Search This Blog

Thursday 16 May 2024

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा - जिल्हाधिकारी विनय गौडा





मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा - जिल्हाधिकारी विनय गौडा 

Ø नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा

चंद्रपूरदि. 16 : निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

नियोजन सभागृह येथे आज (दि.16) मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा घेतांना ते बोलत होते. मंचावर सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे, नितीन हिंगोले आदी उपस्थित होते.

19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली असून मतदानाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 4 जून रोजी तडाळी येथील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व इतर सर्वजणांचे अतिशय बारकाईने या प्रक्रियेवर लक्ष असते. तसेच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतमोजणीची प्रक्रिया समजावून सांगणे / दाखविणे आवश्यक आहे.

पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणेच आणि मॅन्युअलचा अभ्यास करून अतिशय पारदर्शक आणि अचूकपणे मतमोजणी करावयाची आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचा-याने गोपनीयता पाळणे आवश्यक असून कोणीही स्वत:चे मत व्यक्त करू नये तसेच प्रक्रियेची माहिती इतरांना देऊ नये. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकारी – कर्मचा-यांनी तटस्थ असणे गरजेचे आहे. मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी – कर्मचारी व इतरांना मोबाईल, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास परवानगी नाही. संपूर्ण प्रक्रियेसाठी तीनवेळा रँडमायझेशन होणार असून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतमोजणी बाबत सर्वांनीच तयारी करून ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी सादरीकरण केले. तसेच ईव्हीएम मतमोजणीकरीता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल, पोस्टल बॅलेटकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएस मतमोजणी करीता 8 टेबल राहणार आहे. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट च्या मतमोजणीला सुरवात होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

कापूस लागवड तंत्रज्ञानासह इतर विषयांवर शेतक-यांना प्रशिक्षण



कापूस लागवड तंत्रज्ञानासह इतर विषयांवर शेतक-यांना प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 15 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे इंडो कॉटन सेंटर ऑफ पीडीकेव्ही, एक्सलन्स फॉर कॉटन अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने कृषी संशोधन केंद्र, ऐकार्जुना (ता. वरोरा) येथे शेतकरी आणि कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले.

शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकरीता मान्सूनपूर्व तयारी तसेच कापूस लागवड तंत्रज्ञान, कपाशीचे बियाणे, बोंडअळी नियंत्रण इत्यादी विषयावर प्रशिक्षण देण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, कृषिवाणी कार्यक्रमाच्या संचालिका संगिता लोखंडे उपस्थित होत्या. यावेळी श्री. तोटावार यांनी सोयाबीनच्या अष्ठसूत्री लागवडीवर व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. याप्रसंगी कृषी संशोधन केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार यांनी कपाशी पिकांचे लागवडीसाठी विविध वाण, व त्यांचे वैशिष्टये, कापूस लागवड तंत्रज्ञान, बोंडअळींचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. चर्चा सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरेसुद्धा देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांनी केले. यावेळी परिसरातील शेतकरी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते.

००००००

उन्हाळी शिबिरातून आदिवासी विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण



 

उन्हाळी शिबिरातून आदिवासी विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण

Ø 142 विद्यार्थ्यांचा विविध प्रशिक्षणात सहभाग

           चंद्रपूरदि. 15 : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 23 एप्रिल ते 22 मे 2024 या कालावधीत उन्हाळी शिबीर हा उपक्रम राबविला जात आहे. प्रकल्पात पहिल्यादांच अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे कलागुण विकसीत होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार यांनी व्यक्त केला.

शासकीय  माध्यमिक  तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे करण्यात आले आहे. उन्हाळी शिबिरात शासकीय/ अनुदानित  आश्रम शाळेतील एकूण 142 विद्यार्थी (62 मुले व 80 मुली) सहभागी झाले आहेत. शिबिरात विद्यार्थ्यांच्या निवासाचीभोजनाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे. प्रशिक्षित मार्गदर्शक /प्रशिक्षक यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

1. योगा प्रशिक्षण माधुरी वानकर यांच्यामार्फत दिले जात असून यात योगा विषयीची माहिती,  योगाचे फायदेओंकार साधना, पूरक हालचाली, योगासन आदींचा समावेश आहे. 2.आर्चरी प्रशिक्षण गिरीश कुकडे व अक्षय टेकाडे यांच्यामार्फत देण्यात येत आहे. यात धनुर्विद्या या खेळामध्ये धनुष्याबाण चालवून आपले लक्ष कसे भेदायचे याचा सराव देण्यात येत आहे. 3.गोंडी पेटींग प्रशिक्षण सुभाष  लांजेवार व पी.टी.गवाळ यांच्यामार्फत देण्यात येत आहे. यात वारली पेन्टिंग मध्ये त्रिकोण,चौकोणवर्तुळ आणि रेषाच्या माध्यमातून पेन्टिंगत्यामध्ये विटांची लाल भुकटीतांदळाची पीटशेणकोळसा यांचा वापर करण्याच्या उद्देशाने  गोंडी आणि वारली पेन्टिंगचे प्रशिक्षण दिले  जात आहे. 4.तायक्वांडो प्रशिक्षण  तुषार दुर्गे व अनुष्का काळे यांच्यामार्फत देण्यात येत आहे. यात किक्सपचेसब्लॉकिंगस्व:रक्षण याचा समावेश आहे.

5.व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण चंद्रशेखर कंदालवार देत आहेत. यात उद्दिष्ट,  वेळेचे बंधनबायोडाटा लिखाणसंवाद कौशल्य या मुद्यावर विद्यार्थ्यांना परीपक्व करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच काय करावेकाय करु नयेकधीकुठेकाय बालायचेकसे  वागायचे आपले सामर्थ्यआपल्यातील कमजोरीआपल्याला मिळालेली संधीहोणारे संभाव्य धोके यावर नियत्रंण व मंच  वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जात आहे.  6.इंग्लीश स्पीकिंग कोर्स  अनिल दहागावकर यांच्यामार्फत देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषयाची भीती आणि न्यूनगंड असल्यामुळे  ते दूर करण्यासाठी विविध मानसशास्त्रीय प्रशिक्षण तंत्राचा अवलंब करून सरावावर भर देण्यात येत आहे. या माध्यामातून विद्यार्थ्यांना इंग्रजी संदर्भात आत्मविश्वास  निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 7.संगीत कला प्रशिक्षण विशाल बावणे व राहून पडघने  देत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संगीत  विषयाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी  या उद्देशाने त्यांना  होर्मोनियमतबलाढोल इत्यादी वाद्दे  वाजविण्याचे  तसेच गायनाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

            उन्हाळी शिबिराला प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी / कर्मचारीमुख्याध्यापकपालक तसेच वनविभागआरोग्य  विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी भेट दिली आहे. या प्रशिक्षणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना समाजात एक  मानाचे स्थान प्राप्त होण्यास मदत होईल तसेच विद्यार्थ्यांना शिस्तस्वयंअध्ययन अशा प्रकारच्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

००००००

परवानाधारक कृषी केंद्रातून बियाणांची खरेदी करा


परवानाधारक कृषी केंद्रातून बियाणांची खरेदी करा

Ø दलाल किंवा अनधिकृत बियाणांबाबत तक्रार करण्याचे आवाहन

           चंद्रपूरदि. 15 : बीटी  कापसाच्या विविध कंपनीच्या संशोधित  वाणांचे गुणधर्म व उत्पादकतेमध्ये विशेष फरक नसतो तर येणारे उत्पन्न हे पिकांचे व्यवस्थापन तसेच जमिनीच्या मगदूरावर/ सुपीकतेवर अवलंबून असते. तुलनात्मक गुणधर्म व क्षमता असलेल्या बियाण्यांची परवानाधारक कृषी केंद्रामध्ये उपलब्धता असून एमआरपी दरामध्ये गुणात्मक बियाण्याची खरेदी करून शेतक-यांनी लागवडीच्या खर्चात बचत करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

            अशी करा कपाशी बियाण्याची निवड : कपाशीचे वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व गुणधर्म याचा विचार करावा. सर्व प्रकारच्या हवामानास  व जमिनीस अनुकूल वाण असावे. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील प्रतिकारक्षम वाण असावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडाचा सुध्दा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते. बागायती लागवडीसाठी मध्यम ते उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. बोंडाचे  आकार बागायती लागवडीसाठी  मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. या गुणधर्माप्रमाणे मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वत: इतर शेतकऱ्यांच्या कपाशीच्या वाणाची निवड करावी. अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायदा  होईल.

            सध्या बाजारात विविध कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे उपलब्ध आहे. यासर्व वाणांमध्ये विशेष  फरक नसून एखाद्या विशिष्ट वाणांची  मागणी करू नये किंवा जादा दराने खरेदी करू नये. तसेच खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातूनच करावी. बाहेर राज्यातून किंवा दलाला मार्फत बियाणे खरेदी टाळावे. याबाबत काही तक्रार असल्यास अथवा अनधिकृतरित्या कोणीही विक्री करत असल्यास टोल फ्री क्रमांक 7498655232 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तोटावार व कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत यांनी केले आहे.

००००००

बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

 

बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम  मुदत 31 जुलैपर्यंत

चंद्रपूरदि. 15 : केंद्र  शासनाच्या महिला व बाल विकास  विभागामार्फत  बालशक्ती  पुरस्कार दिला जातो.  प्रधानमंत्री  राष्ट्रीय बाल पुरस्कार हा 5 ते 18 वर्षापर्यंत शिक्षणकला, सांस्कृतिक कार्यखेळ, नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे, अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री  राष्ट्रीय बाल पुरस्कार  2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत.

ज्या मुलांचे वय 5पेक्षा अधिक व 31 जुलै2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षणकलासांस्कृतिक कार्यखेळनाविन्यपूर्ण शोधसामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केली आहेत्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकारकेंद्रशासित प्रदेशजिल्हाधिकारी /जिल्हादंडाधिकारीपंचायत राज्य संस्थानागरी स्वराज संस्था,  शैक्षणिक संस्था इ.अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत आहे, असे महिला व बालविकास आयुक्त यांनी कळविले आहे.

००००००

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान


 शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

चंद्रपूरदि. 15 : सहकार  पणन  व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए. ) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा 24, 25 व 26 मे 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत भवानजीभाई हायस्कूलमुलरोडचंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

ज्या परिक्षार्थिंनी सदर परिक्षेकरीता अर्ज केले आहेतअशा परिक्षार्थ्यांनी आपले ओळखपत्र युजर आयडी वरुन काढून घ्यावे  व ज्या परिक्षार्थ्यांचे ओळखपत्र मिळाले नाहीत अशा परिक्षार्थ्यांनी आधार कार्डपॅन कार्डबँक  पासबुकनिवडणुक ओळखपत्रवाहन परवानाकार्यालयाचे ओळखपत्र यापैकी एक दाखवून प्रोव्हीजन ओळखपत्र या कार्यालयाकडून 23 मे 2024 पर्यंत बनवून घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.

००००००

धान व भरडधान्याची 31 मे पर्यंत खरेदी

 धान व भरडधान्याची  31 मे पर्यंत खरेदी

चंद्रपूरदि. 15 :  पणन हंगाम 2023-24 रब्बी मधील शासकीय आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी/भरडधान्य (मका) खरेदी केंद्रावर 30 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होती. परंतु मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामामध्ये अल्प प्रमाणात शेतकरी नोंदणी झालेली असल्याने आता शेतकरी नोंदणीला व खरेदीला 31 मे 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2023-24 पासून ज्या शेतकऱ्याचा 7/12  आहेत्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण  होणार नाही.  त्यामुळे ज्या  शेतकऱ्यांना शेतमालाची  विक्री  करावयाची आहे, त्याच  शेतकऱ्यांने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत  म्हणजे 31 मेपर्यंत आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर धान खरेदी/ भरडधान्य (मका) खरेदीसाठी नोंदणी पूर्ण करावीअसे  जिल्हा मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांनी कळविले  आहे.

०००००

Tuesday 14 May 2024

शैक्षणिक कामाकरीता लागणारे दाखले वेळेपूर्वी काढून घ्या


शैक्षणिक कामाकरीता लागणारे दाखले वेळेपूर्वी काढून घ्या

Ø जिल्हाधिका-यांचे पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन

चंद्रपूरदि. 14 : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल नुकताच लागला आहे. जून महिन्यात स्टेट बोर्डाचा निकाल लागणार असून पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे शैक्षणिक कामाकरीता लागणारे आवश्यक दाखले वेळेपूर्वीच काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, भूमीहिन प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र अशा विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. दाखले वेळेवर न मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नाहक अडचणींचा सामना करावा लागू शकतो तसेच पालकांना वेळेवर धावपळ करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी अगोदरच त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे / दाखले आताच काढून घ्यावे व ऐनवेळेवर होणारा त्रास टाळावा.

परिक्षांचे निकाल लागल्यानंतर विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ तसेच तहसील कार्यालयात एकच गर्दी होते. त्यामुळे वेळेत दाखले मिळण्यास विलंब होऊ शकतो. कधीकधी तांत्रिक अडचणीसुध्दा उद्भवू शकतात. हा विलंब व त्रास टाळण्यासाठी वेळेपूर्वीच उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, भूमीहिन प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र नजीकचे आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत सेवा केंद्र, तालुका स्तरावरील सेतू केंद्रातून दाखल्यांसाठी अर्ज करावा व रितसर दाखल्यांची पोचपावती घ्यावी. शैक्षणिक कामाकरीता आवश्यक असणारे सर्व दाखले पालकांनी वेळेपूर्वीच प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

०००००००

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा


 जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

Ø तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 14 : भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पद्माकर पाटील, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) ए.ए. तांदळे, तहसीलदार (सामान्य) प्रिया कवळे आदी उपस्थित होते.

      यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी प्रत्येक विभागाने व्हिजिलन्स (सतर्कता) अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. भ्रष्टाचाराशी संबंधित प्राप्त तक्रारी किती व किती तक्रारींचा निपटारा झाला, याबाबत अहवाल सादर करावा. तसेच भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करावयाची असल्यास संबंधित विभाग किंवा समितीसमोर तक्रार दाखल करावी. तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. भ्रष्टाचारासंदर्भातील जी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविले जाऊ शकतात, अशा प्रकरणांची तसेच गतवर्षी दोषी ठरलेले आणि निर्दोष सुटलेल्या प्रकरणांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर करावी. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांनी पंच नेमणुकीसाठी नोडल अधिका-यांची मागणी प्रशासनाकडे केली.

०००००००

शेतक-यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण व आधार सिडींग करून घ्यावे


 

शेतक-यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण व आधार सिडींग करून घ्यावे

Ø जिल्हाधिका-यांकडून पी.एम. किसान सन्मान निधी कार्यवाहीचा आढावा

चंद्रपूरदि. 14 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण आणि बँक खात्यास आधार संलग्नीकरण (आधार सिडींग) करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतक-यांनी तात्काळ ई-केवायसी आणि आधार सिडींग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पी.एम. किसान पोर्टलवर प्रलंबित असलेल्या बाबींची पुर्तता करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाहीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभिषेक अत्रे, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिक कारपेनवार यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पी.एम. किसान सन्मान निधी अंतर्गत पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याकरीता संबंधित लाभार्थी शेतक-यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण आणि आधार सिडींग त्वरीत करून घ्यावे. तसेच तहसीलदारांनी संबंधित लाभार्थ्याचा, 1 फेब्रुवारी 2019 पुर्वीचा 7/12 बघून त्वरित निपटारा करावा. जेणेकरून कोणीही सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार नाही. सोबतच तालुकानिहाय माहिती घेऊन ई-केवायसी आणि आधार सिडींग प्राधान्याने करून घ्यावे. जिल्ह्यात मंडळ स्तरावरील हवामानाचा अंदाज घेणारे सर्व यंत्र सुस्थितीत आहे की नाही, याची पडताळणी करून मान्सूनच्या पुर्वी सदर यंत्र दुरुस्त करून घ्यावे. याबाबत तहसीलदारांनी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक आणि स्कायमेटच्या प्रतिनिधींची तालुका स्तरावर बैठक घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

जिल्ह्यात प्रधानमंत्री सन्मान निधीकरीता 2 लक्ष 49 हजार 26 शेतकरी पात्र असून यापैकी 2 लक्ष 42 हजार 697 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत. तर 6329 लाभार्थ्यांचे प्रलंबित आहे. तसेच 2 लक्ष 44 हजार 892  लाभार्थी शेतक-यांचे  आधार सिडींग पूर्ण झाले आहेत. तर 6765 शेतक-यांचे आधार सिडींग करणे बाकी असून 581 शेतक-यांची पडताळणी प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

०००००००

20 जुलैपर्यंत राहणार चना खरेदी व नोंदणी सुरू

 

20 जुलैपर्यंत राहणार चना खरेदी व नोंदणी सुरू 

चंद्रपूरदि. 14 : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2023-24 मध्ये एन.सी.सी.एफ. (National Co-oprative Consumer Federation Nashik ) च्या वतीने चना खरेदीस मान्यता दिली आहे. त्यानुसार 8 एप्रिल 2024 पासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू झाली असून 20 जुलै 2024 पर्यंत चना खरेदी व नोंदणी सुरू राहणार आहे.

दिनांक 22 एप्रिल 2024 पासून चना खरेदीला सुरुवात झाली असून 25 जूनपर्यंत चना खरेदी करता येणार होता. आता मात्र खरेदी व नोंदणीला मुदतवाढ मिळाली असून 20 जुलै 2024 पर्यंत चना खरेदी करता येणार आहे.  चंद्रपूर खरेदी केंद्राला पोंभुर्णा, सावली, मूल तालुका जोडले असून राजूरा केंद्रासोबत बल्लारपूर आणि गोंडपिपरी तालुका, गडचांदूर केंद्रासोबत कोरनपा, जीवती तालुका, चिमूर खरेदी केंद्रासोबत ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुका आणि वरोरा खरेदी केंद्रासोबत भद्रावती तालुका जोडण्यात आला आहे. या पाच खरेदी केंद्रावर नॅशलन को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन, नाशिक (एन.सी.सी.एफ.) मार्फत चना खरेदी व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. एनसीसीएफ ने ठरवून दिलेल्या कालावधीत शेतक-यांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर जावून चना विक्री व नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस.तिवाडे यांनी कळविले आहे.

नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : सातबारा, चालू खाते असलेले बँकेचे पासबुक, आधारकार्ड, आठ अ प्रमाणपत्र आवश्यक.

००००००

Monday 13 May 2024

कृषी विभाग व विमा कंपनीने प्रलंबित प्रकरणे समन्वयातून निकाली काढावेत



 

कृषी विभाग व विमा कंपनीने प्रलंबित प्रकरणे समन्वयातून निकाली काढावेत

Ø जिल्हाधिका-यांकडून पीक विमा योजनेचा आढावा

चंद्रपूरदि. 13 : स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसानग्रस्त झालेल्या विम्याची प्रलंबित प्रकरणे कृषी विभाग व विमा कंपनीने समन्वयातून निकाली काढून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभिषेक अत्रे, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिक कारपेनवार यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, यापूर्वी करण्यात आलेल्या पंचनाम्याची प्रलंबित प्रकरणे एकमेकांच्या समन्वयातून त्वरीत निकाली काढावी. त्यासाठी नियोजनबध्द कार्यप्रणाली तयार करा. प्रलंबित प्रकरणांचा तालुका कृषी अधिकारी यांनी तालुका स्तरावर आढावा घ्यावा. विमा कंपनी आणि कृषी विभागाने शेतक-यांसाठी योग्य पद्धतीने काम करावे. जे पात्र लाभार्थी आहेत, अशा शेतक-यांना नुकसानग्रस्त पिकांचे पैसे मिळणे आवश्यक आहे, यासाठी गांभिर्याने काम करावे. तसेच विमा कपंनीने फिल्डवर मनुष्यबळ वाढवावे, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी शेतकरी अर्ज संख्या 3 लक्ष 50 हजार 976 असून विमा संरक्षित क्षेत्र 3 लक्ष 27हजार 918 हेक्टर आहे. आतापर्यंत मिळालेली नुकसान भरपाई एकूण 25 कोटी 31 लक्ष असून 48 हजार 884 लाभार्थ्यांना विम्याचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने भात पिकाचे विमा संरक्षित क्षेत्र 1 लक्ष 32 हजार 389 हेक्टर (70.32 टक्के क्षेत्र), कापसाचे विमा संरक्षित क्षेत्र 1 लक्ष 18 हजार 606 हेक्टर (67.69 टक्के) आणि सोयाबीनचे 62274 हेक्टर (91.90 टक्के) विमा क्षेत्र संरक्षित असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

००००००

Friday 10 May 2024

जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता आराखडा सादर करा - जिल्हाधिकारी विनय गौडा





 

जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता आराखडा सादर करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूरदि. 10 : जलयुक्त शिवाराची कामे ही पावसाळयापूर्वी करणे अपेक्षित असल्याने यावर्षी जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता तात्काळ आराखडा सादर करावाअशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनउपवनसंरक्षक कुशाग्र पाठकश्वेता बोड्डू,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्यासह दूरदृष्यप्रणाली द्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेजलयुक्तची कामे पूर्ण करण्याकरीता अतिरिक्त निधीची मागणी करावी. प्रत्येक मागणीवर निधी वितरित केला जाईल. सन 2023 - 24 मधील दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार 100 % निधी वितरित करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी ची मागणी करण्यात यावी. जिल्हा नियोजन समिती मार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीसह विशेष निधीमधून मागणी प्रस्ताव सादर करावे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सन 2023-24 मधील प्रशासकीय मान्यता नुसार करण्यात येणारे कामे प्रत्यक्ष स्थळी भेटी देऊन पूर्ण करावी. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची कामे करतांना कामाच्या आधारे निधी मागणी प्रस्ताव सादर करण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यतच्या कार्यपध्दतीची माहिती सर्वांना देण्यात यावी.

सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन बैठकी घेऊन जलयुक्त शिवारच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयात नोडल अधिकारी यांची नेमणूक करावी व त्यांनी जलयुक्त शिवार कामाचा आठवडी अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे प्रत्येक सप्ताहास सादर करावा.

पुढे जिल्हाधिकारी म्हणालेनिधी मागणी सादर करतांना कोणतेही त्रुटी येणार नाहीयाची काळजी घ्यावी. तसेच सदर निधी हा संबंधित लेखाशिर्षकांतर्गत असल्याचेी खात्री करावी. प्रशासकीय मान्यतेनुसार कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल. त्यामुळे सर्वांनी आपल्या अधिकारांतर्गत सर्व कामे पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. जेणेकरून चंद्रपूर जिल्हयातील जलयुक्त शिवाराच्या कामाचा वाढता आलेख विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करता येईल. कामे पूर्ण होताच त्याची जीओ टॅगींग सह इतर कागदपत्रानुसार होणारी अंतीम प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावीअशा सूचना त्यांनी दिल्या.

००००००


बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा




बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूरदि. 10 : शासन निर्णय फेब्रुवारी 2000 अन्वये बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी तथा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती मार्फत चंद्रपूर जिल्हयातील बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यवाहीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी गुरुवारी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे,  चंद्रपूर महनगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवारवैद्यकीय अधिकारी डॉ नयना उत्तरवारजिल्हा साथरोग अधिकारी मिना मडावी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेजिल्हयातील शहरी किंवा ग्रामीण भागातील विना परवानगीने चालविण्यात येणा-या नर्सिग होमची माहिती घेवून अशा नर्सिग होमला शेवटची नोटीस द्यावी तसेच त्यांचे नर्सिग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी. परवानगीनुसार सुरु असलेले नर्सिंग होम तथा दवाखाने परवानगीच्या अटी व शर्ती नुसार चालतात की नाहीशासनाच्या नियमांचे  काटेकोर पालन करतात की नाहीयाची सुध्दा तपासणी करण्यात यावी. तसेच या विषयीबाबतची कोणतीही तक्रार आल्यास त्याची तात्काळ चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागास दिले. तसेच समितीमार्फत 33 प्रकरणामध्ये नोंदविण्यात आलेल्या एफ.आय.आर. बाबत पुढील कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना पोलिस विभागास त्यांनी दिल्या. यावेळी नर्सिंग होम तथा मोठया हॉस्पीटल्स मधून होणाऱ्या मेडीव्हेस्टचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

चंद्रपूर जिल्हयातील सदर समितीमार्फत आजपर्यंत 121 धाडी टाकण्यात आल्या असून त्यापैकी 33 प्रकरणामध्ये एफ.आय.आर. नोंदविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी दिली. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे व मनपा आरोग्य अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

Thursday 9 May 2024

अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा



 

अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूरदि. 9 : अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनउपविभागीय अधिकारी संजय पवारपोलिस निरीक्षक महेश कोंडावारकेंद्रीय जीएसटी विभागाचे विजयकुमारकृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरेटपाल खात्याचे उपविभागीय निरीक्षक एम.एम. चव्हाणशिक्षणाधिकारी (प्राथ) आश्विनी सोनवणेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेशिक्षण विभागाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जनजागृती करावी. या पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी पुढील शैक्षणिक सत्रापासूनच वर्षभराचे नियोजन करावे. यात जनजागृतीपथनाट्यरॅली आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवगत करणे तसेच यासोबत वाहतुकीचे नियमआरोग्यबाबत मार्गदर्शनतंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आदी बाबी समजावून सांगाव्यात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) परिसरात असलेल्या बंद कारखान्यांची यादी करून तेथे पोलिसांच्या सहकार्याने तपासणी करावी. जेणेकरून अशा बंद कारखान्यांच्या उपयोग असामाजिक घटकांसाठी होणार नाही.

कृषी विभागाने शेतशिवाराच्या नावाखाली गांजाखसखस व इतर अंमली पदार्थ वनस्पतींची लागवड तर होत नाहीयाबाबत संबंधित कृषी सहायकग्रामसेवक व पोलिस पाटील यांना गावात अवगत करून त्याची माहिती प्राप्त करावी. पोस्ट विभागाने जिल्ह्यात येणा-या पार्सलचे स्कॅनिंग करावे. तसेच कुठेही अंमली पदार्थाची लागवडवाहतूक व विक्री होत असल्यास याबाबतची माहिती वंदे मातरम् चांदा’ या तक्रार प्रणालीचा टोल फ्री क्रमांक 18002338691टोल फ्री क्रमांक 112 आणि चाईल्ड लाईनचा टोल फ्री क्रमांक 1098 वर तात्काळ द्यावी. माहिती देणा-या व्यक्तिचे नाव गोपनीय ठेवले जाईलअसे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

यावेळी अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा नियमित आढावापोलिस विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाईएन.डी.पी.एस. अंतर्गत अधिका-यांचे प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

०००००००