Search This Blog

Sunday 30 April 2023

भूसंपादन प्रकरणातील पाच कोटी रक्कम लोक आदालतीमध्ये वसूल

 




भूसंपादन प्रकरणातील पाच कोटी रक्कम लोक आदालतीमध्ये वसूल

चंद्रपूरदि. 30 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयनवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालयमुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष समृद्धी एस भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली आज (30 एप्रिल) रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते .

सदर लोक अदालतीमध्ये वरोरा येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर येथे प्रलंबित असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पक्षकार असलेल्या भूसंपादनाची एकूण 133 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 82 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून मोबदल्याची एकूण रक्कम 5 कोटी 28 लक्ष 87 हजार 805 रुपये संबंधित / शेतकरी यांना अदा करण्यात आले. सदर भूसंपादनाची प्रकरणे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होतीपरंतु महामंडळाने व पक्षकारांनी तडजोडीची तयारी दाखवून सदर प्रकरणात मोबदलाची रक्कम अदा केलेली आहे. आजपर्यंत झालेल्या लोक अदालतीपैकी या लोक अदालती मध्ये ही विशेष बाब आहे . वरील प्रमाणे भूसंपादन प्रकरणाबाबत लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश सर्व वकीलसर्व न्यायालय कर्मचारीपोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केलेअशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली आहे.

00000000

वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन









 

वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Ø वन अकादमी येथे राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद थाटात संपन्न.

Ø वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन

चंद्रपूरदि. 30 : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या माध्यमातून चिंतन मंथन करून भविष्याचा वेध घेत वनविभागाने कार्य करायचे आहे. वनविभागाच्या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून राज्याला पुढे नेणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे आपला विभाग देशात सर्वांत अग्रेसर राहीलयादृष्टीने पूर्ण शक्तीने प्रयत्न कराअसे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन करण्यासाठी वन अकादमी येथे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद थाटात संपन्न झाली. या परिषदेत मार्गदर्शन करतांना ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीराज्याचे वनबल प्रमुख वाय.एल.पी. राववन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यासह राज्यातील वरीष्ठ वन अधिकारी उपस्थित होते.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकसंवाद वाढविण्यावर भर द्यावा. विभागाप्रती जनतेच्‍या मनात सन्‍मान निर्माण होईल,  आपुलकी वाटेल असे आचरण करावे तसेच मानव - वन्यजीव संघर्षात संबंधित कुटुंबाला त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी. याबाबत कुठलीही हयगय होता कामा नये. आजही वृत्तपत्रात पर्यावरणवृक्षवन्यप्राण्यांचे महत्त्व यावर लिखाण करणाऱ्यांची कमतरता आहे. ही उणीव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भरून काढावी. त्यासाठी दोन महिन्यातून एकदा आपल्या विभागाबाबत अभ्यासपूर्ण लेख लिहावा.

नियोजनगुणवत्ता आणि कामाचा वेग हे सूत्र ठरवून विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे. मंत्रालयातील फाईल्सवर वेगाने निर्णय होणे अपेक्षित आहे. वनविभागाला ज्या विविध स्त्रोतांमधून निधी मिळू शकतो त्याबाबत पाठपुरावा व प्रयत्न करावे. मनरेगाच्या निधीचा जास्तीत जास्त वापर करून घ्यावा. वनउपजांवर आधारित उद्योगांना चालना देणे हा आपला उद्देश आहे. त्यासाठी वनांशी संबंधित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतील गावांमध्ये वनउपज लागवड करण्याकरिता विभागाने प्रोत्साहित करावे. वनउपजांवर आधारित कॉमन सर्व्हिस सेंटर चंद्रपुरात असले पाहिजेअसेही त्यांनी नमूद केले.

पुढे वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेकल्याणकारी राज्य म्हणून जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. याच माध्यमातून महाराष्ट्र फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची (महाराष्ट्र वन उद्योग विकास महामंडळ) संकल्पना पुढे आली आहे. या महामंडळाच्या सविस्तर अभ्यासासाठी चार-पाच जणांची एक समिती तयार करावी. १४२ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वनउपजांशी संबंधित असलेली उत्पादने नक्कीच लागणार आहेतहे वनविभागाने लक्षात घ्यावे.

सैन्याच्या धर्तीवर इको क्लबची पदरचना करताना त्यासमोर ग्रीन हा शब्द लावण्याबाबत नियोजन करा. ग्रीन youtube वर वनांशी संबंधित व्हिडिओ अपलोड करावे. राज्यातील पर्यावरण संस्थांची नोंदणी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात इको क्लबचे एक मुख्यालय असणे आवश्यक आहे. वनविभागाने ॲप विकसित करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देता येऊ शकते कायाची पडताळणी करावी. डिजिटल माहिती मिळण्यासाठी क्यूआर कोड विकसित करणेपर्यावरणावर आधारित साहित्य संमेलनाचे आयोजन करणेस्लोगनवादविवाद स्पर्धापरिसंवाद आदीचे नियोजन करणे यासाठी वन विभागाने समन्वयातून पुढाकार घ्यावा.

वनविभागात जवळपास साडेपंधरा हजार कर्मचारी कार्यरत आहेतअसे सांगून वनमंत्री म्हणालेशेवटच्या फळीतील कर्मचारीसुद्धा पर्यावरण व जंगलाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. अशा कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधाचांगले निवासस्थान उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. वनविभागाचे विश्रामगृहकार्यालय उत्तम असले पाहिजे. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प क्रमांक एकवर येण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावेअसेही ते म्हणाले.

दरम्यानवन अकादमीच्या परिसरात ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते बेकरीचे उद्घाटन झाले. त्यानंतर वन विकास प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थींसाठी दोन बसगाड्यांचे लोकार्पण त्यांनी केले.या दोन्ही बस वातानुकुलीत व आरामदायी असून प्रशिक्षणार्थींना शहरात व परिसरातील वनांमध्ये प्रवासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे.

जगभरातील पर्यटन बघा

देशातील उत्तम सफारीचांगले पर्यटन आपल्या राज्यात विकसित व्हावेहा उद्देश डोळ्यापुढे ठेवावा. वन्यप्राणी बचाव केंद्राबाबत चांगला प्रस्ताव तयार करण्यासाठी टीम तयार करावी. यासाठी वरिष्ठ वन अधिकारी यांच्या टीमने बाली (इंडोनेशिया)बँकॉक (थायलंड)सिंगापूर या आंतरराष्ट्रीय ठिकाणांची तसेच गुजरात मधील जामनगरकेवडिया या भारतातील ठिकाणांच्या सफारीची पाहणी करून अभ्यास करावाअशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या.

७५ हजार विद्यार्थ्यांना जंगल दर्शन

पर्यावरण हृदयापर्यंत पोहोचविण्यासाठी बालमनावर प्रयोग करणे आवश्यक आहे. 'चला जाणुया वनालाया अंतर्गत ७५ हजार विद्यार्थ्यांना जंगलाचे दर्शन घडविण्यात येईल. इको क्लबमध्ये केवळ जिल्हा परिषद व आश्रमशाळाच नव्हे तर चांगल्या खाजगी शाळांचा सुद्धा समावेश करावा. प्रत्येक जिल्ह्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे फेडरेशन तयार करावेअसे ना. मुनगंटीवार म्हणाले. राज्यात सध्या ८ हजार ८०७ शाळांचा इको क्लबमध्ये समावेश आहे.

परिषदेचा पहिला दिवस

या परिषदेमध्ये अमृतवनबेलवनसर्पदंशावरील लस निर्मितीसंशोधनात्मक कामेउजाड टेकड्यांचे हरितीकरणचित्रपट निर्मितीसाठी स्थळांची निवडपडीक ओसाड जमिनीचे व्यवस्थापनशहर-नगर-महानगर येथे वृक्ष लागवडीसाठी आराखडा निर्मितीमनरेगाअंतर्गत अभिसरण व रोपवाटिकेची कामे, ‘चला जाणुया वनाला’ उपक्रमइको क्लब आराखडा व अंमलबजावणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी वनमंत्रांच्या हस्ते ताडोबातील पारंपरिक वनौषधी पुस्तिकेचेचंद्रमा त्रैमासिकमेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गवत पुस्तिका व नकाशा तसेच वन परिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट यांनी तयार केलेली मास्टरमाइंड टायगर आर टी - 1’ या चित्रफीतीचे विमोचन करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमात अधिकाऱ्यांचा सत्कार

वनविभागाला उत्कृष्ट सेवा देऊन पुढील तीन महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते शालश्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात नितीन गुदगेरंगनाथ नाईकवाडेगुरुनाथ अनारसेदिगंबर पगारनानासाहेब लडकतप्रदीपकुमार व सत्यजित गुजर या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

००००००००

Saturday 29 April 2023

ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार






 

ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

Ø पंचायत राज दिन व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

चंद्रपूरदि. 29 : भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहेअशा ग्रामसेवकांवर गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे घड्याळाकडे पाहून काम करू नका तर गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकांनी तन-मनाने काम करावेअशी अपेक्षा राज्याचे वने,  सांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित पंचायत राज दिन व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवारमुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकरउपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडेश्याम वाखर्डे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देता आले नाहीतअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेयावर्षी तीनही वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्त केवळ 45 ग्रामसेवक आदर्श नाही तर या जिल्ह्यातील प्रत्येकच ग्रामसेवक आदर्श असला पाहिजे. तेव्हाच हा जिल्हा प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करेल. आपले राज्य ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंतांनी सांगितलेली ग्रामगीता हा गावाच्या विकासासाठी उत्कृष्ट असा ग्रंथ आहे. प्रत्येक सरपंच आणि ग्रामसेवकाने हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. कारण सरपंच हा त्या गावचा मुख्यमंत्री तर ग्रामसेवक हा मुख्य सचिव आहे. ज्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला नाहीत्यांनी आजपासून गावाच्या विकासाचा संकल्प करावा. आपण काय कृती करतोयावर आदर्श समाजाची निर्मिती होईल.

शिक्षण व्यवस्थेबद्दल पालकमंत्री म्हणालेशिक्षण क्षेत्रात खुप मोठी भरारी घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आजही देशात 25 कोटी लोक निरक्षर आहेत. हा आकडा आपल्या राज्यात 1 कोटी 75 लक्ष आहे. ही खरचं चिंतेची बाब आहे. उच्च शिक्षण घेतांना आपला परिवार आणि समाजाला विसरून चालणार नाही. त्यामुळेच शिक्षणासोबत सामाजिक आणि सुसंस्कृत शिक्षणाची गरज आहे. शिक्षणावर सर्वात जास्त खर्च महाराष्ट्र करीत असून यासाठी 77 हजार कोटींची तरतूद केली आहे. 100 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये 9 विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेचे असतात. उर्वरीत 91 विद्यार्थी हे विना अनुदानित शाळांमधून येतात. याचाही विचार या निमित्ताने करावा. गत काळात आपण जिल्ह्यातील 1500 शाळांना ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली. आपला विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घ्यावीअसे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

तत्पूर्वी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या कॉफीटेबल बुकचे विमोचन तर झेडपी चांदा स्टुडंट वेब पोर्टल व मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक राजू पिदूरकरहनुमान इनामेश्यामकुमार ठावरीराजेश कांबळेमिनाक्षी राऊतकामसेन वानखेडेनिराशा पाखमोडे अशा 45 ग्रामसेवकांचा शालपुष्पगुच्छस्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गटविकास अधिकारी मंगेश आरेवार (भद्रावती)राजेश राठोड (चिमूर)भागवत रेजीवाडे (जिवती)मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातेकर या अधिका-यांनासुध्दा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्मार्ट ग्राम योजनेचा पुरस्कार ब्रम्हपुरी तालुक्यातील जवराबोडी (मेंढा) या ग्रामपंचायतीला देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनीसंचालन एकता बंडावार यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारीगटविकास अधिकारीग्रामसेवकप्राथमिक शिक्षकआरोग्य सेवक / सेविका आदी उपस्थित होते.

००००००००

अवैध साठा शोधून तंबाखु व गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करा

 


अवैध साठा शोधून तंबाखु व गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करा

Ø जिल्हाधिका-यांचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश

चंद्रपूरदि. 29 : जिल्ह्यात सुगंधित तंबाखूसुपारीगुटखा यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्रशहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा विक्री होत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी अवैध साठा शोधून तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सुरक्षित अन्न आणि निरोगी आहारासाठी सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळीअन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहितेअन्न सुरक्षा अधिकारी श्री. टोपलेपोलीस निरीक्षक रोशन पाठकपोलीस विभागाच्या अपर्णा मानकरजिल्हा महिला व बालविकास विभागाचे परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकरसहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडूरंग माचेवाडमनोहर चीटनुरवार तसेच ग्राहक संस्थेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेअवैध सुगंधीत तंबाखूसुपारी गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन कार्यवाही करावी. पोलीस विभागाने याबाबत माहिती घ्यावी. ज्या अन्नपदार्थ विक्रेत्यांकडे व व्यावसायिकांकडे अन्न परवाना नाही, याबाबत चौकशी करून अशा आस्थापनांना भेटी द्याव्यात. अन्न व्यावसायिकांचे परवान्याचे नूतनीकरण करावेत. तसेच इट राईट चॅलेंज उपक्रमांतर्गत अन्नपदार्थाविषयक माहिती द्यावी. जेणेकरूननागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होईलअसे ते म्हणाले.

००००००

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8 वाजता

 पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8 वाजता

चंद्रपूरदि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम  सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस मैदान, चंद्रपूर येथे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

०००००००

Thursday 27 April 2023

बॉक्सींग व व्हॉलीबॉल खेळाच्या नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 


बॉक्सींग व व्हॉलीबॉल खेळाच्या नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि. 27: जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूरच्यावतीने जिल्ह्यातील खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता व उदोन्मुख खेळाडूंकरीता अद्यावत व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी एकूण 100 खेळाडूंचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.   

आयोजनाचा पहिला टप्पा 1 ते 10 मे 2023 पर्यंत तर दुसरा टप्पा 15 ते 25 मे पर्यंत, नि:शुल्क व्हॉलीबॉल व बॉक्सिंग क्रीडा प्रशिक्षण शिबिर जिल्हा स्टेडियम, आकाशवाणी रोड, चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण शिबिरात 10 वर्षावरील ते 17 वर्षाखालील सर्व मुलामुलींना सहभाग घेता येईल. 

या प्रशिक्षण शिबिरात व्हॉलीबॉल, बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण तसेच 10 ते 17 वर्षाखालील खेळाडूंना प्राथमिक विकास कौशल्याचे धडे, समुपदेशन, चर्चासत्र, परिसंवाद तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून देण्यात येईल. खेळाडूंना या शिबिरात सहभाग घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबिरात चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

00000

2 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

2 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 27: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

माहे, मे  महिन्याचा पहिला सोमवार, दि.  1 मे रोजी येत असून  सदर  दिवशी  शासकीय  सुट्टी  असल्यामुळे मंगळवार, दि. 2 मे रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका  लोकशाही  दिनातील  टोकन क्रमांकाची  प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा.  तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल,  लोकशाही  दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. असे निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

00000

वरोरा तालुक्यातील बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश

 वरोरा तालुक्यातील  बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश

चंद्रपूर, दि. 27: वरोरा तालुक्यात बालविवाह होत असल्याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरोराचे उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक श्री. काचोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोंखडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महीला व बालविकास) संग्राम शिंदे यांच्या समन्वयाने तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा व महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात बालविवाह थांबविण्यात यश आले.

बालविवाहातील मुलाचे वय 21 पेक्षा कमी असल्याने कागदपत्रावरून चौकशीअंती दिसून आले. सदर बालकास बालकल्याण समितीसमक्ष हजर करण्यात येत आहे. बालविवाह लावून देणे कायद्याने गुन्हा असून घरातील वडील मंडळी व गावातील प्रतिष्ठित नागरीकांनी या प्रकारच्या प्रथेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामस्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवक व सहाय्यक अधिकारी म्हणून अंगणवाडी सेविकेची जबाबदारी असते. तरीही, या प्रकारच्या घटना ग्रामीण व शहरीस्तरावर सातत्याने घडतांना दिसून येतात. दक्ष नागरीक म्हणून समाजातील सर्वच घटकांनी यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच अशाप्रकारच्या प्रथेला आळा घालावा. ज्यामुळे सुदृढ व सक्षम समाजाची निर्मिती होईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

00000

दूध उत्पादन वाढीसाठी मुरघास लागवडीला चालना


 दूध उत्पादन वाढीसाठी मुरघास लागवडीला चालना

Ø जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक

चंद्रपूर, दि. 27 : जनावरांना रानात चराई बंदी असल्याने त्यांना पौष्टिक चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. आजच्या या युगात सर्वच जनावरांना घरच्या घरी चारावं लागतं. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत आहे त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी हो आहे. चराई क्षेत्र नाहीपौष्टिक चारा नाही. परिणामी दुधाळू जनावरांना समतोल आहार मिळत नसल्याने दुधाच्या उत्पादनात घट येतांना दिसते. म्हणून कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारीबाजरीमक्कापासून मुरघास चारा बनविण्याच्या उपक्रम हाती घेतला.

मौजा अजयपूर येथील विठ्ठल परसूटकर यांनी आपल्या शेतावर बाजरी लावली व कृषी विभागाच्या मार्गदर्शनात दोन टन मुरघास विशेष प्रशिक्षकाकडून तयार करून घेतले. या उपक्रमाची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अजयपूर येथे भेट देऊन प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरवळकर उपस्थित होते.

मुरघास चारा दुधाळू जनावरासाठी एक वरदान आहे. विशेषत: मक्यापासून बनविलेले मुरघास जनावरे मोठ्या चवीने खतात. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. तसेच मुरघास सहा रुपये किलो दराने विकल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.  मुरघास चा-यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईलच तसेच शेतक-यांनासुध्दा एक पूरक व्यवसाय उपलब्ध होईल, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनासोबतच जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी कृषी विभागाने शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे,  मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी पर्यवेक्षक श्री. बुगेवार  गावातील दूध उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते.

०००००००

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे तीन दिवसीय कार्यशाळा

 

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे तीन दिवसीय कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 27 : वार्षिक उद्योग पाहणी हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GDP) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येते.

निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम 2008 खालील तरतुदींनुसार माहिती देणे बंधनकारक आहे. सन 2021-22 या वर्षाच्या क्षेत्रकामासाठी राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, तर प्रमुख पाहूणे म्हणून औद्योगिक सांख्यिकी विभागाचे उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, उद्योग विभागाचे प्रतिनिधी पी.डी.रेंदाळकर, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर उपस्थित होते. या कार्यशाळेत एकूण 164 अधिकारी व कर्मचारी या सहभागी झाले होते.

सौम्या चक्रवर्ती यांनी, जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याचे सांगितले. तसेच माहिती विहीत वेळेत संकलित करून त्वरीत उपलब्ध करावी, असेही त्या म्हणाल्या. विजय आहेर यांनी, मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करावे. शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच उद्योगांनी देखिल या कामी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन केले.

श्री. चोकलिंगम, म्हणाले, देशातील सर्व्हेचा इतिहास, माहितीचे महत्वत्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित/अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणांसह ज्ञानात भर घातली. माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासारखे तंत्रज्ञान याचा विचार करुन माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखील सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक दिपाली धावरे यांनी तर आभार सहसंचालक नवेन्दु फिरके यांनी मानले.

कार्यशाळेला  रणबीर डे, बाप्पा करमरकर, डॉ. प्रदिप आपटे, उपसंचालक श्रीनिवास शिर्केमहेश चोरघडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी अपर संचालक डॉ. जितेंद्र चौधरी, उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले व प्रशिक्षणार्थींच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी यशदाचे उपमहानिदेशक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.), अपर संचालक पुष्कर भगूरकर, उपस्थित होते.

०००००००

Wednesday 26 April 2023

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 312 हेक्टर शेतजमीनीचे नुकसान

 

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 312 हेक्टर शेतजमीनीचे नुकसान

चंद्रपूर, दि. 26 : चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे 312.51 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे या कालावधीत तीन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. तसेच 65 पशुधनाची जीवित हानी व पाच पशुधन जखमी झाले आहेत. वादळ वारा, गारपीठ, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 312 घरांचे व गोट्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 

या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना व शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी तलाठ्यानमार्फत तात्काळ पंचनामे करून आवश्यक निधी मागणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिल्याचे निवासी  उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

 जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

Ø मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जनतेचे अभिनंदन

चंद्रपूर/मुंबई, 26: केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2018-19 या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत.

जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले असून, या कार्यात सहभागी सर्वांचे आभार सुद्धा मानले आहेत. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता जलयुक्त शिवार 2.0 अभियान सुद्धा असेच सर्वांनी यशस्वी करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

(जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल : संदर्भासाठी लिंक: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1919726)

00000

जलशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा




जलशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 26: शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत जलशक्ती अभियान: कॅच द रेन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पूर्वतयारीबाबत व जलशक्ती अभियान: कॅच द रेनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांच्या प्रगतीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित बठैकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. नन्नावरे, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महानगरपालिका, वनविभाग तसेच इतर विभागांनी जलशक्ती अभियानासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती अभियान पोर्टलवर अपलोड करावी. नरेगामार्फत केलेली कार्यवाही सदर पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून काही विभाग अद्यापही मागे आहेत. तसेच विभागनिहाय प्रत्येक विभागांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती अपलोड केली आहे का? याबाबत दर 15 दिवसानंतर आढावा घेण्यात येईल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जलशक्ती अभियान : कॅच द रेन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. जलसंधारण ही जनचळवळ होणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पाटबंधारे विभागाने तलावांची माहिती अद्यावत करावी. पुढीलवर्षी पाणीपुरवठ्याबाबत समस्या निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन करावे. सर्व मुख्याधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आढावा घ्यावा व त्यासंदर्भात प्लॅन तयार करावा. पाऊस कमी झाला तरी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतर शेतसिंचन व उद्योगांना पाण्याची उपलब्धता करावी. असे ते म्हणाले

 अमृत सरोवराचा आढावा:

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अमृत सरोवराची 17 कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील व तालुकानिहाय सुरू असलेली अमृत सरोवराची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी. तसेच जलजीवन मिशनमध्ये पाणीटंचाई असलेल्या भागात शाश्वत स्त्रोत निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

 उष्माघातबाबत (हिटवेव्ज) आढावा:

उष्माघात (हिटवेव्ज) कृती आराखड्याचे योग्य नियोजन करून प्राधान्याने अंमलबजावणी करावी. 12 मे नंतर येणाऱ्या हिटवेव्जसाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा. उष्माघात हा सायलेंट किलर असून या उष्माघातामुळे दरवर्षी अनेक जण मृत्युमुखी पडतात. उष्माघाताच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी इमारती, रुग्णालये आदींचा आढावा घ्यावा. फायर सेफ्टीच्या बाबतीत दक्ष राहावे. शाळा, महाविद्यालये व अंगणवाडी यांचा वेळा बदलविण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.

00000

मनपाची नाली सफाई व गाळ वाहतूक ही दोन्ही कामे 51 लक्ष रुपयात

 

मनपाची नाली सफाई व गाळ वाहतूक ही दोन्ही कामे 51 लक्ष रुपयात

Ø नाली सफाईची सेवा तातडीने देण्याकरीता सर्विस बेस नालीसफाई निविदा

चंद्रपूर, दि. 26: दिपक उत्तराधी नालीसफाई कंत्राटदार यांना नालीसफाईचे कार्यादेश देऊन 15 दिवसाच्या आत काम सुरू करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार कंत्राटदारांनी दि. 16 मार्च 2023 पासून नालीसफाईचे काम सुरू केले असता, कंत्राटी कामगारांनी काम बंद पाडले व सतत 17 दिवस नालीसफाईचे काम करू दिले नाही. त्यामुळे कंत्राटदाराने दि. 4 एप्रिल 2023 पासून नालीसफाईचे काम सुरू केले आहे. याआधी, सदर कंत्राट हे मनुष्यबळ पुरविण्याचे होते. त्यामुळे शहरातील सर्व नाली स्वच्छता करणे बंधनकारक नव्हते. यामुळे परिणामकारक नाली स्वच्छता होत नव्हती. तसेच निव्वळ नाली सफाईच्या कामावर मनपाचे 67 लक्ष रुपये प्रतिमाह खर्च होत होता. तसेच नाली सफाईचा गाळ उचलण्यास प्रतिमाह रु. 25 ते 30 लक्ष खर्च होत होता. असे एकूण सरासरी 95 लक्ष रुपये खर्च येत होता. तरीही नाली सफाईच्या कामात मोठ्या प्रमाणात तक्रारी नागरिकांकडून येत होत्या व नागरिकांच्या नालीसफाईची सेवा तातडीने देण्याकरीता सर्विस बेस नालीसफाई निविदा महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली.

त्यामध्ये नागरीकांच्या नालीची सफाई किमान महिन्यातून दोन वेळा करण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच निघालेला गाळ ही घनकचरा वाहतूक करण्याची जबाबदारी नालीसफाई कंत्राटदारास बंधनकारक आहे. त्यामुळे नागरीकांना विहित कालावधीत नालीसफाईची कामे करून देण्यात येणार असून कंत्राटदारावर बंधनकारक आहे. याआधीचा एकूण खर्च रुपये 95 लक्ष होणाऱ्या खर्चात 44 लक्ष रुपयाची सरासरी बचत होऊन दोन्ही कामे फक्त 51 लक्ष रुपये प्रतिमाह खर्चात होत आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक बचत होत आहे.

तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना किमान वेतन मनपाने लागू केला आहे. मनपाने प्रत्यक्ष कामगारांसह चर्चा करून काम सुरू केले आहे. दैनंदिन नाल्याची साफसफाई आणि गाळ उचलण्यासाठी 4 एप्रिल 2023 पासून नियमित कार्य सुरू आहे. तसेच आजपर्यंत 1360 किलोमीटर नाल्याची सफाई कंत्राटदाराने केली आहे. तर 325 ट्रॅक्टर ट्रिप नाली, माती, गाळ घनकचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यात आली आहे.

याआधी घनकचरा प्रकल्प येथे नाली माती 30 ते 35 टन दररोज येत होती आता 60 ते 65 टन नाली माती दररोज येत आहे. तरीही, नालीसफाई कामाची तक्रार असल्यास मनपाचे स्वच्छता झोन कार्यालयात किंवा मनपाच्या चांदा सिटी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांनी केले आहे.

000000

25 ते 29 एप्रिल कालावधीत विद्यार्थ्यांचा इसरो(बंगलोर) शैक्षणिक दौरा

 




25 ते 29 एप्रिल कालावधीत विद्यार्थ्यांचा इसरो(बंगलोर) शैक्षणिक दौरा

Ø शैक्षणिक व पर्यटनस्थळांना देणार भेटी

चंद्रपूर, दि. 26: मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेमार्फत नवरत्न स्पर्धेच्या निवड प्रक्रियेद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इसरो (बंगलोर) येथे दि. 25 ते 29 एप्रिल 2023 या कालावधीत शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या शैक्षणिक दौऱ्याकरीता जिल्हा परिषद शाळेतील 32 विद्यार्थी इसरो दौऱ्याकरीता रवाना झाले. इसरो दौऱ्याकरीता जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी आपले योग्य ध्येय ठरवावे, संशोधक व चिकित्सक व्हावे, परीक्षेत केवळ गुण मिळाले पाहिजे असा अट्टहास न करता एक चांगला माणूस म्हणून आपले जीवन कसे जगता येईल? यादृष्टीने प्रयत्नशील असावे, असा मोलाचा सल्ला दिला. प्रवासाचा आनंद घ्यावा व सोबतच आरोग्य सांभाळणे अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना व सोबत जाणाऱ्या शिक्षकांना दिल्या.

याप्रसंगी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूळकर आधी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून विद्यार्थ्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या इसरो दौऱ्याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ) विशाल देशमुख यांनी केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरे व निकिता ठाकरे, गटशिक्षणाधिकारी व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.

शैक्षणिक व पर्यटनस्थळांना देणार भेटी:

सदर इसरो (बेंगलोर) दौऱ्यादरम्यान शैक्षणिक व पर्यटनस्थळांना भेटी देण्याकरीता अभ्यास दौऱ्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे.  26 एप्रिल 2023 रोजी बेंगलोर पॅलेस, लालबाग बॉटनिकल गार्डन, टिपू सुलतान समर पॅलेस व गव्हर्नमेंट म्युझियम, 27 एप्रिल रोजी इसरो (बेंगलोर), बेंगलोर फिल्म सिटी, जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियम व बेंगलोर एक्वेरियम, 28 एप्रिल रोजी एचएएल एरोस्पेस म्युझियम, बनरघट्टा नॅशनल पार्क, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट तर 29 एप्रिल रोजी बेंगलोर सायन्स म्युझियम, मैसूर फॅन्टॅसी पार्क, मैसूर स्नो सिटी व मैसूर पॅलेस असे दौऱ्याचे स्वरूप राहणार आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतराळ विषयक ज्ञानात भर पडेल त्याचप्रमाणे परिसरातील इतर प्रेक्षणीय स्थळांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती संग्रहित करता येईल पर्यावरण व इतर भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.

00000