Search This Blog

Friday, 18 November 2022

शेतकऱ्यांसाठी बारामती येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा

 शेतकऱ्यांसाठी बारामती येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा

इच्छुकांकडून अर्ज आमंत्रित

चंद्रपूर,दि.18 :  शेतकऱ्यांना शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करता यावा, या उद्देशाने शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण बारामती कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात येणार  आहे. याकरिता कृषी विभागामार्फत इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत 60 शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र प्रशिक्षण पाच दिवसांकरिता आयोजित आहे. यासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

अर्जाचा विहित नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार हा फळबाग लागवड, कांदा चाळ, संरक्षित शेती, प्राथमिक प्रक्रिया आदींचा लाभ घेतलेला तसेच लाभ घेऊ इच्छित असलेला असावा. त्यासोबतच चालू आर्थिक वर्षामध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत हॉर्टनेटवर/ महाडीबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जाचा समावेश करावा.

लक्षांकाच्या मर्यादेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास विहित पद्धतीने अर्जाची सोडत काढून, ज्येष्ठता सूचीनुसार प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. महिला, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटास देखील प्राधान्य राहील.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण या बाबीसाठी खर्चाचे मापदंडानुसार प्रति शेतकरी प्रति दिन रुपये एक हजार याप्रमाणे जास्तीत जास्त 5 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य देय राहील. तसेच  स्थानिक परिस्थितीनुसार मापदंडापेक्षा जादाचा खर्च येत असल्यास आर्थिक मापदंड व्यतिरिक्त वाढीव खर्च शेतकरी हिस्सा (लोकवाटा) भरून करावा लागेल.

तरी, इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment