Search This Blog

Monday, 23 March 2026

वन अकादमी येथे जलसाक्षरता बाबत प्रशिक्षण

 



                                   वन अकादमी येथे जलसाक्षरता बाबत                                                            प्रशिक्षण                                       

चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे जलसाक्षरता अभियान अंतर्गत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील 126 जलदूत व जलप्रेमी यांचे प्रशिक्षण नुकतेच वन अकादमी येथे पार पडले.

या प्रशिक्षणामध्ये जलसंपदा व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये जलसाक्षरता केंद्र व जलकर्मी यांची भूमिका व जबाबदारी, जलसाक्षरतेसाठी विविध विभागांमधील समन्वय, तसेच जलसाक्षरता प्रसार व प्रचार कार्यपद्धती यांचा समावेश होता.  यावेळी जलसंवर्धनासाठी विविध वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर, पाण्याचा ताळेबंद व जलसाक्षरता या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय जलप्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी प्लास्टिक वापर कमी करणे, एकल वापर प्लास्टिक बंदी व त्यावरील उपाययोजना याबाबतही माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणादरम्यान सिंचन कायदा व इतर कायद्यांमधील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती देण्यात आली. तसेच पाणलोट क्षेत्र विकास आराखडा, पाणलोट उपचार व जलसाक्षरता, तसेच जलसंपदा विभागासमोरील भविष्यातील आव्हाने, महाराष्ट्रातील जलसंपत्ती, राज्याची जलनीती, पाणी उपलब्धता व हवामान बदल या विषयांवरही सखोल चर्चा करण्यात आली. ‘चला जाणूया नदीलाया उपक्रमांतर्गत पैनगंगा नदितील प्रदूषण, जलप्रदूषण समस्या व उपाययोजना यावरही माहिती देण्यात आली.

मामा तलाव पुनरुज्जीवनाची यशोगाथा, लोकसहभागातून जलसंवर्धन, तसेच पर्यावरणपूरक व हरित गाव संकल्पना या विषयांवरही प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविणे, पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करणे व लोकसहभागातून शाश्वत जल व्यवस्थापनाला चालना देणे हा प्रमुख उद्देश असल्याचे अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा यांनी सांगितले. सदर प्रशिक्षण सत्र संचालक खुशाल रामगिरकर यांच्या निरीक्षणात पार पाडले.

००००००

No comments:

Post a Comment