Search This Blog

Wednesday, 17 December 2025

राज्यांतर्गत अन्नधान्य कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा


राज्यांतर्गत अन्नधान्य कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा

चंद्रपूर, दि. 17 :   राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

रब्बी हंगाम 2025 मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2025 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पात्रता : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ),ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास),  पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा जोडणे आवश्यक, बैंक खाते चेक/ पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख :  रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील.  ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिकासाठी 31 डिसेंबर 2025. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये

बक्षिस स्वरूप :  तालुका पातळीवर प्रथम बक्षीस 5 हजार, द्वितीय 3 हजार आणि तृतीय 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर प्रथम बक्षीस 10 हजार, द्वितीय 7 हजार आणि तृतीय 5 हजार रुपये. राज्य पातळीवर प्रथम बक्षीस 50 हजार, द्वितीय 40 हजार आणि तृतीय 30 हजार रुपये.

उपरोक्त नमूद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ http://krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

००००००

No comments:

Post a Comment