Search This Blog

Thursday 29 February 2024

‘वंदे मातरम् चांदा’ कॉल सेंटरवरील प्राप्त तक्रारींचा आढावा



 

‘वंदे मातरम् चांदा’ कॉल सेंटरवरील प्राप्त तक्रारींचा आढावा

Ø जिल्हाधिका-यांनी दिली सेंटरला भेट

चंद्रपूरदि. 29 :  नागरिकांच्या समस्या व तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी तसेच शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली आले आहेत. तुकूम येथे स्थित तक्रार निवारण प्रणालीच्या कॉल सेंटरला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवारतहसीलदार विजय पवारतांत्रिक सहाय्यक अनुराग गयनेवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेकॉल सेंटरला आतापर्यंत प्राप्त तक्रारीची यादी अद्ययावत ठेवावी. तक्रारीचा विषय व सदर तक्रार कोणत्या विभागाशी संबंधित आहेयाबाबत माहिती उपलब्ध ठेवावी तसेच दैनंदिन तक्रारीची नोंद ठेवावी. ज्या तक्रारकर्त्याचे प्रश्न प्रलंबित असतात व लवकर सुटत नाही, अशा तक्रारीबाबत  प्रशासनाला कळवावे, अशा सूचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी श्री.गौडा यांनी आतापर्यंत प्राप्त  तक्रारीनिराकरण करण्यात आलेल्या तक्रारीप्रलंबित तक्रारी तसेच कॉल सेंटरमधील कार्यरत चमुदैनंदिन येणारे कॉलयाबाबत माहिती जाणून घेतली.

आतापर्यंत 710 तक्रारींचे निराकरण : ‘वंदे मातरम् चांदा’ या तक्रार निवारण प्रणालीवर आजपर्यंत 1038 तक्रारी प्राप्त झाल्या असून 710 तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी प्रक्रियेमध्ये आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी स्वतः कॉल सेंटरच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून तपासणी केली. तसेच आतापर्यंत आलेल्या विविध तक्रारी जाणून घेतल्या.

अशी नोंदवा तक्रार : तक्रार नोंदवण्यासाठी 1800-233-8691 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सदर टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल. टोल फ्री क्रमांकावरील प्राप्त तक्रारी vandemataramchanda.in या संकेतस्थळावर नोंदविली जाईल व संबंधित विभागास पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात येईल.

००००००

आजपासून तीन दिवस चंद्रपुरात ताडोबा महोत्सव

 



आजपासून तीन दिवस चंद्रपुरात ताडोबा महोत्सव

Ø परिसंवाद, चर्चासत्रासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी

चंद्रपूरदि. 29 :  जगप्रसिध्द ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयेाजन करण्यात आले आहे. 200 पेक्षा जास्त अधिवास असलेल्या आणि वाघांची भूमी म्हणून प्रसिध्द असलेल्या चंद्रपूरमधील विविध ठिकाणी हा भव्य महोत्सव होणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 1 मार्च रोजी विविध सत्रे आणि प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. सुरवातीला वन अकादमी येथे सकाळी 11 वाजता ग्रामविकास समितीचे सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांच्यासोबत मानव – वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याबाबत चर्चा आणि निसर्ग  प्रश्नमंजुषा आयोजित आहे.  तसेच सायंकाळी 5 वाजता चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांचा सँड आर्ट शो आणि श्रेया घोषाल यांची लाईव्ह संगीत संध्या कार्यक्रम होणार आहे.

2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता रामबाग कॉलनी, चंद्रपूर येथे रोपट्यांपासून जगातील सर्वात मोठी शब्दरचना ‘भारतमाता’ लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 12 वाजतापासून वन अकादमी येथे विविध चर्चासत्राचे आयेाजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे प्रसिध्द कवी कुमार विश्वास यांचे कविसंमेलन आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांचे संगीतसंध्या कार्यक्रम होणार आहे.

3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता वन अकादमी येथे सी.एस.आर. परिषद – सहयोगातून संवर्धन तर सायंकाळी 5 वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे समारोपीय कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र वनभुषण पुरस्कार व इतर पुरस्कार सोहळा आणि प्रसिध्द अभिनेत्री हेमामालिनी आणि त्यांच्या संचातर्फे भारतातील नद्यांवर आधारीत ‘गंगा बॅलेट’ या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे.

०००००००

तेलंगणातील वनपरिक्षेत्र अधिका-यांची वन अकादमीला भेट


 

तेलंगणातील वनपरिक्षेत्र अधिका-यांची वन अकादमीला भेट

चंद्रपूरदि. 29 :  तेलंगणा येथील दुलापल्ली वन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या 8 महिला व 27 पुरुष असे एकूण 35 वनपरिक्षेत्र प्रशिक्षणार्थी अधिका-यांनी वन अकादमी, चंद्रपूर येथे भेट दिली. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून सदर प्रशिक्षणार्थी अधिकारी 28 फेब्रुवारी रोजी वन अकादमीमध्ये दाखल झाले होते.

यावेळी वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी तेलंगणा येथील वनपरिक्षेत्र प्रशिक्षणार्थी अधिका-यांना महाराष्ट्रातील वन आणि वन्यजीव व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के पर्यंत जंगल आणि वृच्छादन वाढविण्यासंदर्भात राष्ट्रीय लक्ष गाठण्याचे आवाहन केले.

००००००

ताडोबा महोत्सव दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

 

ताडोबा महोत्सव दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Ø नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 : शहरात दि. 1 ते 3 मार्च 2024 पर्यंत ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये चांदा क्लब ग्राऊंड येथे 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाकरीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपयोजना व नियमनासाठी, चंद्रपूर मार्गावर वाहतूक सुरळीत चालावी. वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास तसेच गैरसोय होऊ नये. याकरीता वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याबाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.

दि. 1 ते 3 मार्च 2024 पर्यंत दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरोरा नाका ते मित्र नगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाकापर्यंतचा मार्ग हा ताडोबा महोत्सवाकरीता येणाऱ्या वाहनाखेरीज इतर सर्व प्रकारच्या वाहनाकरीता बंद राहील. तसेच सदर मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.

वाहतूकदारांनी या पर्यायी मार्गाचा करावा अवलंब:

सदर कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका- उड्डाणपूल- सिद्धार्थ हॉटेल- बस स्टॅन्ड-प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे जिल्हा स्टेडियम-मित्र नगर चौक-संत केवलराम चौक मार्गे शहरात प्रवेश करतील. सदर कालावधीत शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट-प्रियदर्शनी चौक-बस स्टँड चौक-सिद्धार्थ हॉटेल-उड्डाणपूल-वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक-मित्र नगर चौक- जिल्हा स्टेडियम-जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे बाहेर जातील.

 या ठिकाणी असेल पार्किंग व्यवस्था : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चांदा क्लब समोरील न्यू इंग्लिश/दरगाह मैदान, चांदाक्लब समोरील चर्च मैदान(फक्त दुचाकी वाहनांकरिता) तसेच कृषी भवन जवळील मैदान/ट्रॅव्हल्स स्टॅन्ड या नियोजित ठिकाणी पार्क करावीत.

नागरिकांनी सदर अधिसूचनेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

०००००

अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती

 

अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती

Ø 28 मार्च ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अतिंम मुदत   

चंद्रपूर, दि.29 : शैक्षणिक सत्र 2023-24 करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरीता शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2024 पर्यंत असणार आहे.

चिमूर, प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या महाविद्यालयामध्ये चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, वरोरा व भद्रावती या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांनी आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना त्यांचे आधार कार्ड अपडेट असावे. आधार बँक किंवा पोस्ट यांच्याशी लिंक असावेत. शासकीय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांनी वसतीगृह विद्यार्थी अशी नोंद शिष्यवृत्तीच्या आवेदन पत्रात करावी. अर्ज भरताना काही अडचण उद्भवल्यास चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2024 पर्यंत देण्यात आली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. तसेच महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती अर्ज त्वरित निकाली काढण्याची कार्यवाही करावी, असे चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी कळविले आहे.

००००००

दुर्मिळ आजार असणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांसाठी हिमोफिलिया डे-केअर सेंटर कार्यान्वित

 

दुर्मिळ आजार असणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांसाठी हिमोफिलिया डे-केअर सेंटर कार्यान्वित

Ø आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर, दि.29 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील हिमोफिलिया डे केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात करण्यात आले.

हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी अपर मुख्य सचिव दीपक मैसेकर, आयुक्त धीरजकुमार तसेच संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार हिमोफिलिया डे केअर सेंटरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय राठोड, माया आत्राम, अधिपरिचारिका सपना बावणे, विकास वाढई, दीपक डंबारे उपस्थित होते.

हिमोफिलिया रुग्णांस वर्षातून 10 ते 12 वेळा रक्तस्त्राव होण्याची संभावना असते व त्याकरीता फॅक्टर 7, फॅक्टर 8(अ) व फॅक्टर 9(ब) रुग्णास आवश्यकता असते. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 28 रुग्णांची नोंद झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हिमोफिलिया रुग्णास आवश्यकता असणाऱ्या घटकांचा तुटवडा पडू न देण्याचा मानस आहे, असे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यावेळी म्हणाले. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णांना अत्यावश्यक वेळी इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नसावी, याकरीता हिमोफिलिया सेंटर प्रत्येक जिल्ह्यात स्थापित केले आहे. यामध्ये प्रत्येक फॅक्टरची उपलब्धता असेल. पूर्वी या सुविधेचा लाभ घेण्यास रुग्णांना नागपूर येथे जावे लागत होते. मात्र, आता ही सुविधा चंद्रपूरमध्येच उपलब्ध झाली आहे. याचा उद्देश म्हणजे समुदायातील हिमोफिलिया असलेल्या व्यक्तींसाठी विशेष काळजी आणि समर्थन प्रदान करणे आहे. हा उपक्रम दुर्मिळ रक्तस्त्राव विकार आणि प्रभावित झालेल्या लोकांसाठी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी समर्पित आहे.

हिमोफिलिया रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा :

वैद्यकीय सेवा : हिमोफिलिया व्यवस्थापनामध्ये अनुभवी आरोग्य सेवा व्यावसायिक निदान, उपचार आणि देखरेख यासह सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणे.

शिक्षण आणि समुपदेशन : रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हिमोफिलियाची समज वाढविण्यासाठी तसेच परिस्थिती प्रभावीपणे हातळून त्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षण व समुपदेशन सेवा प्रदान करण्यात येते.

पोषक वातावरण : हिमोफिलिया केंद्रामध्ये एक पोषक वातावरण असेल जिथे रुग्ण इतर हिमोफिलिया रुग्णांशी संपर्क साधून आपला अनुभव शेअर करू शकेल.

आपत्कालीन प्रतिसाद : अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह सुसज्ज, केंद्र आपत्कालीन परिस्थिती त्वरित आणि कार्यक्षमतेने हाताळणे.

हिमोफिलिया डे केअर सेंटर मधील सुविधेचा लाभ घेण्याकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय राठोड 8830875244 व अधिपरिचारिका सपना बावणे 7387714867 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी हिमोफिलिया डे केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

००००००

महाराष्ट्राची व्याघ्रभुमी चंद्रपूर येथे 1 ते 3 मार्च 2024, चांदा क्लब ग्राऊंडवर, ताडोबा_महोत्सव....

 महाराष्ट्राची व्याघ्रभुमी चंद्रपूर येथे  1 ते 3 मार्च 2024, चांदा क्लब ग्राऊंडवर, #ताडोबा_महोत्सव....



महाराष्ट्राची व्याघ्रभुमी चंद्रपूर येथे 1 ते 3 मार्च 2024, चांदा क्लब ग्राऊंडवर, ताडोबा महोत्सव....

 महाराष्ट्राची व्याघ्रभुमी चंद्रपूर येथे  1 ते 3 मार्च 2024, चांदा क्लब ग्राऊंडवर, ताडोबा महोत्सव....



Wednesday 28 February 2024

जिल्हयात 1 लक्ष 55 हजार 435 बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट

 



जिल्हयात 1 लक्ष 55 हजार 435 बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट

Ø 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 28 :  ‘ दोन थेंब प्रत्येकवेळी....पोलिओ वर विजय दरवेळी’ या संकल्पनेनुसार रविवार दि. 3 मार्च रोजी पल्स पोलिओ मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील 1 लक्ष 55 हजार 435 बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.28) आढावा बैठक घेतली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हिलन्स मेडीकल ऑफिसर डॉ. साजिद, जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिचारिका सुरेखा सुपराळे, सुरेखा ठाकरे आणि भावना सोंडवल आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, पल्स पोलिओ लसीकरणापासून 0 ते 5 वयोगटातील एकही बालक वंचित राहता कामा नये. बाहेरून स्थलांतरीत झालेले नागरिक किंवा वस्त्यांवर विशेष लक्ष द्यावे. जेथे लसीकरण कमी होते, अशा ठिकाणांना आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करावी. तालुकास्तरावरही कार्यालय प्रमुखांनी लसीकरण मोहिमेबाबत बैठक घेऊन योग्य नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. 

भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, याकरीता यावर्षीसुध्दा शासनातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची एकच फेरी दिनांक 3 मार्च 2024 रोजी राबविण्यात येत आहे. या दिवशी 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बुथवर पोलिओ लस पाजण्यात येणार आहे100 टक्के बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यात 2349 लसीकरण केंद्रे व 262 मोबाईल टीम : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात 2117 लसीकरण केंद्रे, शहरी भागात 88 व महानगरपालिका क्षेत्रात 144 अशी एकूण 2349 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी याकरीता ग्रामीण भागात 190 मोबाईल टिम, शहरी भागात 21 व महानगरपालिका क्षेत्रात 51 अशा 262 मोबाईल टिमची व्यवस्था केलेली आहे. तसेच टोलनाका, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणीसुध्दा ट्राझिंट टिमव्दारे लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे.

भारत 2011 पासून पोलिओ मुक्त : पोलिओ रोगाचे निर्मुलन करण्याचे हेतुने भारत सरकार 1995पासून पल्स पोलि लसीकरण मोहीम राबवित आहे. तसेच नियमित लसीकरण, ए.एफ.पी. सर्व्हेक्षण व पोलि रुग्ण आढळल्यास मॉप अप रॉउंड याव्दारे पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. देशात 13 जानेवारी 2011 नंतर अद्यापपर्यंत पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पोलिओ निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासुन प्रथमच अशा पध्दतीने यश मिळालेले आहे. जानेवारी 2014 मध्ये भारताला पोलिओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले आहे.

००००००

Tuesday 27 February 2024

_अर्थसंकल्प प्रतिक्रिया_ सर्वच घटकांना न्याय देऊन गरिबांच्या कल्याणाचा विचार : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

           


                                     

                                            _अर्थसंकल्प प्रतिक्रिया_

सर्वच घटकांना न्याय देऊन गरिबांच्या कल्याणाचा विचार : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.२७- महाराष्ट्रातील सर्वच घटकांना न्याय देत गरिबांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असून 'गरीबो के सन्मान में महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्ती के साथ मैदान में', अशी प्रतिक्रिया राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वांना समान न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केला. समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास या अर्थसंकल्पातून होणार आहे. शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अश्या सर्वच घटकांना सामावून घेणारा, न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

00000