गुजरातमधील सिंह नोव्हेंबर अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार – वनमंत्री मुनगंटीवार
मुंबई / चंद्रपूर दि. 10 : गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दि. 26 सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर व एक मादी ) आता नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 12 हेक्टर कुंपण क्षेत्रात असून येथे 1975-1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात वाढदेखील झाली होती ; परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात 17 वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला.
दरम्यान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुजरात राज्यातील ही सिंहाची जोडी येणार असल्याने उद्यानात पर्यटकांची संख्या पुन्हा वाढण्यास मदत होईल.
०००००००
No comments:
Post a Comment