Search This Blog

Tuesday 28 February 2023

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोप





 जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोप

चंद्रपूर, दि. 28: कृषी विभागाच्या वतीने 24 फेब्रुवारी रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे कृषी महोत्सव व पशुप्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. सलग पाच दिवस चाललेल्या कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम पार पडला

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, माजी कृषी सहसंचालक डॉ. उदय पाटील, मूलचे तालुका कृषी अधिकारी  भास्कर गायकवाड, नामदेव डाहुले, संजय गजपुरे, नरेंद्र जीवतोडे तसेच वयाची शंभरी पार केलेले वयोवृद्ध आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, चांदा क्लब ग्राउंड येथे पाच दिवस जिल्ह्याचे कृषीप्रदर्शन झाले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जिल्ह्यामध्ये मिशन जयकिसान ची  घोषणा केली. शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पुढच्या वर्षभरात काय काय उपायोजना करावयाच्या आहे? त्याचे संपूर्ण विवेचन आणि नियोजनबद्ध कार्यक्रम मिशन जय किसानच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे तर शेतकरी या देशाचा कणा आहे. या अमृत महोत्सवीवर्षात बळीराजाला बळकट करण्याचे काम देशपातळीवर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. शेतकरी  एका दान्याचे हजार दाणे करतो व काळ्या मातीतून सोने उगवतो. या देशाची लोकसंख्या 130 करोड आहे. त्यांना अन्नधान्य पुरविण्याचे काम हा शेतकरी करतो. पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाचे व प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचे कथन ऐकण्यास मिळाले. शेतकरी जसा प्रयोगशील असतो त्याचप्रमाणे अधिकारी सुद्धा प्रयोगशील असावा तरच कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ शकेल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या संकल्पनेतून मिशन जय किसान जिल्ह्यात सुरू केले. शेतकरी हा देशाची ताकद असून आज 130 कोटी लोकसंख्या असलेल्या जगाला अन्न पुरविण्याचे काम शेतकरी करीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. विदर्भात सर्वात जास्त ज्वारीचे क्षेत्र हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने फळाचे महत्व, फायदे व त्याबाबतची जनजागृतीसाठी कृषी विभागामार्फत स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकेत प्रकल्प उपसंचालक नंदकुमार घोडमारे म्हणाले, 24 फेब्रुवारी रोजी कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या ठिकाणी 200 स्टॉलची उभारणी करण्यात आली. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून मिलेट दौड काढण्यात आली तर पाच दिवसीय प्रदर्शनीमध्ये विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले. या पाच दिवसीय महोत्सवात 18 हजार 267 लोकांनी नोंदणी करून प्रदर्शनीला भेट देत लाभ घेतला. प्रत्येक स्टॉलवर संवाद साधला असता 26 लाख 61 हजार 600 रुपयांचे साहित्य विक्री झाली असल्याची माहिती मिळाली असल्याचे सागिंतले.

तत्पूर्वी, वयाची शंभरी पार केलेल्या भीमा राठोड (110 वर्ष), परसराम राठोड(105 वर्ष), जनाबाई चव्हाण(103 वर्ष) व भोजू गायकवाड(102 वर्ष) यांचे मान्यवरांच्या हस्ते चरण धुवून सत्कार करण्यात आला. या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शंभर पार केलेल्या वयोवृद्धांनी स्वतःचे अनुभव कथन केले.

यावेळी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (फलोत्पादन)चंद्रशेखर आवारी, मोरेश्वर देरकर, स्वप्निल कोल्हटकर, किशोर ठावरी, गजानन बन्सोड आदी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

00000

आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत प्रशिक्षण सत्र


आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत प्रशिक्षण सत्र

Ø 24 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28: वर्ग-3 व वर्ग-4 पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षेची, आदिवासी उमेदवारांकडून तयारी करून घेण्याकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने साडेतीन महिन्यांचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सत्र 1 एप्रिल 2023 पासुन आयोजित करण्यात आले आहे. दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2023 या कालावधीत होणाऱ्या प्रशिक्षण सत्राकरीता अनुसूचित जमातीतील आदिवासी उमेदवारांनी 24 मार्च 2023 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. 19, चंद्रपूर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले आहे.

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देय राहील. अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी सदर अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग (जात), तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांचा नोंदणी क्रमांक आदींचा उल्लेख करावा. व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्याकरीता एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 24 मार्च असून 28 मार्च 2023 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. निवड यादी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसिध्द करण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या अटी : उमेदवार अनुसूचित जमाती (एस.टी.) (आदिवासी) प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 दरम्यानचे असावे. उमेदवार किमान एच.एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे नोंदणी केलेले असावे.

आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, गुणपत्रिका (एस.एस.सी / एच.एस.एस.सी / पदवी), आधारकार्ड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे नोंदणी कार्ड.

00000

महाज्योतीमार्फत जेईई,नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्डचे वितरण

 


महाज्योतीमार्फत जेईई,नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्डचे वितरण

Ø आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योतीमार्फत मंजूर झालेल्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे व ज्या विद्यार्थ्याचे नाव मंजूर यादीत समाविष्ट आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपले टॅब व डाटा सिमकार्ड सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण, शासकीय दूध डेअरी रोड, जलनगर, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत येऊन प्राप्त करून घ्यावे. तसेच पालकांना सोबत घेऊन यावे.

विद्यार्थ्यांनी स्वतःचे व पालकांचे आधार कार्ड, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका व बोनाफाईड सर्टिफिकेट आदी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्र व कागदपत्रे सोबत ठेवावीत. वरील कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कुणालाही टॅब देण्यात येणार नाही. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.

000000

पोवनी-गौरी ते राजुरा मार्ग जड वाहनांच्या वाहतुकीस बंद

 


पोवनी-गौरी ते राजुरा मार्ग जड वाहनांच्या वाहतुकीस बंद

Ø नागरीकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : पोवनी-गौरी ते राजुरा या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमन व्हावे. तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकरीता 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत पुलाचे बांधकाम अद्यापही पूर्ण न झाल्याने सदर मार्गावरील वाहतूक 31 मे 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंद करण्यात येत आहे. जनतेने पर्यायी मार्ग म्हणून राजुराकडून पडोलीकडे येणारी जड वाहतूक ही राजुरा-रामपूर-सास्ती-पोवनी-हडस्ती-देवाडा-दाताळा-पडोली या मार्गाचा वापर करावा. तसेच पडोली ते राजुराकडे जाणारी जड वाहतूक ही पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती-पोवनी-सास्ती-रामपूर-राजुरा या मार्गाचा वापर करावा व दिलेल्या निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

पौवनी-गौरी-रामपूर-राजुरा या 7 किलोमीटर रस्त्याचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशीनरी ही मोठी असल्याने रस्ता बांधकाम करतांना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनांना येण्या-जाण्याकरीता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. अवजड वाहतूकदारांना राजुराकडून पडोलीकडे येण्यासाठी राजुरा-रामपूर-सास्ती-पौवनी-हडस्ती-देवाडा-दाताळा-पडोली या मार्गाचा वापर करता येईल. तसेच पडोलीकडून राजुराकडे जाण्यासाठी जड वाहतुकींना पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती-पोवनी-सास्ती-रामपूर-राजुरा या मार्गाचा वापर करता येईल. पोवनी-गौरी ते राजुरा हा रस्ता जड वाहनाकरीता दि. 31 मे 2023 पर्यंत पूर्णपणे बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-1 मार्फत विनंती करण्यात आली आहे.

00000

भाषेमुळेच व्यक्तिमत्व घडण्यास मदत – श्रीपाद जोशी



 

भाषेमुळेच व्यक्तिमत्व घडण्यास मदत – श्रीपाद जोशी

Ø जिल्हा माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन

चंद्रपूरदि. 28 माहिती आणि ज्ञानाचे विविध स्त्रोत अशा या श्रीमंतीच्या काळात आपली मानसिकता गरीब राहता कामा नये. उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर भाषेशिवाय पर्याय नाही. आज संधीचे प्रारुप तयार झाल्यामुळे स्वत:ला तयार करा. त्यासाठी आपल्या भाषेवर प्रेम करा, असे आवाहन कवी, लेखक, नाटककार श्रीपाद जोशी यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

आपल्या व्यक्तिमत्वातील तेज, सामर्थ्य हे बोलण्यातून प्रगट होते, असे सांगून श्री. जोशी म्हणाले, उर्जावान आणि उत्साहाने बोलण्यासाठी सर्वात महत्वाची भाषा असते. त्यासाठी शब्दाचे सामर्थ्य असावे लागते. भाषा ही कोणाच्याही मालकीची नाही. आपण मागास भागातील विद्यार्थी आहोत, असा न्युनगंड मनातून काढून टाका. प्रत्येक विषयावर बोलण्याचे कौशल्य विकसीत करा. त्यामुळे आपली भाषा समृध्द होईल आणि व्यक्तिमत्वात तेज झळकेल. विद्यार्थ्यांनो वाचन नियमित करा. आपल्या भाषेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या.

मराठी भाषेच्या उगस्थानाबद्दल बोलतांना श्री. जोशी म्हणाले, इ.स. 400 च्या सुमारास संस्कृत, महाराष्ट्रीय प्राकृत भाषा सुरू झाली. त्यात 18 देशी भाषांचा परिचय केला गेला. इ.स. 900 मध्ये श्रवणबेळगाव येथे शिलालेख सापडला. 1188 मध्ये मुकुंदराज यांनी वैनगंगेच्या तिरावार अंभोरा (जि. भंडारा) येथे विवेकसिंधू हा ग्रंथ लिहिला. 12 व्या शतकाचा काळ हा महानुभावपंथीय काळ म्हणून ओळखला जातो. या काळात चक्रधरांचे शिष्य माइंनभट यांनी दृष्टांत हा ग्रंथ लिहिला. इ.स. 1275 ते 1296 हा ज्ञानेश्वरांचा कालखंड आहे. संत ज्ञानेश्वरांनी 9 हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. त्यानंतर संत नामेदवांनी नाममुद्रा, नामसंकिर्तन रुजविले. 15 व्या शतकात संत एकनाथ, संत रामदास होऊन गेले. त्यानंतर संत तुकारामांनी पाच हजारांच्या वर अंभग लिहिले. 300 – 350 वर्षानंतर आजही तुकारामांचे अभंग मानवी कल्याणासाठी मार्गदर्शनपर आहेत. शिवकालीन साम्राज्यात शाहीर, पोवाडा विकसीत झाला. ब्रिटीश राजवटीनंतर केशवसुत, कवी बी. बालकवी, कुसुमाग्रज, ग्रेस,नारायण सुर्वे आदी कवी, लेखक होऊन गेल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, आपल्या भाषेविषयी जोपर्यंत आपल्याला प्रेम आणि आपुलकी आहे, तोपर्यंत भाषा टिकणार आहे. पिढ्यानपिढ्या भाषा आपल्या सोबत असते. त्यामुळे भाषेवर प्रेम करणे शिका. अभ्यासाच्या रुपाने भाषेला प्रेम द्या, तेवढे तुम्हालाही भाषेचे प्रेम मिळणार आहे.

यावेळी रोजगार मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे म्हणाल्या, स्पर्धा परिक्षेसोबतच भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आयुष्यात ‘लढ म्हणा’ अशी थाप असली तर पुन्हा आपण गतीने काम करतो. मराठी भाषेचे संवर्धन करायचे, असा सकंल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी तर संचालन सुशील सहारे यांनी केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

००००००

अपर जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 

 



अपर जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

चंद्रपूरदि. 28 : सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभागामार्फत आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मरुगानंथम एम., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीवर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक छाया येलकेवाड, विधी अधिकारी अनिल तानले आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत 35 पैकी एकूण 34 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यात प्रथम हप्ता 16 प्रकरणे तर द्वितीय हप्तामधील 18 प्रकरणांचा समावेश आहे. तसेच तपासावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करावा, अशा सुचना अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे यांनी पोलिस विभागाला दिल्या.

आतापर्यंत एकूण नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या 1626 आहे. यात पोलिस तपासावर 31 गुन्हे,पोलिस फायनल 129, न्यायप्रविष्ठ 1429, ॲट्रॉसिटी कलम कमी केलेले 35 आणि पोलिस ॲबेटेड समरीवरील 2 गुन्ह्यांचा समावेश आहे. न्यायप्रविष्ठ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली 94 प्रकरणे, दोषमुक्त झालेले 916, केस मागे घेतलेले 92, विथड्राल ॲबेटेड समरी 11, न्यायालयातून कलम कमी 5 आणि न्यायालयात प्रलंबित 311 असे एकूण 1429 प्रकरणे असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त यांनी दिली.

००००००

Monday 27 February 2023

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली केंद्र बांधकाम निधी त्वरित मंजुरीसाठी पालकमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली केंद्र बांधकाम निधी

त्वरित मंजुरीसाठी पालकमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे

चंद्रपूरदि. 27 : गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असून सदर विद्यापीठाच्या गडचिरोली केंद्राच्या स्वतः च्या इमारतींचे बांधकाम वेगाने होणे आवश्यक आहे. त्याकरीता बांधकाम निधीचे अंदाजपत्रक त्वरित मंजुर व्हावे यासाठी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुलपती व राज्यपाल रमेश बैंस यांना एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरीता स्थापन करण्यात आले आहे. या दोन्ही जिल्ह्यात आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. या दोन जिल्ह्यात वनक्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार क्षमता वाढविणारे शिक्षणक्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करणे हे उद्दिष्ट गोंडवाना विद्यापीठाने समोर ठेवले आहे.

सध्या गडचिरोली येथील विद्यापीठ केंद्र भाड्याच्या इमारतीत आहे. या विद्यापीठावर दोन्ही जिल्ह्यातील तरूणांचे भवितव्य अवलंबून असल्याने विद्यापीठ स्वतःच्या इमारतीत  लवकरात लवकर स्थलांतरित होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली केंद्राच्या बांधकामासाठी 884 कोटींचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. या अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यानंतर निधीविषयक प्रक्रिया पुढे सरकेल. त्यामुळे हे अंदाजपत्रक मंजूर करण्याकरीता राज्यपाल महोदयांनी कुलपती या नात्याने त्वरित लक्ष घालावेअशी विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल श्री रमेश बैंस यांना केली आहे. या विषयात राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

००००००

‘फळाहार सर्वोत्तम आहार’बाबत कृषी विभागातर्फे स्लोगन स्पर्धा


‘फळाहार सर्वोत्तम आहार’बाबत कृषी विभागातर्फे स्लोगन स्पर्धा

चंद्रपूरदि. 27 : निरोगी आयुष्यासाठी, विविध जीवनसत्वाच्या आवश्यक पुर्तीसाठी आणि शरीराच्या बळकटीसाठी रोज एक तरी फळ खाणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने आरोग्याच्या दृष्टीने फळाचे महत्व, फायदे व त्याबाबतची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्वोत्तम स्लोगन स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेत शेतकरी, नागरीक तसेच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. उत्कृष्ट स्लोगनकरीता प्रथम बक्षीस 3 हजार, द्वितीय बक्षीस 2 हजार तर तृतीय बक्षीस 1 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. स्लोगनची थीम ‘रोजच्या आहारात फळाचा वापर आवश्यक करणे व त्याचं महत्व पटविणे’ ही आहे. स्लोगन यापूर्वी प्रसारीत झालेले नसावे, स्लोगन संक्षिप्त व स्पष्ट असावे.

स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 7 मार्च 2023 असून आपले स्लोगन कृषी भवनचंद्रपूर अथवा dsaochandrapur@gmail.com वर पाठविता येतील. स्लोगन पाठविताना आपले नावपत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावा. आपले स्लोगन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किंवा आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी येथे व्यक्तिशः सादर करता येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

००००००

Sunday 26 February 2023

प्रशासकीय भवन परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रमदान





प्रशासकीय भवन परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रमदान

Ø सहाय्यक जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम

चंद्रपूरदि. 26: आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तसेच आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावाया उद्देशाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविन्यात आली. तर आता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर प्रशासकीय भवन परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.

प्रशासकीय भवन येथे विविध कार्यालय आहेत. या कार्यालयात दैनंदिन शासकीय कामकाजाच्या निमित्ताने नागरिकांची व अभ्यागंताची सतत येजा सुरू असते. त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावेया उद्देशाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या पुढाकारातून श्रमदान करण्यात आले. तसेच इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. या श्रमदानात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहितेभूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक प्रमोद घाडगे यांच्यासह प्रशासकीय भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Saturday 25 February 2023

अतिक्रमण नोटीस बाबत पालकमंत्र्यांनी रेल्वे अधिका-यांना खडसावले




अतिक्रमण नोटीस बाबत पालकमंत्र्यांनी रेल्वे अधिका-यांना खडसावले

चंद्रपूर, दि. 25 : जलनगर येथे वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. नियोजन सभागृह येथे जलनगर रेल्वे प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासन, रेल्वेचे अधिकारी व नागरीकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘सर्वांना घरे’ ही मा. पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, एकीकडे नागरिकांना घरे देण्याची योजना असतांना रेल्वे प्रशासन नागरिकांना बेघर करीत आहे. अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे बोर्डाचा कोणताही आदेश आला तर सर्वात प्रथम जिल्हा प्रशासन व पालकमंत्री कार्यालयाशी रेल्वे प्रशासनाने संपर्क करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाला जमिनीची आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मागावे. नागरिकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेण्यात यावे. सरसकट कारवाई करून नागरिकांना बेघर करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

35 – 40 वर्षांपूर्वी जेव्हा अतिक्रमण झाले तेव्हा रेल्वेने काहीही म्हटले नाही. रेल्वेला आता अतिक्रमणाची आठवण आली. या शहरावर पहिला हक्क स्थानिकांचा आहे. रेल्वे प्रशासनाने पहिले नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करावी, नंतरच अतिक्रमणाला हात लावावा. तसेच रेल्वेने आता कोणतेही नवीन अतिक्रमण होऊ देऊ नये, मात्र जुन्या घरांना हात लावू नका. राज्य शासनाच्या घरकुल योजनेत रेल्वेनही आर्थिक सहकार्य करावे. याबाबत आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

०००००००

Friday 24 February 2023

जिल्ह्यातील रमाई आवास योजने अंतर्गत एकूण 2178 घरकुल मंजूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

 

जिल्ह्यातील रमाई आवास योजने अंतर्गत एकूण 2178 घरकुल मंजूर

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चंद्रपूरदि. 24 : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजने अंतर्गत एकूण 2178 घरकुल मंजूर करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी जिल्ह्याकरीता 6009 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.पूर्ण जिल्हातून पंचायत समिती निहायएकूण 2192 अर्ज सादर झालेले होतेत्यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश होता. त्यामध्ये जिल्हातून पात्र 2178 लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे.

ज्या लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले नसेल अशा लाभार्थ्यांनी 'वंदे मातरम चांदा या 1800-233-8691 या टोलफ्री नंबर वर फोन करून आपले संपूर्ण नाव,पूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक ट्रोलफ्री नंबरवर कळवावे. समाजकल्याण विभागाकडून पात्र लाभार्थी तपासुन पुढील मंजुरी यादीत त्यांचे नाव घेण्यात येईल.

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाच्या सर्व योजना पोहोचाव्या आणि प्रत्येकाला मूलभूत सुविधा उपलब्ध  व्हाव्यात हे  पं. दीनदयाल उपाध्याय यांचे अंत्योदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जिल्ह्यातील गरजूंना घर देण्यासाठी रमाई आवास योजनेतून मदत करण्याचा निरंतर प्रयास राहील असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

००००००

शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 





शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा -  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø चांदा क्लब येथे कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन

चंद्रपूर, दि. 24 : कृषीपासून ते उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर भारत करण्याचा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे. कृषी क्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून ख-या अर्थाने शेतकरी हाच खरा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चांदा क्लब येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक नंदकुमार घोडमारे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुळकर उपस्थित होते.

कृषी क्षेत्राच्या भरभराटीसाठी जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ राबविण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे सिंचनाच्या व्यवस्था करण्यात येईल. राज्यातील सर्व माजी मालगुजारी तलावाच्या नुतणीकरणासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती आपण उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. येत्या अर्थसंकल्पात ही घोषणा होणार असून पहिल्या टप्प्यात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी हे अमृत आहे. आपली गावे कसे वॉटर न्यूट्रल करता येतील, त्याबाबत नियोजन करावे. यासाठी खनीज विकास निधी, नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ.

पाच दिवस चालणा-या या कृषी महोत्सवात एकूण 211 स्टॉल लागले असून यातून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक माहिती मिळेल. जिल्हा प्रत्येक बाबतीत अग्रेसर राहावा, यासाठी आपण कटिबध्द आहोत. अर्थमंत्री असतांना आपण सहकारी शेतीची संकल्पना मांडली. राज्यात 1 कोटी 37 लक्ष शेतकरी भोगवटादार असून 1 कोटी 7 लक्ष शेतकरी अल्पभुधारक आहेत. ‘चांदा ते बांदा’ योजनेत कृषी आर्मी करण्याचा आपण संकल्प केला होता. दुस-याचे पोट भरणारा शेतकरी उपाशी राहणे योग्य नाही. त्यासाठी सामुहिक शेती हा चांगला पर्याय आहे. शेतकरी प्रक्रिया उद्योगांचे जाळे विणण्यासाठी शेतकरी समोर येत आहे.

पुढे पालकमंत्री म्हणाले, रक्त आणि पोट भरणारे धान्य कृत्रिमरित्या निर्माण करता येत नाही. अलिकडच्या काळात  शेती करण्याकडे कल कमी झाला आहे. शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय होणे आवश्यक आहे. शेत तिथे मत्स्यतळे अशी योजना राबविण्यात येणार आहे. किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अल्पदरात शेतक-यांना कर्ज मिळू शकते. जिल्ह्यात भाजीपाला क्लस्टर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कृषी स्टार्ट अपमध्ये पहिला शेतकरी आपल्या जिल्ह्यातून व्हायला पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. शेतक-यांनो केवळ कृषी प्रदर्शनी बघू नका तर नवीन तंत्रज्ञान घेऊन शेती जगविण्याचा विचार करा.

पुढील वर्षी कृषी महोत्सव हा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावा. या कृषी महोत्सवाकरीता शेतकरी, नागरीक यांच्या सुचना मागण्यासाठी आजपासूनच येथे एक बॉक्स ठेवा. उत्कृष्ट सुचना देण्या-यांना आपल्या स्वत:कडून 11 हजार, 5 हजार व 3 हजार असे बक्षीस देण्यात येईल. तसेच पुढील महोत्सवात एक दिवस कृषी साहित्य अधिवेशन, एक दिवस सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन असे सत्र आयोजित करावे. अत्याधुनिक नर्सरीच्या बाबतीत शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी नाविन्यपूर्ण किंवा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला आहे. त्यामुळे पशुधनासाठी चांगले कुटार उपलब्ध होईल. कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा शेतक-यांनी अवलंब करावा. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शेतक-यांपर्यंत शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान पोहचविणे, हा यामागचा उद्देश आहे. शेतक-यांनी खाजगी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. जिल्ह्यात पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे दुबार – तिबार पिके घेतली तर शेतक-यांचे उत्पन्न वाढेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी देऊन माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार उपसंचालक रविंद्र मनोहरे यांनी मानले. कार्यक्रमाला शेतकरी प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधी, विविध स्टॉलचे प्रतिनिधी, शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

पशु प्रदर्शनीला भेट : जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चांदा क्लब समोरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडवर पशु प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व पशुपालकांशी संवाद साधला.

०००००००

राज्यात 2550 चौ. किमी. वनक्षेत्रात वाढ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 








राज्यात 2550 चौ. किमी. वनक्षेत्रात वाढ

                                     -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा वर्धापन दिन

Ø मानव विकास, डोंगरी विकासच्या धर्तीवर वनग्राम विकास योजना

चंद्रपूर, दि. 23 : ‘वन से जीवन के मंगल तक’ आणि ‘वन से धन तक’ हे केवळ वनविभागामुळेच शक्य आहे. निसर्गाचे संरक्षण करून ईश्वरीय कार्य करण्याचे काम आमचा विभाग करतो आहे. वन अधिकारी, कर्मचारी, वनमजूर आणि विशेष म्हणजे गावक-यांच्या सहकार्यामुळेच राज्यात 2550 चौ. किमी वनक्षेत्रात वाढ करू शकलो, याचा मनस्वी आनंद आहे, असे राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी यावेळी, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, अप्पर मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, चंदनसिंह चंदेल उपसंचालक कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे, सैनिकी शाळेचे प्रशासकीय अधिकारी देवाशिष जीना, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, तसेच सरपंच, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

काँक्रीटच्या जंगलापेक्षा निसर्गाच्या जंगलात राहणारे जास्त नशीबवान आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ईश्वरीय कार्य करण्याचे काम वनविभाग करतो. या विभागाचा मंत्री होणे हे आपले सौभाग्य आहे. गत कार्यकाळात राज्याचा अर्थमंत्री म्हणून देशात सर्वोत्तम 11975 हजार कोटींचा सरप्लस अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला. वनमंत्री आणि धनमंत्री असल्यामुळेच असा सरप्लस अर्थसंकल्प मांडू शकलो. राज्यात सर्वांच्या सहकार्याने वनक्षेत्रात वाढ झाली असून ती तब्बल 2550 चौ. किमी आहे. तसेच देशात महाराष्ट्राने सर्वात जास्त मँग्रोजचे क्षेत्र वाढविले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याची दखल घेतली असून महाराष्ट्राच्या या अभिनव प्रकल्पाचे केंद्राने कौतुक केले आहे. तेंदुपत्ता हा रोजगाराचा एक घटक आहे. रॉयल्टी बोनस देतांना केवळ 25 टक्के निधी देण्यात येत होता. मात्र वनमंत्री म्हणून आपण आस्थापनेचा खर्च कमी करून तेंदुपत्ता बोनससाठी 72 कोटींची तरतूद केली आहे.

वन्यजीव - मानव संघर्षात वाढ झाली आहे, हे मान्य करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबियांना 2 लक्ष वरून आता 20 लक्ष रुपयांची मदत वाढविण्यात आली आहे. मात्र, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युच होणार नाही, याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव यांच्याशी चर्चा सुरू असून वन्यप्राणी जेव्हा गावात येतात, त्याची पूर्वकल्पना देता येईल का, याबाबत विचार सुरू आहे. 80 टक्के मृत्यु हे जंगलात होतात. त्यामुळे गावक-यांचे जंगलावरचे अवलंबित्व कमी करावे लागेल. यासाठी स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेसोबत काम सुरू आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना राज्याने राबविली. यामुळे गावांची गरज पूर्ण होत आहे. मात्र रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच आता मानव विकास आणि डोंगरी विकास योजनेच्या धर्तीवर वनग्राम विकास योजना राबविण्याचा संकल्प आपण केला आहे. आगामी अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात येईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) धर्तीवर आता फॉरेस्ट औद्योगिक विकास महामंडळ (एफआयडीसी) नागपूर आणि चंद्रपूर-गडचिरोलीच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. एफआयडीसीच्या माध्यमातून वनांवर आधारीत उद्योगांना मदत होऊ शकेल. एवढेच नाही तर कौशल्य, तंत्रज्ञान, मार्केटिंग आदी प्रशिक्षण देणे शक्य होईल. चंद्रपूर येथील एमआयडीसी मध्ये 20 एकर जागेवर वनांशी संबंधित कौशल्य विकासाचे केंद्र उभारण्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंजुरी दिली आहे.

निसर्गाच्या संरक्षणाबरोबरच हे पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी वन विभागाने अधिक चांगले काम करावे. जंगलात काम करणा-या वन कर्मचा-यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी चंद्रपुरातील धनराज भवन समोर वातानुकूलित वसतीगृह तयार करण्यासाठी वन अधिका-यांनी गांभिर्याने लक्ष द्यावे. वनांची सेवा करणा-यांच्या आयुष्यात धनाची कमतरता कधीही पडू नये, अशी अपेक्षा वनमंत्र्यांनी व्यक्त केली.

खासदार बाळू धानोरकर म्हणाले, वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ताडोबाचे महत्व जगात अधोरेखीत केले. वन्यजीव –मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने विशेष प्रयत्न करावेत. गावातील लोकांच्या रोजगारासाठी बफर क्षेत्रातील जास्तीत जास्त गेट उघडावे. तर आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, जिल्ह्यात वन पर्यटनातून रोजगार उपलब्ध होत आहे. औद्योगिक पर्यटनालाही येथे वाव आहे. ताडोबा फाऊंडेशनच्या माध्यमातून वनलगतच्या गावांना आर्थिक मदत व गावक-यांचा सत्कार ही वनमंत्र्यांची उत्कृष्ट संकल्पना आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचा सत्कार व धनादेश वितरण : व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील मामला, बोर्डा, निंबाळा, चोरगाव, चेकबोर्डा व हळदी तसेच वायगाव, पाहामी, दुधाळा, झरी, घंटाचौकी व चेकनिंबाळा या ग्राम परिस्थितीकीय विकास समितीस 3.50 लक्ष रुपयाचा धनादेश वितरीत करण्यात आला. तसेच मामला, खडसंगी,  मुल, मोहर्ली बफर झोन व अलिझंजा या उत्कृष्ट ग्राम परिस्थितीकीय समितीचा सन्मान करून 25 हजार रुपयाचा धनादेशाचे वाटप करण्यात आले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक बचाव दलांना पुरस्कार वितरण : पडझरी, निंबाळा, सितारामपेठ, कुकूडहेटी व वडाळा येथील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक बचाव दलांना 25 हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

बफर क्षेत्रातील 10वी व 12वी वर्गातील विद्यार्थ्यांना संगणक वितरण : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील 10 वी व 12 वीच्या परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या 35 विद्यार्थ्यांना टॅब व लॅपटॉप वितरीत करण्यात आले. यामध्ये दहावीतील श्वेता ताजने, रश्मी दुर्योधन, समीर गेडाम, समीक्षा कस्तुरे या विद्यार्थ्यांना टॅबलेट तर बारावीतील भाग्यश्री ढोणे, नलिनी चांदेकर व निलेश गेडाम यांचा समावेश होता.

शालेय मुलींना सायकलचे वाटप : वनक्षेत्र लगतच्या भोसरी व खुटवंडा या गावातील 5वी ते 10 वीच्या 26 मुलींना प्रतिनिधिक स्वरूपात सायकलचे वाटप करण्यात आले.

उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक पुरस्कार : जंगलावरील निर्भरता कमी व्हावी व रोजगार प्राप्त व्हावा यादृष्टीने व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रातील एकूण 22 युवक निसर्ग मार्गदर्शक म्हणून विभागात कार्यरत आहे. त्यामध्ये वसंत शंकर सोनुले (मोहर्ली कोअर गेट), मंगेश पांडुरंग नन्नावरे (कोलारा गेट), रामराव सखाराम नेहारे (नवेगाव गेट), अरविंद चौखे (अलिझंजा गेट) तर भीमा मेश्राम जुनोना (बफर) या निसर्ग मार्गदर्शकांना उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट होम स्टे पुरस्कार : लेक व्ह्यु, आणि वाघाई होम स्टे मोहर्ली यांना प्रदान करण्यात आला.

ग्रीन रिसॉर्ट पुरस्कार : वाघोबा इको लॉज पगदंडी रिसॉर्ट यास ग्रीन रिसॉर्ट पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय आयसीआयसीआय फाउंडेशन, ॲक्सिस फाउंडेशन, एसबीआय फाउंडेशन, मिटको सोल्युशन, हेमेंद्र कोठारी फाउंडेशन, टायगर रिसर्च कंजर्वेशन ट्रस्ट, महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन, टाटा प्रोजेक्ट मुंबई, महिंद्र हॉलिडे आणि रिसॉर्ट, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, एचडीएफसी कॅपिटल ॲडव्हायझर लिमिटेड, इको-प्रो, सातपुडा फाउंडेशन, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व विवेक गोयंका या संस्थांनासुध्दा सन्मानित करण्यात आले. तर निमढेला येथील पर्यटन व्यवस्थापक स्वर्गीय जितेंद्र नन्नावरे यांच्या कुटुंबीयास 1 लक्ष रु. धनादेश वितरित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात आदिवासी नृत्याने झाली. यावेळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पावर आधारीत माहितीपट दाखविण्यात आला. तसेच ताडोबा डायरीचे विमोचन वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

000000