Search This Blog

Wednesday 12 April 2023

माजी सैनिकांना आंध्र विद्यापिठाकडून मिळणार कला शाखेची पदवी

 

माजी सैनिकांना आंध्र विद्यापिठाकडून मिळणार कला शाखेची पदवी

Ø पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार

चंद्रपूर, दि. 12 : माजी सैनिकांना कला शाखेतून बी.ए. (एचआरएम) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य शासनाच्या तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त असणार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या तरुणाईच्या आयुष्याचा मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनविणे हा यामागचा उद्देश आहे.

माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करीत नाही. त्यामुळे आंध्र विद्यापीठाची झालेल्या कराराद्वारे माजी सैनिकास विविध नोकऱ्यांकरीता पात्र होण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी आंध्र विद्यापीठाद्वारे कला शाखेतून बी.ए. (एचआरएम) पदवी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या सुवर्ण संधीचा माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे (निवृत्त) यांनी केले आहे.

माजी सैनिकांना पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्रता व अटी:

अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता 12 वी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एयरफोर्सद्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र, माजी सैनिकांची सेवा 15 वर्षापेक्षा कमी नसावी. दि. 1 जानेवारी 2010 नंतर निवृत्त झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता 10 वी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षाचा अभ्यासक्रम (2 वर्षे 12 वी+ 3 वर्षे पदवी) लागू राहील.

अभ्यासक्रमाची कोर्स फी रुपये 12 हजार 500 असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन circulars/publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

No comments:

Post a Comment