Search This Blog

Friday 30 June 2023

3 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


 3 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 30 सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 3 जुलै  रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

00000

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू  

चंद्रपूर, दि. 16 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 जुलै ते 15 जुलै 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे.

या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

सदर आदेश 1 जुलै ते 15 जुलै 2023 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी  विनय गौडा जी. सी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

00000

Thursday 29 June 2023

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन साजरा

 

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन साजरा

चंद्रपूरदि. 29 : 29 जुन हा दिवस प्रा. प्रशातचंद्र महालनोबीस यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन म्हणून 2007 पासून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा सांख्य‍िकी कार्यालयचंद्रपूर येथे राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन  साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुनिल धोंगडेसुभाष कुमरे (प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी)सांख्य‍िकी अधिकारी अमित सुतारआदिवासी विकास प्रकल्पाचे नियोजन अधिकारी ए. एम. नंदनवारसहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) जी. के. सातपुते सहायक  व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात शाश्वत विकास ध्येयाचे सनियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय निर्देशक आराखडयासह राज्य निर्देशक आराखडा यांची एकत्रीत सांगड या विषयावर  सुनिल धोंगडेयांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थ‍ित सर्व अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन अजय भेंडे यांनी तर आभार श्री. वंजारी यांनी मानले.

००००००

Wednesday 28 June 2023

ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महा हब’ साकारण्यात येणार 500 कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महा हब’ साकारण्यात येणार 500 कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            चंद्रपूर/ मुंबई, दि. 28 : राज्यातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महा हब’ ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी 500 कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालयात महा हब संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नानौटिया, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्यासह महा हबचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे - कल्याण या परिसरात मजबूत उद्योजकीय इको - सिस्टीम तयार करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील स्टार्टअपची संख्या वाढावी, तसेच उद्योजकांना एका छताखाली स्टार्ट - अप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी पोषक वातावरण मिळावे ही महा हबची प्रमुख संकल्पना आहे. यासाठी उद्योग विभागासह कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यासह इतर विभाग एकत्रितपणे काम करणार आहे.

            महा हबमध्ये प्रामुख्याने उद्योग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्याचे काम करण्यात येईल. महा - हब हे प्रामुख्याने स्टार्ट - अप सुरु करणाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी, संशोधन आणि शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध मान्यता, आवश्यक बैठका, चर्चासत्र, परिषद याचे आयोजन आणि समन्वय या महा हबमार्फत करण्यात येईल.यामध्ये प्रामुख्याने फिनटेक, डेटा सेंटर्स, औषधी कंपन्या, वाहन उद्योग, उत्पादन यांचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            महा - हब नावीन्यपूर्ण आराखड्यानुसार यामध्ये ‘वन स्टॉप शॉप’ ही प्रमुख कल्पना आहे. यामध्ये विविध संसांधनासह इको सिस्टीम कार्यालये, कार्यालयासाठी आवश्यक जागा, क्षमता बांधणी, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, निधी, कायदेशीर तसेच आर्थिक बाबींमधील निपुणता, कौशल्य बांधणी, सॉफ्ट आणि हार्ड टेक्नॉलॉजीमधील पायाभूत सुविधा, संस्थात्मक भागीदारी यावर भर असणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री, कौशल्य विकास मंत्री, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सदस्य असतील. माहिती व तंत्रज्ञानचे नोडल डिपार्टमेण्ट म्हणून काम पाहणार आहेत.

00000

नॅनो युरिया व डीएपी खतांच्या वापराने होणार शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ



नॅनो युरिया व डीएपी खतांच्या वापराने होणार शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ

Ø जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 28: केंद्र शासनामार्फत सन-2022 पासून नॅनो युरीया व यावर्षीपासून नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढविण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरीता ईफको या सहकार क्षेत्रातील कंपनीद्वारे नॅनो युरीया व नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढावा, यासाठी रथाद्वारे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या प्रचार व प्रसिद्धी रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरल्यास पारंपारीक खताएवढेच फायदे होणार असून ही खते पारंपारीक खतांच्या तुलनेने स्वस्त असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार असल्याबाबतचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.  

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी नॅनो युरीया व नॅनो डीएपी फवारणीकरीता एक बॉटल (500मिली) प्रति एकरी पुरेसे असून याची कार्यक्षमता पारंपारीक खतांपेक्षा जास्त असल्याबाबत उपस्थितांना सांगितले.

नॅनो युरिया व नॅनो डीएपी हे एक नत्र व स्फुरद युक्त आधुनिक खत असून पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारे नत्र व स्फुरद या अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात. नॅनो युरिया मध्ये नत्राचे कण हे अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एकसंघ असतात व पृष्ठभागीय क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता पारंपारीक युरियापेक्षा जास्त असते. तसेच नॅनो डीएपीमध्ये कणांचा आकार 100 नॅनोमीटर पेक्षा कमी असल्याने बियाणे मुळांच्या आत किंवा पानांवर उपलब्ध रंध्रछिद्रातून आणि इतर छिद्रातून सहज प्रवेश करू शकतात. नॅनो डीएपीचा उपयोग सीड प्रायमर म्हणून केल्यास बियाण्यांचे लवकर अंकुरण होऊन पिकाची जोमाने वाढ व गुणवत्ता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरते. नॅनो युरिया व नॅनो डीएपी ही विद्राव्य खते सर्व पिकांकरीता नत्र व स्फुरदाचा उत्तम स्त्रोत असल्याने याच्या वापराने पिकातील नत्र व स्फुरदाची कमतरता दूर होत. परिणामी, पिकांच्या उत्पादकतेत वाढ होऊन खर्चात बचत होत असल्याने शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक उत्पन्नात वाढ होते.

सदर नॅनो युरिया व नॅनो डीएपी प्रचार व प्रसिद्धी रथाच्या उद्घाटनाप्रसंगी कृषी विकास अधिकारी वीरेंद्रसिंह राजपूत, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे रसिक बच्चूवार, ईफकोचे क्षेत्र अधिकारी चेतन उमाटे आदींची उपस्थिती होती.

00000

सधन कुकुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी अर्ज आमंत्रित


सधन कुकुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी अर्ज आमंत्रित

Ø 9 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.28: परीसरातील कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर, राजुरा, जिवती, वरोरा व चंद्रपूर या 9 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 9 सधन कुकुट विकास गटांची स्थापना करण्यासाठी सक्षमपणे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

सदर योजना 50 टक्के शासन अनुदानावर राबवायची आहे. या योजनेत शासन निर्णयानुसार प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. हि योजना सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के शासन अनुदानावर असून एकूण प्रकल्पाची किंमत रुपये 10 लक्ष 27 हजार 500 इतकी असून 50 टक्के शासन अनुदान रु. 5 लक्ष 13 हजार 750 व 50 टक्के लाभार्थी हिस्सा रु. 5 लक्ष 13 हजार 750 असा आहे. सदर योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यामधून सक्षमपणे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांकडून दि. 9 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.उमेश हिरुडकर यांनी केले आहे.

00000

Tuesday 27 June 2023

वर्षपुर्ती : विशेष वृत्त शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ मुळे जिल्ह्यातील 4.9 लक्ष गरीब कुटुंबाचे सण गोड

 

वर्षपुर्ती : विशेष वृत्त

शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ मुळे जिल्ह्यातील

4.9 लक्ष गरीब कुटुंबाचे सण गोड

Ø दिवाळी आणि गुडीपाडव्याला किटचे वाटप 

चंद्रपूरदि. 26 : आपापल्या परंपरेनुसार सण साजरे करण्यासाठी भारतीय नागरीक उत्साही असतो. त्यात आर्थिक परिस्थितीचा विचार केला जात नाही. गरीबातील गरीब सुद्धा सणासुदीला गोडधोड करण्याची इच्छा बाळगून असतो. अशा गरीब कुटुंबाचे सण गोड होण्यासाठी राज्य शासनाने या कुटुंबाना ‘आनंदाचा शिधा’ किट पोहचविण्याचा निर्णय घेतला. दिवाळी आणि गुडीपाडवा या दोन्ही सणांमध्ये  चंद्रपूर जिल्ह्यातील 4 लक्ष 9 हजार 275 कुटुंबाला ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्या आणि गुडीपाडव्याच्या वेळेस शासकीय कर्मचा-यांचा संप असतांना जिल्ह्यात 100 टक्के किटचे वाटप झाले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना गतवर्षी दिवाळीत आणि यावर्षी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ किट 100 रुपयांत वाटप करण्यात आली. या 100 रुपयांच्या किटमध्ये 1 किग्रॅ रवा, 1 किग्रॅ चणाडाळ, 1 किग्रॅ साखर आणि 1 लीटर पामतेलाचा समावेश होता. चंद्रपूर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे 1 लक्ष 38 हजार 393 लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील 2 लक्ष 70 हजार 882 लाभार्थी असे एकूण 4 लक्ष 9 हजार 275 लाभार्थ्यांना किट देण्यात आली. जिल्ह्यात दोन्ही सणांमध्ये 100 टक्के किटचे वाटप झाले असून शासनाच्या या निर्णयामुळे गरीबांचे सण गोड होण्यास मदत झाली.

विशेष म्हणजे जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी राज्य शासनाकडून आढावा घेण्यात येत होता. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांशी संवाद साधत या योजनेबाबत नागरिकांकडून माहिती घेतली. ‘आनंदाचा शिधा’ किट पासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, तसेच नागरिकांना वेळेत किटचे वाटप झाले पाहिजे, अशा सुचनाच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्यांमध्ये शासकीय गोदाम सुरू ठेवून शासनाकडून प्राप्त झालेल्या सर्व किट गावस्तरापर्यंतच्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहचविण्यात आल्या. घरची दिवाळी सोडून गरीबांची दिवाळी साजरी करण्यासाठी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तर गुडीपाडव्याच्या दरम्यान शासकीय कर्मचा-यांचा संप सुरू असतांनाही प्राप्त झालेल्या धान्याच्या सर्व किट पोहचविण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे यांनी सांगितले.

००००००

906 किलो अंमली पदार्थाची होळी





906 किलो अंमली पदार्थाची होळी

Ø पोलिसांतर्फे जनजागृती प्रभातफेरी               

चंद्रपूर, दि. 27 : दरवर्षी 26 जुन हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन पाळला जातो. नशेच्या आहारी गेलेल्या लोकांचे जीवन वाचवणेप्रत्येक व्यक्तीमुलेमुली यांच्यामध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता करणे, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलातर्फे जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली.

विशेष म्हणले जिल्हयातील विविध पोलिस स्टेशन अंतर्गत एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये दाखल गुन्हयातील अंमली पदार्थ (गांजाडोडा पावडर व टरफल) असा एकूण 906 किलो 962 ग्रॉम अंमली पदार्थाची होळी करण्यात आली.

 तत्पूर्वी गांधी चौक येथून जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक रविंद्रसिह परदेशीअपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधुपोलिस उपअधीक्षक राधिका फडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवारपोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) महेश कोंडावारसतिश राजपुत (शहर पोलिस स्टेशन)राजेश मुळे (रामनगर पोलिस स्टेशन)अनिल जिट्टावार (दुर्गापूर पोलिस स्टेशन)शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक रोशन यादवप्रविण पाटीलतसेच ‘सी-60’ पथक, दंगा नियंत्रण पथकवाहतुक शाखायांच्यासह पुरष व महिला पोलिस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर जनजागृती प्रभारी रैली शहरातील महात्मा गांधी रोड मुख्य मार्गाने जटपुरा गेटसावरकर चौक मार्गे पोलिस मुख्यालय चंद्रपूर येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला.

        अंमली पदार्थाची होळी : चंद्रपूर मुख्यालय येथे रॅलीचा समारोप झाल्यानंतर जिल्हयातील विविध पोलिस स्टेशन अंतर्गत एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये दाखल गुन्हयातील अंमली पदार्थ (गांजाडोडा पावडर व टरफल) असा एकूण 906 किलो 962 ग्रॅम अंमली पदार्थ न्यायालयाच्या परवानगीने पंचासमक्ष पोलिस मुख्यालय येथे जाळुन नाश करण्यात आले.       

००००००

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू


समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू

चंद्रपूर, दि. 27 : वर्ग 1 ली ते 8 वी मध्ये  शिकणारे कोणतेही बालक पाठयपुस्तकापासून वंचित राहु नये, पाठयपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येवु नये, तसेच शाळेतील सर्व दाखल पात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शुन्यावर आणणे, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा व अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 करीता एकात्मिक मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहे.

सन 2023-24 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याकरीता 1 लक्ष 73 हजार 290 विद्यार्थ्यांकरीता 7 लक्ष 19 हजार 638 पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार, सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून शाळास्तरापर्यंत पोहोचती करण्यात आली आहे. सदर पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक, प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करून पुस्तक दिन साजरा करण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविले आहे.

०००००००

27 ते 30 जुन रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन


27 ते 30 जुन रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दि. 27 ते 30 जुन 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे.

उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल त्या उमेदवारांनी अप्लाय करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती :

www.mahaswayam.gov.in   या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले-स्टोअर मधुन महास्वयंम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व  एम्प्लॉयमेंटवर क्लिक करा.  एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब  सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधारकार्ड क्रमांक व पासवर्डने साइनइन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर चंद्रपूर-3 हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करुन फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर  रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी  पंडित  दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटणावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा. आयअॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांच्या अप्लाय बटनावर क्लिक करा.

सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी  व पासवर्डने लॉगईन करुन दि. 27 ते 30 जुन 2023  रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हॉट्सॲपच्या माध्यमातुन संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

००००००

योजनेंतर्गत 802 रुग्णांवर 3902 वेळा केमोथेरपी उपचार


योजनेंतर्गत 802 रुग्णांवर 3902 वेळा केमोथेरपी उपचार

Ø जुने व नवीन रुग्णांना पुरविण्यात आलेल्या केमोथेरपी सायकल केसेसची संख्या

चंद्रपूर, दि. 27 : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्ष 2022 ते 23 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 42 कॅन्सर रुग्णांची नोंद आहे. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांवर मेडिकल ओंकोलॉजी या स्पेशलिटी अंतर्गत 2022 ते जून 2023 पर्यंत जुने व नवीन अशा 802 रुग्णांवर 3902 वेळा केमोथेरपी उपचार करण्यात आला आहे.

कॅन्सर रुग्णांना साधारणपणे 4 ते 6 वेळा उपचाराकरीता केमोथेरपी सायकलची आवश्यकता असते. सदर 802 रुग्णांनी या योजनेअंतर्गत 3902 केमोथेरपी सायकलकरीता उपचार घेतला आहे. तसेच 3902 हे कॅन्सर रुग्ण नसून योजनेअंतर्गत जुने उपचाराधीन आणि नवीन रुग्णांना पुरविण्यात आलेल्या एकूण केमोथेरपी सायकल केसेसची संख्या आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांनी कळविले आहे.

०००००००

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

 अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 27 :  एक अनोळखी इसम वय अंदाजे 24 वर्ष  असून दि. 21 जून रोजी   रेल्वे स्टेशन, चंद्रपूर येथील  स्टार्टर सिग्नल जवळ जखमी अवस्थेत मिळुन आल्याने त्यास उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. परंतू सदर इसम उपचारादरम्यान मृत पावला आहे. इसमाची ओळख पटविण्याकरीता रेल्वे स्टेशन परीसरात विचारपुस केली असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. तरी, सदर  मृत  इसमाची  ओळख  पटविण्याचे  आवाहन  रेल्वे पोलीस स्टेशन, वर्धा मार्फत करण्यात येत आहे.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

वय अंदाजे 24 वर्ष, सडपातळ बांधा, उंची 5 फूट 7 इंच, रंग निमगोरा, केस काळे मध्यम, चेहरा गोल,

नाक चपटे, अंगात कथ्या रंगाचा हॉफ टि-शर्ट, काळसर ग्रे रंगाचा लोअर फुलपॅन्ट त्यावर डावीकडे ॲडीडास असे लिहीले आहे. असे कपडे परिधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर रेल्वे पोलीस स्टेशन, वर्धा येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

०००००

फ्रान्समधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन


फ्रान्समधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी

महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 27 :   जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये  फ्रांस (ल्योन) येथे होणार आहे. त्या स्पर्धेत  सहभाग नोंदविण्यासाठी देश, राज्य, विभाग, आणि जिल्हास्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. याद्वारे गुणवान, कौशल्यधारक पात्र स्पर्धकाचे नामांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चंद्रपूर जिल्हातील युवक-युवतींनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे  यांनी केले आहे.

 सदर स्पर्धा ही दर 2 वर्षानी होत असते. जगातील ही सर्वात मोठी व्यवसायीक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभा संपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हातील युवक-युवतींनी विविध 52 क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या महास्वयंम  वेबपोर्टलवर  नोंदणी करावी.

यापूर्वी 46 जागतिक कौशल्य  स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ठ  झाले असून ही स्पर्धा 15 देशात 12 आठवडयासाठी  आयोजित करण्यात आली  होती. यापूढील जागतिक कौशल्य   स्पर्धा-2024 मध्ये फ्रांस (ल्योन) येथे आयोजित केली आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा तदनंतरचा असावा. तसेच आडेटिव्ह  मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउुड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजीटल कन्स्ट्रक्शन,  इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0  इन्फारमेंशन नेटवर्क गॅबलिग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन ॲड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रासाठी उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी, 1999 किंवा त्यांनतरचा असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेसाठी येथील उमेदवारांना करता येईल नामांकन :

या स्पर्धेसाठी देश, राज्य, विभाग, आणि जिल्हापातळीवरून प्रतिभा संपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम.एस.एम.इ. टुल्स रुम्स, आय.आय.टी, सिपेट, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, आय.एच.एम/हॉस्पीटॅलिटी इंन्स्टिटयुट, कार्पोरेट टेक्निकल इन्स्टिटयूट, स्किल ट्रेनिग इंस्टिटयुट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इन्स्टिटयुट ऑफ ज्वेलरी मेकिंग इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य विज्ञान शाखेची कनिष्ठ  व वरिष्ठ महाविद्यालये तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्त  सर्व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध आस्थापना आणि कारखाने यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छुक प्रतिभा संपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल.

स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल. या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्याकडून करण्यात येईल. इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर भेट देऊन नोंदणी करुन सहभाग निश्चित करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे  यांनी केले आहे.

००००००० 

Monday 26 June 2023

पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये


पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

चंद्रपूर, दि. 26 : कृषी हवामान व सल्ल्यानुसार चंद्रपूर जिल्हयामध्ये दिनांक 26 ते 28 जून 2023 पर्यंत आकाश ढगाळ राहून सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहेवातावरणातील बदलामुळे मॉन्सूनचे जिल्हयातील आगमन उशिराने झाले असले तरी शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करु नयेअसे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हयात चालू 2023-24 या खरीप हंगामात 4 लाख 90 हजार हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन केले आहेयात प्रत्येकी 1 लाख 87 हजार हेक्टर भात पिक व कापूस तर 80 हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा राहीलहवामान विभागाच्या या अंदाजानुसार दि24 व 25 जूननंतर अरबी समुद्रवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहेयासंदर्भात शेतक-यांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये, सर्वसामान्यतः शेतक-यांनी 80 ते 100 मि.मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नयेशासनाकडून महावेध प्रणालीमार्फत जिल्हयासाठी प्राप्त दैनिक पर्जन्यमान अहवालानुसार  वरोरा तालुक्यातील टेमुर्डाखांबाडाचिमूर तालुक्यातील खडसंगीभिसीमासळराजुरा तालुक्यातील विरुर स्टेव कोरपना तालुक्यातील कोरपना व गडचांदूर याच महसूल मंडळामध्ये 75 ते 100 मिमी पर्यंत पर्जन्यमान झाल्याची नोंद असली तरी सलग तीन दिवस पर्जन्यमान झालेले नाहीत्यामुळे या व इतर महसूल मंडळांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याची खात्री करुनच पेरणी करावीउन्हामुळे तप्त झालेल्या शेतजमीनीतील ओलावा घटतोत्यामुळे पावसाळयात किमान 75 ते 100 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाल्यानंतरच किंवा जमीन किमान सहा इंच ओली झाल्याची खात्री झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावीजिल्हयात माहे जून महिन्याच्या 183.5 मिमी सरासरी पैकी दि. 26.06.23 पर्यंत 42.8 मिमी पर्जन्यमान झाले असून त्याची टक्केवारी 23.10 आहेमागील वर्षात याच तारखेपर्यंत 78 मिमी पाऊस पडलेला होता.

असे करा पीक नियोजन : 1) शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये.  2) सर्वसामान्यतः शेतक-यांनी 80 ते 100 मि.मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. 3) शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. 4) मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये. 5) पेरणी करताना साधारणपणे 20 टक्के जादा बियाणांचा वापर करावा. 6सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. 7) पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करावी. 8) जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन (मल्चींग) सारख्या तंत्राचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

००००००