वन अकादमी आणि नागपूर आयआयएम यांच्यात सहकार्यासाठी करार
चंद्रपूर, दि. 16 : वन प्रशासन व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील प्रशिक्षण क्षमता व संशोधन बळकट करण्याच्या दिशेने चंद्रपूर वन अकादमी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर यांच्यात सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. हा करार वन अकादमीचे संचालक एम. एस. रेड्डी आणि नागपूर आयआयएमचे संचालक डॉ. भीमराव मेत्री यांच्या स्वाक्षरीने झाला. या कार्यक्रमाला प्रा. अनूप कुमार, अधिष्ठाता (शिक्षण कार्यक्रम) आलोक कुमार सिंह, वन अकादमीचे अतिरिक्त संचालक उमेश वर्मा आदी उपस्थित होते.
चंद्रपूर वन अकादमी ही महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत स्वायत्त संस्था असून वन अधिकाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे. पर्यावरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, वन्यजीव, हवामान बदल आणि संबंधित क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन या महत्त्वाच्या कार्यात ही संस्था सक्रिय आहे. याप्रसंगी बोलताना एम. एस. रेड्डी म्हणाले, या करारामुळे नैसर्गिक संपदा व्यवस्थापन, सरकारी कर्मचाऱ्यांचे कौशल्य नकाशांक, धोरणात्मक नेतृत्व, प्रभावी संवादकला, टीम बिल्डिंग, शाश्वत विकास, पर्यावरणीय व सामाजिक शासन तसेच वन प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व संशोधन उपक्रम विकसित करण्यास मदत होईल. हे उपक्रम वन अधिकाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कराराचा उद्देश आयआयएम नागपूरच्या व्यवस्थापन व नेतृत्वक्षेत्रातील तज्ज्ञता आणि चंद्रपूर वन अकादमीचा क्षेत्राधारित अनुभव यांना एकत्र आणून अभिनव प्रशिक्षण पद्धती आणि प्रभावी धोरण संशोधन पुढे नेण्याचा आहे. या करारामुळे वन क्षेत्रातील भावी नेतृत्व घडविणे आणि नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनाला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे, असे अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment