Search This Blog

Friday, 9 January 2026

हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन


हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

            चंद्रपूर,दि. 09 : हरभरा पिकाचे बारकाईने निरीक्षण करून घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच व्यवस्थापनाचे उपाय योजावे. या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंडयावर, कळयावर व फुलांवर एकरी अंडी घालते. ही अंडी खसखसीत दाण्यासारखी दिसतात त्यामुळे 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होवून वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळया संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांदयाच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळया प्रामुख्याने फुले व घाटयांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळया घाटयाला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधरणतः 30-40 घाटयांचे नुकसान करते.

एकात्मिक व्यवस्थापन : 1. घाटे अळीचे परभक्षक उदा, बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी ईत्यादी पिकामध्ये फिरून घाटे अळया वेचुन त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. 2. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्षांचे अळया वेचण्याचे काम सोपे होते. 3. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटेअळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्यूर) एकरी किंवा दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस 8 ते 10 पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. 4. शेतकरी बंधुनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी खालील दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या .

पहिली फवारणी (50 टक्के फुलोऱ्यावर असतांना) : निंबोळी अर्क  5 टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि. (1x10 पिओबी/मिली) 500 एल ई./हे किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी., 20 मि.ली.

दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीच्या 15 दिवसानंतर) : 1. इमामेक्टीन बेझाएट 5 टक्के एस जी 3 ग्रॅम किंवा 2. ईथिऑन 50 टक्के ई.सी. 25मिली किंवा 3. क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस. सी . 2.5 मिली

          सदर किडीचे वेळीच व्यवस्थापन केल्यास प्रादुर्भाव नियंत्रण करता येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

००००००

No comments:

Post a Comment