Search This Blog

Saturday, 17 October 2026

एसआयआर-2026 अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


 एसआयआर-2026 अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Ø जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 17, 18, 24 व 25 ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे

चंद्रपूर, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण-2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना आता 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार असून, अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पात्र नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदार यादीत पात्र नागरिकांचा समावेश व्हावा, तसेच प्रारूप मतदार यादीतील त्रुटी दूर करता याव्यात, या उद्देशाने शनिवार, दि. 17 ऑक्टोबर, रविवार, दि. 18 ऑक्टोबर, शनिवार, दि. 24 ऑक्टोबर आणि रविवार, दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या शिबिरांमध्ये पात्र नागरिकांना मतदार यादीत नवीन नाव नोंदविणे, विद्यमान नोंदीतील तपशील दुरुस्त करणे तसेच आवश्यकतेनुसार दावे व हरकती दाखल करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. याशिवाय, भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा संकेतस्थळावरूनही ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.

पात्र नागरिकांना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. नाव नोंदणी करावयाची असल्यास किंवा मतदार यादीतील नोंदीबाबत दुरुस्ती अथवा हरकत असल्यास विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा. कोणताही पात्र मतदार मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत आवश्यक दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

००००००

लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती

 



लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती

Ø आरवट-शिवणी येथे श्रमदानातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम

Ø अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या वतीने चंद्रपूर तालुक्यातील आरवट-शिवणी येथील सराई नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.

कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण, पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने तहसील कार्यालय, चंद्रपूर व चंद्रपूर महसूल मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरवट-शिवणी परिसरात वनराई बंधारा उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.

श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

आरवट-शिवणी येथील सराई नाल्यावर सुमारे 50 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि अंदाजे 2 मीटर खोल आकाराच्या बंधाऱ्याची लोकसहभागातून निर्मिती करण्यात आली. या बंधाऱ्यामुळे नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार असून, जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढून भूजल पुनर्भरणास चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच परिसरातील विहिरी, शेती आणि इतर जलस्रोतांना याचा फायदा होऊ शकणार आहे.

दुष्काळ निवारणासाठी स्थानिक उपाययोजनांवर भर

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी स्थानिक पातळीवर अडविणे, भूजलसाठ्यात वाढ करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यासारख्या कमी खर्चाच्या व लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना पाणीटंचाई निवारणासाठी उपयुक्त ठरू शकतात.

अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

या श्रमदान उपक्रमात उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे व ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने व त्यांचे पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी, स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, चंद्रपूर मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी, आरवट येथील तलाठी अनूप वघारे, योगेश सागुळले तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

जलसंवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ शासकीय उपाययोजना पुरेशा नसून नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. गावागावांत उपलब्ध नाले, ओढे आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी जलसंवर्धनाच्या उपक्रमांत सहभागी व्हावे, तसेच पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000000

Friday, 16 October 2026

चंद्रपुरात निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद संपन्न


 

चंद्रपुरात निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद  संपन्न

Ø निर्यातवाढीसाठीच्या विविध योजना आणि बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 16 : जिल्ह्यातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणे तसेच शासनाच्या विविध निर्यात प्रोत्साहन योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने 'निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांचा विकास' या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे 'निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद -2026' उत्साहात संपन्न झाली.

विदेश व्यापार महासंचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर आणि जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या परिषदेला जिल्ह्यातील आयात-निर्यात संकेतांक (आयईसी) धारक उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

यावेळी विदेश व्यापार उपमहासंचालक स्नेहल ढोके यांनी निर्यात प्रोत्साहन मोहिमेची माहिती दिली. तसेच 'निर्यात दिशा' व 'निर्यात प्रोत्साहन' या योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना उपलब्ध होणाऱ्या विविध संधी, प्रोत्साहनपर उपाययोजना आणि निर्यातवाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी उपआयुक्त (उद्योग) अनमोल कोरे यांनी प्रास्ताविकातून चंद्रपूर जिल्ह्याची सद्यस्थितीतील निर्यात क्षमता, जिल्हा उद्योग केंद्राची भूमिका, जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीचे कार्य तसेच महाराष्ट्र निर्यात धोरण 2023 याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार कराराबाबत सादरीकरण करून या कराराच्या अनुषंगाने उद्योजकांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यापार व निर्यातीच्या संधींवर प्रकाश टाकला.

या परिषदेत वॉलमार्ट, डीएचएल, भारतीय लघुउद्योग विकास बँक (सीडबी), भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक), निर्यात पत हमी महामंडळ (ईसीजीसी), अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषद (ईईपीसी), कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) तसेच भारतीय टपाल विभागाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यांनी ई-कॉमर्सच्या माध्यमातून निर्यातवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचे मार्ग, निर्यात प्रक्रियेतील सुलभता, आर्थिक सहाय्य, निर्यात पत संरक्षण आणि विविध संस्थात्मक योजनांबाबत उद्योजकांना मार्गदर्शन केले.

स्थानिक उद्योगांच्या निर्यातीला चालना देण्यावर भर

चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक उद्योग, लघु व मध्यम उद्योजक तसेच नव्याने निर्यात क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेशी जोडणे, निर्यातीसाठी आवश्यक माहिती व संस्थात्मक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्याची निर्यात क्षमता वृद्धिंगत करणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश होता.

या शिबिरामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यातविषयक शासकीय योजना, ई-कॉमर्सच्या संधी तसेच विविध वित्तीय व निर्यात प्रोत्साहन संस्थांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाली.

०००००

दुष्काळावर मात करण्यासाठी सिंदेवाहीत जलसंधारणाची लोकचळवळ!




 दुष्काळावर मात करण्यासाठी सिंदेवाहीत जलसंधारणाची लोकचळवळ!

Ø तालुक्यात 100 वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

चंद्रपूर, दि. 16 : दुष्काळग्रस्त सिंदेवाही तालुक्यात आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. याच अनुषंगाने संपूर्ण तालुक्यात किमान 100 वनराई बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, लोकसहभागातून पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दोन वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पहिल्याच दिवशी अनेक गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी : या मोहिमेला 15 ऑक्टोबर 2026 रोजी उत्स्फूर्त सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मेंढामाल, मिनघरी, लाडबोरी, डोंगरगाव, कच्चेपार, नवेगाव लोन, लोणखैरी आदी ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधारे उभारण्यात आले. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसाठा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

प्रशासनाच्या पुढाकाराला लोकसहभागाची जोड : पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामस्थ या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. जलसंधारण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून ती प्रभावीपणे साध्य होऊ शकते, हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. स्थानिक संसाधनांचा वापर करून कमी खर्चात पाणी अडविण्याचा प्रभावी पर्याय म्हणून वनराई बंधाऱ्यांकडे पाहिले जात आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रयत्नशील आहेत. गावागावांत लोकसहभाग वाढवून जलसंधारणाच्या कामांना व्यापक स्वरूप देण्यावर प्रशासनाचा भर आहे.

वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी काही प्रमाणात अडविण्यास, जमिनीत मुरण्यास आणि परिसरातील भूजल पुनर्भरणास मदत होऊ शकते. त्यामुळे शेती, जनावरे आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या प्रयत्नांना हातभार लागणार आहे.

००००००

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने माता, अर्भक व लहान बालक पोषण कार्यक्रमात आता चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश

 मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने माता, अर्भक व लहान बालक

पोषण कार्यक्रमात आता चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश

Ø 'एमआयवायसीएन’ कार्यक्रम राबविण्यासाठी मुंबई आयआयटी च्या सहकार्याने सामंजस्य करार

चंद्रपूर, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील माता आणि बालकांचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मुंबई आयआयटीच्या अभिनव संकल्पनेतून विकसित करण्यात आलेला ‘माता, अर्भक व लहान बालक पोषण कार्यक्रम’ (Mother, Infant and Young Child Nutrition – MIYCN) आता चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.

यासाठी आवश्यक सामंजस्य करार करण्यात आला असून लवकरच कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण कमी करणे, त्यांची शारीरिक वाढ सुधारणे आणि माता-बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात माता व बालकांच्या पोषणविषयक सेवांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचा या महत्त्वाकांक्षी उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, आयआयटीशी संलग्न व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन आणि आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विकसित झालेली इडूयू पिरॅमिड एज्युकेशनल सर्व्हिसेस या संस्था धोरणात्मक व प्रमुख अंमलबजावणी भागीदार म्हणून कार्य करणार आहेत.

बालकांच्या पहिल्या दोन वर्षांतील पोषणावर विशेष भर : बालकाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्षे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात योग्य पोषण, नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर मार्गदर्शन मिळाल्यास कुपोषण व वाढ खुंटण्यासारख्या समस्या टाळता येऊ शकतात. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील मातांपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत आरोग्यविषयक माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक व आदिवासी भाषांमधील लघु शैक्षणिक चित्रफिती, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि नियमित मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांची क्षमता वाढविण्यात येईल.

प्रत्येक बालकाच्या वाढीवर नियमित लक्ष : या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकेकडे माता आणि बालकांचा निश्चित गट राहणार आहे. गृहभेटीदरम्यान बालकांचे वजन, वाढ आणि पोषणस्थितीची नियमित नोंद घेतली जाईल. बालकाच्या वाढीचा वेग कमी होत असल्याचे लक्षात येताच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने वेळीच आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत.

यामुळे बालक कमी वजनाच्या किंवा कुपोषणाच्या स्थितीत जाण्यापूर्वीच संभाव्य धोका ओळखणे शक्य होईल. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून इतर कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल.

चंद्रपूर जिल्ह्यात माता-बाल आरोग्य सेवांना बळकटी : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागात माता आणि बालकांपर्यंत पोषणविषयक माहिती प्रभावीपणे पोहोचविणे, बालकांच्या वाढीचे नियमित निरीक्षण करणे आणि कुपोषणाचा धोका वेळीच ओळखणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांच्या सहभागातून माता-बाल आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

विशेषतः मातांना स्तनपान, पूरक आहार, बालसंगोपन आणि योग्य पोषणाबाबत शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. बालकांना आयुष्याची निरोगी सुरुवात मिळावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक आरोग्य कर्मचारी आणि प्रभावी प्रशिक्षण यांची सांगड घालणारा हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील माता-बाल आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

00000000