जिल्ह्यातील 5 लक्ष बालकांची होणार आरोग्य तपासणी
Ø जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानाला 9 फेब्रुवारीपासून सुरवात
Ø मुख्य कार्यकारी अधिका-यांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. 8 : 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुला – मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दिल्या असून या अंतर्गत जिल्ह्यातील 5 लक्ष 2 हजार 418 बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. जागरुक पालक, सुदृढ बालक या अभियानाला 9 फेब्रुवारीपासून सुरवात होणार असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवारी आढावा घेतला.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. खेमराज कन्नाके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. प्राची निहुलकर, डॉ. निवृत्ती जिवणे, शिक्षणाधिकारी (प्राथ) दीपेंद्र लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संग्राम शिंदे, डॉ. अविष्कार खंडारे, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष विवेक भास्करवार आदी उपस्थित होते.
येत्या दोन महिन्यात ही मोहीम 100 टक्के यशस्वी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, शासकीय आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स व इतर कर्मचा-यांसह इच्छुक खाजगी डॉक्टरांनासुध्दा यात समाविष्ठ करा. ग्रामीण भागातील 339 व चंद्रपूर महानगर पालिकेचे तीन अशा एकूण 342 पथकाद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पथकामध्ये शिक्षकांचाही समावेश करावा. तसेच तपासणी झाल्याचे कार्ड पालकांना उपलब्ध करून द्यावे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी दर आठवड्याला या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पंधरवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर तर महिन्यात एकदा जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घ्यावी. ज्या शाळेत किंवा अंगवाडीत तपासणी होणार आहे, अशा ठिकाणी एक – दोन दिवसांपूर्वीच माहिती द्यावी, अशा सुचना श्री. जॉन्सन यांनी दिल्या.
जिल्ह्यातील एकूण शासकीय शाळा, अनुदानित शाळा, खाजगी शाळा, दिव्यांग शाळा, बालगृह, अनाथालय, आश्रम शाळा, शाळाबाह्य मुले, शासकीय अंगणवाडी / बालवाडी, खाजगी नर्सरी / बालवाडी, अंगणवाडीबाह्य बालके अशा एकूण 5 लक्ष 2 हजार 418 बालकांची तपासणी करण्यात येणार आहे.
अभियानाची उद्दिष्टे : 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुला – मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरीत उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भसेवा देऊन (औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादी) उपचार करणे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे.
या बाबींची होणार तपासणी : डोक्यापासून पायापर्यंत सविस्तर तपासणी, वजन व उंची घेऊन (6 वर्षांवरील बालकांमध्ये) सॅम/मॅम/बीएमआय काढणे, आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे रक्तदाब व तापमान मोजणे व गरजु विद्यार्थ्यांना त्वरीत उपचार वा संदर्भित करणे, नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंत विकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, एपिलेप्सी आदी आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरीत संदर्भित करणे, तसेच ऑटीझम, विकासात्मक विलंब आदीच्या रुग्णांना ओळखून त्वरीत संदर्भित करणे, किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक / मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार संदर्भित करणे.
उपाययोजना व औषधोपचार : प्रत्येक आजारी बालकांवर औषधोपचार, नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध सर्व रक्त – लघवी – थुंकी तपासण्या, एक्स – रे / युएसजी / बीईआरए आवश्यकतेनुसार कराव्यात. डीईआयसी अंतर्गत आवश्यकतेनुसार बालकांना थेरपी, शस्त्रक्रिया, न्युमोनिया, जंतुसंसर्ग, अतिसार, रक्तक्षय, दृष्टीदोष, दंत विकार, क्षयरोग, कुष्ठरोग आदी व्याधींनी आजारी असलेल्या बालकांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उपचार, समुपदेशन.
००००००
No comments:
Post a Comment