Search This Blog

Friday 8 December 2017

चंद्रपूर आकाशवाणीचा रौप्य महोत्सवाला रंगली गाण्याची मैफल विविध उपक्रमातून वर्धापन दिन साजरा

चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : चंद्रपूर जिल्हयामध्ये मनोरंजनासोबत माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या चंद्रपूर आकाशवाणीला २५ वर्ष पूर्ण झाले आहेत . मंगळवारी ५ डिसेंबरला एका शानदार सोहळ्यात २५ वर्षाचे सिंहावलकोन करण्यात आले.
        चंद्रपूरमध्ये २५ वर्षापूर्वी दिनांक 6 डीसेंबर 1992 रोजी चंद्रपूर आकाशवाणीच्या प्रसारणाला सुरुवात झाली, आणि बघता बघता हा प्रवास २५ वर्षाचा झाला. वनाच्छादित जिल्हा असणाऱ्या चंदपूरमध्ये एक प्रभावी माध्यमं म्हणून चंद्रपूर आकाशवाणीची ओळख आहे . श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद आणि परस्पर संवादाचे माध्यमं म्हणून चंद्रपूर आकाशवाणीने आपले नावलौकिक मिळवले असून आकाशवाणीचे  मनोरंजनात्मक व विकासवार्तावरील अनेक कार्यक्रम लोकप्रिय ठरले आहे . यामध्ये आरोग्य दर्पण, गीत गुंजन, गीत सरिता, आपली आवड, हॅलो सखी, पत्रावर आधारित प्रतिसाद, ओळख कायदयाची, विविध अधिका-याच्या मुलाखती व मान्यवरांच्या आदी कार्यक्रमाचा समावेश आहे.
    चंद्रपूर जिल्हयात लोकप्रिय ठरलेल्या आकाशवाणीची मंगळवारी सायंकाळी संगीत मेजवानीत रौप्य महोत्सवपूर्व सायंकाळ साजरी करण्यात आली  हिंदी -मराठी गाण्यांची ही मैफल साजरी केली हिमांशू रंगारी यांच्या चमूने. यामध्ये  संगीता उमरे, मंगेश देऊळकर, शेखर शर्मा, अमोल दुधकर, निखील जिरकुंटवार, आशिष गायगोले, सुनील इंदू वामन ठाकरे आदी कलाकार सहभागी झाले होते .
     तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार व आकाशवाणीचे जिल्हा वार्ताहर मधुसुदन व्यास , प्रभारी केंद्र प्रमुख मनोहर पवनीकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली . यावेळी आकाशवाणीच्या माध्यमातून एक जागरूक व प्रतिसाद देणारी पिढी आम्ही निर्माण करण्याचे दायित्व या माध्यमाने पार पाडावे. शासकीय योजना आणि धोरण तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरत असून आणखी प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून कार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली . प्रेक्षपणाची फ्रीकवेन्सी वाढवण्यात यावी, तसेच स्थानिक भाषा, स्थानिक समस्या आणि स्थानिक कलाकारांना अधिक वाव मिळावा , अशी मागणीही मान्यवरांनी केली .
      या कार्यक्रमाला आकाशवाणी ,दूरदर्शन  केंद्रातील कर्मचारी  ,नैमितिक उदघोषक, मान्यवर श्रोते उपस्थित होते.
0000000


रोजगार मेळाव्याला शेकडो तरुणांची उपस्थिती नोकरी देणारी पिढी कौशल्य विकासातून मिळेल :महापौर


चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : सर्वांना नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे अगदी छोटया स्तरावर  का  होईना उद्योगधंदा उभारण्यासाठी सुरुवात करा. धडपड कधीच वाया जाणार नाही. कौशल्य विकास देणाऱ्या अभ्यासक्रमाची  निवड करा. असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी  आज  युवकांशी  संवाद  साधताना  केले.
दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान,चंद्रपूर,जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजिकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जैन भवन येथे या रोजगारे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी  विविध  कंपन्याकडून उमेदवारांची मुलाखत व माहिती गोळा करण्यात आली. शेकडो  तरुणांनी संबंधित कंपन्यातील रिक्त जागांसाठी आपली उमेदवारी दाखवली. याठिकाणी विविध प्रशिक्षण संस्थाकडून स्टॉल लावण्यात आले होते. याशिवाय मुद्रा बॅक, विविध महामंडळ व लोकराज्यचा  स्टॉल लावण्यात आला होता.  
या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, एमआयडीसी  इंड्रस्ट्रीज असोशिशनचे अध्यक्ष  मधुसूदन रुघटा  यांच्या  सह उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी  समिती  सभापती  राहुल पावडे, सभापती अनुराधा हजारे, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपआयुक्त विजय देवळीकर, सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास सुनंदा बजाज, चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिघवी, गोपाल एकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानावरून बोलतांना एमआयडीसी  इंडस्ट्रीज असोशिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंघटा  यांनी व्यावसायिक होण्यासाठी सचोटी व  मेहनतीसोबत  एक पाऊल पुढे टाकण्यासाठी  हिम्मतही आवश्यक  असल्याचे सांगीतले. श्रीमती सुनंदा बजाज यांनी यावेळी कौशल्य विकास विभागाबाबत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या रोजगार मेळाव्याला जिल्हा  भरातील तरुणांनी  उपास्थिती  लावली  होती.

0000000