रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत
सहभाग नोंदवा
Ø कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
Ø ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर तर गहू व हरभरासाठी 15
डिसेंबर अंतिम मुदत
चंद्रपूर,दि.18: रब्बी हंगामात अधिसूचित क्षेत्रातील अधीसूचित
ज्वारी, गहू व हरभरा या पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे
आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सदर योजना अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित पिकांसाठी आहे. यात कर्जदार व बिगर
कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग नोंदविणे ऐच्छिक आहे. रब्बी हंगामासाठी शेतकरी हप्ता
1.5 टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारी जिरायत-5 महसुल
मंडळे, हरभरा-27 महसुल मंडळे व गहू बागायत-10 महसुल मंडळ याप्रमाणे अधिसूचित
करण्यात आलेली आहे.
योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पीक
पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक
नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबीअंतर्गत विमा संरक्षण
आहे. विमा योजनेची अंमलबजावणी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीची तर्फे
करण्यात येणार आहे.
विमा योजने अंतर्गत रब्बी ज्वारी या पिकासाठी प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम 30 हजार 500 रुपये असून शेतकऱ्यांना 457 रुपये 50 पैसे प्रतिहेक्टर पीक विमा हप्ता
भरावयाचा आहे. गहू पिकासाठी प्रतिहेक्टर विमा संरक्षित रक्कम 41 हजार रुपये असून शेतकऱ्यांना 615 रुपये प्रतिहेक्टर पिक विमा हप्ता भरावयाचा
आहे. हरभरा पिकासाठी प्रतिहेक्टर विमा संरक्षित रक्कम 39 हजार 218 असून
शेतकऱ्यांनी 588 रुपये 27 पैसे प्रतिहेक्टर पिक विमा हप्ता
भरावयाचा आहे.
पीक विम्यात
सहभाग नोंदविण्याचा अंतिम दिनांक ज्वारी पीकासाठी 30 नोव्हेंबर तर गहू व हरभरासाठी
15 डिसेंबर 2022 असा आहे. विमा योजनेत भाग घेवू इच्छिणारे शेतकरी महा ई-सेवा
केंद्र, ग्राहक सेवा केंद्र किंवा बँकेत वैयक्तिक पीकविमा भरू शकतात. शेतकऱ्यांनी विहित
मुदतील पीक विमा योजनेत सहभाग नोंदवून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बऱ्हाटे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment