Search This Blog

Tuesday, 29 September 2026

मासळ येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण


मासळ येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 29 : ग्रामीण भागातील नागरिकांना गावपातळीवरच सर्वकष आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मासळ (ता. चिमूर) येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या डॉ. मिना मडावी यांच्या नियोजनातून हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणात 57 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य व कार्यक्षमता वाढविणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. गावपातळीवरच अधिकाधिक आजारांचे निदान व उपचार करून अनावश्यक संदर्भीकरण टाळण्यासाठी "अधिक सेवा, कमी संदर्भ या संकल्पनेवर काम करण्यावर भर देण्यात आला.

प्रशिक्षणात 13 प्रमुख घटकावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये 1) गरोदरपण, प्रसूती व प्रसूती पश्चात काळजी, 2) नवजात व अर्भक आरोग्य सेवा, 3) बालक व किशोरवयीन आरोग्य, 4) कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य, 5) संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन, 6) सामान्य व किरकोळ आजाराचे उपचार, 7) असंसर्गजन्य आजाराचे प्रतिबंध व नियंत्रण, 8) डोळे व कान यांचे प्राथमिक आरोग्य, 9) मौखिक आरोग्य सेवा, 10) वृद्धापकाळ व पेलटिव्ह केअर, 11) आपत्कालीन वैद्यकीय सेवा, 12) मानसिक आरोग्य, 13) योग व आयुष पद्धती या सेवांचा समावेश आहे.

याशिवाय प्रभावी संवाद कौशल्य, साकारात्मक देहबोली, रुग्णांशी आपुलकीने संवाद साधणे आणि नेतृत्व कौशल्य याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. माता व बालमृत्यू कमी करणे, असंसर्गजन्य आजारांचे वेळेत तपासणी करणे, नियमित गृहभेटी तसेच आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.

प्रशिक्षणात डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गजानन राऊत, डॉ. मिना मडावी, डॉ. संदीप भटकर, डॉ. भावेश वानखेडे, डॉ. मनोज शेंडे, डॉ. किशोर भट्टाचार्य, शोभा नैनावत, वंदना किन्नाके, रमेश घुटके यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकासह 57 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.

००००००

No comments:

Post a Comment