Search This Blog

Friday 31 August 2018

विविध संघटनांकडून अनुसूचित जमाती कल्याण समितीला निवेदने सादर


चंद्रपूर दि. 31 ऑगस्ट-  महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांकडे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संघटनांनी आपल्या मागण्या व तक्रारी सादर केल्या. अनुसूचित जमाती कल्याण समिती सध्या चंद्रपूर दौऱ्यावर असून एक सप्टेंबर पर्यंत विविध विभागाच्या आस्थापनांमध्ये आदिवासींच्या न्याय्य हक्याचे संरक्षण करण्यासाठी ही समिती कार्य करते.
15 आमदारांचा सहभाग असणाऱ्या या समितीने 30 ऑगस्टपासून जिल्ह्यातील आपल्या कार्यवाहीला सुरुवात केली. गुरुवारी या समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा पुरवठा विभाग, वनविभाग, उर्जा विभाग, क्रीडा विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा बँक,आदिवासी प्रकल्प कार्यालय, आदिवासी महामंडळ,  आरोग्य विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय, एसटी महामंडळ या ठिकाणच्या रिक्त पदांचा आढावा घेतला.
            तसेच कर्मचाऱ्यांची बढती, भरती, आरक्षण, अनुशेष,  जात पडताळणी याबाबतही त्यांनी चौकशी केली. केंद्र आणि राज्य शासन अनुसूचित जमाती संदर्भात विविध योजना राबवित धोरण ठरविते. मात्र या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा पातळीवरील विविध आस्थापनांमध्ये घेतली जाते का याबाबतची पाहणी व तपासणी ही समिती करीत असते. ही समिती आपला अहवाल विधिमंडळाला सादर करते. या समितीला विशेष अधिकार असून जिल्हास्तरावर विभागप्रमुखांकडून योग्य माहिती न मिळाल्यास संबंधित विभागाच्या सचिवांना ही समिती आपल्या साक्षीसाठी पाचारण करते. राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्काचे रक्षण व्हावे, त्यांचा विविध स्तरावरील सहभाग वाढावा व समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांचा सहभाग व्हावा. यासाठी प्रचलित  कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता ही समिती काम करते. या समितीचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर सादर करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना, आश्रम शाळा चालविणारे पदाधिकारी तसेच आदिवासी चळवळींमध्ये सहभागी असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी आमदार अशोक उइके यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत त्यांना अवगत केले.
                                                            0000

अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून जिल्हाभरातील विविध संस्थांची तपासणी



रुग्णालय, आश्रम शाळा, वसतिगृह, ग्रामपंचायतीला भेटी

चंद्रपूर दि.31 ऑगस्ट-  आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यातील विविध आस्थापना योजना, उपाययोजना, यामध्ये राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जमाती संदर्भातील निर्देशित काम होते अथवा नाही याची तपासणी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज जिल्ह्यात केली. सोबतच काल दिवसभर घेतलेल्या बैठकांमध्ये उल्लेख झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी देखील रात्री उशिरापर्यंत दहा आमदारांची चमू करीत होती.
              राज्य शासनाची विशेष अधिकार असणारी 15 विधिमंडळ सदस्यांच्या सहभागातील अनुसूचित जमाती कल्याण समिती सध्या तीन दिवसांच्या चंद्रपूर दौऱ्यावर आहे. काल गुरुवारी या चमूने रात्री अकरा वाजेपर्यंत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये तसेच जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये काल विविध विभागाचा आढावा या चमूने घेतला. राळेगाव मतदारसंघातील आमदार अशोक उईके हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये आमदार वैभव पिचड, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकूर, आमदार पास्कल धनारे,   आमदार संतोष टारफे यांचा समावेश आहे. 
आज या 11 आमदारांच्या चमूला तीन भागात विभागणी करून आमदार अशोक उईके, आमदार वैभव पिचड, आमदार श्रीकांत देशपांडे या तीन आमदारांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या तीन भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता सकाळी 11 वाजता या चमू रवाना झाल्या. रात्री उशीरा पर्यंत जिल्ह्याच्या विविध भागात शाळा ग्रामपंचायती वसतिगृह तसेच विविध आस्थापनाची या आमदारांनी  तपासणी केली. जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या न्याय्य हक्काचे संरक्षण होते अथवा नाही याबाबतची प्रत्यक्ष खात्री केली. काल दिवसभर झालेल्या अनेक बैठकांमध्ये विविध  विभागांच्या विभाग प्रमुखांशी बोलतांना त्यांनी अनेक कामांबाबत विचारणा केली होती. या चर्चेदरम्यान काही कामांबाबत चौकशी करण्याबाबत या आमदारांनी तयारी दाखवली होती. आज सकाळी प्रत्यक्ष पाहणीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
         आमदार अशोक उईके यांच्या नेतृत्वातील चमूने कोरपना, जिवती या तालुक्यातील अनेक कामांची पाहणी केली. ग्रामपंचायत खडकी याठिकाणी त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांची आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची गावांमध्ये अंमलबजावणी होते अथवा नाही याबाबत प्रत्यक्ष चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जिवती येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेला भेट दिली. 1987 पासून याठिकाणीही आश्रम शाळा सुरू आहे. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक वर्गावर जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांची स्वतः तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांसोबत जेवणही केले. यावेळी काही वर्गावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष कशा पद्धतीचा अभ्यास सुरू आहे, हे देखील जाणून घेतले. यावेळी जिवती, गडचांदूर परिसरातील विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी देखील त्यांना येऊन भेटले. यावेळी अप्पर आदिवासी आयुक्त ऋषिकेश मोडक, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, उपसचिव राजेश तारवी, अपर सचिव संजय कांबळे आदी अधिकारी देखील होते. 
         आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वातील अन्य एका चमूने बल्लारपूर येथून प्रारंभ केला. मूल, सिंदेवाही, नागभिड या परिसरात त्यांनी भेट दिली . त्यांनी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षास भेट दिली. तिसरी चमू आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वात  चिमूरकडे रवाना झाली. वैभव पिचड यांनी चिमूरकडे रवाना होण्यापूर्वी जिल्ह्यातील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण आदिवासींना सर्वदूर भागात मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी भेटी दरम्यान व्यक्त केली. आदिवासी व्यक्तींना कौशल्ययुक्त नव्हे उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना गृह उद्योग सुरू करण्यासाठी बांबू प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाच्या मोठ्या योजनांमधून कायमस्वरूपी रोजगार निर्मितीच्या सोयी तयार झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
उद्या या समितीचा शेवटचा दिवस असून उद्या सकाळी 9.30 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनांमध्ये आढावा घेतला जाणार आहे.  गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्या विभागाचा आढावा घेतला गेला नाही, या विभागाचा देखील यावेळी आढावा होणार आहे. याशिवाय काही विभागाला गुरुवारी चर्चेदरम्यान त्रुटीची पूर्तता करण्याचे सांगितले होते. त्या सर्व विभागाचा खुलासा देखील उद्या संबंधित विभाग प्रमुखांना  करावा लागणार आहे.
                                                0000

Thursday 30 August 2018

आदिवासींच्या न्याय्य हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा : आ.अशोक उईके



अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्याला प्रारंभ
रात्री उशिरापर्यंत विविध विभागाची आढावा बैठक

चंद्रपूर दि.30 ऑगस्ट - आदिवासीबहुल असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीच्या बहुसंख्येला लक्षात घेता, या ठिकाणी आदिवासींच्या न्याय हक्काचे संरक्षण काटेकोरपणे झाले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, वनविभाग, पोलीस विभाग व अन्य सर्वच विभागांमध्ये राज्य शासनाच्या  अनुसूचित जमाती बद्दलच्या प्रचलित कायद्याची अंमलबजावणी सक्षमतेने करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधावे, असे निर्देश महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक उईके यांनी गुरुवारी दिले.
राज्‍य शासनाची विशेषाधिकार असणारी 15 विधीमंडळ सदस्यांचा सहभाग असणारी अनुसूचित जमाती कल्याण समिती सध्या तीन दिवसांच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहे. आज सकाळी या समितीचे चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, राजूराचे आमदार ड. संजय धोटे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृहावर स्वागत केले. अनुसूचित जमातीच्या विविध योजनांवर अनौपचारिक चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या या समितीने एव्हरेस्ट सर करणाऱ्या दहा आदिवासी विद्यार्थ्यांचे शहरात आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम कौतुक केले. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी समितीचे स्वागत केले. यावेळी अप्पर आदिवासी आयुक्त ऋषिकेश मोडकजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरजिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. या समितीमध्ये  डॉ. अशोक उईके यांच्यासह आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकुर, आमदार श्रीकांत देशपांडे यांचेही स्वागत करण्यात आले.

नियोजन भवनात आढावा
समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनांमध्ये झाली. समिती सदस्यांना यावेळी गोंड राज्याच्या वैभवशाली वारशाची सचित्र गाथा सांगणारे मुलूख चांदा हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. समितीने सर्वप्रथम जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचा आढावा घेतला. समितीच्या कार्यपद्धतीप्रमाणे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची मंजूर पदे, त्यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष तसेच जात पडताळणी याविषयी समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांनी सादर झालेल्या आढावा व माहिती घेऊन तपासणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीचंद्रपूर महानगरपालिका, तहसील कार्यालय,  उपविभागीय कार्यालय,  जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, एसटी महामंडळ आदी ठिकाणच्या आस्थापनातील अनुसूचित-जमातीच्या न्याय हक्कावर चर्चा केली. समितीच्या अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभागी होत प्रशासनाने जात पडताळणी अनुशेष, भरती, बढती आरक्षण, याबाबतीत अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर  रेड्डी,  महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे,  निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सर्व मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या सत्राचा समारोप करताना डॉ.अशोक उईके यांनी चंद्रपूर जिल्ह्याला गोंड राजाचा दैदिप्यमान इतिहास राहिला आहे. त्यामुळे आदिवासीबहुल असणाऱ्या या भागांमध्ये प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व विविध पदाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या न्याय्य हक्काचे रक्षण, त्यांच्या अधिकाराची योग्य अंमलबजावणी आणि प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय असला पाहिजे, यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे, कुणाच्याही हक्कावर गदा येणार नाही. यासाठी कायद्याचा काटेकोरपणे वापर करावा, असे निर्देश दिले.

जिल्हा परिषदेचाही आढावा 
दुपारी 3 नंतर समितीने जिल्हा परिषदेच्या आवारातील सभागृहामध्ये जिल्हा परिषदेतील अनुसूचित जमाती संदर्भातील पदभरती, बढती, आरक्षण, जात पडताळणी याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असल्याचा आढावा घेतला. याठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जात पडताळणी च्या संदर्भात व बिंदुनामावली प्रमाणित करण्याबाबतच्या नियमावर चर्चा करण्यात आली. यावेळी समिती सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असणाऱ्या अनेक प्रकरणावरही चर्चा केली.

शनिवारी पुन्हा आढावा
कल्याण समितीने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये आढावा घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा पुन्हा जिल्हा नियोजन भवनात उर्वरित विभागाच्या आढाव्याला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हा आढावा सुरू होता. तत्पूर्वी गुरुवारी झालेल्या आढाव्यामध्ये अनेक विभागाला काही माहिती सादर करायचे निर्देश समितीने दिले आहेत.  शनिवारी पुन्हा यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. ज्या विभाग प्रमुखांनी आज समितीपुढे माहिती सादर केली नाही किंवा समितीने संपूर्ण माहिती सादर करण्याबाबत पुन्हा सांगितले आहे. त्या सर्व विभाग प्रमुखांसोबत पुन्हा एकदा शनिवारी 1 सप्टेंबरला समितीपुढे चर्चा होणार आहे. एकत्रित आढावा घेण्यापूर्वी ज्या विभागात सोबत आज बैठक वेळे अभावी होऊ शकली नाही. त्यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. त्यानंतर 1 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता समितीची आढावा बैठक सर्व अधिकाऱ्यांसोबत होणार आहे.
दरम्यान, उद्या जिल्ह्यातील चंद्रपूरचिमूर प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या तालुकानिहाय आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कामांची पाहणी समिती करणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा देखील समिती करणार आहे. 15 आमदारांच्या या समिती सोबत उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव संजय कांबळे, कक्ष अधिकारी दामोदर गायकर यांच्यासह विभागीय जात पडताळणी व अन्य विभागाचे शीर्षस्थ अधिकारी आलेले आहेत.
                                    000

चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांचा भीमपराक्रम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी- आ.अशोक उईके



अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी केला गुणगौरव
चंद्रपूरदि.30 ऑगस्ट  चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे  अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणा-या शेकडो मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, अशा शब्दात महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके यांनी कौतुक केले. यावेळी समितीच्या अन्य आमदार सदस्यांनी या मुलांची मुलाखत घेत एव्हरेस्टच्या आठवणींना जागृती दिली.  
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रम शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करुन चंद्रपूर जिल्हयात तसेच महाराष्ट्रासह देशात आपले नाव लौकीक केले आहे.  अशा या विद्यार्थ्यांचा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा विधान सभा सदस्य डॉ.अशोक उईके व समितीचे सदस्य आमदार प्रभुदास भिलावेकरआमदार डॉ.पंकज भोयरआमदार राजाभाऊ वाजे,आमदार शांताराम मोरेआमदार वैभव पिचडआमदार पांडुरंग बरोराआमदार आनंद ठाकुरआमदार श्रीकांत देशपांडेउपसचिव राजेश तारवीअपर सचिव संजय कांबळे व कक्ष अधिकारी दामोदर गायकर यांनी  चंद्रपूरमध्ये आगमन झाल्यानंतर पहिली भेट आदिवासी विक्रमविरांची घेतली. समितीच्या सदस्यांनी यावेळी या मुलांना अनेक प्रश्न विचारले. या मुलांना त्यांच्या योग्यतेनुसार उच्चपदस्थ नौक-या मिळाव्यात. चांगल्या ठिकाणी त्यांना समाजाचे नेतृत्व करता यावे, याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी समितीचे सदस्य आमदार वैभव पिचड यांनी केले. तर अन्य सदस्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेतले. चंद्रपूर ते  एव्हरेस्ट हा प्रवास करतांना आलेल्या अडचणी, शासनाकडून झालेली मदत याबद्दलही समिती सदस्यांनी माहिती घेतली. या मुलांनी आदिवासी समाजाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील  10 आदिवासी विद्यार्थ्यांनी 16  मे रोजी एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा रोवला होता. याची दखल प्रधानमंत्र्यांनी थेट लालकिल्ल्यावरुन आपल्या भाषणात घेतली आहे. या विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: भेट घेऊन कौतुक केले आहे. राज्य शासनाने देखील एव्हरेस्ट सर करणा-यांना 25 लाख तर एव्हरेस्टवर चढाई करणा-या उर्वरित 5 विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयाची मदत केली आहे.  पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात राज्याच्या आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला 'ऑपरेशन शौर्य च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केले होते.  आज या मुलांचे समिती सदस्यांनी कौतुक करतांना अप्पर आदिवासी आयुक्त ऋषीकेश मोडक, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
 समितीच्या सदस्यांनी यावेळी कवीदास  काठमोडे, मनीषा धुर्वे, परमेश आडे, विकास सोयामआकाश मडावी, शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, अक्षय आत्राम या विद्यार्थ्यांचा आज शासकीय विश्रामगृह येथे सत्कार केला. यावेळी आमदार ॲड.संजय धोटेजिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजली घोटेकर  जिल्हा परिषदेचे व महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.                                                                 0000

तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यावर धडक कार्यवाही


चंद्रपूर, दि.30 ऑगस्ट- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत असून मोठ्या प्रमाणात कॅन्सर सारखे गंभीर आजार सर्वत्र फोफावत आहे. यामध्ये युवक वर्गाचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे नियंत्रण करण्याकरीता कोटपा कायदा 2003 हा अंमलात आलेला आहे. या कायद्यानुसार वेगवेगळया कलमानुसार दंड आकारण्यात येत आहे. तरी सुध्दा मोठया प्रमाणात शहरामध्ये या कायद्याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्यामुळे अति.जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग चंद्रपूर अंतर्गत तंबाखू नियंत्रण भरारी पथकाच्या माध्यमातून कोटपा कायदा 2003 चे उल्लंघन करणा-या चंद्रपूर शहरातील पान मटेरियल शॉप, पान सेंटर, सिनेमा टॉकीज, रेस्टॉरंट, बसस्टॉप, शाळा व कॉलेज परिसरात धाडी टाकून दंड वसूर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा सल्लागार डॉ. कैलास नगराळे मित्रांजय निरंजनेतुषार रायपूरे तसेच पोलीस विभागातील सुधाकर इटनकर, सुशील गेडाम  यांनी कार्यवाही  केली आहे.
 त्यामुळे जिल्ह्यात विकल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई करण्याचा सपाटा लावण्यात आला असून खर्रा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून दूर रहावे. या संदर्भात होणा-या अवैध विक्री विरुध्द जागृकता निर्माण करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.  
                                                0000

सफाई कामगारांना महानगरपालिकेने घरांची उपलब्धता करावी: दिलीप हाथीबेड


सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी
जिल्ह्यामध्ये समन्वय समिती स्थापन करणार

चंद्रपूर, दि.29 ऑगस्ट - चंद्रपूर महानगरांमध्ये व जिल्हयातील अन्य नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमाची अंमलबजावणी शेवटी सफाई कामगारांकडे येते. त्यामुळे अशा कामगारांच्या उत्तम आरोग्यासाठी व सुविधांसाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध योजनांमधून घरांची उपलब्धता करून द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी आज येथे केले.
चंद्रपूर येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य हाथीबेड दौऱ्यावर आले होते समाज कल्याण कार्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन  कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत झालेल्या  प्रमुख बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मुख्याधिकारीचंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे,अतिरिक्त  जिल्हा पोलिस अधीक्षक  हेमराजसिंह राजपूत, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना निकाली काढले. यावेळी महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना अंतर्गत घरे उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी माहिती दिली. चंद्रपूर महानगरपालिकेने या संदर्भात पाऊल उलल्याबद्दल त्यांनी महानगरपालिकचे देखील कौतुक केले.
 यावेळी सफाई कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने लाड समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकृतिबंधानुसार सफाई कर्मचाऱ्यांची भरती,महानगरपालिका सफाई कामगारांसाठी आवश्यकतेनुसार घरेशासकीय नियमानुसार अनुकंपा भरती प्रक्रिया गतिशील करणे सुट्टीच्या दिवशीच्या कामाचा मोबदला निश्चित करणे कालबद्ध पदोन्नती मधील प्रकरणे निकाली काढणे,ठेकेदारी पद्धतीच्या कामात सफाई कामगारांना प्राथमिकता देणे, किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिल्यास कारवाई करणे, पोलिस ठाण्यांमध्ये नियुक्ती बाबतचा प्रस्ताव पाठवणे आदी मुद्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या कार्यक्रमाचा समारोप करताना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये प्रतिनिधींना सहभागी करण्यात येईल. तसेच दोन महिन्यातून एकदा या समितीची बैठक घेतली जाईलअसे स्पष्ट केले. या बैठकीला गौरीशंकर गावकर, पवन सातपूते, विजय हारकर, भालचंद्र राऊत आदीसह जिल्हयातील सफाई कामगार संघटनेचे नेते व पदाधिकारी  उपस्थित होते.
                                                0000

Wednesday 29 August 2018

कृषी केंद्रावर औषधीच्या नावासह किंमतीचे फलक न लावणा-यांवर कारवाई करा


जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत एकमुखी मागणी
हॅलो चांदा 155-398 या क्रमांकाचा तक्रारीसाठी वापर करण्याचे आवाहन

       चंद्रपूर, दि.28 ऑगस्ट - ‍धान, कपाशी व अन्य पिकांवर आलेल्या किडीमुळे शेतकरी एकीकडे संकटात असतांना कृषी विभागाने त्यांना फवारणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. तसेच   कृषी केंद्र मालकांनी फवारणी औषधीची उपलब्धता, योग्य औषधी वापरण्याचा सल्ला व त्याच्या किंमतीचे फलक दर्शनी भागात लावावे. या कृषी केंद्राची तपासणी नियमित व्हावी, त्याबाबत प्रत्येक तालुकास्तरीय अधिका-यांनी अंमलबजावणीसाठी पुढे यावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले.
            चंद्रपूर जिल्हयामध्ये यावर्षी पाऊस भरपूर असतांना पिकांवर आलेल्या किडीमुळे शेतकरी चिंतेत आहे. अशावेळी फवारणीचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. शेतक-यांनी कोणती औषधी फवारणीसाठी वापरावी. त्याचे प्रमाण किती असावे, या संदर्भात प्रत्येक कृषी केंद्रावर फलक लावावे, अशी मागणी समितीचे सदस्य गिरीधरसिंह बैस यांनी केली आहे. सोबतच बंदी आणलेल्या औषधीबाबतही जागृती करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अन्य सदस्य सदाशिव सुकारे यांनी औषधी व त्याच्या किंमतीची यादी लावण्याबाबत मागणी केली. आजच्या बैठकीमध्ये विद्युत मंडळाच्यामार्फत येणा-या अवास्तव विद्युत बिलाबाबतही सदस्यांनी तक्रारी नोंदविल्या. काही सदस्यांनी या संदर्भातील लेखी तक्रारी नागरिकांच्या वतीने आणल्या होत्या. विद्युत मंडळाने या संदर्भात लक्ष घालण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील फळे विक्रेत्यामार्फत फळे पिकवतांना होत असलेल्या रासायनिकाच्या वापराबाबत विभागाने सतर्क रहावे व नियमितपणे बैठकीत महिन्याच्या कार्यवाहीचा अहवाल दयावा, असा दंडक घातला.
            याशिवाय शासकीय कार्यालयात मुद्रांक शुल्कासाठी अतिरीक्त पैशाची मागणी होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी समितीच्या सदस्यांनी केली. प्लॉस्टीकच्या बंदीबाबत चंद्रपूर महानगरपालिकेने राबविलेल्या मोहिमेचा आढावाही घेण्यात आला. जिल्हयाभरातील नगर पंचायतीनी देखील हा कित्ता गिरवावा, असे आवाहनही करण्यात आले. या बैठकीचे आयोजन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव आर.आर.मिस्कीन यांनी केले. या बैठकीला मार्गदर्शन करतांना निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी समिती सदस्यांच्या तक्रारीबाबत अतिशय गंभीरतेने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. या समितीने जनतेला त्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवार यंत्रणेच्या 155-398 या टोल फ्रि क्रमांचा वापर करण्याचे आवाहन केले. या टोल फ्रि क्रमांकावर तक्रार केल्यानंतर प्रशासनामार्फत महिनाभराच्या आत कार्यवाही करण्यात येते,असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला अ.मा.नरवाडे, वा.स.नामपल्लीवार, डॉ.विनोद गोरंटीवार, दत्तात्रेय गुंडावार, आशीष कोट्टावार, सचिन चिंतावार, मनिष व्यवहारे, कविश्वर साळवे, जगदीश रायठ्ठा, डब्ल्यु.जी.कुरेशी, नितीन गुंडेज्या, गिरीधरसिंह बैस, हर्षवर्धन पिपरे, कल्पना बगुलकर, मिनाक्षी गुजरकर, संगीता लोंखडे, सदाशिव सुकारे, सुहास कोतपल्लीवार, डॉ.प्रीती बैतुले, डॉ.अजय गोगुलवार आदींची उपस्थिती होती.
                                                            0000

Wednesday 22 August 2018

चंद्रपूरच्या 'मिशन शक्ती 'ला आमिर खानचे मिळणार पाठबळ



चंद्रपूरचे आमंत्रण स्वीकारले ,'मिशन शक्ती 'मध्ये सहभागी होणार
आमीरला ताडोबा , खाणीचेही आकर्षण

चंद्रपूर दि २२ ऑगस्ट :आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असणारे सिनेअभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभे राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत.राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीमध्ये आमिर खान यांनी या मिशन शक्ती मध्ये सहभागी होण्याचे मान्य केले आहे. देशभक्तीच्या या अफलातून प्रयोगासाठी आपले सर्व पाठबळ देण्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे. लवकरच यासंदर्भातील कार्यक्रमासाठी आमिर खान ताडोबानगरी चंद्रपूरमध्ये येणार आहेत.
                    ठासून गुणवत्ता भरलेल्या चंद्रपूर गडचिरोली या भागातील आदिवासी, मागास व अन्य सर्व समाजातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व कला प्रकारात देशपातळीवर धडक दिली आहे . मिशन शौर्यमध्ये तर एव्हरेस्ट सर करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नात आदिवासी आश्रम शाळेतील सतरा-अठरा वर्षाचे विद्यार्थी एव्हरेस्टवर चंद्रपूरचा झेंडा फडकवून आले आहेत. नुकतेच ब्रम्हपुरी येथील येरमे बंधू आंतरराष्ट्रीय कराटे चैंपियनशिप साठी अॅथेन्स येथे रवाना झाले आहेत. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सैन्यामध्ये, अर्धसैनिक दलात, पोलिसात काम करणारे नवजवान आहेत .या प्रदेशाचा देशसेवेसाठी काम केल्याचा आपला स्वतःचा इतिहास आहे. मंगळवारी सिने अभिनेते आमिर खान आणि अर्थमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या झालेल्या भेटी दरम्यान ताडोबाच्या पराक्रमी वाघांपासून तर या भागातील वन्यजीव ,वनसंपदा आणि खाणीचे साम्राज्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी त्यांना दिली. यावेळी त्यांनी चंद्रपूरच्या ऑपरेशन शौर्य मध्ये सहभागी झालेल्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पराक्रमाची गाथा त्यांना सांगितली. सध्या आशियाई स्पर्धा जकार्तामध्ये सुरू आहे हा धागा पकडून त्यांनी आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे काही विशिष्ट क्रीडाप्रकारांमध्ये पदक वाढविण्याची क्षमता या भागातील विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे सांगितले.
               चंद्रपूरमध्ये येत्या डिसेंबर पर्यंत सर्व तालुक्यातील क्रीडा संकुले तयार होत आहे . बल्लारपूर येथे तयार होणाऱ्या विशेष क्रीडा संकुलामध्ये अशा प्रकारच्या क्रीडा प्रकाराला चालना देण्याची तयारी केली जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले .आमीर खान यांना हा प्रयत्‍न भावला असून त्यांनी अशा पद्धतीने एखादया भागात लोकप्रतिनिधी विशेष प्रकल्पासाठी काम करीत असल्याचे ऐकून आनंद झाल्याचे स्पष्ट केले. या भेटी दरम्यान आमिर खान यांनी ताडोबा परिसरातील  वन्यजीव, वनसंपदा जिल्ह्यातील विपुल खनिज संपत्ती आणि खान पर्यटनाला असलेला वाव याबाबतही जाणून घेतले. या परिसराचा इतिहास जाणून घेताना त्यांनी चंद्रपूरला भेट देण्याचे मान्य केले असून मिशन शक्तीला पाठबळ देण्याचे जाहीर केले. 
               ना. मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीमध्ये सहा क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये वेटलिफीटींग, धर्नुविद्या, नेमबाजी, जलतरण,  व्हॉलीबाल व जिम्नॉस्टिक्स या खेळाचा सहभाग असेल. ६ खेळाची निवड केली असून यासाठी चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील सर्व समाज घटकातील गुणवान, काटक,  चपळ व उच्च शारीरिक क्षमता असणाऱ्या मुलांची कडक चाचणीद्वारे निवड केली जाणार आहे .या सर्व मुलांना आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि संबंधित क्रीडाप्रकारातील जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील उद्योग-व्यापार जगतातील नामवंत व्यक्तींकडून आर्थिक मदत घेतली जाणार आहे. 2018 मध्ये या विषयक प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून ना. मुनगंटीवार यांनी यासाठी 2024 च्या ऑलंपिक क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील सहा वर्षात या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील ,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय समाजामधील सामाजिक पुरुषार्थ वाढविणाऱ्या चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आमिर खान यांनी अशा घटनाक्रमांची नोंद आपल्या चित्रपटांमध्ये घेतली आहे.चंद्रपूर मध्ये ना. मुनगंटीवार करीत असलेल्या या प्रयोगाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे .
पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील 4250 गावे पाणीदार करण्यासाठी आमिर खान आणि श्रीमती किरण राव यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. पाणी समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेत हा पुढाकार मैलाचा दगड ठरणार असल्याचे ना सुधीर मुनगंटीवार म्हणाले.पाणी फाउंडेशन आणि ग्रीन महाराष्ट्र यांच्या माध्यमातून संयुक्तपणे मोहीम राबविण्यास हरित महाराष्ट्र ही संकल्पना साकार होण्यास मदत होईल असेही  ते म्हणाले.
०००००