Search This Blog

Wednesday, 5 August 2026

एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 99.69 टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण


एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 99.69 टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण

Ø गणना प्रपत्र जमा करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Ø अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी 27 ऑक्टोबर रोजी

चंद्रपूर, दि. 05 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात ‘मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम – 2026’ राबविण्यात येत आहे. ‘एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत राहू नये’ या मुख्य उद्दिष्टाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीरहित करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत 17 लक्ष 92 हजार 133 मतदारांचे डिजिटायझेशन (99.69 टक्के) यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण 17 लक्ष 97 हजार 655 मतदारांपैकी 5 ऑगस्ट 2026 पर्यंत 17 लक्ष 97 हजार 027 मतदारांना (99.97%) गणना प्रपत्रे (इन्युमरेशन फॉर्म) वितरित करण्यात आली आहेत. यापैकी 17 लक्ष 92 हजार 133 मतदारांचे डिजिटायझेशन (99.69 टक्के) पूर्ण झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देऊन सुधारित कालावधी जाहीर केला आहे.

जिल्ह्यात एकूण 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेतला असता, 70-राजूरा, 72-बल्लारपूर, 73-ब्रम्हपूरी व 74-चिमूर या मतदारसंघांमध्ये एकूण 100 टक्के काम पूर्ण झाले असून 75-वरोरा येथे 99.81 टक्के तर 71-चंद्रपूर मतदारसंघात 98.63 टक्के काम पूर्ण झाले आहे.

असा आहे पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम : 1) मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (बीएलओ) घरोघरी भेटी 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत, 2) मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण / पुनर्रचना 17 ऑगस्ट, 3) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 24 ऑगस्ट 2026, 4) दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 पर्यंत, 5) नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026, 6) अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी 27 ऑक्टोबर 2026

नागरिकांना व राजकीय पक्षांना आवाहन : 1) सध्या सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन पडताळणी करत आहेत. ज्या मतदारांनी अद्याप आपले गणना प्रपत्र (इन्युमरेशन फॉर्म) अचूक भरून जमा केले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बीएलओ कडे 17 ऑगस्ट, 2026 पर्यंत ते जमा करावे. 2) जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे बूथस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. 3) लोकशाही बळकटीकरणासाठी आणि त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

0000000

चंद्रपुरात 67 शासकीय व खासगी कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस


चंद्रपुरात 67 शासकीय व खासगी कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

Ø 'पॉश' कायद्याची अंमलबजावणी न करणे भोवले

Ø ‘SHE BOX पोर्टलवरील नोंदणीसह नियमांचे पालन बंधनकारक

चंद्रपूर, दि. 5 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 (POSH Act) तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत व्यापक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 96 शासकीय आणि 33 खासगी कार्यालये व कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी नियमांची पूर्तता न केल्यामुळे 43 शासकीय व 24 खासगी अशा एकूण 67 कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

राज्यात महिला व बालविकास विभागाच्या वतीने जून 2026 पासून 4 हजारांहून अधिक तपासणी अधिकाऱ्यांमार्फत शासकीय व खासगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांची तपासणी करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 3579 शासकीय आणि 3296 खासगी अशा एकूण 6875 कार्यालयांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नियमांची पूर्तता न केलेल्या 294 शासकीय व 378 खासगी अशा एकूण 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

विहित मुदतीत आवश्यक पूर्तता न करणाऱ्या कार्यालयांवर POSH Act, 2013 मधील तरतुदीनुसार 50 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत ही कारवाई केली जाणार आहे. महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांना POSH Act, 2013 मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या SHe-Box पोर्टलवर कार्यालयाची नोंदणी, अंतर्गत तक्रार समितीची स्थापना व नोंदणी, समिती सदस्यांचे प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांचे जनजागृती व प्रशिक्षण, तसेच वार्षिक अहवाल पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

तपासणीदरम्यान या बाबींची पूर्तता न झाल्याचे आढळल्यास संबंधित कार्यालय, संस्था किंवा कंपनीविरुद्ध अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

००००००

जिल्हाधिकारी धान रोवणीच्या बांधावर

 जिल्हाधिकारी धान रोवणीच्या बांधावर

Ø महिला शेतक-यांसोबत संवाद ; जाणून घेतल्या समस्या

चंद्रपूर, दि. 05 : चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या धानपट्ट्यात रोवणीच्या कामाने वेग घेतला असून शेतकरी महिलांसोबत संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत मंगळवारी थेट तळोधी (बा.) येथील धानाच्या बांधावर पोहचल्या. धान रोवणीमध्ये व्यस्त असलेल्या महिला शेतक-यांसोबत त्यांनी मनमोकळा संवाद साधला. चिखलात उभ्या राहून मेहनत करणाऱ्या महिलांच्या अडचणी, शेतीसंबंधी समस्या आणि अपेक्षा जिल्हाधिका-यांनी ऐकून घेतल्या.

पावसाचे स्वरूप, शेतीसाठी आवश्यक सुविधा तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी महिलांशी चर्चा केली. तसेच शेतक-यांच्या समस्यांकडे अधिका-यांनी संवेदनशीलतेने पाहून तातडीने कार्यवाही करावी. प्रत्यक्ष शेतात जाऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशा सुचना त्यांनी केल्या.

तत्पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी तळोधी (बा.) येथील शासकीय धान्य गोदामाची पाहणी करून ऑनलाइन धान्य वितरण व्यवस्थेची तपासणी केली. तसेच कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. नगर पंचायतीतील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांना त्याचा होणारा लाभ याबाबत कृषी विभाग, नगर परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. अपर तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेताना नागरिकांना शासकीय सेवा विहित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

या दौऱ्यावेळी तळोधीचे तहसीलदार शेखर पुनसे, अविनाश शेमबटवाड, प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, नायब तहसीलदार नरेश बोधे व स्मिता भैसारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, निरीक्षण अधिकारी श्री. चांदेकर आदी उपस्थित होते.

००००००

Tuesday, 4 August 2026

जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या




जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

Ø नागभीड तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा

चंद्रपूर, दि. 04 : जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी (दि. 4) नागभीड तहसील कार्यालयास भेट देऊन महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या सोडविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

याप्रसंगी जिल्हाधिका-यांनी,  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वेळेत व सुलभ पद्धतीने मिळावीत, यासाठी आवश्यक सुधारणा व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नागरिकांना शासकीय सेवा अधिक कार्यक्षम व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला. जमिनीच्या डिजिटायझेशनबाबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून कामाची गती वाढविणे, नोंदी अचूक ठेवणे व पारदर्शकता राखणे, तसेच नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

            विविध विकासकामांची पाहणी : जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय धान्य गोदाम, नवीन तहसील कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी करून दर्जेदार व विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. याशिवाय, नगर परिषद नागभीड अंतर्गत सुरू असलेल्या नमो उद्यान प्रकल्पास भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

दौ-याप्रसंगी प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, अपर तहसीलदार शेखर पुणसे, नायब तहसीलदार नरेश बोधे व स्मिता भैसारे, गट विकास अधिकारी स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख वंदना नाईक, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, निरीक्षण अधिकारी चांदेकर, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे आदी अधिकारी उपस्थित होते.

०००००

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण


मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण

Ø पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

मुंबई /चंद्रपूर, दि. 04 : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय 47) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी 2 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून 19 लाख 60 हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण 21 लाख 60 हजार रुपयांचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.

प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता.

अशा कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबईत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला.

या आर्थिक सहाय्यामुळे 25जून 2026 रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने 13 जुलै 2026 रोजी प्रशांत इंगळे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत.

वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. त्याच भावनेतून प्रशांत इंगळे यांना वेळेत आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी बाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

००००००

जिल्हास्तर मैदानी खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन


 जिल्हास्तर मैदानी खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

चंद्रपूर, दि.04 : खेलो इंडिया उपक्रम अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता 8 ऑगस्ट रोजी खेळाडू निवळ  चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.          यापुर्वी ही चाचणी 30 जुलै 2026 रोजी ठेवण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सदर चाचणी रद्द करण्यात आली. 8 ऑगस्ट रोजी खेळाडूंची निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे.

14 वर्षे आतील मुले /मुली  यांनी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. खेळाडूचा जन्म 30 जुलै 2013 ते 30 जुलै 2015 या कालावधीत असावा. उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वतःच्या तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधारकार्ड व जन्म दाखला प्रत सोबत आणावे. खेळाडूंनी पासपोर्ट साईज 2फोटो सोबत आणावे.

उपरोक्त निवड चाचणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील व महानगरपालिका शाळेतील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करून चाचणीच्या दिवशी उपस्थित रहावे. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो.न. 9423673232) व खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षक रोशन भूजाडे (मो.न. 7798174435) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

००००००

जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन बाल कल्याण समितीची आढावा बैठक

 जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन बाल कल्याण समितीची आढावा बैठक

चंद्रपूर, दि. 04 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाईल्ड हेल्पलाईन , बाल कल्याण समिती त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

बालविवाह प्रतिबंध, बालकामगार माहिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअंतर्गत योजनांची माहिती जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या तालुका बाल संरक्षण समिती, ग्राम तथा वार्ड बाल संरक्षण समिती संख्याबाबत माहिती तसेच जिल्ह्यातील बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांचे समक्ष व पोलिसांमार्फत येणाऱ्या  केसेसची माहिती सादर करण्यात आली.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकनुरी नरेश, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर, अतिश चव्हाण, सायली पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, तसेच व्ही.सी. माध्यमातून सर्व तहसिलदार विधी सेवा प्रा., अधिक्षक, समाजकल्याण व बाल कल्याण समितीचे सर्व सदस्य, बाल न्याय मंडळ सर्व सदस्य उपस्थित होते.

००००

Saturday, 1 August 2026

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी व लाभार्थ्यांचा गौरव


 महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी व लाभार्थ्यांचा गौरव

चंद्रपूर, दि. 01 : महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त आज (शनिवार) जिल्हा नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी  विशालकुमार मेश्राम यांनी प्रास्ताविकातून महसूल विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी, महसूल विभाग हा शासनाचा सर्वाधिक लोकाभिमुख विभाग असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असंख्य जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती, जनगणना, निवडणुका, अतिक्रमण प्रकरणे, पट्टे वाटप, नियमाकूल प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्ते योजना, संजय गांधी निराधार योजना आदी विविध कामांद्वारे महसूल विभाग नागरिकांना न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरी असो वा ग्रामीण भाग, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर तलाठी व मंडळ अधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदार आणि उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी हे अधिकारी-कर्मचारी चोवीस तास तत्परतेने कार्यरत असतात. कोणत्याही अडचणीच्या वेळी नागरिकांनी संपर्क साधल्यास त्वरित प्रतिसाद देऊन त्यांच्या समस्यांचे प्रथम प्राधान्याने निराकरण करण्यासाठी महसूल प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनीही उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देत महसूल विभागाच्या लोकाभिमुख कार्याची माहिती दिली.

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), पोलीस पाटील, संजय गांधी योजनेचे लाभार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार सहायक महसूल अधिकारी  अजय मेकलवार यांनी केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, आशा सेविका, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), सहाय्यक कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ अभियानाला मोठी गती


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ अभियानाला मोठी गती

Ø आयजीजीएमसी नागपूर-डब्ल्यूसीएलमध्ये ५ कोटींचा सामंजस्य करार

Ø  मार्च २०२७ पर्यंत विदर्भात २५ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार

मुंबई/नागपूर, दि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वांकांक्षी ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्यात ५ कोटींचा सामंजस्य करार यासाठी करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून ‘नमो नेत्र संजीवनी’ कार्यक्रमाची विदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, मार्च २०२७ पर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये २५ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत सर्व शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो नागरिकांना दर्जेदार व मोफत नेत्रोपचार उपलब्ध होणार असून, त्यांच्या दृष्टीचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पाठबळामुळेच आयजीजीएमसी, नागपूरला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमुळे संपूर्ण विदर्भात व्यापक स्तरावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया राबविणे शक्य होणार असून, ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या उपक्रमामुळे केवळ मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावण्याचे प्रमाण कमी होणार नाही, तर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार नेत्रोपचार सहज उपलब्ध होतील. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात शासन, वैद्यकीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, ‘नमो नेत्र संजीवनी’ कार्यक्रमाद्वारे विदर्भातील हजारो नागरिकांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

००००००