Search This Blog

Wednesday 21 September 2022

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

 


ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

चंद्रपूर, दि. 21 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता  शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाखापर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरित केला जाईल. राज्यातंर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 10 लक्ष तर परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लक्षपर्यंत राहील.

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती:

 अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इ.मा.व. प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लाखपर्यंत असावी. अर्जदार इयत्ता 12वीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यताप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश असेल. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर 0,-1 (यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा जास्त असावा. महामंडळ केवळ बँकेकडून वितरित केलेल्या रकमेवरील जास्तीत जास्त 12% पर्यंत रकमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना करेल.

अर्जदाराने इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधारकार्ड, ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो, अर्जदाराचा जन्माचा व वयाचा दाखला, शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र, शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क माफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, व मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा तसेच आधार संलग्न बँकखाते पुरावा आदी कागदपत्रे कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावी.

इच्छुक अर्जदाराने महामंडळाच्या वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक राहील. अर्जाची तपासणी करून ऑनलाईन पात्रता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल. महामंडळाने निर्गमित केलेले पात्रता प्रमाणपत्र व ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत अर्जदारास बँकेकडे सादर करावी लागेल. बँकेचे कर्जमंजुरी पत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे. शैक्षणिक कर्जाची दरमहा नियमित परतफेड आवश्यक आहे. व्याज परतावा मागणीसाठी कर्जदाराने दरमहा बँक कर्ज खाते उतारा संगणक प्रणालीवर/वेबपोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील. अर्जदाराने थकीत रकमेचा भरणा केल्यास अर्जदारास लगतच्या परतफेड केलेल्या व्याजाच्या हप्त्याचा परतावा देय राहील.

शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्त्यांमधील व्याज रकमेचा परतावा महामंडळ अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करेल. व्याज परताव्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दिपाली मांजरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment