लंम्पी स्किन डिसीज :
बाधित गावातील व 5 किमी सतर्कता क्षेत्रातील
71,098 जनावरांचे लसीकरण
Ø बाधित 97 पैकी 77 जनावरे रोगमुक्त
चंद्रपूर, दि. 26 सप्टेंबर : महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यात व चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत गोवंशीय जनावरांवर लंम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव निदर्शनास आला आहे. सदर रोग हा विषाणूजन्य असून जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मी.मी. व्यासाच्या गाठी, भरपूर ताप, डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव, चारापाणी कमी खाणे, दूध उत्पादनात घट अशी लक्षणे दिसतात.
प्राण्यांमधील संक्रमण आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये लंम्पी त्वचा रोगाच्या प्रादुर्भावाची माहिती पशुपालक, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस व जिल्हा प्रशासनास देणे बंधनकारक आहे. सदर आजार गोवंशीय जनावरांमध्ये झपाट्याने पसरणारा आहे.
सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात सात तालुक्यातील 17 गावे बाधित झालेली असून वरोरा, भद्रावती, सावली, राजुरा, जिवती, कोरपना व चंद्रपूर तालुका अंतर्भूत आहे. बाधित जनावरे सोडून बाधित गावातील व 5 किलोमीटर त्रिज्येतील गावातील 71 हजार 98 जनावरांचे लसीकरण दि. 25 सप्टेंबर 2022 नि:शुल्क करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्याला एकूण 1 लक्ष 20 हजार लसमात्रा प्राप्त झाल्या असून दि.27 सप्टेंबर रोजी 1 लक्ष 75 हजार लसमात्रा प्राप्त होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण गायवर्गीय पशुधन 3 लक्ष 95 हजार 526 असून पुढील आठवड्यापर्यंत 75 टक्के जनावरांना लसीकरण पूर्ण करण्यात येईल. बाधित जनावरांची संख्या 97 असून, 77 जनावरे रोगमुक्त झाली आहे. व उर्वरित 20 जनावरांचे उपचार पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत सुरू आहे. औषध साठा उपचारासाठी पशुवैद्यकीय संस्थेत उपलब्ध आहे.
लंम्पी त्वचारोग हा औषधोपचाराने निश्चित बरा होत असून आजारी जनावरांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत बाधित व सतर्कता क्षेत्रात मोफत लसीकरण व आजारी जनावरांना मोफत औषधोपचार शेतकऱ्यांच्या दारात करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत जनावरे व गोठ्याची फवारणी प्रतिबंधक उपाय म्हणून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यासोबत संपर्क करावा.
पशुसंवर्धन विभाग व जिल्हा यंत्रणेकडून सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज आहे. आजारी जनावरे औषधोपचार करून निश्चित बरे होतात. सदर रोग हा प्राण्यांमधून मनुष्याला संक्रमित होत नसल्यामुळे जनावरांचे दूध सेवनासाठी सुरक्षित आहे. तरी, पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांमध्ये लंम्पी स्कीन डिसीज आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेसोबत संपर्क साधावा. किंवा 18002330418 अथवा 1962 या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ कळवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment