि लिंग समभाव 5) व्यवस्थापन, सनियंत्रण व प्रशासन 6) लाभार्थ्यांचे समाधान.

चंद्रपूर जिल्हयातील पीएम श्री शाळांना केंद्रस्तरीय, राज्यस्तरीय अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत. त्यानुसार सदर 30 शाळांना नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष, शिक्षण उपसंचालक, डाएटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथ/प्रशासन अधिकारी), शिक्षणाधिकारी (माध्य), शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद, चंद्रपुर व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी/गटशिक्षणाधिकारी भेटी देऊन शाळांची तपासणी व मार्गदर्शन करणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख यांनी कळविले आहे.

००००००

वेठबिगार कामगार कामावार ठेवल्यास करता येईल तक्रार


वेठबिगार कामगार कामावार ठेवल्यास करता येईल तक्रार

Ø  सहायक कामगार आयुक्त यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 : वेठबिगारांना वेठबिगारीतून मुक्त करून त्यांचे पुर्नवसन करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने वेठबिगार पध्दत (निर्मुलन) अधिनियम-1976 लागू केला आहे. या कायद्याचे उल्लंघन करणा-या मालकाविरुध्द तक्रार करण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

वेठबिगार कामगार म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध वेठबिगारी करणारा पुरुष/स्त्री अथवा बालकामगार अथवा वेठीस धरलेला व बिगारी कामे करणारा. सहसा अशा व्यक्तीने, स्वतः अथवा त्याच्या जवळचे नातेवाईकाने उधार अथवा अग्रीम म्हणून रक्कम अथवा वस्तू घेतलेली असते. ती रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने त्याला अथवा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला, त्या रकमेची परतफेड म्हणून, आवश्यक पूर्तता होईपर्यंत सांगितलेली कामे करावी लागतात.

वेठबिगार पध्दत (निर्मुलन) कायद्याचे उल्लंघन करणा-या मालकाला/व्यक्तीला तीन वर्षापर्यंतचा कारावास आणि 2 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच वेठबिगार कामगार पद्धती (निर्मूलन) अधिनियम 1976 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने 14 मे 2026 रोजी सुधारीत मानक कार्यपद्धती प्रकाशित केलेली असून त्याची अंमलबजावणी करण्याकरीता महसूल व कामगार विभागाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वरीलप्रमाणे वेठबिगार कामगार, कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्ह्यातील कामगारांनी/नागरिकांनी/समाजसेवी संस्थेने जिल्हाधिकारी, चंद्रपूर, स्थानिक पोलिस स्टेशन, जिल्ह्यातील उपविभागिय अधिकारी तसेच सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे प्रत्यक्षात, पोष्टाद्वारे  किंवा assttcommrchd@gmail.com ई-मेलद्वारे तक्रार करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्र.भि. कावळे यांनी केले आहे.

००००००

3 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

 3 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

चंद्रपूर, दि.29 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येते. तसेच दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तक्रारदारांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे व तालुकास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निकाली निघाल्यानंतर व समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावे.

ऑगस्ट 2026 महिन्याचा पहिला सोमवार 3 ऑगस्ट रोजी येत असल्याने या दिवशी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी 2 प्रतीत अर्ज सादर करावा. तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, तद्नंतरच तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

सैनिक कल्याण विभागातर्फे विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

सैनिक कल्याण विभागातर्फे विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 : सन 2025-26 या वर्षासाठी विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित असून सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त प्रकरणांची छाननी करून विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येईल. इयत्ता 10 वी बोर्डाच्या परिक्षेत 90 टक्के व 12 वी बोर्डाच्या परिक्षेत 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या दहा माजी सैनिक/ विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी 20 हजार रुपये, तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक /पत्नी / पाल्य यांना एकरकमी 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.

तसेच आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक /विधवा यांच्या पाल्यांना 1 लक्ष रुपये, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इ. यांना त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 50 हजार रुपयांचा पुरस्कार, जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या मार्फत प्रदान करण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक/ पत्नी/ पाल्य/ विधवा यांनी विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आपले प्रस्ताव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 15 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व संबंधित माजी सैनिक / विधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर यांनी केले आहे.

०००००

Tuesday, 28 July 2026

29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Ø जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश

चंद्रपूर, दि. 28 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, तसेच जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सदर आदेश जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले असून नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय 07172 - 250077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आदेशात नमूद आहे.

०००००००

29 व 30 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

 

29 व 30 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

Ø नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 29 व 30 जुलै 2026 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : अति मुसळधार पावसात नागरिकांनी घरात आश्रय घ्यावा, मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्यापासून दूर राहावे, रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळावे, खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवू नये, पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहावे.

वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करू नये : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे सोबतच मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असेल तर ते ओलांडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी  वसुमना पंत यांनी केले आहे.

०००००००

पात्र शेतक-यांसाठी आधार ई-केवायसी पूर्णपणे मोफत


पात्र शेतक-यांसाठी आधार ई-केवायसी पूर्णपणे मोफत

Ø ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’

चंद्रपूर, दि. 28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026’ सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. सदर प्रक्रिया राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत करण्यात येत असून शेतक-यांना आता आधार ई-केवायसी करीता कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. कर्जमुक्तीसाठी आधार ई-केवायसी शासनाने पूर्णपणे मोफत केली आहे.  

ई-केवायसी सेवेसाठी संबंधित केंद्रचालकांना स्वतंत्रपणे सेवा शुल्क अदा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रामार्फत करण्यात आलेल्या यशस्वी  ई-केवायसी संख्येच्या आधारे, लागू सेवा शुल्काची गणना करून महाआयटी मार्फत प्रत्येक महिन्याच्या अखेरीस संबंधित केंद्र चालकाच्या खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्यात येईल. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अथवा केंद्रचालकांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना असून सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणावर ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी सुविधा पूर्णतः विनामूल्य असल्यामुळे ‘आपले सरकार सेवा केंद्रांना’ स्पष्ट सूचना देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे.

यात 1) ई-केवायसी साठी कोणत्याही शेतकऱ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे शुल्क घेण्यात येऊ नये. 2) प्रत्येक संबंधित केंद्रावर ई-केवायसी सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे, असा सूचना फलक दर्शनी भागात लावण्यात यावा. 3) कोणत्याही केंद्रचालकाकडून शेतकऱ्यांना ई-केवायसी साठी शुल्क आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा असे निदर्शनास आल्यास सदर बाबीची तात्काळ पडताळणी करून संबंधितांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 4) जिल्हा व तालुका स्तरावर या प्रक्रियेचे नियमित संनियंत्रण करण्यात यावे व ई-केवायसी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

वरील सुचनांची सर्व संबंधित यंत्रणा व आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांच्या आदेशात नमुद असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.

००००००

एसआयआर मोहिमेंतर्गत प्रारुप मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी पुन्हा एक संधी


 एसआयआर मोहिमेंतर्गत प्रारुप मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी पुन्हा एक संधी

Ø 17 ऑगस्ट ते 16 सप्टें. 2026 पर्यंत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध

चंद्रपूर, दि. 28 : राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (एसआयआर) कार्यक्रम चालू असून सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी गृहभेटीस येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून द्यावयाचा आहे. गणना अर्ज भरून व त्यावर स्वाक्षरी करून दिलेल्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील.

ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाहीत किंवा जे नवमतदार असतील त्यांच्यासाठी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026  या कालावधीत, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत सदर अर्जाची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.

या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरू शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरून हरकत घेऊ शकेल. मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा/विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती एका वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. सबब, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहीत नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया आहे व कलम 23 (3) नुसार अशा सुधारणा कोणत्याही निवडणुकांसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत करता येतात, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, म.रा. यांनी कळविले आहे.

००००००

25 सिंधी विस्थापितांना जमीन नियमानुकूलचे आदेश वाटप


 25 सिंधी विस्थापितांना जमीन नियमानुकूलचे आदेश वाटप

Ø विशेष अभय योजनेंतर्गत दिलासा

चंद्रपूर, दि. 28 : सिंधी वसाहतींमधील सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल करण्यासाठी आणि त्यांना फ्री-होल्ड (भोगवटादार वर्ग-1 / सत्ताप्रकार-अ) करण्यासाठी ‘विशेष अभय योजना-2025’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील 25 सिंधी विस्थापितांना जमीन नियमानुकूलचे आदेश वाटप छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात करण्यात आले.

पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी विस्थापितांचे निर्वासित इसम (नुकसान भरपाई व पुनर्वसन) अधिनियम, 1954 व तदनुषंगिक नियमांनुसार पुनर्वसन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने सदर कायद्याच्या कलम 34 नुसार आपले अधिकार सन 1971 पासून महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहेत. 24 जानेवारी 1973 शासन अधिसुचनेनुसार राज्यात भरपाई संकोष मालमत्ता घोषित करण्यात आलेल्या आहेत. सदर भूखंडांच्या अधिकार अभिलेखात भोगवटादार वर्ग-2 अथवा ब/ब-1/ब-2 सत्ता प्रकार अशा नोंदी असल्याने व विस्थापितांकडे जुने पुरावे नसल्याने अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी महसूल व वन विभागाने शासन निर्णय 15 मे 2025 अन्वये ‘विशेष अभय योजना-2025’ लागू केली आहे.

 योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व सवलती : सद्यःस्थितीत निवासी वापरासाठी असलेल्या जमिनीकरिता 2.5 टक्के आणि वाणिज्यिक वापराच्या जमिनीकरिता 5 टक्के सवलतीचे अधिमूल्य आकारण्यात येत आहे.

ग्राह्य पुरावे : रेफ्युजी कार्ड, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, घरपट्टी/पाणीपट्टी पावती, वीज बिल, ताबेपावती, मतदार ओळखपत्र, मालमत्ता पत्रक, 7/12 नोंदी इत्यादी पुरावे ग्राह्य धरले जातात.

सदर शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार चंद्रपूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी व पुराव्यांची सखोल पडताळणी करून चंद्रपूर तालुक्यातील एकूण 25 पात्र सिंधी विस्थापित अतिक्रमणधारकांना जमिनीचे शर्तभंग नियमानुकूल करून फ्री-होल्ड करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने वाटप करण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन : ‘विशेष अभय योजना-2025’ ही 15 मे 2027 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी लागू आहे. चंद्रपूर तालुक्यातील ज्या सिंधी विस्थापित नागरिकांनी/धारकांनी अद्याप आपले निवासी व वाणिज्यिक भूखंड नियमानुकूल व फ्री-होल्ड करून घेतलेले नाहीत, त्यांनी आवश्यक दस्तऐवजांसह तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे त्वरित संपर्क साधून  या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

००००००

सुधारीत निकषानुसार भरावे लागणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज


 सुधारीत निकषानुसार भरावे लागणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज

Ø अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2026 पर्यंत

चंद्रपूर, दि. 28 : माहिती व तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभागाने ग्रामपंचायत स्तरावरील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी सुधारीत गुणांकन पध्दती लागू केल्यामुळे जिल्ह्यातील 633 ग्रामपंचायत स्तरावरील सदर केंद्र मंजुरीसाठी नव्याने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2026 आहे.

 यापूर्वी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी 2 मार्च 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून 20 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र व अपात्र अर्जदारांची प्रारूप यादी 2 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्याच्या www.chanda.nic.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या 9 जुलै 2026 च्या पत्रान्वये मंजुरीसाठीच्या गुणांकन निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुधारित गुणांकन पद्धती लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वी राबविण्यात आलेली मंजुरीची प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील, शासनाने विहित केलेल्या सुधारित अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सुधारीत निकषानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर रिक्त सेवा केंद्रांची ग्रामपंचायतनिहाय यादी, अर्जाचा नमुना, सुधारित अटी व शर्ती तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती www.chanda.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, व संबंधित तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक व परिपूर्ण भरून, आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 27 July 2026

43968 पात्र शेतक-यांच्या याद्या जिल्ह्याला प्राप्त


 

43968 पात्र शेतक-यांच्या याद्या जिल्ह्याला प्राप्त

Ø पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 27 : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत आतापर्यंत 43 हजार 968 पात्र शेतक-यांच्या याद्या चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 36 हजार 757 तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 7211 शेतक-यांचा समावेश आहे. कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी (दि.27) आढावा घेतला.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण,ॲग्रीस्टॅक नोंदणी व इतर आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण त्वरीत करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते एकमेकांशी लिंक नाहीत, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी विलंब न करता आवश्यक बाबी पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा निबंधक (सहकारी संस्था), जयसिंग राजपुत, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष सोनोने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर आदी उपस्थित होते.

०००००००

28 व 29 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी


28 व 29 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Ø नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 27 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 28 व 29 जुलै 2026 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : अति मुसळधार पावसात नागरिकांनी घरात आश्रय घ्यावा, मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्यापासून दूर राहावे, रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळावे, खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवू नये, पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहावे.

वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करू नये : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

वादळ, वारा, मुसळधार व अतिमुसळधार पावसात नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  वसुमना पंत यांनी केले आहे.

०००००००

Sunday, 26 July 2026

आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदाची परीक्षा २ ऑगस्टला


आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदाची परीक्षा २ ऑगस्टला

Ø सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. २६ : आदिवासी विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधील गट-ड संवर्गातील चौकीदार पदाच्या ४७८ रिक्त जागांसाठी दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार होती. मात्र, परीक्षार्थींकडून प्राप्त झालेल्या परीक्षा केंद्र बदलाबाबतच्या विनंत्या व निवेदनांचा विचार करून परीक्षा केंद्र व वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २८ जुलै २०२६ रोजी शिफ्ट-२ मध्ये होणार होती. मात्र, आता या परीक्षेच्या दिनांक व शिफ्टमध्ये बदल करण्यात आला असून, संबंधित उमेदवारांची परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी शिफ्ट-१ मध्ये सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन सुधारित प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, इतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना त्यांनी पसंती दिलेल्या परीक्षा केंद्रांपेक्षा लांबचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. मात्र, संबंधित उमेदवारांच्या परीक्षेच्या दिनांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सर्व उमेदवारांनी आपले सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील परीक्षा केंद्र, दिनांक, शिफ्ट व वेळ यांची खात्री करावी, असे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

00000000