Search This Blog

Monday, 30 March 2020

जिल्ह्यात कलम 144 लागू

जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता
सर्व दुकाने बंद राहणार
चंद्रपूर, दि.25 मार्च : कोरोना (कोविड-19)  विषाणूमुळे नागरिकांचे आणि सार्वजनिक आरोग्याचे सुरक्षिततेकरिता तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता नागरिकांचे एका ठिकाणी होणाऱ्या गर्दीस प्रतिबंधक करण्यासाठी जिल्ह्यामध्ये जमावबंदीची 144 कलम लागू झालेली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये घेण्यात येणारे खाजगी व सार्वजनिक ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडाविषयक प्रदर्शने व शिबिरे, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे आंदोलन इत्यादी कार्यक्रमात मनाई करण्यात येत आहे. तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू (कोविड-19) च्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार व भीती, व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मीडिया व होर्डिंग इत्यादींवर प्रसारित करू नये. तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.
मिरवणुका, रॅली, सामूहिक कार्यक्रम, भाषणे यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. धार्मिक स्वरूपाचे समोपदन, धर्म परिषद ,धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये, कोरोना विषाणु (कोविड-19) ‌ चे अनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या क्वॉरेन्टाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरांतर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.

सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरूस, जत्रा, मनोरंजनाचे क्रीडा व इतर सर्व स्पर्धा इत्यादींना मनाई राहील. तसेच, कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व परदेशी सहलीचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.
सर्व दुकाने, सेवा आस्थापना,  उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये इत्यादी बंद राहतील.
या बाबींना आदेश लागू नाही :
किमान मनुष्यबळासह शासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना, विमानतळ व रिक्षा थांबे, बँक, पेट्रोल पंप इत्यादींना, अंत्यविधी ( कमाल 20 व्यक्तींपुरता मर्यादित), अत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध-दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, पार्सल स्वरूपात काऊंटर तसेच इतर मार्गांनी विक्री, वितरित करण्यास परवानगी राहील.
सर्व हॉटेल,  लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील. ज्या आस्थापना (उदा. माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्यांच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्त्वाच्या उपक्रमांची जबाबदारी आहे व सदर बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम राहू शकतील. परंतु, या दृष्टीने सदर आस्थापना कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांना विशेषरित्या कळविणे बंधनकारक आहे.
प्रसार माध्यमांचे सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टीव्ही न्यूज चैनल इत्यादींचे कार्यालय सुरु राहतील. घरपोच सेवा देणाऱ्या सेवा उदाहरणार्थ ॲमेझॉन,फ्लिपकार्ट,बिग बास्केट इत्यादी सुरू राहतील.किमान मनुष्यबळासह बँका,एटीएम,कॅश लॉजिस्टीक आणि कॅश ट्रॉन्झक्शन व अन्य संबंधित सेवा सुरु राहतील.
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट डेटासेवा यांच्यासह माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सेवा, अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक, शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि वाहतूक, बंदरावरून होणारी वाहतूक, मनुष्यबळ, कंटेनर फ्राईड स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालय, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
खाद्यपदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांच्यासह अत्यावश्यक वस्तूंची ई-कॉमर्स द्वारे वितरण, खाद्यपदार्थ किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, बेकरी, पशुखाद्य यांची वाहतूक व साठवण सुरू राहील. तसेच या अत्यावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.
बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशु वैद्यकीय सेवा, उपहारगृहांमधून आणि खाजगी, घरगुती खानावळ यांच्याकडून होणारे घरपोच सेवा, औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य व चारा निर्मिती घटक इत्यादी सुरू राहील.
रुग्णालये, औषधालय, चष्म्याची दुकाने, औषधांची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या सेवा, पावसाळ्यापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवांकरिता खाजगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा सेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था, अत्यावश्यक सेवांना किंवा कोरोना (कोविड-19) प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणाऱ्या खाजगी आस्थापना, वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी सुरू राहील.

वरील सर्व निर्बंध लोकांच्या वाहतुकीवर असेल, वस्तूंच्या दळणवळणावर नाहीत. त्याचप्रमाणे, अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था, संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असेल.
सदर आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 25 मार्च दिनांक 14 एप्रिल पर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188,269,270,271 या प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

00000

No comments:

Post a Comment