Search This Blog

Friday, 10 April 2026

नांदगाव (पोडे) येथे 15 दिवसीय ‘ट्रेनिंग कम प्रोडक्शन’ उपक्रम


नांदगाव (पोडे) येथे 15 दिवसीय ‘ट्रेनिंग कम प्रोडक्शन’ उपक्रम

Ø बीआरटीसी चिचपल्ली मार्फत आयोजन

चंद्रपूर, दि. 10 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत 'कॅम्प' सन 2025-26 या वर्षासाठी ‘एम्पॉवरिंग ट्रॅडिशनल बांबू क्राफ्ट कम्युनिटीज ट्रेनिंग’ कार्यक्रमांतर्गत नांदगाव (पोडे) येथील महिलांसाठी 15 दिवसीय विशेष 'ट्रेनिंग कम प्रोडक्शन' प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणातून स्थानिक महिलांना बांबू कलेच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनपाल सौदागर लाटकर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना बांबू उद्योगातील भविष्यातील संधी आणि वनविभागाच्या सहकार्याबद्दल माहिती दिली. 15 दिवसांच्या या कालावधीत प्रशिक्षक प्रियांका पाल, संतोष बजाईत आणि गोविंदा आत्राम यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. यामध्ये प्रामुख्याने  बांबूपासून स्लायव्हर (काड्या) तयार करणे,  अतिशय कलाकुसरीची बांबूची फुले तयार करणे, अशा विविध बाबींचे प्रात्यक्षिकांसह शिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. बांबू काम शिकल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वाढ झाली असून, घरबसल्या उत्पन्नाचे साधन मिळाल्याची भावना महिलांनी यावेळी बोलून दाखवली.  

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या प्रशिक्षणामागचा मुख्य उद्देश आणि महिला सक्षमीकरणासाठी बांबू व्यवसायाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे संचालन सुनिता मोकाशे यांनी केले. प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन बीआरटीसीचे संचालक मनोज खैरनार आणि वन परिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

००००००

No comments:

Post a Comment