Search This Blog

Thursday, 12 March 2026

आनंदवन वरोरा येथे शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन





 

आनंदवन वरोरा येथे शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

Ø जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 12, 13 आणि 14 मार्च पर्यंत आयोजन

चंद्रपूर, दि. 06 : राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी, तसेच या योजनांचा त्यांना लाभ मिळावा, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आनंदवन, वरोरा येथील मुख्यमंत्री सभागृहात तीन दिवसीय शासकीय योजनांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या हस्ते गुरुवारी आज (दि.12) करण्यात आले.

यावेळी वरोराचे तहसीलदार योगेश कौटकर, आनंदवनच्या अंतर्गत व्यवस्थापन विश्वस्त पल्लवी आमटे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, आनंदवनचे जनसंपर्कअधिकारी राजेश ताजणे, वाचा उपचार तज्ज्ञ रविकांत घोलप तसेच विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. भस्के म्हणाले, राज्य शासनाच्या सुचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 12 ते 14 मार्च या कालावधीत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांचे प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आले आहे. याच ठिकाणी 14 मार्च रोजी महाराजस्व शिबीराचेसुध्दा आयोजन आहे. नागरिक व विद्यार्थ्यांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आनंदवनच्या विश्वस्त पल्लवी आमटे म्हणाल्या, नागरिकांसाठी शासनाच्या चांगल्या योजना आहेत. यात रोजगाराच्या, उद्योगासंबंधी माहितीसुध्दा आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून सरकार मदत देण्यास तयार आहे, त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. योजनांचा फायदा झाला तर आयुष्य उभे राहू शकते. आनंदवन नेहमीच अशा उपक्रमात सहभागी राहिले आहे, असे त्यांनी सांगितले.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रविकांत घोलप यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी मानले. सदर प्रदर्शन हे मुख्यमंत्री सभागृह, आनंदवन, वरोरा येथे 12, 13 आणि 14 मार्च पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नागरिकांसाठी उपलब्ध आहे. परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment