Search This Blog

Sunday 31 October 2021

पारंपरिक शेतीला पुरक व्यवसाय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी - पालकमंत्री विजय वडेट्टीवार













पारंपरिक शेतीला पुरक व्यवसाय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी

-         पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø ब्रह्मपुरी, सावली व  सिंदेवाही तालुका सिंचनाच्या क्षेत्रात अग्रेसर करणार

चंद्रपूर दि.31 ऑक्टोबर: शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे. विभागिय कृषी संशोधन केंद्रातील उपलब्ध तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा अवलंब करत शेतीचा विकास साधावा, तसेच पारंपारिक शेतीला पूरक व्यवसाय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे आयोजित  धान महोत्सव, शेतकरी मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, नगराध्यक्ष आशाताई गंडाटे, सभापती मंदाताई बाळबुद्धे, विजय कोरेवार, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विनोद नागदेवते, प्राध्यापिका स्नेहा वेलादी  प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीतही आता डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कृषी केंद्रातून अनेक प्रजातीचे धानाचे संशोधन झाले आहे. त्यासाठी कृषी संशोधन केंद्र सातत्याने कार्य करीत आहे. शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्‍यकता असून त्याची ओळख पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने  छोटे छोटे देश शेती व्यवसायात अग्रगण्य स्थानावर पोहोचले आहे. विदेशात 500 एकरसाठी फक्त 20 लोकांची आवश्यकता असते ऐवढे तंत्रज्ञान या देशांनी विकसित केले आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत नवनवीन तंत्रज्ञानाचा व यंत्राचा वापर करावा व दर्जेदार व  शाश्वत शेतीकडे वळावे.

पालकमंत्री श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला ब्रह्मपुरी तालुका आहे. सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी काम सुरू असून मार्च 2022 नंतर सिंदेवाही तालुक्याचे  87 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी उपलब्ध करून देण्यास मदत मिळणार आहे. यावर्षी सिंचनासाठी 850 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सन 2024 मध्ये शेतकऱ्यांना दोन पिकाचे नियोजन करता येईल एवढे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

संशोधन केंद्रामध्ये शेडची उभारणी करून त्यामध्ये शेतीस उपयोगी असे विविध यंत्रे व अवजारे माहितीसह उपलब्ध ठेवावीत. जेणेकरून आलेल्या शेतकऱ्यांना त्या यंत्राची व वापर यासंबंधीची माहिती मिळू शकेल.

कृषी विद्यापीठाने तांदळामध्ये लाल तांदळाचे वाण विकसित केले आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहे. त्यासाठी लाल तांदूळ हा आरोग्यास उपयोगी आहे, त्यामुळे कॅन्सरवर मात करण्यासाठी आहारात लाल तांदुळाचा समावेश करण्याचे त्यांनी सांगितले.

 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन विभागीय कृषी संशोधन केंद्रास विविध यंत्रे, अवजारांसाठी 37 लक्ष रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला. कृषी संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होत आहे.

धानाच्या माध्यमातून मूल येथे इथेनॉलचा मोठा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यासोबतच दुधाचे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्र बंद करावी लागली पण शेती हे एकच क्षेत्र असे होते जे पूर्णत: खुले राहिले. त्यामुळे ग्रामीण युवकांनी शेतीतून व्यावसायिक बनून आपला विकास साधावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

करडईचे क्लस्टर महाज्योतीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात करडई पिकाच्या उत्पादन वाढीसाठी 5,500 शेतकऱ्यांना करडई पिकाचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे. करडई तेल आरोग्यास उत्तम असून जनावरांपासून या पिकांची नासधूस होत नाही, नफा व उत्पन्न या पिकातून अधिक मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर अधिक भर द्यावा. चंद्रपूर वनसंपदेने व्यापलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात वनविद्या महाविद्यालय डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होईल. यासाठी 128 कोटी रुपये निधी उपलब्ध होत असल्याचेही पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले म्हणाले, शेतकऱ्यांनी संशोधन केंद्रात येऊन पिकांची, पीक पद्धतीची, लागवडीची, यंत्रे व अवजारांची माहिती घ्यावी व दर्जेदार शेती करावी. या भागातील शेतकरी अतिशय सहनशील असून शेतकऱ्यांनी खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावे.

त्यासोबतच, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाहीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये कृषी संशोधन शेतकऱ्यांसाठी लोकाभिमुख आहे, या केंद्राने आतापर्यंत एकूण 62 शिफारसी दिल्या असून प्रामुख्याने 16 वाण तर बाकी शिफारशी पीक संरक्षण व कृषिविद्या विषयाशी संबंधित आहे. पीडीकेव्‍ही साधना नवीन धानाचा वाण यावर्षी प्रसारित होत असल्याचे ते म्हणाले. तसेच कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांच्या सभेद्वारे या भागातील हवामान परिस्थितीवर आधारित पीक सल्ला शेतकरी व कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी  आठवड्यातून दोन वेळा प्रसारित केला जातो. केंद्रावर 12 प्रकारचे धान, शेतीची कृषी यंत्रे, अवजारे प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिके व प्रसार करावयाचा असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विभागीय संशोधन केंद्रातील माया कुटीला भेट देत पाहणी केली. तदनंतर, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत भाडेतत्त्वावर कृषी यंत्रे, अवजारे केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी  डॉ. कोल्हे यांनी अवजारे व यंत्राची माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली लोखंडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका स्नेहा वेलादी यांनी केले.

000000

रविवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 1 बाधित


रविवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø  ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 21

चंद्रपूर, दि. 31 ऑक्टोबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात रविवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 814 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 251 झाली आहे. सध्या 21 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 35 हजार 123 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 45 हजार 50 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकित वेतन द्यावे -पालकमंत्री विजय वडेट्टीवार




 दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकित वेतन द्यावे

-पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. 31 ऑक्टोबर: कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड व बरांज कोल माईन्स येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खाण प्रशासनाला दिले. मागील 10 महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. तरी दिवाळीपूर्वी कामगारांना तातडीने 4 महिन्याचे थकित वेतन देण्याची अंमलबजावणी  करावी, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात  कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लि. व  बरांज कोल माईन्स येथील कामगारांच्या किमान वेतन संबंधाने व इतर तक्रारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, मुलचे उपविभागीय अधिकारी श्री.खेडकर, बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. नैताम प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्व कामगारांना तातडीने किमान वेतन देण्याचे नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केपीसीएलकडे खाण सुरू झाल्यापासून कामगारांचे 21 महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. त्यापैकी कामगारांना दिवाळीपूर्वी 4 महिन्याचे वेतन देण्याचे करावे व उर्वरित 6 महिन्याचे वेतन डिसेंबर अखेरपर्यंत देण्यात यावे. व शिल्लक राहिलेल्या 11 महिन्याचे वेतन किमान वेतन ठरविल्यानंतर देण्यात यावे. कामगारांना वेतन न दिल्यास खाणीचे कामकाज बंद करण्यात येईल अशा सूचनाही त्यांनी  दिल्या.

 महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सायवन, आवंढा, कचराळा व  गुंजाळा येथील पुनर्वसितांना भूखंडाचे पट्टे वाटप करून देण्यासंदर्भात  पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. जमिनीचे पैसे भरून मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही तातडीने करावी. व माहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जमिनीचे पट्टे तातडीने वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

त्यासोबतच, कोरोना आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपयांचे फिक्स डिपॉझिट पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व कल्पना राजूरकर उपस्थित होते.

00000

Saturday 30 October 2021

गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी पोलीस विभागाने खास पथक निर्माण करावे -पालकमंत्री विजय वडेट्टीवार





गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी पोलीस विभागाने  खास पथक निर्माण करावे

-पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø  सर्व पोलीस स्टेशन सीसीटीव्हीने जोडणार

Ø  पोलीसांना जिल्हा नियोजन मधून वाहने देणार

Ø  अमली पदार्थ व गुटख्यावर कारवाईचा पाश आवळण्याचे निर्देश

चंद्रपूर,दि. 30 ऑक्टोंबर : जिल्हयातील दोषसिध्दीचा दर समाधानकारक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांचे काम उत्तम असून गुन्ह्यांचे प्रमाण व वारंवारता जास्त असणाऱ्या तालुकयांसाठी पोलीस विभागाने खास पथक निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.

मंथन सभागृहात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली . त्यात ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख, चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नंदनवार तसेच सर्व तालुक्यांचे पोलीस निरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

गुन्हयांची उकल तातडीने करण्यासाठी गठीत या पथकाला आवश्यक तो निधी,मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल.गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी व गुन्हे दर कमी होण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्याचा उदेदश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस विभागाच्या  गेल्या वर्षभरातील कामकाजाचे सादरीकरण या बैठकीत पोलीस अधिक्षक श्री.साळवे यांनी केले.

कोरोना काळात देशात गुन्हे वाढले आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार  यासारख्या गुन्हयांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. वर्ष 2019 मध्ये 43 टक्के ,2020 मध्ये 42.52 तर सप्टेंबर 2021 अखेर 35 टकके दोषसिध्दीचा दर असून तो समाधानकारक असल्याची भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

महिला संदर्भातील सायबर गुन्हयाबाबत कडक व कायदेशीर कारवाई करण्याची भुमीका ठेवावी. पोलिसांची भूमिकेबाबत योग्य संदेश जावा, या गुन्ह्यांकडे शासन बारकाईने बघत आहे, ही वस्तूस्थिती जावी, नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दलचा  सन्मानपूर्वक आदर निर्माण व्हावा,अश्या पध्दतीची कार्यशैली पोलीसांची असावी असे पालकमंत्री म्हणाले.

पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून आपण सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटली पाहिजे. असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच गुन्हा स्थळांवर तातडीने पोहोचण्यासाठी पोलीसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे त्यांनी निर्देश दिले.

अमली पदार्थ व गुटख्याबाबत पोलीसांनी पाठपुरावा करून त्या गुन्हयांची पाळेमुळे शोधून काढावीत. आर्म्स ॲक्टचे काटेकोरपणे पालन करावे. कोळश्यांचा काळाबाजार ,बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त डिझेल विक्री करणा-यांवर  कारवाई करावी.कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे कायद्याची बूज राखून  पोलिसांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अवैध वाहतूक रोखण्यासाठी व महसूल वाढीसाठी प्रादेशिक परिवहन व पोलीस या यंत्रणांनी चोखपणे काम करावे. जिल्हा पोलीस दलाच्या जादुटोणा प्रतिबंधक कायदयाची प्रचार व प्रसीध्दी  व अन्य उपक्रमांना आवश्यक तो निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी  पोलीस अधिक्षकांना निर्देशीत केले.

डायल 112 प्रकल्प नियंत्रण कक्षाला भेट

 बैठकीनंतर  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पोलीस विभागाच्या डायल 112 प्रकल्प नियंत्रण कक्षाला भेट देत पाहणी केली. नियंत्रण कक्ष अत्याधुनिक करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल ,असे त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर स्थानिक माध्यम प्रतिनिधींशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला..

00000

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 2 कोरोनामुक्त


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 2 कोरोनामुक्त

Ø  ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 22

चंद्रपूर, दि. 30 ऑक्टोबर :  जिल्ह्यात शनिवारी (दि.30) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 813 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 249  झाली आहे. सध्या 22 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 34 हजार 99 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 44 हजार 68 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Friday 29 October 2021

शुक्रवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित


शुक्रवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 24

चंद्रपूर, दि. 29 ऑक्टोबर : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये गोंडपिपरी येथे  1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 813 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 247 झाली आहे. सध्या 24  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 32 हजार 755 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 42 हजार 492 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती


स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

 जिल्हयात 420  सुरक्षा रक्षकांची  भरती

चंद्रपूर, दि. 29 ऑक्टोबर : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7425 सुरक्षा रक्षक भरती करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात माजी सैनिक प्रवर्गातून 420 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावयाची आहे.  त्याअनुषंगाने सदर पदाकरीता  ईच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्हयातील माजी सैनिकांनी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत डिस्चार्ज बुक, ओळखपत्र व रोजगार कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देत स्व:ताचे  नाव नोंदवावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॅप्टन दिपक लिमसे यांनी केले आहे.

हि आहे पदासाठी पात्रता:

सुरक्षा रक्षक पदाकरीता, माजी सैनिकाचा जन्म 30 सप्टेंबर 1976 च्या अगोदरचा नसावा. शैक्षणिक पात्रता

शिक्षण कमीत कमी 8 वी पास मात्र, बारावी उत्तीर्ण  नसावा. सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15वर्षे झाली असावी.  सैन्यदलातील हुद्दा हवालदार किंवा त्यापेक्षा कमी असावा, सैन्य दलातील वर्तण व चारीत्र्य चांगले असावे तसेच सैन्य दलातून सेवा‍निवृत्त झाल्यानंतर उमेदवाराला कोणताही आजार अथवा अपंगत्व नसावे. उमेदवार  शारिरीकदुष्टया सक्षम असावा. तरी, जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी आपल्या नावाची नोंद कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन करावी, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

येत्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन


येत्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि.29 ऑक्टोंबर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 1 नोव्हेंबर  2021 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. तदनंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, तसेच निवेदन स्वीकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील.या लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील.

00000

शेतकरी आत्महत्या पाच प्रकरणांमध्ये मदत


 

शेतकरी आत्महत्या पाच प्रकरणांमध्ये मदत

Ø अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरांनी घेतला आढावा

चंद्रपूर,दि. 29 ऑक्टोंबर : शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे मदत पात्र असल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 11 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 5 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली, 4 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली तर उर्वरीत 2 प्रकरणे प्रलबिंत ठेवण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्जाचे पुरावे जोडलेले नाहीत, ते पुरावे मागवून घ्यावेत. अशा सुचना अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीला अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, नायब तहसीलदार (सामान्य) गीता उत्तरवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी एम.एन.हेकाड, डॉ. गजेंद्र मेश्राम, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम, प्रशांत कंचनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

महाराष्ट्रातील नेत्रहीन बांधवांसाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून दिवाळी भेट

 

महाराष्ट्रातील नेत्रहीन बांधवांसाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून दिवाळी भेट

Ø नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करणार

चंद्रपूर/मुंबई दि. 28 ऑक्टोंबर : बहुजनांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योतीची निर्मिती केली आहे. या  महाज्योतीच्या माध्यमातून नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असा विश्वास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या श्रीरंग संस्थेने भेट घेतली. याप्रसंगी नेत्रहीन विद्यार्थ्यांनी स्वतः मंत्री विजय वडेट्टीवार यांचे रेखाटलेले छायाचित्र भेट स्वरूपात दिले. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, श्रीरंग सेवाभावी संस्थेत कार्यरत असणाऱ्या तरुणांनी नेत्रहीन मुलांना गंधातून रंग ओळखून चित्र रेखाटण्याची कला शिकवली आहे. ही कला दुर्मिळ व अप्रतिम आहे. श्रीरंग संस्था करत असलेले  कार्य उल्लेखनीय आहे. गंधातून रंग ओळखून चित्र रेखाटण्याची कला अवगत झाल्यास गरजू नेत्रहीनांच्या हाताला काम मिळू शकेल. त्यांना आधार मिळेल. म्हणून, नेत्रहीन बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही कला विकसीत करून महाज्योतीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देणार.

 नेत्रहीन विद्यार्थ्यांना रंगांना गंधातून ओळखून चित्र रेखाटण्याची कला श्रीरंग सेवाभावी संस्थेचे डॉ. सुमित पाटील यांच्याकडून अवगत केली आहे. बहुजन समाजासाठी आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना प्रोत्साहन देऊन दृष्टी बाधित समाजासाठी भविष्यातील एक संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत मंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे  चित्र रेखाटणारे  प्रियदर्शिनी सालियन, प्रसाद बालम, आकांक्षा वाकडे, प्रतिक्षा डोळस आणि शबनम अन्सारी, श्रीरंग संस्थेचे डॉ. सुमित पाटील यांना श्री. विजय वडेट्टीवार यांनी आर्थिक मदत केली. यासह संस्था करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.

00000

Thursday 28 October 2021

गुरुवारी जिल्ह्यात 2 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 24


गुरुवारी जिल्ह्यात 2 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 24

चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा  मृत्यू  झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या  रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात 2 रुग्ण आढळले असून चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा , गोंडपिपरी , राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती  व इतर  ठिकाणी  बाधित रुग्णांची संख्या शुन्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 812 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 246 झाली आहे. सध्या 24 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 31 हजार 685 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 41 हजार 412 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000


दुचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु

 दुचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु

चंद्रपूर दि.28 ऑक्टोंबर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची  MH34-CA-0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनाकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि.29 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्जदाराने पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत, क्रमांकानुसार विहित केलेले शासकीय शुल्क, डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,चंद्रपुर यांच्या नावे विहित शुल्क रकमेचा भरणा मालिका सुरू झाल्यानंतर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावे, तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यानंतर वाहनाचे कागदपत्रे तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. मालिका सुरू असताना वाहन-4 प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर बंद करण्यात येईल.

प्राप्त होणारे अर्ज दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयांमध्ये स्वीकारले जातील. 29 ऑक्टोंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास, अर्जदाराने कार्यालयामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत चौकशी करावी. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 29 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचे धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. तसेच सायंकाळी 4.30 पर्यंत बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

Ø विविध विभागांचा घेणार आढावा

चंद्रपूर दि. 28 ऑक्टोंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी  12 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूरकडे प्रयाण.

शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी, सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत संबंधित विभागाशी आढावा बैठक. सकाळी 11.45 वाजता कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लि. व बरांज कोल माईन्स प्रा. लि. येथील कामगारांच्या किमान वेतन संबंधाने व इतर तक्रारीबाबत आढावा बैठक. तसेच एम्टा व्यवस्थापन व  कामगारांमध्ये दि. 30 सप्टेंबर 2021 रोजीच्या बैठकीत झालेल्या आश्‍वासनांची पूर्तता होण्याबाबत बैठक. दुपारी 12.30 वाजता जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत प्राप्तनिधी, खर्चित निधी, अखर्चित निधी, प्रस्तावित कामे तसेच कार्पेट क्लस्टर बाबत आढावा बैठक. दुपारी 1.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावावर झालेली कार्यवाही, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव.

दुपारी 2.30 वाजता बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात  सुरू, अपूर्ण, प्रस्तावित कामांबाबत तसेच कामनिहाय प्राप्त निधी, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 3.15 वाजता सिंचाई विभागासह मध्यम, लघू, पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात सुरु, पूर्ण प्रस्तावित कामांबाबत तसेच कामनिहाय प्राप्त निधी, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 3.45 वाजता मूल तालुक्यातील, ग्रामपंचायत बेंबाळ येथील पाणीपुरवठा समस्येबाबत आढावा बैठक. सायंकाळी 4.15 वाजता घुगुस शहरातील वार्ड क्र. 6 मधील सन  2014-15 मध्ये बांधकाम केलेले सभागृह जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याबाबत बैठक.  सायंकाळी 4.45 वाजता आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, कोविड-19 व जिल्ह्यातील आरोग्य विषयासंदर्भात संबंधित आरोग्य विभाग व वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5.15 वाजता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सायवन, आवंढा, कचराळा व गुंजाळा येथील पुनर्वसितांना भूखंडाचे वाटप करून पट्टे देण्याबाबत बैठक. सायंकाळी 5.45 वाजता पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक. सायंकाळी 6.15 वाजता परिवहन (आरटीओ) विभागातील अधिकाऱ्यांसोबत वाहतूक संदर्भात चर्चा. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

रविवार दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथून सिंदेवाहीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित धान महोत्सव, शेतकरी मेळावा व चर्चासत्राच्या आयोजित कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 1 वाजता शिवटेकडी रत्नापुर ता. सिंदेवाही येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता सिंदेवाही येथून कमलाई निवास,रामदास पेठ, नागपूरकडे प्रयाण.

00000

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित


 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

चंद्रपूर दि.28 ऑक्टोंबर: महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोरोना  वर्तणूक विषयक सूचना व निर्देशाचे यथोचितरित्या काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये 50 शिकाऊ अनुज्ञप्ती व 140 पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन,  पप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे:

दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 23 नोव्हेंबर रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 25 नोव्हेंबर रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर, 26 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर तर 30 नोव्हेंबर रोजी  शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

चंद्रपूर जिल्हयात नाविन्यपूर्ण योजनांने काम समाधानकारक - राजेश क्षीरसागर



 जिल्हयांनी कायमस्वरूपी प्रकल्प उभारावेत

चंद्रपूर जिल्हयात नाविन्यपूर्ण योजनांने काम समाधानकारक

 - राजेश क्षीरसागर

            चंद्रपूर, दि.28 ऑक्टोंबर : जिल्हयातील नाविन्यपूर्ण योजनांमधून झालेले काम समाधानकारक आहे. मात्र, या योजनांमधून  कायमस्वरूपी प्रकल्प किंवा मालमत्ता उभाराव्यात, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना, उपयोजना व मानव विकास कार्यक्रमांतील योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.  

बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय धिवरे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.मिताली सेठी, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन  वायाळ,  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, प्रकल्प अधिकारी रोहन घुगे,  मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर उपस्थित होते.

        जिल्हयातील नाविन्यपूर्ण कामांची माहिती जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने यांनी यावेळी दिली. यामध्ये मूल तालुक्यातील चिरोली गावाजवळ अंधारी नदीवर केलेल्या पूलवजा बंधाऱ्याने मासेमारी व्यवसायाकरीता सोय निर्माण झाली आहे. त्यासोबतच 800 हेक्टर क्षेत्रात शेतीसाठी सिंचनाची सोय उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी  सांगितले. तसेच सन 2018-19 मध्ये  पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होण्यासाठी 224 अंगणवाड्यामध्ये वॉटर एटीएम लावण्यात आले. बचतगटांच्या  महिलांना कापडी पिशव्या व बॅग शिवणकामाच्या प्रशिक्षणामुळे आर्थिक मदत झाली आहे.  एकात्मिक बालविकास योजनेतर्गत चंद्रपूर व बल्लारपूर येथे आयएसओ मानांकीत अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले आहे.  तर 2020-2021 मध्ये नाविन्यपूर्ण योजनांमध्ये ब्रम्हपूरी, सिंदेवाही, सावली, राजूरा व वरोरा येथील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करणे तसेच  तांदळाची साठवण करण्यात येणाऱ्या शासकीय गोदामांमध्ये  सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, कृषी विभागास  विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शहरी व ग्रामिण भागात फळे व भाजीपाला विक्रीकरीता स्टॉल उभारणी करण्यासाठी, संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नियोजनातून रूग्णालये, ऑक्सिजन प्लांट आदी कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली. रूग्णालयांच्या फायर ऑडिटचे काम पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, बालकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा उभाराव्यात. सामुहिक विकासांच्या योजना प्राधान्याने राबवाव्यात. नाविन्यपूर्ण कामे राबविताना अधिकाधिक सार्वजनिक हित साधले जाईल याचा प्रयत्न करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. निधी उपलब्ध करणे व कामांची माहिती यावेळी  देण्यात आली.

          कोविडच्या पहील्या व दुस-या लाटेतील जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या परिणामकारक उपाययोजनांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यावेळी दिली. संभाव्य तिस-या कोविड लाटेच्या नियंत्रणासाठी तिप्पट ऑक्सिजन जिल्हयात उपलब्ध आहे. व्हेंटीलेटर, लहान बालकांसाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणा याबाबतही सादरीकरण करण्यात आले. कोविडमध्ये 27 मेट्रीक टन ऑक्सिजन ही  दुसऱ्या लाटेतील अत्युच्च मागणी होती. आता आरोग्य यंत्रणा बळकट केल्याने 83 मेट्रीक टन ऑक्सिजनची उपलब्धता जिल्हयात आहे.  त्याचप्रमाणे, संभाव्य तिस-या कोविड लाटेच्या अनुषंगाने बालकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा उभारण्याचे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.

00000