Search This Blog

Friday 26 July 2019

भविष्यातील सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर सैनिकी शाळेचे असावेत : ना. मुनगंटीवार





 चंद्रपूर सैनिकी शाळेत लेफ्टनंट जनरल निंभोरकरांच्या उपस्थितीत कारगील दिन  
·         पहिल्या तुकडीच्या चिमुकल्यानी पालकमंत्र्यांना दिला गार्ड ऑफ ऑनर
·         सैनिकी शाळेच्या पहिल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती
·        सैनिकी शाळेचे प्रधानमंत्रीसंरक्षणमंत्री करणार लवकरच उद्घाटन

चंद्रपूर दि.26 जुलै : ऑपरेशन विजय, अर्थात 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये आज देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी या शाळेत दाखल झालेल्या सैनिकी पेहरावातील पहिल्या तुकडीला संबोधित करताना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भविष्यामध्ये या शाळेचा विद्यार्थी आर्मीनेव्ही किंवा एअर फोर्सचा प्रमुख व्हावा व त्याने गर्वाने चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे नाव सांगावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन लवकरच प्रधानमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांच्याहस्ते होणार आहे. मात्र सैनिकी शाळेच्या नियमानुसार या ठिकाणची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून 90 विद्यार्थ्यांची सहाव्या वर्गाची पहिली तुकडी अभ्यासक्रमाला लागली आहे. आज कारगिल विजय दिवसाच्या शुभ पर्वावर चंद्रपूर सैनिकी शाळेने देशभक्तीने ओतप्रोत  कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सैनिकी शाळेसाठी प्रेरणास्थान ठरलेले सर्जिकल स्ट्राइक मधील मुख्य भूमिका असलेले लेफ्टनंट जनरल  राजेंद्र निंभोरकर आणि  ज्यांनी अथक पाठपुरावा व विक्रमी वेळेत 123 एकरा मधील सैनिकी शाळा चंद्रपूरकरांना लोकार्पित केलीअसे राज्याचे वित्तनियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरएअर व्हाईस मार्शल(सीनियर ॲडमिन एअर स्टाफ ऑफिसर) बी. मणिकंटनवन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेलजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या  महापौर  अंजलीताई घोटेकर,  विभागीय मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारपोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,  अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेअधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सैनिकी शाळेचे प्राचार्य स्कॉर्डन लिडर नरेशकुमार, उपप्राचार्य लेप्ट कमांडर अनमोल,  समाज कल्याण सभापती  ब्रिजभूषण पाझारे,  बल्लारपूर नगरपरिषदेचे  नगराध्यक्ष  हरिष शर्माशिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांची देखील उपस्थिती होती.
आज कारगिल दिनी या सैनिकी शाळेमध्ये दिल्लीच्या इंडिया गेट प्रमाणे तयार करण्यात आलेल्या अमर जवान ज्योतीवर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तत्पूर्वी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना हस्तांदोलन केले. यानंतर अवघ्या बारा, तेरा वर्षाचे असणारे सैनिकी पेहरावातील विद्यार्थ्यांनी सैनिकी शिस्तीत पालकमंत्र्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. उपस्थित सर्व 90 विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना सलामी दिली. हा क्षण पालकमंत्र्यांना भावूक करणारा ठरला.
त्यानंतरचा सैनिकी शाळेतील विस्तीर्ण मैदानावरचा कार्यक्रम सैनिकी शिस्तीचा वेगळा आविष्कार होता. सैनिकी शाळेचे गीत, एअर फोर्स दलाच्या बँडचे संचालन व  शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक लक्षवेधी होते.
यावेळी संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सैनिकी शाळेच्या निर्मितीमागील भूमिका व प्रेरणा विषद केली. देशातील 712 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाघ असणारा जिल्हा चंद्रपूर आहे. त्यामुळे या सैनिकी शाळेतून निघालेला एक एक विद्यार्थी या देशाचा नावलौकिक वाढविणारा विद्यार्थी असेलअशी आशा त्यांनी व्यक्त केली. सैनिकी शाळा उभारण्यासाठी राजेंद्र निंभोरकर यांनी केलेल्या वेळोवेळी मदतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ही सैनिकी शाळा विक्रमी 14 महिन्यात तयार झाली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सैनिकी शाळेच्या निर्माणाचे काम करणारे कामगार देखील उपस्थित होते. त्यांचे देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले. तुम्ही केवळ सैनिकी शाळा उभारली नाही तर देश मजबूत करणाऱ्या पिढीच्या मजबुतीसाठी काम केलेले आहे.  भारत मातेच्या या कामगार सुपुत्रांनी आपले दायित्व व्यक्त केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कामामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, संस्थांनी पुढाकार घेतला त्या सर्वांचे यावेळी त्यांनी आभार मानले.
4 ऑगस्ट रोजी चंद्रपूरला आमीर खान यांच्याहस्ते मिशन शक्तीला सुरुवात होत असून येत्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूर, गडचिरोलीतील क्रीडापटूंनी ऑलम्पिकमध्ये मेडल मिळावे, ही आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूरची सैनिकी शाळा हे आपले एक स्वप्न असून खरा आनंद जेव्हा हा या शाळेतला विद्यार्थी वीस-पंचवीस वर्षांनंतर देशाच्या आर्मी दलाचा प्रमुख असेल, नेव्ही दलाचा प्रमुख असेल किंवा एअरफोर्समध्ये महत्त्वाच्या पदावर असेल तेव्हाच मिळेल. हा अधिकारी जेव्हा सांगेल कीहोय ! मी चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचा विद्यार्थी आहे. तेव्हा मला आणखी समाधान मिळेलअशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. सैनिकी शाळेच्या परिसरात त्यांनी आज फेरफटका मारला व नव्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पहिल्या तुकडी सोबत छायाचित्र देखील काढले. यावेळी चंद्रपूर-बल्लारपूर शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
                                                            0000

Monday 22 July 2019

बालकांच्या संरक्षणासाठी समाजानेच पुढे यावे : प्रवीण घुगे


पत्रकार परिषदेत आवाहन
महिला व बालकल्याण समिती सोबत बैठक

चंद्रपूर, दि.20 जुलै - उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठात बाल संरक्षण संदर्भातील प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष रचना केलेली आहे. बाललैंगिक शोषणाबाबत निकाल जलद गतीने व्हावेत. न्यायालयात त्यासंबंधिचे सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे याकरिता प्रयत्न सुरू असून बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनासोबतच संवेदनशील  व प्रशिक्षित समाज तसेच सामाजिक  संस्थांनी पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे त्यानंतरच समाजातील वाईट प्रवृत्तीला आळा बसेलअसे मत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी आज 20 जुलै रोजी  शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी आयोगाच्या सदस्या डॉ. वासंती देशपांडे व सीमा व्यास प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच  बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड.वर्षा जामदार, सदस्या मनीषा नखातेमृणाली धोपटेअभय बोधे उपस्थित होते.
बाल संरक्षण संदर्भातील संस्थांची वर्गवारी करण्यात आली असून अ व ब दर्जाच्या संस्थांनाच मान्यता दिली असून क दर्जाच्या संस्था वगळण्यात आल्या आहेत. पालक असूनही घरी ठेवण्यायोग्य नाहीत, अश्या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालगृहात ठेवण्यात येते.  तसेच जास्तीत जास्त बालक कुटुंबा सामावली जावी असा आमचा मुख्य हेतू आहे. 12 वर्षाच्या आत वयोगटातील असणारी बालक तात्काळ दत्तक प्रक्रियमार्फत दत्तक झाली पाहिजेयाकरिता सीएआरए व एसएआरए  यातील मार्गदर्शक सूचनेनुसार प्रयत्न सुरू आहेत.  दत्तक विधानाची प्रक्रिया करीत असताना अर्ज करणाऱ्या कुटुंबाची मानसिक स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेतला जातो. यात पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने ऑनलाइन नोंदणी केल्या जात आहे. याबाबत समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये जागृती होणे आवश्यक आहे. याकरिता गावस्तरावर सक्रिय ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन होणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी दत्तक विधानाची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगितली.
तसेच शाळेत बालकांना मारहान होत असल्यास किंवा एखादा बालक संकटात असल्यास 1098 या चाईल्डलाईनवर संपर्क करावा तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी बाल संरक्षण संदर्भातील यंत्रणा उदाहरणार्थ बालकल्याण समितीबाल न्याय मंडळ, बाल पोलीस पथक व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याशी मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावर शिक्षणाचे अधिकारांतर्गत तात्काळ पोलीस विभागामार्फत कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी पोलीस विभाग,  जिल्हा महिला बालविकास अधिकारी , जिल्हा बाल संरक्षण कक्ष,  जिल्हा शिक्षण विभाग,  सहाय्यक कामगार आयुक्त यांची संयुक्तरीत्या बैठक घेतली यादरम्यान त्यांनी बाल पोलीस पथक जिल्हा बाल संरक्षण कक्ष व शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेली सुरू असलेली बाल संरक्षणाविषयी जनजागृतीची मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक  प्रशांत खैरे, महिला सहाय्यक कक्षाच्या  अतिरिक्त पोलीस निरीक्षक श्रीमती एकुरकेशिक्षणाधिकारी (माध्यमिकसंजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी  (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल परिविक्षा अधिकारी  छोटू बोरीकरबाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व  इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                       0000

सातव्या आर्थिक गणनेकरिता जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न


चंद्रपूरदि. 20 जुलै:  केंद्रशासनातर्फे राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार असून यामध्ये उद्योग, व्यवसाय व सेवा यांची प्रत्यक्ष कुटुंबास तसेच उद्योगास भेट देऊन गणना करण्यात येणार आहे. ही गणना जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळएनआयसीचे प्रमुख सतिश खडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमीत सुतार, सीएससीचे विभागीय प्रभारी निलेश कुंभारेनगर परिषदेचे सर्व मुख्याधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आर्थिक गणना दर पाच वर्षांनी होत असून यापूर्वी 2013 साली करण्यात आली होती. यावर्षी आर्थिक गणना ही प्रथमच पेपरलेस पद्धतीने पद्वारे राबवण्यात येणार आहे. या गणनेत उद्योगरोजगारकामगारांची संख्यानोकरदारस्वयंरोजगार,कामगार पणन संस्थावस्त्रोद्योगशाळामहाविद्यालयांची संख्याकुटुंबांचा आर्थिक स्थरसंकलित महसूलआदी घटकांची गणना केली जाणार आहे. सदर गणेनेसाठी जिल्ह्यात 1892 प्रगणक व 473 पर्यवेक्षकांची आवश्यकता भासणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा पास करावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनाच प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून कॉमन सर्विस सेंटर कडून निवड करण्यात येईल. हे प्रगणक प्रत्येक कुटुंबात पर्यंत पोहोचणार आहे.
या गणनेवर संनियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यस्तरीय समितीशी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत आर्थिक गणनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्या कार्यालयांना सहकार्य करण्याबाबत सूचना देणेस्थानिक प्रशासन व पंचायत यांना वेळोवेळी मार्गदर्शनात्मक सूचना करणेराज्यस्तरीय समन्वय समितीला अवगत करणेगणनेचा जिल्हास्तरीय अहवाल मंजूर करणे व प्रचार प्रसिध्दीची कामे करण्यात येईल. प्रगणक तसेच पर्यवेक्षकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिल्या.
                                                                          0000

सफाई कामगारांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


चंद्रपूरदि. 20 जुलै: सफाई कामगार समन्वय समितीच्या निवेदनानुसार प्रलंबित प्रकरणे तसेच मागण्या तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज 20 जुलै 2019 रोजी वीस कलमी सभागृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे,उपायुक्त गजानन बोकडेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड तसेच इतर विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सफाई कामगार समन्वय समिती सोबत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून द्यावी. प्रलंबित असलेली वारसान हक्काचे प्रकरण निकाली काढण्यात यावे. सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. कामगारांना आवश्यक असलेले सफाई साहित्य व इतर किरकोळ सामान उपलब्ध करून द्यावे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वस्तीचे सौंदर्यीकरण दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत करून देण्यात यावे. लाड पागे समिती नुसार वारसा हक्क लागू करण्यात यावे. ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कामगारांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारची शासकीय सुट्टी लागू करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतरचे लाभ तात्काळ देण्यात यावे. लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत असल्याने मुलींच्या आश्रमशाळेत महिला कर्मचा-यांची तात्परती अथवा कायम स्वरूपात नियुक्ती करण्यात यावी. या मुख्य मागण्यांवर  जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सफाई कामगार समन्वय समितीने प्रकाश टाकला.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रश्न समजून घेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या यामध्ये सफाई कामगारांसाठी श्रमसाफल्य योजनेअंतर्गत भविष्यातील गरज लक्षात घेऊन  येत्या पंधरा दिवसात महानगरपालिकेमार्फत जागा निश्चित करावी किंवा समन्वय समितीने स्वतः जागा सुचवावी. आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी सोमवारला प्रकाशित करावी. तसेच 31 जुलैपर्यंत सुनावणी घेऊन वारसांचा प्रश्न सोडवावा. सफाई कामगारांना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेचा  लाभ मिळवून देण्याकरिता  विशेष शिबिर आयोजित करावे. त्यात  महानगरपालिका प्रशासनाने सफाई कामगारांबद्दल असलेल्या संपूर्ण योजनांची  माहिती द्यावी. दर दोन महिन्यांनी महानगरपालिकेने सफाई कामगार समन्वय समितीसोबत बैठक घेऊन प्रत्येक मागणीचा पाठपुरावा करावा, अशा सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. सफाई कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेऊन दर तीन महिन्यांनी कॅन्सरटीबी व इतर आजारांच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिरे घ्यावीतअशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. प्रत्येक मागणीचा योग्य पाठपुरावा करावा. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालयपोलीस विभागऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनाही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सूचना दिल्या.
                                                                                     00000

Monday 15 July 2019

कौशल्याच्या आधारे जग जिंकता येते : ना. मुनगंटीवार



कौशल्यपूर्ण प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्याकरीता युवकांनी
पुढाकार घेण्याचे आवाहन
v कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागामार्फत जागतिक
युवा कौशल्य दिन साजरा
चंद्रपूर. दि, 15 जुलै: अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून युद्धाच्या माध्यमातून जग जिंकता येत नसून या जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला कौशल्याच्या आधारे जिंकता येते. त्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता विविध योजना सुरू केलेल्या आहे. त्याचा लाभ घ्यावा तसेच जिल्ह्यातील युवकांनी उद्योगांमध्ये पुढाकार घेऊन प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवावा, असे राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित युवाशक्तीला आवाहन केले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात 15 जुलै रोजी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा नियोजन अधिकारी नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक उद्धव येरमे, उद्योजकता विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते.
15 जुलै रोजी देशात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. चंद्रपूरमध्ये विविध मार्गदर्शक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचे औचित्य साधून बोलतांना ते म्हणाले, या दिनी फक्त कार्यक्रम आयोजित करून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याचा दिवस नाही. तर देशातील युवकांनी स्वतःमध्ये कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्प करण्याचा हा दिवस आहे. भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. 1750 मध्ये जगाच्या एकूण उत्पन्नापैकी एकट्या भारत देशाचे उत्पन्न 50 टक्के होते. परंतु आज  गरजेच्या अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात. कारण युवकांना स्वतःचे कौशल्य ओळखता आलं नाही. म्हणून आजही आपला देश निर्मिती व निर्यातीमध्ये मागे आहे. आपल्या युवकांमध्ये शक्ती आहे, परंतु त्या शक्तीला कौशल्याची जोड देण्याची गरज असून त्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून कौशल्य भारत योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील युवकांनी घ्यावा व कौशल्य निर्माण करून स्वतःसोबतच देशाचाही विकास साधावा. हाच खरा भारत मातेचा जयजयकार असेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
            राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना  युवकांमध्ये कौशल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योजकता निर्माण होण्याकरिता निधीची तरतूद केलेली आहे. पोंभूर्णा येथे अगरबत्ती तसेच टूथपिक निर्मितीचा उद्योग सुरू केलेला असून या माध्यमातून जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. जिल्ह्यात सैनिकी शाळेची निर्मिती करण्यात आलेली असून भविष्यात राष्ट्राचा लष्करप्रमुख या शाळेतून शिकलेला असेल तेव्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून येईल. जिल्ह्यात वनसंपत्ती, खनिज संपत्ती व  कृषी संपत्तीची कमतरता नसून त्या आधारित उद्योगांची कमतरता आहे. हे ओळखूनच चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यामुळे बांबूवर आधारित उद्योग करणाऱ्या महिला तसेच युवकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होणार आहे. उत्पादनाच्या क्लस्टर पद्धतीचा शोध भारत देशामध्येच लागला असून त्याचे महत्त्व तरुणांनी ओळखावे. तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक बाबींसाठी करावा. जग बदलाची तसेच देश बदलाची वाट न पाहता बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी आणि जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित युवकांना दिल्या.
नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. आपल्या देशात 2015 पासून हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशासकीय भवन ते प्रियदर्शनी सभागृहापर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. उपरवाही येथिल स्किल अँड इंटरप्रीनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट व ब्रह्मपुरी येथील एकलव्य भटक्या मागासवर्गीय संस्थेमार्फत पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थित युवांमध्ये उद्योग संबंधित शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. सोबतच विविध तज्ञांचे मार्गदर्शन  करण्यात आले. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन केले. नरेश उगेमुगे यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा विकास या विषयावर तर राहुल ठाकरे यांनी महाराष्ट्र हिरकणी योजना व कृषीआधारीत उद्योग याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बल्लारपूर येथील डायमंड कटींग सेन्टरच्या माध्यमातून हि-याला पैलू पाडणाऱ्या कौशल्य विकासाचे प्रात्याक्षिकही युवकांनी अनुभवले. या केंद्राचे संचालक निलेश गुल्हाने यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी कौशल्य विकासामध्ये कार्य करणाऱ्या अग्रणी संस्थांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी तसेच कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व विद्यार्थी तसेच युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
000000