शासनाच्या योजना व जनसामान्यांपर्यंत त्यांचे हक्क व कायदे पोहोचविण्याचे कार्य उत्कृष्ट - जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
Ø विधी सेवा प्राधिकरणतर्फे महाशिबिराचे आयोजन
चंद्रपूर,दि. 8 नोव्हेंबर : शासनाच्या योजना व नागरिक, महिला व बालके यांच्यासाठी असणारे कायदे, त्यांचे हक्क व कर्तव्य यांची माहिती पोहोचविण्याचे उत्कृष्ट कार्य विधी सेवा प्राधिकरणच्या महामेळाव्याच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा नियोजन भवन परिसर येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिया जनबंधू, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा या दोन बाबींवर हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. असे सांगून जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, महिला व बालकांसाठी असणारे कायदे व त्यांचे हक्क, पोस्को कायदा आदींची माहिती पोहोचविण्याचे कार्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करीत आहे. पोलीस विभागामार्फत 112 कॉल सेंटर क्रमांक कार्यान्वित आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास पोलीस प्रशासनाकडून त्वरित मदत मिळणार आहे. कृषी विभागाच्या विविध योजना असून मागेल त्याला शेततळे, शेती अवजारे, कृषी स्वावलंबन आदी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविल्या जात आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. या शिबिराच्या माध्यमातून जिल्हावासियापर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्याचे चांगले कार्य होत आहे.
जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, या महाशिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आले आहे. या स्टॉलला भेटी देऊन आपल्यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती करून घ्यावी व इतरांनाही सांगावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म म्हणाल्या, न्यायालय व यंत्रणा सर्वांसाठी आहे, परंतु काही कारणास्तव आपण यंत्रणेपर्यंत पोहोचू शकत नाही. किंवा यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सर्व यंत्रणापर्यंत आपल्याला सहजतेने पोहोचता यावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घेऊन महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात मुख्यत्वे करून संविधान व लहान मुले व महिलांसाठी असणारे कायदे, कैद्यांसाठी असणाऱ्या योजना व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी आपण न्यायालय अथवा पोलीस स्टेशनपर्यंत पोहचू शकत नाही. त्यासाठी 112 हा कॉल सेंटर क्रमांक कार्यान्वित आहे, तसेच महिलांकरिता भरोसा सेल कार्यान्वित आहे. विधी सेवा प्राधिकरण हे सर्वांसाठी 24 तास उपलब्ध असून मदतीसाठी सदैव तत्पर आहे. नागरिक कुठलीही तक्रार घेऊन विधी सेवा प्राधिकरणमध्ये येऊ शकतो. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत परितक्त्या महिला, दुर्लक्षित बालके या सर्वांपर्यंत न्यायाच्या माध्यमातून पोहोचण्याचे कार्य राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत केल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या महाशिबिरामध्ये विविध शासकीय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना व सेवा यांचे स्टॉल लावण्यात आले असून त्यामार्फत नागरिकांचे प्रबोधन केल्या जात आहे.असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिका व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते फीत कापून विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन दिवाणी न्यायाधीश आर.डी हिंगणगावकर तर आभार दिवाणी न्यायाधीश श्रीमती बेदरकर यांनी मानले.
या शिबिरास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
००००००००
No comments:
Post a Comment