Search This Blog

Tuesday 31 January 2023

‘पाथ’ च्या माध्यमातून होणार आरोग्य संस्थांचे बळकटीकरण

 

‘पाथ’ च्या माध्यमातून होणार आरोग्य संस्थांचे बळकटीकरण 

Ø जिल्हाधिका-यांची अभिनव संकल्पना

चंद्रपूर, दि. 31 : कोविड – 19 च्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर काही नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत सुधारणा व एकात्मिक प्रयत्न करणे गरजेचे व अत्यावश्यक झाले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘पाथ’ (Programme for Appropriate Technology in Health) या संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

भारतीय सार्वजनिक आरोग्य मानांकने व राष्ट्रीय गुणवत्ता हमी देखरेख कार्यक्रम यांच्या मानकाप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) ‘पाथ’ या संस्थेमार्फत फेरमुल्यांकन करण्यात येईल. तसेच निघालेल्या त्रृटींची पुर्तता करून जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण केले जाईल. यासाठी पहिली पायरी म्हणून जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी , पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची कार्यक्षमता वृध्दी करण्यासाठी 1 व 2 फेब्रुवारी  रोजी आभासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतर टप्प्याटप्प्यानी आरोग्य संस्थांचे मुल्यमापन करून बळकटीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील 63 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10 ग्रामीण रुग्णालये, 100 खाटांचे एक उपजिल्हा रुग्णालय व 50 खाटांचे दोन उपजिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची ही अभिनव संकल्पना असून यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसुध्दा मोलार्च सहकार्य मिळत आहे. तसेच हा प्रकल्प जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांनी कळविले आहे.

००००००

हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 100 टक्के यशस्वी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा



हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 100 टक्के यशस्वी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø 10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मिळणार घरोघरी गोळ्या

            चंद्रपूर, दि. 31 : हत्तीरोग ही चंद्रपूर जिल्ह्यातील गंभीर समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यासाठी शासनाकडून राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. या कालावधीत आपल्या घरी औषधी / गोळ्या घेऊन येणा-या कर्मचा-यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच आरोग्य यंत्रणेने ही मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम., आरोग्य सेवा (हिवताप) विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जागतिक आरोग्य संघटनेच्या नागपूर विभागाच्या सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, दीपेंद्र लोखंडे, डॉ. संदीप गेडाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे आदी उपस्थित होते.   

            जिल्ह्यातील 9 तालुक्यात चंद्रपूर (ग्रामीण), भद्रावती, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मुल, सावली, सिंदेवाही व ब्रम्हपूरी या तालुक्यात सदर मोहीम राबविण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, तालुका स्तरावर तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, नगर परिषद / पंचायतीचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच एन.सी.सी, एन.एस.एस चे जिल्हा समन्वयक आणि शाळा महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत त्वरीत बैठक घ्यावी. शासनाने हत्तीरोग दूरीकरण मोहिमेंतर्गत तीन औषधांची (आयडीए) उंची व वयोगटानुसार एक मात्रा घेऊन या रोगाचा समुळ नाश करता येतो.

हत्तीरोगाच्या तीनही औषधी प्रत्येक घरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचा-याद्वारे मोफत देण्यात येणार आहे. ही औषधी उपाशी पोटी घेऊ नये. अलबेंडाझॉल ही गोळी चावून चावून खावी. औषधी देणा-या आरोग्य कर्मचा-यांच्या समोरच गोळ्या खाणे आवश्यक आहे. दोन वर्षांपेक्षा कमी वयाची बालके व गरोदर माता तसेच गंभीर आजारी रुग्णांना ही औषधी दिली जाणार नाही. सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच हत्तीरोग दुरीकरणासाठी या मोहिमेत लोकसहभाग वाढविणे आणि जनजागृती करण्यावर भर द्यावा. हत्तीरोगापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी आणि सर्व संबंधित यंत्रणेने ही मोहीम 100 टक्के यशस्वी करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

जिल्ह्यात सन 2022 मध्ये हत्तीपाय व हत्तीहाथाचे 10380 रुग्ण आढळले असून हायड्रोसिलचे 3067 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 672 जणांवर हायड्रोसिल ची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 

०००००००

कुष्ठरोग जनजागृती अभियानचा जिल्हाधिका-यांकडून आढावा


 

कुष्ठरोग जनजागृती अभियानचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 31 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम’ 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हास्तरीय समन्वय समितीचा आढावा घेतला.

 बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम., आरोग्य सेवा (हिवताप) विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. संदीप गेडाम, जागतिक आरोग्य संघटनेच्या नागपूर विभागाच्या सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील 502 गावांमध्ये गत पाच वर्षात कुष्ठरोगाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. 272 गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, 342 गावांमध्ये प्रत्येकी 2 ते 3 रुग्ण, 148 गावांत प्रत्येकी 4 ते 5 रुग्ण आणि जिल्ह्यातील 335 गावांमध्ये प्रत्येकी पाच पेक्षा जास्त रुग्ण असल्याचे डॉ. संदीप गेडाम यांनी सांगितले.

औषधोपचाराने कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो : कुष्ठरोग हा आजार ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्री’ या जंतू पासून होत असून तो अनुवांशिक नाही. हा आजार पूर्वीच्या जन्माचे पाप नाही. कुष्ठरोगाचे मुख्य लक्षण त्वचेवरील बधीर फिक्कट चट्टा हा आहे. जर असे लक्षण आढळून आल्यास ताबडतोब आपल्या गावातील आशा, नर्स किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कुष्ठरोग आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. या रोगावर सर्व सरकारी दवाखान्यात मोफत औषधोपचार उपलब्ध आहे. औषधोपचाराने हा रोग पूर्णपणे बरा होतो. लवकर निदान, वेळेवर व नियमित उपचाराने विकृती टाळता येते.

००००००

अवैध रेती उत्खनन प्रकरणी वाहने व साहित्य जप्त



अवैध रेती उत्खनन प्रकरणी वाहने व साहित्य जप्त

चंद्रपूर, दि. 31 : घुग्गुस शहरालगतच्या वर्धानदी पात्रामध्ये अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नकोडा घाट या ठिकाणी धाड टाकली असता त्याठिकाणी एका मोटर बोटद्वारे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. तसेच डब्ल्यू.सी.एल.च्या जागेवरून सदर रेती घाटावर जाण्याकरीता रॅम्प तयार करून नदीतून अवैध रेती उत्खनन सुरू होते जवळच लागून असलेल्या डब्लू.सी.एल.च्या मालकीच्या सर्व्हे नंबर 56 मध्ये एक जेसीबी, एक पोकलेन मशीन व अंदाजे 40 ब्रास रेती साठा आढळून आला.

या अवैध उत्खननामध्ये गुंतलेली सर्व वाहने व साहित्य जप्त करण्यात आले असून सदर वाहनांच्या मालकावर व अवैध रेतीसाठा केलेल्या संबंधितावर प्रशासनाद्वारे नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.

००००००००

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा

Ø 8 फेब्रुवारीपर्यंत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 31 : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज  https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या वेब लिंकवर सादर करावा. ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा कालावधी दि. 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2023 असणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 8 फेब्रुवारी 2023 असेल. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी 15 फेब्रुवारी 2023 पासून असेल. तर ऑनलाईन परीक्षा दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येईल. (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार यामध्ये बदल होऊ शकतो.)

सदर परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

०००००

सुकन्या समृद्धी योजनेसाठी डाक विभागाचे विशेष अभियान


 सुकन्या समृद्धी योजनेसाठी डाक विभागाचे विशेष अभियान

Ø 9 व 10 फेब्रुवारी या कालावधीत उघडता येणार खाते 

चंद्रपूर, दि. 31 : सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना फक्त मुलींसाठी असून केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे. मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना या योजनेची गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. पोस्ट विभागाद्वारे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याचे अभियान दि. 9 व 10 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे.

केंद्र आणि राज्यशासनाद्वारे बँका किंवा पोस्ट ऑफिसमार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे. यामध्ये मुलींच्या आईवडिल यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात.

ही आहेत योजनेची वैशिष्ट्ये:

सर्वात कमी 250 रुपये भरून सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालू करता येते.  10 वर्षाखालील मुलीचे खाते,मुलीचे आई-वडील अथवा कायदेशीर पालकाद्वारे उघडता येते. एका मुलीकरीता केवळ एकच खाते स्वीकारल्या जाईल. तर एका कुटुंबात केवळ दोनच खाते स्वीकारल्या जातील. एका वर्षात किमान रु. 250 किंवा जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी ते परिपक्व होते. व मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर 50 टक्क्यापर्यंतची जमा असलेली रक्कम खात्यातून काढता येते. या योजनेत व्याजदर आकर्षक असून वर्तमानामध्ये 7.6 टक्के व्याजदर आहे. या खात्याला भारतामध्ये कुठेही ट्रान्सफर करता येते. तसेच रक्कम बँकेतून, पोस्ट ऑफिस व पोस्ट ऑफिसमधून बँक मध्ये ट्रान्सफर करता येते.

योजनेच्या अधिक माहितीसाठी www.indiapost.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन पोस्ट विभागामार्फत करण्यात आले आहे.

००००००

Monday 30 January 2023

उमा नदी संवर्धनासाठी 35 गावाचे गावकरी नदी पात्रात

 



उमा नदी संवर्धनासाठी 35 गावाचे गावकरी नदी पात्रात

Ø ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम

चंद्रपूर, दि. 30 : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चिमूर तालुक्यातील 20 गावे तसेच सिंदेवाही तालुक्यातील 15 गावे असे एकूण 35 गावातील नागरिकांनी उमा नदी पात्रात उतरून नदीमध्ये दीप प्रज्वलन केले आणि एकतेचा संदेश दिला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदिला’अभियानाच्या माध्यमातून चिमुर व सिंदेवाही तालुक्यात उमा नदी संवाद यात्रेच्या जनजागृती करण्याकरीता जिल्हा प्रशासन व प्रभु फॉऊंडेशन, चंद्रपूर तसेच नदी काठावरील गावे यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच  उमा नदीच्या जल पुजनाच्या कार्यक्रमाचे विविध गावांमध्ये आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला उमा नदी प्रहरी सदस्य तसेच मनरेगा विभागाचे  सहायक कार्यक्रम अधिकारी अजय काकडे यांनी मार्गदर्शन करून शासनाचे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व गावक-यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला ‘मी पाणी कारभारी’ टीम तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीमहिला बचत गट,गुरुदेव सेवा मंडळ,भजन मंडळ ,युवक मंडळ व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

०००००


कुष्ठरोग निवारण पंधरवडा अंतर्गत चंद्रपूरात ‘रन फॉर लेप्रसी’

 



कुष्ठरोग निवारण पंधरवडा अंतर्गत चंद्रपूरात ‘रन फॉर लेप्रसी’

            चंद्रपूर, दि. 30 : स्पर्श – 2023 कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) चंद्रपूर, महानगर पालिका आरोग्य विभाग व ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’ (पुरुष / महिला गट) चे आयोजन करण्यात आले.

            समाजातील लोकांमध्ये कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज, अंधश्रध्दा, भीती दूर करून हा आजार इतर आजारांप्रमाणे सारखाच आहे, ही भावना लोकांच्या मनात रुजविणे, हा या मॅरेथॉनचा उद्देश आहे. मॅरेथॉनची सुरवात महानगर पालिका, गांधी चौक येथून करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, महानगर पालिकेच्या उपायुक्त विद्या पाटील, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. आडेपवार आदी उपस्थित होते.

‘रन फॉर लेप्रसी’ मॅरेथॉन गांधी चौक, जटपूरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, जनता कॉलेज चौक आणि परत गांधी चौकात मॅरेथॉनची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जनबंधू यांनी तर आभार श्री. त्रिपुरवार यांनी मानले. यावेळी महानगर पालिका क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कुष्ठरोग कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

Sunday 29 January 2023

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज - जिल्हाधिकारी विनय गौडा


 

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø 50 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

            चंद्रपूर, दि. 29 : विज्ञान म्हणजे काय? विज्ञानाची मानवी जीवनात गरज काय? अशा प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधून विज्ञानाचा, आपल्या दैनंदिन जीवनात वापर करून विद्यार्थ्यांनी आपली व देशाची प्रगती केली पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षकांनी निर्माण करण्याची गरज आहे. एखादी नवीन वस्तु विद्यार्थ्यांनी बघितली असेल तेव्हा त्या वस्तुबद्दल त्याच्या मनात विविध प्रश्न तयार झाले पाहिजे. त्या वस्तुचा चिकित्सक अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे, असे विचार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी व्यक्त केले.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर तसेच जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने " तंत्रज्ञान व खेळणी" या मुख्य विषयावर सेंट मायकेल इंग्लिश स्कूल, चंद्रपूर येथे पार पडलेल्या ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन २७, २८ आणि २९ जानेवारी २०२३ या कालावधीत केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी (माध्य.) दिपेंद लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, रुपेश कांबळे, लोकनाथ खंडारे, शिक्षण विस्तार अधिकारी सावन चालखुरे, लघुत्तम राठोड, गणेश येळणे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक जॉन्सन म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे निव्वळ शैक्षणिक विकास करणे नव्हे. तर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कौशल्याला वाव देवून त्याला प्रोत्साहित करण्याचे कार्य शिक्षकांनी व पालकांनी केले पाहिजे. विद्यार्थ्यांला केवळ जास्त गुणांची अपेक्षा न करता त्याच्या आवडीनुसार तो रमला पाहिजे. सर्व क्षेत्रामध्ये विकास होणे गरजेचे आहे. विद्यार्थी जर चांगला घडला तर देशाचा विकास होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष प्रतिकृतीचे पाहणी करून सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यातील निवड झालेल्या माध्यमिक व प्राथमिक गटातील प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. त्यात माध्यमिक गटात एकूण ४९ प्रतिकृतींची नोंदणी झाली असून त्यात गैर आदिवासी गटात ३७ तर आदिवासी गटात १२ प्रतिकृती आणि प्राथमिक गटातमध्ये एकूण ४८ प्रतिकृतींची नोंदणी झाली असून गैर आदिवासी गटात ३६ तर आदिवासी १२ प्रतिकृतींची नोंदणी झाली आहे. शैक्षणिक साहित्य शिक्षकांचे यामध्ये माध्यमिक शिक्षक १० तर प्राथमिक शिक्षक ११ आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांचे एकूण १० साहित्य नोंदणी केली आहे. प्रतिकृतींचे मुल्यमापनवहोणार असून प्रदर्शनी भेट सुद्धा राहणार आहे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले. संचालन अमित अडेट्टीवार यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण यांनी मानले.

०००००००

30 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्त्या बंद

 


30 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्त्या बंद

            चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूकीकरिता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या 28 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजतापासुन 29 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे 18 व 23 जानेवारीचे सदर आदेश रद्द करण्यात येत आहे.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्त्या 30 जानेवारी 2023 रोजी नियमातील तरतुदीनुसार संपूर्ण दिवसभर बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशात नमूद आहे.

0000000

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंचा शोध


जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंचा शोध

            चंद्रपूर, दि. 29 : जिल्हा वार्षिक योजना 2023 नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंची शोध मोहीम क्रीडा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

'इंडिया खेलो फुटबॉल’ या नाविन्यपूर्ण योजनेतून 2 लाख 50 हजार इतक्या निधीतून व 15 आणि 17 वर्षातील मुलांकरिता ट्रायल्स आयोजित करण्यात आले आहे. या ट्रायल्स मधून जे विद्यार्थी आपल्या कौशल्य दाखवतील त्यांची दिल्ली येथे पुन्हा व्यावसायिक क्लब मार्फत निवड चाचणी घेण्यात येऊन त्यांची निवड त्या त्या क्लब मध्ये होणार आहे.

या विशेष मोहिमेकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि इंडिया खेलो फुटबॉल या संघटनेचे हितेश जोशी यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

0000000

जि. प. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केले कलागुण

 



जि. प. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केले कलागुण

            चंद्रपूर, दि. 29 : प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वत:तील कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडुरंग माचेवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सावन चालखुरे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक राजू साखरकर, सचिव एस. एम. बोमनवार, सादिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने करण्यात आली. छोटूभाई पटेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. मेश्राम यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सादर होणाऱ्या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमात चंद्रपूर शहरातील 21 शाळेतील जवळपास 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रंगतदार देशभक्तीपर नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व देशभक्तिने भारावलेल्या कलाकृतीचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी शाळांना सहभाग स्मृतिचिन्ह व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले. आभार सांस्कृतिक कार्यक्रमाचे नोडल अधिकारी मोरेश्वर बारसागडे यांनी मानले.

यशस्वीतेकरीता आयोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी मोलाचे सहकार्य केले.

०००००००

Thursday 26 January 2023

चंद्रपूर जिल्हा सामर्थ्य आणि पराक्रमाचा प्रतीक व्हावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार












 

चंद्रपूर जिल्हा सामर्थ्य आणि पराक्रमाचा प्रतीक व्हावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø पोलिस मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

            चंद्रपूर, दि. 27 : जगातील 193 देशांपैकी 14 देशांमध्ये वाघ आहेत. त्यापैकी सर्वाधिक वाघ भारतात असून देशात चंद्रपूर जिल्हा हा वाघांच्या संख्येत क्रमांक एक वर आहे. एकप्रकारे जगातील सर्वाधिक वाघ असलेला आपला जिल्हा आहे. वाघ हा सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत चंद्रपूर जिल्हा हा सामर्थ्य आणि पराक्रमाचा प्रतीक व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त (26 जानेवारी) पोलिस मुख्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर जनतेला संदेश देतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

सुरवातीला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सर्व धर्म आणि सर्व पंथांचा सन्मान करणारा हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे. तसेच चांगल्या भावनेने काम करण्याचा हा संकल्प दिवस आहे. नाभीच्या देठापासून ‘जय हिंद’ किंवा 'भारत माता की जय’ म्हटले तर आपली 50 टक्के देशभक्ती दिसून येते. मात्र 100 टक्के देशभक्ती सिध्द करायची असेल तर आपली कर्तव्य तत्परता कृतीतून दाखवावी लागेल. गत 75 वर्षात आपण संविधानातील आपले मुलभूत अधिकार बघितले. त्याबद्दल केवळ चर्चा केली. मात्र या संविधानाची तोपर्यंत पूर्ण फलश्रृती पूर्ण होणार नाही, जोपर्यंत आपण आपल्या कर्तव्याबद्दल चर्चा करणार नाही.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून तर शताब्दी महोत्सवापर्यंत स्वत:ला कर्तव्यासाठी अर्पण करा. भयमुक्त, भूकमुक्त, विषमता मुक्त, प्रदुषणमुक्त, रोजगारयुक्त समाज आपल्याला घडवायचा आहे. समता, ममता, बंधुता हे शब्द ओठांपुरते मर्यादीत झाले आहेत. दिलेले कर्तव्य मी पूर्ण करेन, असा संकल्प करा. विद्यार्थ्यांनो खुप मोठे व्हा, अभ्यास करा, हाच या तिरंग्याला खरा ‘सॅलूट’ आहे. हा ध्वज केवळ कापडाचा एक तुकडा नाही तर आपल्या सर्वांसाठी तो प्राणप्रिय आहे. स्वातंत्र्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. या बलिदानाला सैदव आठवणीत ठेवा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. 

पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार:

ध्वजदिन निधी संकलनात सन-2021 मध्ये जिल्हयाने दिलेल्या उद्दिष्टानुसार 41 लक्ष 45 हजार (104 टक्के) इतका निधी संकलित केल्याबद्दल सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे तर्फे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सोबतच हवालदार नरेंद्र रामाजी वाघमारे ताम्रपट प्राप्त सैनिकांचा जिल्हा प्रशासनामार्फत सत्कार करण्यात आला. पोलिस विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट अन्वेषण अधिकारी म्हणून पोलिस उपाधीक्षक (गृह) राधिका फडके, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलिस उपनिरीक्षक बाजीराव झाडे, गुणवत्तापूर्वक सेवा व पोलिस पदकासाठी निवड झाल्याबद्दल रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट, सायबर गुन्हे जनजागृतीकरीता सायबर पोलिस स्टेशनचे मुजावर युसुफ अली तर 2 ते 13 जानेवारी 2023 दरम्यान पुणे येथे आयोजित मिनी ऑलिम्पिक व महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धामध्ये वुशू खेळ प्रकारात गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल महिला नायक पोलिस शिपाई प्रिती बोरकर यांचा सत्कार पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षात क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गुणवंत खेळाडूंना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रु. 10 हजार देऊन गौरविण्यात आले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व.बाबूराव बनकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिवाकर बनकर यांनी योग सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत पोंभुर्णाचे वैद्यकीय अधीक्षक तथा तालुका आरोग्य अधिकारी  डॉ.संदेश मामीडवार, प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार मंडल, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयामार्फत सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त पंचायत समिती, चंद्रपूर प्रथम क्रमांक व पंचायत समिती पोंभुर्णा द्वितीय क्रमांक यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.  वीरपत्नी व वीरमाता, वीरपिता, तसेच शौर्य चक्र प्राप्त सुभेदार शंकर मेंगरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी पोलिस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलिस, होमगार्ड, नक्षल विरोधी पथक, स्काऊट-गाईड, एनसीसी, तसेच इतर विद्यार्थ्यांनी देखील पथसंचलन केले.

०००००००