जि. प. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केले कलागुण
चंद्रपूर, दि. 29 : प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वत:तील कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडुरंग माचेवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सावन चालखुरे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक राजू साखरकर, सचिव एस. एम. बोमनवार, सादिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने करण्यात आली. छोटूभाई पटेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. मेश्राम यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सादर होणाऱ्या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात चंद्रपूर शहरातील 21 शाळेतील जवळपास 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रंगतदार देशभक्तीपर नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व देशभक्तिने भारावलेल्या कलाकृतीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी शाळांना सहभाग स्मृतिचिन्ह व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले. आभार सांस्कृतिक कार्यक्रमाचे नोडल अधिकारी मोरेश्वर बारसागडे यांनी मानले.
यशस्वीतेकरीता आयोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी मोलाचे सहकार्य केले.
०००००००
No comments:
Post a Comment