Search This Blog

Wednesday, 25 March 2026

3 ते 5 एप्रिल या कालावधीत ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रम

 3 ते 5 एप्रिल या कालावधीत ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रम

चंद्रपूर, दि. 25 :  खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ हा उपक्रम 3 ते 5 एप्रिल या कालावधीत कन्यका परमेश्वरी हॉल, चंद्रपूर येथे  राबविण्यात येणार आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या विशेष बाजारपेठेत नागरिकांना विविध प्रकारची आकर्षक उत्पादने खरेदी करता येणार आहेत. स्वादिष्ट खाद्यपदार्थ, ट्रेंडी व पारंपरिक कपडे, घरगुती उपयोगाच्या वस्तु, कलात्मक हस्तकला, दागदागिने, तसेच अनेक स्वदेशी उत्पादनांचा समावेश या प्रदर्शनात असेल.

'लोकल टू व्होकल' संकल्पनेला बळ देणे, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना विश्वासार्ह, गुणवत्तापूर्ण स्थानिक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रममोहन पांडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी श्रीरंग खोंड (7057909073) वैष्णवी दारव्हेकर (9689473020) या क्रमांकावर संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment