Search This Blog

Saturday, 26 September 2026

‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनासह




 ‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनासह

ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø सिंदेवाही येथे जिल्हास्तरीय प्रात्यक्षिकाचा शुभारंभ

Ø पहिल्या टप्प्यात 100 ग्रामपंचायतींमध्ये स्वस्तिक पॅटर्न व केशर आंबा लागवड

चंद्रपूर, दि. 26 : ‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवडीमुळे कमी जागेत अधिक झाडांची लागवड करून पाण्याची बचत, हरित क्षेत्रात वाढ आणि पर्यावरण संवर्धन साधता येणार आहे. त्यासोबतच केशर आंबा फळबागांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना भविष्यात स्वतःचे उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्ही -बी -जी राम-जी),  ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व विविध योजनांच्या अभिसरणातून सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात 25 सप्टेंबर रोजी ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी त्या बोलत होत्या. ए. एस. नाथन (ऑक्सिजन मॅन) यांच्या संकल्पनेवर आधारित ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

स्वस्तिक पॅटर्नच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करून त्या म्हणाल्या, सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी व सरपंचांचे नियमित प्रशिक्षण होते. त्यामुळे चारही जिल्ह्यांतील प्रशिक्षणार्थींना स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवडीची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि या अभिनव पद्धतीचा व्यापक प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी या केंद्राची ‘डेमो साइट’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्वस्तिक पॅटर्नमुळे कमी जागेत अधिक झाडे लावणे, झाडांना योग्य सूर्यप्रकाश मिळणे, पाण्याची बचत व संवर्धन तसेच हरित क्षेत्र वाढविण्यास मदत होणार आहे. केशर आंबा फळबाग लागवडीमुळे ग्रामपंचायतींना भविष्यात उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोतही निर्माण होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात 100 ग्रामपंचायती

या जिल्हास्तरीय प्रात्यक्षिकानंतर पुढील महिन्यात खनिज क्षेत्र बाधित 50 ग्रामपंचायतींमध्ये स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवड, तर अन्य 50 ग्रामपंचायतींमध्ये केशर आंबा लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबत पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रवाढ आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी पंत यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींपर्यंत उपक्रम नेण्याचे नियोजन : मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग 

या पथदर्शी प्रयोगानंतर जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींमध्ये वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी केशर वाणाच्या आंब्याची लागवड करण्यात येत आहे. फळबागा उत्पादनात आल्यानंतर फळांच्या विक्रीतून ग्रामपंचायतींना स्वतःचे उत्पन्न अर्थात प्राप्त होऊ शकते. या उत्पन्नाचा उपयोग गावातील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, शाळा व इतर विकासकामांसाठी करता येईल. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या स्वयंपूर्णतेला चालना मिळेल. या उपक्रमांच्या माध्यमातून गावांना सुंदर, हिरवेगार आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले.

ही केवळ वृक्षलागवड नव्हे, वृक्षक्रांती’ – ए. एस. नाथन : ‘ऑक्सिजन मॅन’ ए. एस. नाथन यांनी स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपणाबाबत मार्गदर्शन केले. स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण हा केवळ वृक्षलागवडीचा उपक्रम नसून विविध योजनांचे अभिसरण, रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा संगम घडविणारा अभिनव प्रयोग आहे. ही केवळ वृक्षलागवड नसून ‘वृक्षक्रांती’ असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी वसुमना पंत व मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर अंतरगाव व गडमौशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक गिरीश धायगुडे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, विभागीय वन अधिकारी बापू येडे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे, प्रभारी गटविकास अधिकारी विभावरी तितरे, लक्ष्मी कुमरे, कृषी अधिकारी महेश वट्टी, चंद्रकांत दलाल, बंडू गुंतीवार, थामदेव अगडे, प्यारेलाल देवगडे, ओम चनफने  यांच्यासह प्रशिक्षण केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मीनारायण दोडके यांनी आभार मानले.

0000000

298 आरोग्य शिबिरांतून 24 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी


 

298 आरोग्य शिबिरांतून 24 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

Ø 'श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रम

चंद्रपूर, दि. 26 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा' अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 16 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत 298 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून 24 हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर यांच्या नियोजनातून शहरी भागातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, आपला दवाखाना, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर विशेष आरोग्य शिबिरे घेण्यात आली.

24,548 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी

16 ते 25 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात एकूण 298 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण 24,548 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 10,868 पुरुष, 12,200 महिला, 1,334 बालके तसेच हृदयविकाराशी संबंधित 51 लाभार्थ्यांचा समावेश आहे. आरोग्य शिबिरांमध्ये 3,166 लाभार्थ्यांची रक्त तपासणी तर 273 लाभार्थ्यांची ECG तपासणी करण्यात आली. याशिवाय 1,298 लाभार्थ्यांची आयुष्मान भारत व आभा कार्डसंबंधी नोंदणी करण्यात आली.

विविध आजारांची तपासणी व उपचारासाठी संदर्भ सेवा

शिबिरांमध्ये मेडिसिन, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, त्वचारोग यासह विविध आजारांबाबत तपासणी व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या आरोग्य संस्थेतच विविध आरोग्य सेवा व तपासण्या उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तपासणीदरम्यान आजाराची लक्षणे आढळलेल्या तसेच पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे संदर्भित करण्यात आले.

138 जणांचे स्वेच्छा रक्तदान

आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांमध्ये रक्तदान आणि अवयवदानाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात आली. विविध शिबिरांच्या माध्यमातून 138 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. तसेच अवयवदानाबाबत नागरिकांना माहिती देऊन त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.

0000000

सांस्कृतिक गणेशोत्सवात कलाविष्कारांची उधळण








 

सांस्कृतिक गणेशोत्सवात कलाविष्कारांची उधळण

Ø प्रियदर्शिनी सभागृह येथे जिल्हा प्रशासनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 26 : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी  सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित 'गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम'  मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.

सात वर्षीय कृष्णा गादेवार याने गणरायाचा गजर गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर पुरुष आणि स्त्री यांचा एकत्रित आवाज काढत देवदत्त सातपुते यांनी आपल्या गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हितांशी भालेकर या विद्यार्थिनीने नृत्य सादर केले तर विजेंद्र टेंभुर्डे आणि त्यांच्या कलाकारांनी कथ्थक चे सादरीकरण केले. विद्यानिकेतन स्कूलचे किरण गीते व सहकाऱ्यांनी समूह नृत्य, किरण खोब्रागडे व सहकाऱ्यांनी सामूहिक नृत्य, लोकमान्य टिळक गर्ल्स प्राथमिक शाळेच्या सुनीता नागभीडकर यांनी सुद्धा नृत्य केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अभियंता रवींद्र हजारे यांनी तसेच सुरेश भालेकर यांनी सुद्धा गीत सादर केले. उप कृषी अधिकारी ज्योती कार्लेकर यांनी एकपात्री अभिनय सादर केला. तर राजुरा येथील गोपिकाबाई सांगडा पाटील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. मुल नगर परिषदेचे तुषार मोटघरे, बल्लारपूर नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी संगीता उमरे व प्रणाली पाटील यांनी सुद्धा नृत्य सादर केले. स्थानिक कलावंत, विद्यार्थी तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक सरस कलाविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, अतुल जटाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सपना पिंपळकर यांनी केले व रोहयो कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यात नायब तहसीलदार गीता उत्तरवार , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विक्रांत जोशी, निशा मेश्राम, वैशाली बावनकर यांचा समावेश होता.

सादरीकरण करणाऱ्या कलावंतांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

0000000

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

 



सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

Ø जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र रुग्णांच्या सेवेत

चंद्रपूर, दि. 26 : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डायलिसिस केंद्राचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या केंद्रामुळे मूल व लगतच्या परिसरातील किडनी विकाराच्या रुग्णांना डायलिसिसची  सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.

उद्घाटन सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंत हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रवीण पंत, पोटदुखे हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रसाद पोटदुखे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अभिषेक दीक्षित, प्रा. महेश पानसे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

लोकार्पणानंतर केंद्रामध्ये प्रत्यक्ष डायलिसिस सेवेला सुरुवात करण्यात आली. सिंदेवाही येथील नंदलाल मेश्राम या रुग्णावर उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली या केंद्रातील पहिले डायलिसिस करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे यापूर्वी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे मूल व परिसरातील रुग्णांना त्यांच्या जवळच डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील डायलिसिस केंद्रावरील रुग्णांचा ताण कमी होण्यासही मदत होईल.

किडनी विकाराच्या रुग्णांना नियमितपणे डायलिसिससाठी दूरवर प्रवास करावा लागू नये आणि आवश्यक आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी, या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे केंद्र जनतेच्या सेवेसाठी  कार्यान्वित झाले असून परिसरातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रामटेके यांनी केले.

0000000

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; विविध उपाययोजना व सवलती लागू

 

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; विविध उपाययोजना व सवलती लागू

Ø चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा समावेश

चंद्रपूर, दि. 26 : खरीप हंगाम 2026 मधील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे प्रभावित राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ‘Trigger-१ (प्रथम कळ)’ लागू करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा समावेश आहे. या भागांसाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळ व्यवस्थापन संहिता-2016 नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे. खरीप 2026 मधील परिस्थितीच्या आधारे जूनपासून आतापर्यंतच्या पर्जन्याची तूट व अन्य घटकांचा विचार करून कृषी आयुक्तांनी शासनाला अहवाल सादर केला. या अहवालानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीचे ‘Trigger-१’ लागू असल्याचे निदर्शनास आले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभुर्णा  या 12 तालुक्यांचा समावेश आहे.

पिकांच्या स्थितीचा अहवाल शासनाला सादर होणार : ‘Trigger-१’ लागू असलेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांच्या पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्वेक्षण करण्यात आलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा सविस्तर अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त भागासाठी 12 प्रमुख उपाययोजना व सवलती : ‘Trigger-१’ लागू असलेल्या 265 तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. तसेच कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट देण्यात येणार आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीजपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असल्याने त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या वीजपंपांना ही सूट लागू राहणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही.

अन्नधान्य, चारा व पाण्याच्या उपलब्धतेवर भर

दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी व शेतमजुरांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये यासाठी शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी, शेतमजूर व इतर घटकांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही, यासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासोबतच जलसंधारणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय शासनाने यापूर्वी निर्गमित केलेल्या निर्देशांनुसार नागरिकांसाठी पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील समाविष्ट 12 तालुक्यांमध्ये शासन निर्णयानुसार पंचनामे व पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असून, शासनाने निश्चित केलेल्या उपाययोजना व सवलतींची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांमार्फत करण्यात येणार आहे.

0000000

‘स्वच्छ सेवा आकलन’ अंतर्गत ग्रामपंचायतींनी स्वयं-मूल्यांकन वेळेत पूर्ण करावे – सीईओ पुलकित सिंग


 ‘स्वच्छ सेवा आकलन’ अंतर्गत ग्रामपंचायतींनी स्वयं-मूल्यांकन वेळेत पूर्ण करावे – सीईओ पुलकित सिंग

Ø ई - ग्रामस्वराज पोर्टलवर होणार डिजिटल स्वयं-मूल्यांकन

Ø 2 ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

चंद्रपूर, दि. 26 : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-II अंतर्गत ‘स्वच्छ सेवा आकलन’  उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील ओडीएफ प्लस (मॉडेल) ग्रामपंचायतींच्या स्वच्छता व्यवस्थेचे वार्षिक डिजिटल स्वयं-मूल्यांकन करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी निर्धारित कालमर्यादेत स्वयं-मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील स्वच्छता सेवांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांना बळकटी देणे हा ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या अंतर्गत ओडीएफ स्थितीची शाश्वतता, घन व द्रवकचरा व्यवस्थापन, गावातील दृश्य स्वच्छता, घन व द्रवकचरा व्यवस्थापन साधनांचे कार्यान्वयन व देखभाल तसेच सामुदायिक स्वच्छता संकुलांचे कार्यान्वयन व देखभाल आदी बाबींचे मूल्यांकन केले जाणार आहे.

हे मूल्यांकन ग्रामपाणी व स्वच्छता समिती तसेच स्थानिक समुदायाच्या सहभागातून प्रमाणित प्रश्नावलीच्या आधारे करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता व्यवस्थेची सद्यस्थिती स्पष्ट होण्यासोबतच आवश्यक सुधारणा निश्चित करणे शक्य होणार आहे.

ई - ग्रामस्वराज पोर्टलवर भरावी माहिती

स्वच्छ सेवा आकलन प्रक्रियेत ग्रामपंचायत सचिवांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या लॉगीन मधून ई - ग्रामस्वराज पोर्टलवर संबंधित ओडीएफ प्लस (मॉडेल) ग्रामपंचायतीची प्रारूप माहिती भरावी. ही माहिती ग्रामसभेसमोर चर्चा व पडताळणीसाठी सादर करून आवश्यक ठरावाद्वारे मान्यता घ्यावी. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता करून आवश्यक सुधारणा कराव्यात व अंतिम माहिती पोर्टलवर सादर करावी.

2 ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

स्वच्छ सेवा आकलनाच्या तिसऱ्या टप्प्यात 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ग्रामपंचायतींचे स्वयं-मूल्यांकन करण्यात येत आहे. त्यानुसार प्रारूप स्वयं-मूल्यांकन अहवाल तयार करून 2 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करावी व ग्रामसभेत अहवालावर सविस्तर चर्चा करून त्याची पडताळणी करावी. त्यानंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम माहिती सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील ओडीएफ प्लस (मॉडेल)  ग्रामपंचायतींनी 25 सप्टेंबरपर्यंत स्वयं-मूल्यांकनास सुरुवात करणे, 2 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभा घेणे, 26 ऑक्टोबरपर्यंत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करणे आणि 30 ऑक्टोबरपर्यंत ई ग्रामस्वराज पोर्टलवरील माहिती सुधारित करून अंतिम करणे, अशी कालबद्ध कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे.

‘स्वच्छ सेवा आकलन’मधून प्राप्त होणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी व कमतरता ओळखून त्यावर कालबद्ध सुधारणा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच या निष्कर्षांचा पुढील ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना नियोजनासाठी उपयोग केला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छता व्यवस्थेबाबत वस्तुनिष्ठ माहिती नोंदवावी, आढळलेल्या त्रुटींची वेळेत पूर्तता करावी आणि निर्धारित कालमर्यादेत स्वयं-मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.

0000000

आपले गाव नियमित स्वच्छ ठेवा; ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी — श्रीकांत बोबडे

 

आपले गाव नियमित स्वच्छ ठेवा; ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी — श्रीकांत बोबडे

Ø गावस्तरावर कचऱ्याचे चार भागांत वर्गीकरण करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 26 : स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून कोरपना तालुक्यातील नांदा येथे ग्रामपंचायत सभागृहात स्वच्छता व घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनपर सभा घेण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे म्हणाले की, गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर सांडपाणी व घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. गाव नियमित आणि शाश्वत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ ग्रामपंचायतीची नसून प्रत्येक ग्रामस्थाची आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव स्वच्छ ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पिरामल फाउंडेशनचे मुंबई येथील अधिकारी दीपक कालनकर यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करताना गावात कायमस्वरूपी स्वच्छता राखणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ अनुषंगाने गावस्तरावर कचऱ्याचे चार भागांत वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास त्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रण करता येते. त्यामुळे कचरा हा समस्या न राहता संसाधन म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर तटप यांनी नांदा गावातील प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद चंद्रपूरचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे यांनी कचरा वर्गीकरणाची सुरुवात प्रत्येक कुटुंबातून होणे आवश्यक असल्याचे सांगितले. घरातूनच ओला, सुका, प्लास्टिक तसेच इतर कचरा योग्य प्रकारे वेगळा केल्यास गावातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून कचऱ्यापासून उत्पन्न निर्मिती कशी करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामस्थांना सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन आणि गावात शाश्वत स्वच्छता राखण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांना गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची सामूहिक स्वच्छता शपथ देण्यात आली. कार्यक्रमास ग्रामपंचायतचे उपसरपंच पुरुषोत्तम आसवले, ग्रामपंचायत अधिकारी नरेश धवणे, पिरामल फाउंडेशनचे अधिकारी रवींद्र बागुल, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता दूत तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कोरपना पंचायत समितीचे गट समन्वयक लॉरेन्स खोब्रागडे यांनी केले.

0000000

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना मिळणार योजनांचा लाभ आणि विविध प्रमाणपत्र


 विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना मिळणार योजनांचा लाभ आणि विविध प्रमाणपत्र

Ø 27 सप्टेंबर रोजी बंराजतांडा, 28 रोजी चंद्रपूर आणि 29 रोजी पिट्टीगुडा जिवती येथे विशेष अभियान

चंद्रपूर, दि. 26 : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27 सप्टेंबर 2026 रोजी घमाबाई आश्रमशळा बरांजतांडा येथे, 28 सप्टेंबर रोजी सरोदे सामाजिक भवन, नेहरूनगर चंद्रपूर येथे तर 29 सप्टेंबर रोजी आश्रमशाळा पिट्टीगुडा येथे विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येत आहे. पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच विविध योजनांशी संबंधित शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना तसेच मूलभूत हक्कांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत. शिबिरापूर्वी वस्ती स्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे.

अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर देण्यात येणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत. सदर शिबीराचा विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी अभियानात सहभागी होऊन उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसूमना पंत, सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

0000000

Friday, 25 September 2026

गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी सहा नगर परिषद क्षेत्रात मद्यविक्री बंद


 गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी सहा नगर परिषद क्षेत्रात मद्यविक्री बंद

Ø राजुरा, मूल, वरोरा व चिमूर येथे 26 सप्टेंबर

Ø भद्रावती व ब्रह्मपुरी येथे 27 सप्टेंबरला आदेश लागू

चंद्रपूर, दि. 25 : सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील राजुरा, मूल, वरोरा, चिमूर, भद्रावती आणि ब्रह्मपुरी नगर परिषद हद्दीतील सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या संबंधित दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, मूल, वरोरा व चिमूर तालुक्यात 26 सप्टेंबर रोजी, तर भद्रावती व ब्रह्मपुरी तालुक्यात 27 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. या कालावधीत शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून संबंधित नगर परिषद हद्दीतील किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.

आदेशानुसार 26 सप्टेंबर  रोजी संपूर्ण दिवस राजुरा, मूल, वरोरा आणि चिमूर नगर परिषद हद्दीतील, तर 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस भद्रावती आणि ब्रह्मपुरी नगर परिषद हद्दीतील एफएल-२, सीएल/एफएल/टीओडी-३, एफएलबीआर-२, एफएल-३ आणि सीएल-३ या किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहतील.

संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचा अथवा नियमातील तरतुदींचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

०००००

29 सप्टेंबरचा ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ स्थगित


29 सप्टेंबरचा ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ स्थगित

Ø आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

चंद्रपूर, दि. 25 : जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी 18 ठिकाणी आयोजित करण्यात आलेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरच्या सहायक आयुक्तांनी दिली आहे.

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 18 ठिकाणी 29 सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभाचे आयोजन नियोजित करण्यात आले होते. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहिता तातडीने लागू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात 29 सप्टेंबर  रोजी नियोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केलेल्या तसेच सहभागी होण्यास इच्छुक युवक-युवती, उमेदवार आणि संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

कोडशी बु. येथे 6 ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

 

कोडशी बु. येथे 6 ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

Ø सरपंचांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर अनुसमर्थन घेण्यासाठी आयोजन

चंद्रपूर, दि. 25 : कोरपना तालुक्यातील मौजा कोडशी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश गजानन कोल्हे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या व दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी तीन-चतुर्थांश मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कोडशी बु. येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, यांच्या 23 सप्टेंबर 2026 रोजीच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी, कोरपना यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा होणार असून, अविश्वास प्रस्तावावर ग्रामसभा सदस्यांचे अनुसमर्थन घेणे, हा या सभेचा एकमेव विषय राहणार आहे. विशेष ग्रामसभेसाठी प्रचलित नियमानुसार आवश्यक गणपूर्ती असणे बंधनकारक राहील. ग्रामसभेत उपस्थित सदस्यांची अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन गटांत शिरगणना करण्यात येईल. उपस्थित ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने प्रस्तावाला अनुसमर्थन मिळाल्यास अविश्वास प्रस्ताव संमत झाल्याचे समजण्यात येईल. तर उपस्थित सदस्यांच्या साध्या बहुमताने प्रस्ताव फेटाळण्यात आल्यास सरपंच पद कायम राहील.

या प्रक्रियेसाठी 1 ऑक्टोबर 2024 या अर्हता दिनांकावर आधारित व 29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र ग्रामसभा सदस्यांचा सहभाग नोंदविण्यात येईल. विशेष ग्रामसभा केवळ अविश्वास प्रस्तावावरील अनुसमर्थनासाठी आयोजित करण्यात आली असल्याने या सभेत अन्य कोणत्याही विषयावर चर्चा केली जाणार नाही.

मतदारांनी ओळखपत्र सोबत आणावे : कोडशी बु. ग्रामपंचायत क्षेत्रातील संबंधित ग्रामसभा सदस्यांनी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे. सभेस येताना मतदारांनी राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या ओळख पुराव्यांपैकी कोणताही वैध ओळख पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे, असे कोरपनाचे उपविभागीय अधिकारी बालाजी कदम यांनी कळविले आहे.

००००००

Thursday, 24 September 2026

लोकसंवाद कार्यक्रमातून रोजगाराबाबत मार्गदर्शन

लोकसंवाद कार्यक्रमातून रोजगाराबाबत मार्गदर्शन

Ø  जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

चंद्रपूर, दि. 24 : राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हा अतिशय महत्वाचा विभाग असून बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरावर रोजगार मेळावे आणि महारोजगार मेळावे आयोजित केले जातात, अशी माहिती कौशल्य विकास अधिकारी रोशन गभाले यांनी दिली.

सिव्हील लाईन, चंद्रपूर येथील सार्वजनिक गणेश मंडळ (लालबागचा राजा) आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, संजय वैद्य, उमेश मुदलीयार, भुषण हजारे, तेजस शेंडे, प्रफुल मांदाडे, शेखर हजारे आदी उपस्थित होते.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यात उपलब्ध असलेल्या रिक्त् जागा, आदींची माहिती होण्यासाठी रोजगार मेळावे घेतले जातात, असे श्री. गभाले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य उद्दोजकता विकास योजना, आदिवासी कौशल्य विकास केंद्र आदींबाबत माहिती दिली.

00000