राजुरा, पोंभुर्णा, वरोरा येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर
चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : विद्याथ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापकीय, कायदेविषयक इत्यादी अभ्यासक्रमासाठी मागास प्रवर्गाच्या प्रवेशाकरीता वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. अशा विद्यार्थ्यांची ऐन प्रवेशाच्या वेळी अडचण होऊ नये अथवा जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेश रद्द होऊ नये, याकरीता सदरील अभ्यासक्रमाचे प्रवेशापूर्वीच म्हणजेच विज्ञान शाखेतील 12 वीत असणाऱ्या उमेदवारांचे प्रस्ताव चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून स्वीकारल्या जात आहेत. या करीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त विजय वाकुलकर स्वत : जिल्हयातील विवध तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेवून मार्गदर्शन करीत आहेत.
जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज करतांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागतो. त्यासोबत जातीदावा सिध्द करणारे सर्व मूळ पुरावे अपलोड करावे लागतात. याकरीता बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते व विद्यार्थी अपूर्ण आणि त्रुटी असलेले अर्ज समितीकडे सादर करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रुटीपुर्ततेकरीता समितीकडे पुन्हा यावे लागते. पर्यायाने विद्यार्थ्यांचा नाहक वेळ तर जातोच पण त्यांना आर्थिक नुकसानही होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचे परिपूर्ण अर्ज समितीकडे सादर होईल व विद्यार्थ्यांना कमी वेळेत वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करता येईल, ही बाब उपायुक्त विजय वाकुलकर यांनी आयोजित शिबिरामध्ये सांगितली.
सदर शिबिर राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालय, पोंभुर्णा येथील चिंतामणी महाविद्यालय आणि आनंदवन वरोरा येथील विद्यानिकेतन महाविद्यालय येथे घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, लिपीक तसेच 12 विज्ञान शाखेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शिबिराकरीता विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद असून मोठ्या संख्येने विद्यार्थी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे सादर करीत असल्याचे श्री. वाकुलकर यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment