सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी
जिल्ह्यामध्ये समन्वय समिती स्थापन करणार
चंद्रपूर, दि.29 ऑगस्ट - चंद्रपूर महानगरांमध्ये व जिल्हयातील अन्य नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमाची अंमलबजावणी शेवटी सफाई कामगारांकडे येते. त्यामुळे अशा कामगारांच्या उत्तम आरोग्यासाठी व सुविधांसाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध योजनांमधून घरांची उपलब्धता करून द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी आज येथे केले.
चंद्रपूर येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य हाथीबेड दौऱ्यावर आले होते. समाज कल्याण कार्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रमुख बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मुख्याधिकारी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे,अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना निकाली काढले. यावेळी महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना अंतर्गत घरे उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी माहिती दिली. चंद्रपूर महानगरपालिकेने या संदर्भात पाऊल उलल्याबद्दल त्यांनी महानगरपालिकचे देखील कौतुक केले.
यावेळी सफाई कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने लाड समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकृतिबंधानुसार सफाई कर्मचाऱ्यांची भरती,महानगरपालिका सफाई कामगारांसाठी आवश्यकतेनुसार घरे, शासकीय नियमानुसार अनुकंपा भरती प्रक्रिया गतिशील करणे, सुट्टीच्या दिवशीच्या कामाचा मोबदला निश्चित करणे, कालबद्ध पदोन्नती मधील प्रकरणे निकाली काढणे,ठेकेदारी पद्धतीच्या कामात सफाई कामगारांना प्राथमिकता देणे, किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिल्यास कारवाई करणे, पोलिस ठाण्यांमध्ये नियुक्ती बाबतचा प्रस्ताव पाठवणे आदी मुद्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या कार्यक्रमाचा समारोप करताना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये प्रतिनिधींना सहभागी करण्यात येईल. तसेच दोन महिन्यातून एकदा या समितीची बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट केले. या बैठकीला गौरीशंकर गावकर, पवन सातपूते, विजय हारकर, भालचंद्र राऊत आदीसह जिल्हयातील सफाई कामगार संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment