क्रीडा ई-प्रमाण प्रणाली सुरू; खेळाडूंना घरबसल्या 5% आरक्षणासाठी प्रमाणपत्र
चंद्रपूर, दि. 12 : राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक व जलद मिळावा, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही अत्याधुनिक ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असल्याने प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून बोगस प्रमाणपत्रांना आळा बसणार आहे.
या प्रणालीद्वारे खेळाडूंनी आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ती मूळ अभिलेखाशी जुळल्यास अवघ्या 24 तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होणार आहे. प्रत्येक प्रमाणपत्रावर अद्वितीय QR कोड देण्यात येणार असून त्याद्वारे नियुक्ती प्राधिकारी, जसे की MPSC किंवा पोलीस भरती विभाग, प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील.
राज्यातील आगामी शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्र पडताळणी केलेल्या खेळाडूंनीही पुढील भरतीसाठी या प्रणालीद्वारे नवीन प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत :
खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी. संकेतस्थळावरील Our Services या विभागात जाऊन 5% Reservation या टॅबमध्ये एकदाच नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी आधार-संलग्न मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्डाची पीडीएफ प्रत तसेच स्पर्धेत मिळालेल्या प्रावीण्य प्रमाणपत्राची पीडीएफ प्रत आवश्यक आहे.
अभिलेख उपलब्ध नसल्यास तक्रार नोंदवा:
काही खेळाडूंची स्पर्धेची माहिती किंवा प्रमाणपत्रे तांत्रिक कारणांमुळे पोर्टलवर दिसत नसल्यास त्यांनी संबंधित स्पर्धेचे नाव व वर्ष नमूद करून आपल्या मूळ प्रमाणपत्राची स्कॅन प्रत ई-मेलद्वारे पाठवावी. त्यानंतर विभागीय स्तरावर पडताळणी करून संबंधित अभिलेख पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतील.
सध्या उपलब्ध अभिलेख:
कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५), ज्युडो (२०२४) तसेच कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) या स्पर्धांचे अभिलेख सध्या ऑनलाईन उपलब्ध असून संबंधित खेळाडूंनी त्वरित अर्ज करावा. इतर खेळांचे अभिलेखही लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहितीसाठी खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000000

No comments:
Post a Comment