Search This Blog

Sunday 31 March 2024

मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या – निवडणूक निरीक्षक जाटव




मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या – निवडणूक निरीक्षक जाटव

Ø राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक

चंद्रपूर दि. 31 : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण 15 उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले.

राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. जाटव बोलत होते. बैठकीला निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी आणि राजकीय पक्षांचे / उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. जाटव म्हणाले, जिल्ह्यात किंवा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या क्षेत्रात मतदारांवर दबाव टाकणे किंवा धमकाविण्याचे प्रकार निदर्शनास येत असतील, त्याची माहिती त्वरित कळवावी. जेणेकरून अशा क्षेत्रात पोलिसांसह अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापन करता येईल. तसेच धमकाविणा-यांवर कडक कारवाईसुध्दा केली जाईल. निवडणुकीच्या काळात नागरिकांना किंवा अन्य कोणालाही तक्रार करावयाची असल्यास सी-व्हीजील ॲपचा उपयोग करावा. या ॲपवर तक्रार आणि फोटो अपलोड केल्यास 100 मिनिटांमध्ये त्याचे निराकरण करता येते. निवडणुकीच्या संदर्भातील ऑनलाईन परवानगी करीता ‘सुविधा’ ॲप विकसीत करण्यात आले आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सुविधा ॲपचा वापर करावा. ऑफलाईन परवानगीकरीता ‘एक खिडकी’ योजनासुध्दा उपलब्ध आहे, असे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. जाटव यांनी सांगितले.

तर खर्च निरीक्षक श्री. हिंगोनिया म्हणाले, पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही उमेदवार, राजकीय पक्ष किंवा संघटन 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेचा खर्च करू शकत नाही. यापेक्षा जास्त खर्च करावयाचा असल्यास ऑनलाईन किंवा धनादेशाद्वारे करता येईल. तसेच उमेदवारांनी आपल्या खर्चाच्या नोंदवह्या अतिशय अचूक भराव्यात. खर्चाच्या नोंदवहीची पडताळणी तीन वेळा करणे आवश्यक असून नोंदवहीत बाब निहाय खर्च रोज नमुद करावा, अशा सूचना श्री. हिंगोनिया यांनी दिल्या.

सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवारांचे सहकार्य आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात ‘काय करावे’ किंवा ‘काय करू नये’, यबाबतही त्यांनी माहिती दिली. सोबतच 27 मार्च रोजी अंतिम झालेली मतदार यादी, 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा, टपाली मतदान, निवडणुकीसाठी पोलिस कर्मचा-यांची तैनाती व इतर मनुष्यबळ, जिल्हास्तरावर व विधानसभा मतदारसंघ स्तरावर मिळणा-या परवानग्या, ईव्हीएम व्हीव्हीपॅट सुरक्षा व्यवस्थापन, स्ट्राँग रुम, पेडन्यूज व जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, उमेदवारांच्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन आदींबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना अवगत केले.

असे आहेत संपर्क क्रमांक :

            1.मतदार मदत केंद्र / नियंत्रण कक्ष – 1950 (टोल फ्री)

            2.आदर्श आचार संहिता कक्ष – 8788510061

            3.एक खिडकी (सुविधा) कक्ष – 9673042690

            4.सी-व्हीजील / ई.एस.एम.एस - ॲपद्वारे

००००००००

जिल्हाधिका-यांच्या हस्ते पूर्वपीठिका – 2024 चे विमोचन


 

जिल्हाधिका-यांच्या हस्ते पूर्वपीठिका – 2024 चे विमोचन

चंद्रपूर दि. 31 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. या पार्श्वभुमीवर गत निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मिळालेली मते व इतर बाबी अभ्यासण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पूर्वपीठिका – 2024 ची निर्मिती करण्यात आली आहे. या पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.

पूर्वपीठिका – 2024 मध्ये सन 1951 ते 2019 या कालावधीतील विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती, निवडणूक यंत्रणेशी संबंधित महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, आदर्श आचारसंहितेतील ठळक बाबी, निवडणूक प्रक्रियेदरम्यान ‘काय करावे’ किंवा ‘काय करू नये’ याबाबत माहिती, जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या, मतदान केंद्र, निवडणुकीचा कार्यक्रम आदी माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

०००००

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ - जिल्हाधिकारी विनय गौडा


 

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ - जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर दि. 31 : चंद्रपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ चे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

2019 च्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 64.84 टक्के मतदान झाले होते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर शहरात मतदानाची टक्केवारी कमी होती. शहरातील काही मतदान केंद्रावर तर 50 टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे. ज्या मतदान केंद्रावर 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले, अशा भागात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ अंतर्गत मतदारांना केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यात उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून मंडप उभारणे, जेणेकरून मतदारांना सावली मिळेल, पिण्याचे पाणी, प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच 85 वर्षांवरील मतदार, गर्भवती माता, स्तनदा माता यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येईल. या मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. यासोबतच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्र, महिला व्यवस्थापित मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आणि आदर्श मतदान केंद्राचे नियोजन करण्यात येणार आहे. निवडणूक संदर्भात काही संशयास्पद बातमी किंवा व्हीडीओ क्लिप आढळली तर त्याची खात्री करावी व प्रशासनाशी संपर्क करावा. चुकीची बातमी आपल्याकडून जाणार नाही, याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी.  निवडणुकीसंदर्भात सर्व परवानग्या मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच विधानसभा मतदारसंघ स्तरावर ‘एक खिडकी’ कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन परवानगी सुध्दा घेता येणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सांगितले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक विषयक तपशील : 27 मार्च 2024 अखेर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 18 लक्ष 37 हजार 907 मतदार असून यापैकी 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री आणि 48 इतर मतदार आहेत. मतदान केंद्रांची एकूण संख्या 2118 आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 24443 आहे. तसेच 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार 16442 असून दिव्यांग मतदारांची संख्या 9694 आहे.

19 मार्च 2024 रोजी झालेल्या प्रथमस्तरीय तपासणी अंती 2118 मतदान केंद्रावर 2610 बॅलेट युनीट, 2610 कंट्राल युनीट आणि 2818 व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले आहे.

००००००

Friday 29 March 2024

सामान्य निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा



 

सामान्य निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा

Ø नियोजन सभागृह येथे नोडल अधिका-यांची बैठक

चंद्रपूर दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

नियोजन सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिका-यांची आढावा बैठक श्री. जाटव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सहायक जिल्हाधिकारी (आर्णी) सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

लोकेशकुमार जाटव म्हणाले, निवडणुकीसाठी मतदानाचे साहित्य घेऊन जातांना डिस्पॅच सेंटरमध्ये आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ ठेवावे. तसेच संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना वैयक्तिक मॅसेज जाणे आवश्यक आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम गोळा करतांना अतिशय दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी, जिल्ह्याचा आढावा, मतदान प्रक्रियेमध्ये असलेले मनुष्यबळ व्यवस्थापन, अधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण, साहित्य व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र सुरक्षा व व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व्यवस्थापन, मतपत्रिका, पोस्टल बॅलेट, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण केंद्र, सी – व्हीजील ॲप, 85 वर्षांवरील व्यक्तिंना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तिंना गृहमतदानाची सुविधा आदींबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.

बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

००००००

मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

 मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

चंद्रपूर, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघात दि. 19 एप्रिलदि. 26 एप्रिलदि. 7 मेदि. 13 मे व दि. 20 मे 2024 अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोग यांच्या 22 मार्च 2024 च्या परिपत्रकानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान करण्यास सुटी जाहीर करण्यात आली आहे.  

मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था ,खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागते. हे लक्षात घेताया लोकसभा निवडणुकीत कामगारअधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे.  

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूहमहामंडळेकंपन्या व संस्थाऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगारअधिकारीकर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तरमतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेलयाची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व महामंडळेउद्योग समूहकंपन्या व संस्थांमध्येऔद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य अनुपालन होईलयाची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे. मतदानाच्या हक्कापासून कोणताही शासकीय कर्मचारी वंचित राहू नयेयाकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच कार्यालय प्रमुख, अधिकारीकर्मचारी, व्यावसायिक संस्थाव्यापारी केंद्रऔद्योगिक कारखाने इत्यादीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचे देखील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सूचित केले आहे.

००००००

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालय

 सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालय

चंद्रपूर, दि. 29 :  वार्षिक बाजार मुल्यदर तक्ते 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीनेतसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधीचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी आलेल्या सुट्ट्या लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दस्त नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधकसह जिल्हा निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2024 रोजी सुरू राहणार आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होते. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी तसेच दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सह जिल्हा निबंधक वर्ग- 1 व मुद्रांक जिल्हाधिकारीचंद्रपूर हे कार्यालयदेखील अभिनिर्णयअभय योजना तसेच इतर कामकाजासाठी सुरू राहणार आहेअशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी ए.ए.तांदळे यांनी दिली आहे.

००००००

31 मार्च पूर्वी करा ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर, पॉवर टिलर संवर्गातील नवीन वाहनांची नोंद


 31 मार्च पूर्वी करा ॲग्रीकल्चर ट्रॅक्टरपॉवर टिलर संवर्गातील नवीन वाहनांची नोंद

चंद्रपूर, दि. 29 : शासनाने ॲग्रीकल्चर ट्रॅक्टरपॉवर टिलरकंस्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल (CEV) व कम्बाईन हार्वेस्टर या संवर्गातील नवीन वाहन नोंदणी विषयी वायप्रदूषण मानके व इंजिन क्षमता या अनुषंगाने नोंदणी करीता वैधता जारी केली आहे. यानुसार या संवर्गातील वाहनांची नोंदणी 31 मार्च 2024 पूर्वी करणे आवश्यक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.          

31 मार्चपूर्वी नोंदणी करणे आवश्यक असलेल्या संवर्गात ॲग्रीकल्चर ट्रॅक्टरपॉवर टिलर व कम्बाईन हार्वेस्टर 37 किलो व्हॅट पेक्षा जास्त परंतु 560  किलो व्हॅटपर्यंत (पावर) तसेच 37 किलो व्हॅट पेक्षा (पावर)कंस्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेईकल (CEV) 37 किलो व्हॅट पेक्षा जास्त परंतु 560  किलो व्हॅटपर्यंत (पावर) तसेच  37 किलो व्हॅट पेक्षा (पावर) या वाहनांचा समावेश आहे.  

सर्व वाहन वितरक व वाहन मालक यांच्या सोयीसाठी 31 मार्च पर्यंत सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आले असल्याने वाहन नोंदणी करणे सोयीचे जाणार आहे. तरी या संवर्गातील सर्व वाहन वितरक व वाहन मालक यांनी नवीन वाहनांची नोंद करून घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

००००००

Thursday 28 March 2024

सामान्य निवडणूक निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट





 सामान्य निवडणूक निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट

चंद्रपूर दि. 2: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज, फेक न्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य जिल्हा माहिती कार्यालयाच्या मिडीया सेंटर येथून सुरू असून या सेंटरला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कार्यकारी अभियंता तथा निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी मुकेशकुमार टांगले उपस्थित होते.

यावेळी श्री. जाटव यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सोशल मिडीयाच्या मॉनेटरिंगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच सोशल मिडीयावर करण्यात येणा-या पोस्टबाबत अतिशय गांभिर्याने लक्ष ठेवावे, वृत्तपत्रात पेडन्यूज तसेच फेकन्यूज प्रकाशित झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. प्रमाणीकरणासाठी उमेदवारांचे अर्ज किती दिवसात निकाली काढल्या जातात, याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच फाईल्सची पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचे कार्यपध्दती तसेच मिडीया सेंटर बाबत सामान्य निवडणूक निरीक्षकांना अवगत केले.

००००००

Wednesday 27 March 2024

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

 

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

Ø चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज

चंद्रपूर दि. 213 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (27 मार्च) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणा-या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामनिर्देशनपत्रांची एकूण संख्या 48 झाली आहे.

बुधवारी (दि.27 मार्च) अर्ज दाखल करणा-यांमध्ये धानोरकर प्रतिभा सुरेश (काँग्रेस) यांनी 3 अर्ज, बेले राजेश वारलुजी (वंचित बहुजन आघाडी) यांनी 3 अर्ज, विद्यासागर कालिदास कासर्लावार यांनी 1 अर्ज भीमसेना पक्षाच्यावतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांनी 2 अर्ज, जावेद अब्दूल कुरेशी यांनी 1 अर्ज अपनी प्रजा हित पार्टीच्या वतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून, रमेश आनंदराव मडावी यांनी 1 अर्ज बहुजन समाज पार्टीच्यावतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.

याशिवाय पुर्णिमा दिलीप घनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (विरोंके वीर इंडियन पार्टी), मोरेश्वर कोंदुजी बडोले (अपक्ष), मिलिंद प्रल्हाद दहिवले (अपक्ष), सेवकदास कवडूजी बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, डेमोक्रेटीक), अमोल ओमप्रकाश कोमावार (हिंदू राष्ट्र संघ), राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके (बहुजन समाज पक्ष), राजेंद्र कृष्णराव हजारे (अपक्ष), दिनेश रामबिशाल मिश्रा (अपक्ष), वनिता राजेंद्र राऊत (अखील भारतीय मानवता पक्ष), जावेद मजिद अब्दुल (अपक्ष), विकास उत्तमराव लसंते (सन्मान राजकीय पक्ष), वाघमारे संदीप विठ्ठल (अपक्ष), देठे प्रमोद देवराव (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे (अपक्ष), संजय हरी टेकाम (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), शेख ताजुद्दीन वजीर (अपक्ष), सुर्या मोतीराम अडबाले (अपक्ष), अनिल आनंदराव डहाके (अपक्ष), दिवाकर हरीजी उराडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), दिलीप पुंडलीकराव माकोडे (अपक्ष), गीता अरुण मेहर (अखील भारतीय परिवार पार्टी) यांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला.

13 चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी (26 मार्च) 7 उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले होते.

०००००

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध

 नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध

Ø सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

चंद्रपूर दि. 213 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तिनही निवडणूक निरीक्षक नागरिकांच्या सुचना / तक्रारी ऐकण्यासाठी वन अकादमी येथे उपलब्ध राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.  

सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून मध्यप्रदेशचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव लोकेशकुमार जाटव (मो.9404912593) हे नागरिकांचे मत, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी वन अकादमी येथील व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस येथे त्यांचे कार्यालय ‘बकूळ’ येथे सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत उपलब्ध राहतील.

कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक म्हणून केरळच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस अधिक्षक सुजीत दास (मो. 9307274907) हे वन अकादमी येथील व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस येथील ‘शाल्मिक’ येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11 पर्यंत उपलब्ध राहणार आहेत.

तर निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया (मो. 9404921146) हे नागरिकांचे मत, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी ‘बकूल’ व्हीव्हीआयपी कक्ष, कौस्तुभ बिल्डींग, वन अकादमी येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.

००००००

मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य



 मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

चंद्रपूर, दि. 27 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ई-पिक)  देण्यात आलेले आहे ते मतदारमतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

आधारकार्डमनरेगा जॉब कार्डबँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुककामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्डवाहन चालक परवानापॅन कार्डरजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्डभारतीय पासपोर्टछायाचित्रासह पेन्शन दस्तऐवजकेंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जरी केलेले सेवा ओळखपत्रखासदार/आमदारांना जरी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्रभारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात येणार आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रापैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. तर प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी केवळ त्यांचा मुळ पासपोर्ट आवश्यक राहणार आहे.

मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहिती उपलब्ध होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘फोटो व्होटर स्लीप’ ऐवजी ‘मतदार माहिती चिठ्ठी’ मतदानाच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस अगोदर वितरीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठ्ठी ग्राह्य असणार नाही.   

            चंद्रपूर जिल्हा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नियुक्त सर्व संबंधित अधिकारी व सर्व मतदान केंद्राध्यक्षांनी याची नोंद घ्यावीअसे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.

००००००००

Tuesday 26 March 2024

निवडणूक सामान्य निरीक्षक चंद्रपुरात दाखल

 

निवडणूक सामान्य निरीक्षक चंद्रपुरात दाखल

चंद्रपूर दि. 26 : 13 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून मध्यप्रदेशचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव लोकेशकुमार जाटव हे 26 मार्च रोजी चंद्रपूर येथे दाखल झाले आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 9404912593 असा आहे.

००००००

13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल


 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर दि. 26 : 13 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले.

मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पाटी), मधूकर विठ्ठल निस्ताने यांनी 2 अर्ज (प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया), धानोरकर प्रतिभा सुरेश (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद यांनी 4 अर्ज (भारतीय जनता पार्टी) आणि अतुल अशोक मुनगीनवार (अपक्ष)  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी 16 इच्छूकांनी अर्जाची उचल  केली आहे.

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा उद्या बुधवार शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

००००००

‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष



 पेडन्यूज’ वर राहणार लक्ष

चंद्रपूर दि. 26 : मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिध्द होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण’ अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. सदर व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली असून निवडणूक कालावधीत जिल्ह्यात प्रसारीत होणा-या पेडन्यूज वर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष राहणार आहे.

निवडणूक कालावधीत माध्यमात प्रसारित होणारी वृत्त ही उमेदवाराच्या बाजूने काही मोबदला घेऊन प्रसारित करण्यात येत असतीलअशी शंका समितीला आल्यास अथवा तशी समितीकडे कोणी तक्रार केल्यास त्या वृत्तासंबंधी संबंधित उमेदवाराला नोटिसीव्दारे एम.सी.एम.सी समिती खुलाशाची विचारणा करू शकते. जर समितीला संबंधितांचा खुलासा मान्य झाल्यास त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मात्र समितीला त्याबाबत खुलासा मान्य न झाल्यास संबंधित वृत्त हे पेड न्यूज आहेअसे गृहीत धरून तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जातो.

जिल्हास्तरीय समितीचा निर्णय उमदेवारास मान्य नसल्यास जिल्हास्तरीय समितीला माहिती देवून राज्यस्तरीय समितीकडे 48 तासाच्या आत अपील करता येते. राज्यस्तरीय समिती 96 तासाच्या आत तक्रारीचा निपटारा करून तसा निर्णय उमेदवार आणि जिल्हास्तरीय समितीला कळवितात. या निर्णयाविरूध्द उमेदवार आदेश मिळाल्यानंतर 48 तसांच्या आत भारत निवडणूक आयोगाकडे अपील करू शकतो. आयोगाचा निर्णय अंतिम असतो.

संशयीत पेडन्यूजची उदाहरणे : प्रेस कौन्सिल ऑफ इंडीयाने संशयित पेडन्यूजसंदर्भात काही उदाहरणे दिली आहेत. यात 1. साधारण एकाचवेळी निरनिराळ्या लेखकांच्या बायलाईन नमुद करून स्पर्धा असलेल्या प्रकाशनामध्ये छापून येणारे छायाचित्र व ठळक मथळे दिलेले समान लेख. 2. निवडणूक जिंकण्याची शक्यता असल्याचा दावा करणा-या उमेदवारांची स्तुती करणारे लेख. 3. उमेदवाराला समाजाच्या प्रत्येक समुहाचा पाठिंबा मिळत आहे व तो मतदारसंघातील निवडणूक जिंकेलअसे नमुद करणारे वृत्त. 4. उमेदवाराला वारंवार अनुकूल असणारे वृत्त प्रकाशित करणे. 5. प्रत्येक वाक्य पक्षाच्या उमेदवाराच्या बाजुने लिहून एखादा पक्ष / उमेदवार याच्याकडून केल्या गेलेल्या कार्याने दुसरा पक्ष / उमेदवार यांचे निवडणूकविषयक भवितव्य संपुष्टात येत असल्याचा दावा करणारे वृत्त.

समाज माध्यमांवरही लक्ष : उमेदवार अथवा नोंदणीकृत पक्षांनी आपल्या प्रचारासाठी कोणत्याही माध्यम प्रकारांचा उपयोग करण्यात काहीच गैर नाही. मात्रहे करत असताना या माध्यमांव्दारे प्रसारित करण्यात येणाऱ्या मजकूराचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. या जाहिरात मजकूराच्या माध्यमातून कोणाचेही चारित्र्य हनन होऊ नयेसमाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नयेनैतिकतासभ्यता यांचा भंग होऊ नयेशत्रूत्व-तिरस्काराची भावना निर्माण होऊ नयेयाची काळजी घेणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेमध्ये या सर्व बाबींचा समावेश आहे.

समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील सायबर कक्ष 24 बाय 7 कार्यान्वित असून सोशल मिडीयावरील तक्रारीकरीता 8888511911 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

०००००

Sunday 24 March 2024

जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करा






जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करा

Ø सीमेवरील पथकांना जिल्हाधिका-यांचे निर्देश

Ø पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट

चंद्रपूर दि. 24 : संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी (एसएसटी) जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहे.

भद्रावती तालुक्यातील पाटाळा आणि वणी मतदारसंघातील सीमेवर असलेल्या चेकपोस्टला जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी भेट दिली. यावेळी वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, तहसीलदार योगेश कौटकर (वरोरा), अनिकेत सोनवणे (भद्रावती) आदी उपस्थित होते. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या सीमेवर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) तैनात करण्यात आले आहे. पाटाळा (ता. भद्रावती) येथील पथकांची पाहणी करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनांची कडक तपासणी झाली पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा करू नये. चारचाकी वाहनाच्या डिक्की सह वाहनाच्या सीट जवळील भागसुद्धा तपासावा. यात असणा-या बॅग्ज व इतर बाबींची तपासणी करावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. पूर्णपणे खात्री झाल्यावरच संबंधित वाहनाला प्रवेश द्यावा. तसेच तालुक्यातील वरीष्ठ अधिका-यांनी रात्री – बेरात्री चेकपोस्टवर अकस्मिकपणे भेट द्यावी, असे निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिका-यांनी वरोरा – वणी मार्गावरील पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट दिली. किती जणांची टीम लावण्यात आली आहे, प्रत्येक टीममध्ये किती लोकांचा सहभाग असतो, प्रत्येक शिफ्टमध्ये काम करणा-यांच्या वेळापत्रक कसे आहे, आदी बाबींची माहिती जाणून घेतली. तसेच दोन्ही चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचा-यांनी ऐकमेकांना मोबाईल क्रमांक देऊन ठेवावे, जेणेकरून एखादे वाहन न थांबता सुसाट गेले आणि संशयास्पद वाटले तर त्याची माहिती लगेच दुस-याला देणे शक्य होईल.

वरोरा येथे स्ट्राँग रुमची पाहणी : तत्पुर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी करून या परिसराला बॅरिकेटींग करावे, तसेच स्ट्राँग रुम सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाने विशेष दक्ष राहावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

असे आहेत प्रत्येक मतदारसंघनिहाय तैनात असलेले एसएसटी पथक : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 62 स्थायी निगराणी पथकांचे (एसएसटी) गठन करण्यात आले आहे. यात राजुरा विधानसभा मतदार संघात 15, चंद्रपूर – 4, बल्लारपूर – 6, वरोरा – 12, वणी – 13 तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 12 पथकांचा समावेश आहे. याशिवाय गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 8 तर चिमूर मतदारसंघात 4 एसएसटीचे गठण करण्यात आले आहे.

००००००