Search This Blog

Wednesday 30 November 2022

नागभीड उपविभागातील 60 शेतकऱ्यांना बारामती येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण

 

नागभीड उपविभागातील 60 शेतकऱ्यांना बारामती येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 30 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभागातर्फे पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागभीड उपविभागातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील एकूण 60 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून प्रक्षेत्र प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

           

 

दिनांक 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत बारामती येथे कृषी विज्ञान केंद्र तसेच प्रगतीशील शेतकरी यांच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान तसेच फळबाग, भाजीपाला, हरीतगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, सुगंधी व औषधी वनस्पती इत्यादीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या प्रक्षेत्र प्रशिक्षणाचा लाभ संबंधीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केला आहे.

००००००

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघ यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

            जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघ यांना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे च्या वतीने सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू (पुरुष एक व महिला एक), सर्वोत्कृष्ट गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व सर्वोत्कृष्ट गुणवंत क्रीडा संघटक असे पुरस्कार दिले जातात.

पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांनी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक राहील. क्रीडा संघटक म्हणून सतत 10 वर्ष महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले असले पाहिजे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत खेळांमध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे. तसेच अर्ज करीत असताना 16 ऑक्टोंबर 2017 च्या शासन निर्णयात नमूद जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक राहील.

सर्व पुरस्कारांमध्ये प्रत्येकी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये दहा हजार या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेले खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघ यांना दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात माननीय नामदार तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघ यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

जिल्ह्यातील 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत

 


जिल्ह्यातील 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत

चंद्रपूर, दि. 30 : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता तसेच त्यानंतर नोकरीकरिता मागास प्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष अभियान राबविण्यात येवून 7156 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विविध 139 महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे 5286 तर व्यावसायीक अभ्यासक्रमाचे 2646 असे एकूण 7932 प्रकरणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त झाले होती. त्यापैकी सुमारे 90 टक्के म्हणजे 7156 विद्यार्थ्यांचे वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहेत. यापैकी पाच हजार अर्ज हे माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत महाविद्यालय स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून निर्गमित करण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात अकरावी विज्ञान शाखेचे 8971 व बारावी विज्ञान शाखेचे 8397 विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्चनंतर पुढील व्यावसायिक शिक्षणाच्या नोंदणीकरिता जातवैधता प्रमाणपत्र लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांचे वैधता प्रमाणपत्र डिसेंबरपर्यंत निर्गमित करण्यात येतील. तसेच 11 वीच्या विद्यार्थ्यांनादेखील माहे डिसेंबरपासून वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. तरी महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून आवश्यक कागदपत्रांसह जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे लवकरात लवकर सादर करावे, असे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

००००००

अनुसूचित जाती संवर्गासाठीच्या शासकीय योजनांचा डेटाबेस तयार करणार - अमोल यावलीकर

 


अनुसूचित जाती संवर्गासाठीच्या

शासकीय योजनांचा डेटाबेस तयार करणार - अमोल यावलीकर

Ø समता पर्वनिमित्त पत्रकार कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर, दि. 30 : अनुसूचित जाती संवर्गासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. कोणत्या योजनेसाठी निकषानुसार कोण पात्र ठरू शकेल व संबंधित लाभार्थ्याच्या मागणीनुसार त्यांना योजना मंजूर करून त्याची अंमलबजावणी करता येणे शक्य व्हावे, यासाठी समाजकल्याण विभागामार्फत सर्व शासकीय योजनांचा संगणीकृत एकत्रित डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी आज पत्रकारांना दिली.

संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर) या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिनिमित्त दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व कार्यक्रमांची माहिती दिली.

सर्व शासकीय योजनांचा डाटाबेस तयार करण्याचा अशा प्रकारचा हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्याने सर्वप्रथम हाती घेतला असून हा जिल्ह्याचा अभिनव उपक्रम राहणार असल्याचे श्री. यावलीकर पुढे म्हणाले. समता पर्वनिमित्त जिल्ह्यात 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत प्रभात फेरी, संविधानासाठी चाला, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ञांकडून मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, संविधानविषयक व्याख्याने, पोस्टर व बॅनर बाबत चित्रकला स्पर्धा, अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवक यांची कार्यशाळा, युवा गटांची कार्यशाळा, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींना भेटी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी यांचेसाठी कार्यशाळा, लाभार्थींना विविध लाभाचे वाटप, जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदिवण्याचे आवाहन श्री. यावलीकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र बोरलावार, समाजकल्याण निरीक्षक मनोज माकोडे, गणेश खोटे, मंगला करमलकर, उषा मुंडे, हुजेफा शेख, उषा लोणकर, वैशाली ठाकरे, संतोष सिडावार, राहुल आकुलवार, रुपेश समर्थ तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार




 

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या

मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई / चंद्रपूर, दि. 30 :  गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  सांगितले.

सहयाद्री अतिथीगृह येथे चित्रपट उद्योगातील चित्रपट / टिव्ही / ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, कोल्हापूर चित्रनगरीचे संजय पाटील, दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक, लेखक आणि दिग्दर्शक संतोष आयाचित, निर्माते सुनील भोसले, निर्माते संदीप घुगे, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, शामाशिष भट्टाचार्य, शेमारू कंपनीचे केतन मारू, चैतन्य चिंचलीकर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचावे आणि या चित्रपट निर्मात्यांनी अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती भविष्यात करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल.

गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगावच्या चित्रनगरीत अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिका निर्मात्यांना पहिल्या वर्षी चित्रीकरण भाड्यात 50 टक्के तर दुसऱ्या वर्षी 25 टक्के सूट देण्यात येते. यापुढे मालिका पहिल्या वर्षानंतर चालू राहिल्यास त्यांना चित्रीकरण भाड्यात 25 टक्के सूट देण्यात येईल. चित्रनगरीत चित्रीकरण करण्यासाठी दर आकारण्यात येतात. हे दर किती असावे, ते कधी नेमके वाढवण्यात यावे, याबाबत धोरण ठरविण्यात येणार असल्याने श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

चित्रनगरीमध्ये एक खिडकी योजना सुरू असून यामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली जाते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटन क्षेत्रात चित्रीकरण

 

 

करावयाचे असल्यास पूर्वी 54 हजार प्रती दिवस शुल्क होते. मात्र यापुढे मराठीसाठी 30 हजार रुपये आणि अन्य भाषेसाठी 35 हजार रुपये प्रती दिवसाचे चित्रीकरण शुल्क असेल.

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा परिसर 521 एकरने व्यापलेला आहे. चित्रनगरी परिसरात एकूण 15 कलागारे असून 70 बाह्य चित्रीकरण स्थळे आहेत. आजपर्यंत चित्रनगरीत अनेक मराठी, हिंदी अन्य भाषांच्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात येत असून आजही अनेक चित्रपट, मालिका तसेच प्रसिध्द कथाबाहय कार्यक्रमांचे चित्रीकरण होत आहेत. येणाऱ्या काळात या चित्रनगरीचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत आराखडा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 65 जागांचे नूतनीकरण यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरण याबाबतही नियोजन करण्यात येत आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

बैठकीत महेश कोठारे, प्रसाद ओक, सुषमा शिरोमणी आदींनी सूचना मांडल्या. त्या सूचनांची दखल श्री. मुनगंटीवार यांनी घेतली व तशा सूचना विभागाला दिल्या.

०००००००