Search This Blog

Friday 30 September 2022

ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर


ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर

चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतुगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षांमध्ये 15 दिवस निश्चित करून फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या 27 सप्टेंबर 2022 च्या पत्रान्वये सन 2022 या वर्षामधील ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक वापरासाठी 10 दिवस निश्चित करून राखीव ठेवण्यात आलेल्या 5 दिवसांपैकी 1 दिवस नवरात्रोत्सवाकरीता म्हणजे 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6 वाजतापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

निश्चित करण्यात आलेल्या दिवशी सक्षम अधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकचा वापर करता येईल. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

०००००००

नवरात्रोत्सवात भगर खाताना काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन


नवरात्रोत्सवात भगर खाताना काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर,दि. 30 सप्टेंबर : सणासुदीच्या दिवसात तसेच नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. उपवासाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ करून खाताना, काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहे. त्यामुळे भगर खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. भगर हा भरड धान्याचा एक प्रकार आहे. भगर तयार करण्यासाठी प्रामुख्याने वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्याचा वापर केला जातो. भगर तयार करण्यासाठी उपयोगात आणलेल्या धान्यावरून भगरचे प्रकार पडतात. यात वरई भगर, सावा भगर, बर्टी भगर व कोद्रा भगर यांचा समावेश आहे. वरई भगर सर्वात उच्च प्रतीची तर कोद्रा भगर सर्वात हलक्या प्रतीची समजली जाते. भगरीमुळे कार्बोहायड्रेट आदी तंतुमय पदार्थ मिळतात, जे आरोग्यदायी असतात.

भगरीचे ग्लायकोमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह रुग्णांसाठी भगर हा उत्तम आहार आहे. अशी सत्वगुणी भगर आरोग्याला अपायकारक का ठरते आहे, या प्रकाराचा अन्न व औषध प्रशासनाने अभ्यास केला असून भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्पारीगिल्स प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. त्यामुळे भगरीचे पीठ विकत आणू नये.

भगर खरेदी करतांना अशी घ्या काळजी :

भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक अथवा नोंदणीधारक व्यक्तींकडूनच खरेदी करावी. भगर किंवा उपवासाचे पदार्थ पॅकबंद असलेलेच विकत घ्यावे. भगरीच्या पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावे. पॅकेटवर प्रक्रिया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील असतो, तो नीट पाहून घ्यावा. त्याशिवाय बेस्ट बिफोर डेट म्हणजे भगरीची अंतिम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते तेही तपासून आणि खात्री करूनच खरेदी करावी. भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून किंवा हात गाडीवरून विकत घेऊ नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून आणि नंतर स्वच्छ धुऊन घ्यावी, त्यानंतरच घरगुती पद्धतीने पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडून पक्के खरेदी बिल घ्यावे. सकाळी बनविलेली भगर संध्याकाळी किंवा शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करण्यात येऊ नये. भगर आणि इतर उपवासाचे पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत, आणि ते करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. 25 ते 32 सेल्सिअस तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते.

अन्नपदार्थाच्या दर्जाविषयी कोणतीही माहिती, तक्रार व सूचना असल्यास एफ.डी.ए.च्या 1800222365 या हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अन्न व्यवसायिकांनी तसेच ग्राहकांनी याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नि.दि. मोहिते यांनी केले आहे.

००००००

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा




पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

Ø 108 उमेदवारांपैकी 64 उमेदवारांची प्राथमिक निवड

 

चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 सप्टेंबर रोजी डॉ. आंबेडकर महाविद्यालय येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर, प्राध्यापक सतीश पेटकर , किशोर महाजन , प्राध्यापक श्री. चिमुरकर तसेच कौशल्य विकास विभागाचे शैलेश भगत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दहेगांवकर याच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन पार पडले. त्यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्याना कमवा आणि शिका असा कानमंत्र दिला. विद्यार्थ्यानी शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासावर भर द्यावा आणि मिळेल तो रोजगार करून आपला शालेय  खर्च स्वत: करावा, असे यावेळी सांगितले. भैय्याजी येरमे यांनी विद्यार्थ्यानी स्वत:मधील कौशल्य ओळखून रोजगाराच्या संधीसाठी प्रयत्न करावे. तसेच विद्यार्थ्यांनी मनामध्ये कसलाही संकोच न ठेवता मिळेल ते काम करून आपण कार्यक्षम असल्याचे सिद्ध करावे, विद्यार्थ्याने फक्त नोकरीवर अवलंबुन न राहता स्वयंरोजगाराकडे लक्ष केंद्रित करावे, असे मार्गदर्शन केले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या समन्वयक अमरिन पठाण यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमामध्ये स्थानिक तसेच बाहेर जिल्ह्यातील नामांकित कंपन्या उपस्थित होत्या. या सर्व उद्योजकांनी आपल्या कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 108 उमेदवारांनी आपला बायोडाटा संबंधित कंपनीला दिला असून त्यापैकी 64 उमेदवारांची प्राथमिक निवड झाल्याचे उद्योजकांनी कळविले आहे. अंतिम निवडीसाठी उमेदवारांना कंपनी बोलविणार असल्याचे सांगितले.

            कार्यक्रमाचे संचालन प्रा. चिमुरकर यांनी तर आभार प्रा. पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी व डॉ.आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.

०००००००

3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. तदनंतरच तक्रार अर्ज स्वि कारण्यात येईल, तसेच निवेदन स्विकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील. या लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानातंर्गत कार्यशाळा


माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानातंर्गत कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून नवरात्र उत्सवादरम्यान 26 सप्टेंबर ते  5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था,(मुलींची) चंद्रपूर,येथे विविध व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीकरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यशाळेमध्ये महिलांचे मानसिक विकार व विकास, तणावमुक्त जीवन याबाबत माहिती देऊन त्यावरील उपचार पद्धती तसेच व्यसनमुक्ती, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखुजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, कॅन्सर, आदी रोगाबद्दल माहिती देऊन तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेची कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), चंद्रपूर येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

००००००

महाविद्यालयास देय शिक्षण शुल्काची रक्कम जमा करण्याचे आवाहन


महाविद्यालयास देय शिक्षण शुल्काची रक्कम जमा करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 30 सप्टेंबर : जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालयास देय असलेली शिक्षण शुल्काची 60 टक्के रक्कम 7 दिवसाच्या आत महाविद्यालयाकडे जमा करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2020-21 ते 2025-26 या कालावधीकरीता माहे मार्च 2021 पासून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून सुधारित निधी वितरण कार्यपद्धती राज्यभरात अवलंब करावयाची आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत मंजूर झाल्यानंतर त्या शैक्षणिक वर्षाची अनुज्ञेय शिष्यवृत्ती रक्कम केंद्र शासनाच्या 60 टक्के हिश्याचे वितरण महाडीबीटी प्रणालीवर निश्चित करण्यात येते.

ही मंजूर करण्यात आलेली संपूर्ण शिष्यवृत्तीची रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर ना परतावा शुल्क आदी) तसेच विद्यार्थ्याला देय असणारा भाग (निर्वाहभत्ता) या दोन्ही भागांच्या एकत्रित रकमेचा केंद्र हिस्सा 60 टक्के या प्रमाणात लाभाची रक्कम केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये निश्चित करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेला केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत केलेल्या अर्जानुसार त्यांच्या आधार संलग्निकृत बँक खात्यामध्ये थेट केंद्र शासनामार्फत डीबीटी तत्त्वावर वितरित करण्यात आला आहे.

०००००००

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि.30 सप्टेंबर : आदिवासी विकास विभागामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ दि. 21 सप्टेंबर 2022 पासून सुरू करण्यात आले आहे.

सन 2022-23 या वर्षाकरीता अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रतिपूर्ती या योजनेचा लाभ घेता यावा, याकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून सदर संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच संबंधित महाविद्यालयांनी महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे महाडीबीटी या संकेतस्थळावर परिपूर्ण ऑनलाईन अर्ज भरून कार्यालयास सादर करावे.

तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 या वर्षातील ज्या महाविद्यालय स्तरावर महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज प्रलंबित आहेत, अशा महाविद्यालयांनी तात्काळ अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करावी. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी ही संबधित महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.

०००००

आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर


आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर

Ø समाजकल्याण विभागाचा उपक्रम

चंद्रपूर, दि.30 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात व समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांच्यावतीने राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत आर्वी येथे भव्य आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

नागरिकांचे आरोग्य, त्यांच्या असणाऱ्या आरोग्याच्या समस्या, त्यांचे निदान व्हावे व मोफत औषधोपचार मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला क्राइस्ट हॉस्पिटल, चंद्रपूर येथील डॉ. मंगेश चांदेकर, डॉ. मृण्मयी कोरेवार व त्यांची संपूर्ण टीम तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजुरा येथील गृहपाल श्री. धोडरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी नागरीकांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, गावातील सरपंच व उपसरपंच यांचे सहकार्य लाभले.

००००००००

Thursday 29 September 2022

अवैध दारु विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 


अवैध दारु विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Ø 24 गुन्ह्यांची नोंद ; 1 लक्ष 7 हजारांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यात भद्रावती, चिमूर, चंद्रपूर, सावली, नागभीड, गडचांदूर, सिंदेवाही, वरोरा, बल्लारपूर, ब्रम्हपूरी, राजुरा या तालुक्यात सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व जवान तसेच नागपूर जिल्ह्यातील भरारी पथकाच्या मदतीने एकूण 24 गुन्हे नोंदविण्यात आले. यात 16 आरोपींविरुध्द गुन्हे नोंदवून एकूण 1 लक्ष 7 हजार 36 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांच्या आदेशान्वये तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरचे निरीक्षक एम.एस.पाटील, वरोराचे निरीक्षक विकास थोरात, इश्वर वाघ, दुय्यम निरीक्षक श्री. खांदवे, श्री. आक्केवार, अमित क्षीरसागर, श्री. लिचडे, जगदीश पवार, मोनाली कुरुडकर यांनी पार पाडली.

०००००००

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा दौरा

 


सुधारीत दौरा :

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यांचा चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण. सायं. 6.15 वाजता चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव व मुक्काम. शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता माता महाकाली महोत्सवाचे उद्घाटन, सकाळी 10 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिका-यांसोबत बैठक, 11.45 वाजता पदाधिका-यांसोबत बैठक, दुपारी 1.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती, 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, 4.45 वाजता पडोली येथे गुरु तेजबहादुर साहेब गुरुद्वाराला सदिच्छा भेट, सायंकाळी 5 वाजता यवतमाळकडे प्रयाण.

०००००००

पोषण अभियान अंतर्गत मोरवा येथे ‘स्वस्थ बालक बालिका’ स्पर्धा

 


पोषण अभियान अंतर्गत मोरवा येथे ‘स्वस्थ बालक बालिका’ स्पर्धा

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते चिमुकल्यांना बक्षीस वितरण

            चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : पोषण अभियान 2022 अंतर्गत ग्रामपंचायत मोरवा  येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चंद्रपूरतर्फे स्वस्थ बालक बालिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हानेअध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी आरती जगताप, उमेदचे  मनोहर वाकडे,  मोरवाचे  सरपंच  स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदुरकर आदी उपस्थित होते.           

 चंद्रपूर तालुक्यामध्ये पोषण अभियानाअंतर्गत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत समाजामध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. व्यापक प्रमाणात कार्यक्रम घेतल्यामुळे पोषण अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. मातांना बालकांच्या पोषणाविषयी सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी चंद्रपूर प्रकल्पाने प्रत्येक अंगणवाडीत  स्वस्थ  बालक बालिका स्पर्धा आयोजित केली. 6 महिने ते 3 वर्षे आणि 3 ते 5 वर्ष या वयोगटातील स्वस्थ बालक बालिकांची  निवड करून त्यांचा अंगणवाडी केंद्रामध्ये सत्कार करून पारितोषिक देण्यात आले .

            त्यापैकी पाच बालकांची निवड प्रकल्प स्तरावर करण्यात आली. मोरवा येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धे आर्या प्रवीण घिवे, रुद्र संतोष कांबळे, वैष्णवी भास्कर तोडासे, तनुजा गौतम जाधव,  संस्कार मनोज तुरकर या बालकांची स्वस्थ बालक- बालिका  म्हणून निवड करण्यात आली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच पोषण अभियानांतर्गत नागरिकांना पोषणाचे महत्त्व कळावे याकरिता अंगणवाडी सेविका व उमेदच्या कार्यकर्त्यांमार्फत पोषण आहाराची प्रदर्शनी लावण्यात आली. प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम शिंदे यांनी केले. संचालन पर्यवेक्षिका सुजाता रामटेके यांनी तर आभार  बालविकास प्रकल्प अधिकारी  आरती जगताप यांनी मानले. यावेळी शीतल देरकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुजाता कातकर, मीना भगत,  सुनिता सोयाम, दीपा हमंद ,शीतल भुमर, शिल्पा कुंभलकर, प्रेषित माणूसमारे,  लक्ष्मीकांत जांबुळे यांच्यासह एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते.

००००००

समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

             चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वागीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्फत राबविण्यात येतात.

           सदर समान व असमान निधी योजनाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध download करुन घ्यावा.

           सन 2022-23 साठीच्या समान निधी योजना पुढील प्रमाणे : इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना, उपरोक्त योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेतर्गत इतर योजनाचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करू नयेत.

          सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजना पुढील प्रमाणे : ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना ग्रंथ,साधन सामग्री,फर्निचर,इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य,राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य,महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.

योजनेसाठी करावयाचा अर्ज :

           वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिन्दी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि.28 ऑक्टोबर, 2022 पर्यत पोहचतील, अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन शालिनी इंगोले, प्र.ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.

००००००००

राजुरा, पोंभुर्णा, वरोरा येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

 



राजुरा, पोंभुर्णा, वरोरा येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

            चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : विद्याथ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापकीय, कायदेविषयक इत्यादी अभ्यासक्रमासाठी मागास प्रवर्गाच्या प्रवेशाकरीता वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. अशा विद्यार्थ्यांची ऐन प्रवेशाच्या वेळी अडचण होऊ नये अथवा जात वैधता प्रमाणपत्राअभावी  प्रवेश रद्द होऊ नये, याकरीता सदरील अभ्यासक्रमाचे प्रवेशापूर्वीच म्हणजेच विज्ञान शाखेतील 12 वीत असणाऱ्या उमेदवारांचे प्रस्ताव चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून स्वीकारल्या जात आहेत. या करीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी  समिती उपायुक्त विजय वाकुलकर स्वत : जिल्हयातील विवध तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेवून मार्गदर्शन करीत आहेत.

जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज करतांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागतो. त्यासोबत जातीदावा सिध्द करणारे सर्व मूळ पुरावे अपलोड करावे लागतात. याकरीता बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण निर्माण  होते व विद्यार्थी अपूर्ण आणि त्रुटी  असलेले अर्ज समितीकडे सादर करतात. त्यामुळे  विद्यार्थ्यांना त्रुटीपुर्ततेकरीता  समितीकडे  पुन्हा यावे लागते. पर्यायाने  विद्यार्थ्यांचा नाहक वेळ तर जातोच पण त्यांना आर्थिक नुकसानही होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचे परिपूर्ण अर्ज समितीकडे सादर होईल व विद्यार्थ्यांना कमी वेळेत वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करता येईल, ही बाब उपायुक्त विजय वाकुलकर यांनी आयोजित शिबिरामध्ये सांगितली.

सदर शिबिर राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालय, पोंभुर्णा येथील चिंतामणी महाविद्यालय आणि आनंदवन वरोरा येथील विद्यानिकेतन  महाविद्यालय येथे घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, लिपीक तसेच 12 विज्ञान शाखेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शिबिराकरीता विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद असून मोठ्या  संख्येने विद्यार्थी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे  सादर करीत असल्याचे श्री. वाकुलकर यांनी कळविले आहे.

०००००००

सामा‍जिक न्याय भवन येथे शिष्यवृत्तीबाबत जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांची आढावा बैठक

 

सामा‍जिक न्याय भवन येथे शिष्यवृत्तीबाबत जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांची आढावा बैठक

चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चंद्रपूर येथे सहाय्यक आयक्त, समाजकल्याण अमोल यावलीकर यांच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त चंद्रपूर जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्यांची शैक्षणीक सत्र २०२२-२३ बाबत भारत सरकार शिष्यवृत्तीची  आढावा बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत चंद्रपूर  जिल्हयातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य आणि सबंधित कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील शिष्यवृत्तीसबंधी अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीत या कार्यालयातील सहाय्‍यक लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार, समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे, श्री. बन्सोड, श्री. कांबळे उपस्थित होते.

०००००००

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय  माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरीता जिल्हा क्रीडा संकुल येथे सरावाकरीता येणारे खेळाडू, स्वास्थ लाभाकरीता येणारे नागरीक यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.

 आंतरराष्ट्रीय  माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी उपस्थित सर्व खेळाडू व नागरिकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, माहिती अधिकाराचा वापर समाजामध्ये कार्यालयीन कामकाजाविषयी पारदर्शकता कशी निर्माण करता येईल, याबाबत होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे माहिती अधिकाराचा वापर घटनात्मक पध्दतीने करून समाज प्रबोधनाविषयी समाजात जनजागृती करण्याबाबत त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.बी. वडते यांनी केले तर संचालन क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले. यावेळी क्रीडा मार्गदर्श्क विजय डोबाळे, संदिप उईके, वरिष्ठ लिपीक प्रविण देसाई, खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राचे रोशन भुजाडे उपस्थित होते.

०००००००

Wednesday 28 September 2022

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड 30 सप्टें व 1 ऑक्टो. रोजी चंद्रपूर जिल्ह्यात

 


अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड 30 सप्टें व 1 ऑक्टो. रोजी चंद्रपूर जिल्ह्यात

चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव व मुक्काम. शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता माता महाकाली महोत्सवाचे उद्घाटन, सकाळी 10 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिका-यांसोबत बैठक, 11.45 वाजता पदाधिका-यांसोबत बैठक, दुपारी 1.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती, 4 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, 4.45 वाजता पडोली येथे गुरु तेजबहादुर साहेब गुरुद्वाराला सदिच्छा भेट, सायंकाळी 5.45 वाजता यवतमाळकडे प्रयाण.

०००००००

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ईआर-1 मध्ये सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत


मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ईआर-1 मध्ये सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत

           चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस भरणे आवश्यक आहे. विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahawayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सदर माहिती सादर करणे बंधनकारक असून अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत आहे.

           सप्टेबर 2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय भवन,पहिला माळा,हॉल क्र.5/6 चंद्रपूर या कार्यालयाद्वारे ऑनलॉइन पध्दतीने दि.1 ऑक्टोबर 2022 पासून सुरु होत आहे. तरी चंद्रपूर जिल्हयातील सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेतच. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.rojgar.mahawayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

            सदरील सप्टेंबर 2022 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे, याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. हे तिमाही‍ विवरण विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. तद्वतच प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील Employer Profile  देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ  अद्यावत करावा, असे आवाहन भैय्याजी येरमे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी केले आहे.

           यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com यावर तसचे दुरध्वनी क.07172-252295 वर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधावा, असेही कौशल्य विभागाने कळविले आहे.

०००००००