Search This Blog

Monday, 31 August 2026

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धा, जनजागृती रॅली आणि पारंपरिक खेळांचे आयोजन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

 





जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

 Ø  तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धा, जनजागृती रॅली आणि पारंपरिक खेळांचे आयोजन

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

 चंद्रपूर, दि. 31 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदर, खेळ आणि हालचालया संकल्पनेवर आधारित खेलेगा भारत, जितेगा भारतया थीमअंतर्गत जिल्हाभर विविध क्रीडा स्पर्धा, तंदुरुस्तीविषयक उपक्रम, जनजागृती रॅली, पारंपरिक खेळ आणि खेळाडूंच्या गौरवाचे कार्यक्रम घेण्यात आले.

 क्रीडा ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त, संघभावना, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रभावी मार्ग आहे, हा संदेश या तीन दिवसीय उपक्रमातून देण्यात आला. 28 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण करून उपक्रमांची सुरुवात झाली.

 100 मीटर दौड अन् शहरातून भव्य जनजागृती रॅली

29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करून राष्ट्रीय क्रीडा दिनाची शपथ घेण्यात आली. पोलीस विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात मुला-मुलींसाठी 100 मीटर दौड स्पर्धा घेण्यात आली. यावेळी छत्रपती पुरस्कारार्थी कुंदन नायडू, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, प्रशिक्षक प्रवीण राठोड, नीलकंठ चौधरी आदी उपस्थित होते.

 यानंतर खेळाडूंची भव्य जनजागृती रॅली चंद्रपूर शहरातून काढण्यात आली. सहभागी मुला-मुलींना टी-शर्टचे वाटप करण्यात आले.

 सायंकाळी झालेल्या मुख्य कार्यक्रमाला छत्रपती पुरस्कारार्थी राजेश नायडू, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताख, जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. पूजा देऊरकर, तालुका क्रीडा अधिकारी संदीप उईके व विठ्ठल भालेराव, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, व्हॉलीबॉल प्रशिक्षक हेमंत गिवे, तायक्वांदो प्रशिक्षक बजरंग वानखेडे, जिल्हा क्रीडा समन्वयक वाल्मीक खोब्रागडे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

 गुजरात येथे 79 देशांच्या सहभागातून झालेल्या चॅम्पियनशिपमधील विजेत्या आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. पूजा देऊरकर, चीनमधील शांगलुओ येथे झालेल्या वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप 2025 मधील विजेत्या सखी दोरखंडे तसेच सन 2025-26 मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित 100 मीटर दौड व इतर स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

सायकल ऑन संडेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 30 ऑगस्ट रोजी सामूहिक क्रीडा शपथ घेण्यात आली. सायकल ऑन संडेउपक्रमांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यासोबत पदयात्रा, धावणे आदी उपक्रम घेण्यात आले. रॅलीच्या मार्गावर मार्गदर्शक फलक आणि सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते.

 बल्लारशाह येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पारंपरिक लाठी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक लाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच डीम संघटना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी, रस्सीखेच, नेटबॉल, हॉकी, खो-खो आणि बुद्धिबळ स्पर्धाही उत्साहात पार पडल्या.

 या तीन दिवसीय आयोजनाच्या यशस्वितेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

000000


राजकीय पक्षांच्या उपस्थितीत मतदार याद्यांची प्रसिद्धी

 



राजकीय पक्षांच्या उपस्थितीत मतदार याद्यांची प्रसिद्धी


चंद्रपूर, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत  आज 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला.

 यावेळी मतदान केंद्रांचे अंतिम सुसूत्रीकरण, मतदार आकडेवारी, विविध अर्जासाठी लागणारी अधिकृत 12 कागदपत्रे, कायदेशीर कलमे, नोटीस कालावधी व राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) भूमिका याबाबतचा आढावा घेण्यात आला.

 विविध नमुने व भारत निवडणूक आयोग मान्य पुरावे : मागील  एसआयआर मधील मतदाराच्या किंवा त्याच्या आई-वडील/आजी-आजोबा यांच्या तपशिलाशी जुळवणी न झाल्यास अथवा नवीन नोंदणीसाठी 12 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. यात 1)जन्माचा दाखला 2)पासपोर्ट 3) इ. 10 वी चे (मॅट्रिक) किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, 4) रहिवासी प्रमाणपत्र  5) जात प्रमाणपत्र 6) सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचारी / निवृत्तीवेतन ओळखपत्र, 7) राज्य / स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, 8) शासनाने दिलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, 9) वन हक्क प्रमाणपत्र, 10) राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, 11) शासन स्थानिक प्राधिकरण / बँक / टपाल कार्यालय / जीवन विमा महामंडळ / सार्वजनिक उपक्रम यांनी 1 जुलै 1987 पूर्वी दिलेले ओळखपत्र / प्रमाणपत्र आणि 12) आधार कार्ड (ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारले जाईल).

 नमुना क्र. 6 (नवीन नाव नोंदणी) : सध्याच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले नागरिक तसेच 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार नमुना क्र. 6 भरून नोंदणी करू शकतात.

 नमुना क्र. 7 (नाव वगळणे / आक्षेप) : मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा दुबार नोंदी असलेल्या मतदारांचे नाव वगळण्यासाठी संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार नमुना क्र. 7 भरून हरकत घेऊ शकतो.

 नमुना क्र. 8 (दुरुस्ती / स्थलांतर) : मतदार यादीतील स्वतःच्या नोंदींमध्ये दुरुस्ती (नाव, वय, नातेसंबंध, फोटो), पत्ता बदल किंवा दिव्यांग नोंदीसाठी नमुना क्र. 8 भरता येईल.

 एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणीस बंदी :  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 चे कलम 17 18 नुसार एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नोंदविता येत नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणीच गणना अर्ज भरणे बंधनकारक आहे. खोटी घोषणा केल्यास किंवा मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा वगळणीसाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधितास 1 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही होऊ शकतात.

 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहकार्याचे आवाहन : सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपापल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत (बीएलए) प्रारूप मतदार यादी आणि 2 लक्ष 70 हजार 153 अनकाऊंटेबल मतदारांच्या यादीची सखोल पडताळणी करावी. कोणत्याही मदतीसाठी 1950 या टोल फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा ECINET APP /ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

 सदर बैठकीला जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, तहसीलदार विजय पवार तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

000000


Tuesday, 25 August 2026

महसूल लोक अदालतीमध्ये अधिवक्ता व पक्षकारांनी सहभागी व्हावे - अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे

 




महसूल लोक अदालतीमध्ये अधिवक्ता व पक्षकारांनी सहभागी व्हावे

- अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे

Ø लोक अदालतीच्या धर्तीवर महसूल लोक अदालतीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 25 : राज्यात महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियानचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यास मदत होईल. या अदालतीमध्ये अधिवक्ते व पक्षकारांनी सहभागी होऊन सदर अभियान यशस्वी करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय येथील बार असोसिएशनच्या कार्यालयात आयेाजित कार्यक्रमात डॉ. व्यवहारे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ विक्रम टंडन, उपाध्यक्ष ॲङ अमन मारेकर, सचिव ॲङ अभिजित किन्हीकर आदी उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शेतजमीन या विषयावर मोठा लढा दिला, असे सांगून अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि हक्क पोहोचविणे, हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे मूळ सुत्र होते. त्यामुळेच राज्य शासनाने त्यांच्या नावाने ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान सुरू केले आहे, सदर अभियान संपूर्ण राज्यात 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. विविध कारणांमुळे हे दावे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे पक्षकारांमध्ये आपसी समझेाता करून सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या अधिवक्त्यांकडे अशी महसुली प्रकरणे आहेत, त्यांनी संबंधित पक्षकारांसोबत बोलून यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, जेणेकरून महसुली प्रकरणांची संख्या कमी करून पक्षकारांना दिलासा मिळेल, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम म्हणाले, पक्षकारांचा, अधिवक्त्यांचा व महसूल यंत्रणेचा वेळ वाचावा, यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. महसुली दाव्यांमध्ये कधीकधी अतिशय शुल्लक प्रकरणे असतात. दोन्ही पक्षकारांना योग्य पध्दतीने समजावून सांगितले तर या माध्यमातून त्यांना वेळेत न्याय मिळू शकतो. आपसी संवाद/तडजोड झाली तर प्रकरणे लवकर निकाली निघतील. यात पक्षकारांचा सहभाग आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ विक्रम टंडन म्हणाले, शेतक-यांना आपल्या केसेस लढण्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व अधिवक्ता आणि पक्षकार यात सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन बार असोसिएशनचे सचिव ॲङ अभिजित किन्हीकर यांनी केले. यावेळी वरिष्ठ अधिवक्ता श्री. सातपुते यांच्यासह बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

ईद निमित्त चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल


 

ईद निमित्त चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

चंद्रपूर, दि. 25 : चंद्रपुर शहरामध्ये 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली मध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा, जनतेला त्रास तसेच तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता चंद्रपुर शहरातील वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजतापासून दुपारी 3 वाजेपर्यंत खालील प्रमाणे वाहतुक वळविण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी दिले आहे.

कोहीनुर ग्राउंड-दस्तगीर चौक -मिलन चौक -गांधी चौक- जयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक- जटपुरा गेट-कस्तुरबा रोडने कोहीनूर ग्राऊंड पर्यंतचा रस्ता, सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे.

नागपूरकडून शहरामध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज, पठाणपुरा परिसरात जावयाचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर -संत केवलराम चौक- सेंट मायकल स्कुल- सवारी बंगला चौक -नगीनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील.

नागपुर, वणी, घुग्घुस, गडचांदुरकडे जाणा-या प्रवाशांनी रहमतनगर, नगीनाबाग व इतर परीसरातून जाण्यासाठी बिनबा गेट, रहेमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. बल्लारशा व मुलकडून येणा-या वाहनांना (जड वाहने वगळून) शहरामध्ये जावयाचे असल्यास बसस्टँड- एलआयसी ऑफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोलपंपकडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल.

जनतेने जुलूस व रॅली दरम्यान वरील वाहतुक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

००००००

सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन



 सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन

चंद्रपूर, दि. 25 : शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक असून, या पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी होण्यामागे किडींचा प्रादुर्भाव हे एक प्रमुख कारण आहे. पाने खाणाऱ्या अळयांमुळे एकत्रितपणे (तंबाखुवरील पाने खाणारी अळी, उंटअळया, घाटेअळया, केसाळ अळया इ.) 71 टक्क्यांपर्यंत, फक्त उंटअळयामुळे 50 टक्क्यांपर्यंत सोयाबीनचे नुकसान होऊ शकते.

सध्या स्थितीत सोयाबीन पिकावर उंटअळया व तंबाखुवरील पाने खाणारी अळयाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे किर्डीचे वेळीच निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंबनाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाचे शास्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

तंबाखुवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) : या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात मोठया प्रमाणावर दिसून येतो. अंडयातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळया, समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. अळ्या मोठ्या झाल्यानंतर त्या शेतात सर्वत्र पसरतात व पानांना मोठी अनियमित छिद्रे पाडून पाने खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पानांची चाळणी झाल्यासारखी अवस्था होते. पिकाला फुले आल्यानंतर या अळ्या फुले खाऊन नुकसान करतात, परिणामी पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

उंटअळया : या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः 15 ते 20 दिवसांनी होतो. अळ्या पानांवर लहान, अनियमित आकाराची छिद्रे पाडून नुकसान करतात, त्यामुळे पिकातील शेंगा लागणे व दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घटू शकते. तसेच ह्या अळ्या फुले व शेंगाही खातात.

सध्यस्थितीत एकात्मिक व्यवस्थापन : सोयाबीन पिकांचे वेळोवेळी किडींचे सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखुची पाने खाणारी अळी व केसाळ अळया यांची अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून अळीसह नष्ट करावीत. तंबाखुची पाने खाणारी अळी व हिरवी घाटेअळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी 15 ते 20 प्रति हेक्टरी लावावेत. शेतात इंग्रजी 'T' अक्षरासारखे 50 पक्षीथांबे प्रति हेक्टरी लावावेत.

तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी नोमुरिया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी, प्रादुर्भाव आढळून येताच करावी. पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. या किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर प्रति लिटर पाण्यातून फ्लूबेंडामाईड 39.35% एससी 0.3 मिली किंवा क्लोरेंन्ट्रानिलीप्रोल 18.5% एससी 0.3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 1.90% ईसी 0.85 मिली किंवा टेट्रानिलिप्रोल 18.18% एससी 0.5-0.6 मिली किंवा नोव्हाल्युरॉन 5.25% + इंडॉक्साकार्ब 4.50% एससी 1.65-1.75 मिली किंवा अॅसिटामीप्राईड 25% बायफेथ्रिन 25% डब्लूजी 0.5 ग्रॅम या पैकी एका कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.

वरील सर्व कीटकनाशकाचे प्रमाण साध्या / नॅपसॅक पंपासाठी आहे, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे. शेतात कीटकशकांचा वापर करतांना हातमोजे, तोंडावर मास्कचा, डोळ्यावर चष्माचा वापर करावा व सुरक्षितेची योग्य ती काळजी घ्यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 24 August 2026

एकजुटीच्या प्रयत्नातून सुरक्षित मातृत्वाचा प्रवास


 एकजुटीच्या प्रयत्नातून सुरक्षित मातृत्वाचा प्रवास

Ø दुर्गम घोडणकप्पीत आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश

Ø पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित प्रसूती

चंद्रपूर, दि. 24 : दुर्गम भाग, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यातील अडचणी आणि जोखमीची गर्भावस्था... अशा अनेक आव्हानांवर मात करत आरोग्य विभागाचे कर्मचारी, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे एका मातेचा सुरक्षित मातृत्वाचा प्रवास सुखरूप पूर्ण झाला. दुर्गम घोडणकप्पी  येथील इंदिराबाई रामा जुमनाके यांनी 23 ऑगस्ट 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे 3.1 किलो वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरोदर मातांपर्यंत नियमित आरोग्यसेवा पोहोचविणे हे आरोग्य यंत्रणेसमोरील मोठे आव्हान असते. घोडणकप्पीसारख्या दुर्गम गावातही आरोग्य कर्मचाऱ्यांनी इंदिराबाईंच्या गर्भावस्थेच्या सुरुवातीपासून त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले. घरी जाऊन नियमित तपासण्या, रक्तवाढीसाठी आवश्यक इंजेक्शन्स, गोळ्या आणि औषधोपचार देत त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.

इंदिराबाईंची ही पाचवी गर्भधारणा असल्याने प्रसूतीदरम्यान संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी अधिक दक्षता आवश्यक होती. आई आणि बाळ दोघांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना 10 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोग्य पथकाने त्यांची नियमित देखरेख सुरू ठेवली. पुढील तपासण्यांसाठी 13 ऑगस्ट रोजी त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले. तेथे सोनोग्राफीसह आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आणि डॉ. स्नेहल कासारे यांच्या मार्गदर्शनात हृदयाची ECHO आणि ECG तपासणीही करण्यात आली.

पंधरा दिवसांची काळजी अन् विश्वासाची साथ

गरोदर मातेला जवळपास पंधरा दिवस आरोग्य संस्थेत ठेवणे हे केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित नव्हते. तिची मानसिक तयारी करणे, तिचा विश्वास संपादन करणे आणि प्रत्येक टप्प्यावर आपुलकीने आधार देणे तितकेच महत्त्वाचे होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी संयम आणि संवेदनशीलतेने ही जबाबदारी पार पाडली.

या प्रयत्नांमध्ये इंदिराबाईंच्या कुटुंबीयांची भूमिकाही मोलाची ठरली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवत उपचार आणि रुग्णालयातील वास्तव्यासाठी पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे आवश्यक वैद्यकीय देखरेख कोणत्याही खंडाशिवाय सुरू ठेवता आली. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. 23 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे इंदिराबाईंची सुरक्षित प्रसूती झाली. त्यांच्या कुशीत 3.1 किलो वजनाची सुदृढ चिमुकली आली. आई आणि बाळ सुखरूप असल्याचे पाहून कुटुंबीयांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधान उमटले. ही केवळ प्रसूती नाही, सामूहिक प्रयत्नांचा विजय

इंदिराबाईंची कहाणी ही एका मातेच्या सुरक्षित प्रसूतीपुरती मर्यादित नाही. आरोग्य कर्मचारी, माता, कुटुंब आणि गावकरी यांच्यात विश्वास व समन्वय असेल, तर दुर्गम भागातील आव्हानांवरही मात करता येते, याचे हे उदाहरण आहे.

प्रत्येक गरोदर मातेने वेळेवर तपासणी करून घेणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करणे आणि जोखीम आढळल्यास प्रसूतीपूर्वीच आरोग्य संस्थेत दाखल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि गावानेही गरोदर मातेला आवश्यक सहकार्य केल्यास माता व बालमृत्यूचा धोका कमी करण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळू शकते.

आरोग्यसेवा देणारे आणि आरोग्यसेवा घेणारे यांच्यात विश्वास आणि सहकार्याची साखळी मजबूत झाली, तर दुर्गम भागातील प्रत्येक मातेला सुरक्षित मातृत्वाची संधी देता येऊ शकते. घोडणकप्पी ते पाटण असा इंदिराबाईंचा सुरक्षित मातृत्वाचा प्रवास याच विश्वासाचे प्रतीक ठरला आहे.

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांसह  अधिकाऱ्यांनी घेतली होती इंदिराबाईची भेट : 15 ऑगस्ट रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्यासह जिल्हाधिकारी वसूमना पंत , मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात इंदिराबाईची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. तसेच इंदिराबाईच्या आरोग्याची आपुलकीने विचारपूस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य दक्षता घेण्याच्या सूचनाही केल्या होत्या.

००००००

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा


 मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा

Ø पहिल्याच करारातून 89.60 लाखांची मदत

मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. पहिल्यांदाच झालेल्या या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे करार इतर अनेक नामांकित संस्थांसोबतही प्रक्रियेत असून ते लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत होत आहे.

प्रतिक्रिया :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. याच धर्तीवर इतरही अनेक नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

०००००००

चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ

 


चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ

Ø ICMR पडोली येथे कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट व प्रीनेटल डायग्नोसिस सुविधा सुरू

Ø ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना तपासणी, निदान, समुपदेशन आणि उपचारासाठी होणार मोठा फायदा

चंद्रपूर, दि. 24 : सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांना दर्जेदार, वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने चंद्रपूर जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ICMR, पडोली येथे सिकल सेल डिसीज (SCD) आणि थालेसेमिया रुग्णांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट (CCU) आणि प्रीनेटल डायग्नोसिस (PND) या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवांचा शुभारंभ करण्यात आला.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या आरोग्यसेवांचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधांमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांना आवश्यक तपासणी, निदान, वैद्यकीय सल्ला, समुपदेशन तसेच पुढील उपचारासाठी अधिक सुलभ आणि समन्वित सेवा उपलब्ध होणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमुख/प्रशासक डॉ. विंकी रुघवानी, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या माजी अध्यक्ष तथा सिकलसेल निर्मूलन कार्यगटाच्या अध्यक्ष डॉ. दिप्ती जैन, ICMR संचालक डॉ. मनिषा मदकाईकर, ICMR-NIRBID चे सायंटिस्ट प्रभाकर केदर, गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा परिषद चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते आणि जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चत्रेश्वर यांच्यासह संबंधित अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

एकाच ठिकाणी सर्वसमावेशक आरोग्यसेवा

सिकलसेल व थालेसेमिया या अनुवंशिक रक्तविकारांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नियमित तपासणी, आजाराचे सातत्याने निरीक्षण, तज्ज्ञांचा सल्ला, योग्य उपचार आणि समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. ICMR, पडोली येथे सुरू झालेल्या नव्या सुविधांमुळे या सर्व बाबींसाठी रुग्णांना अधिक सुलभ आणि नियमित आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.

विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी या सुविधा दिलासादायक ठरणार आहेत. रुग्णांची वेळेवर तपासणी, आजाराच्या स्थितीचे नियमित निरीक्षण, आवश्यक निदान चाचण्या आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळी उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.

प्रीनेटल डायग्नोसिसमुळे प्रतिबंधात्मक प्रयत्नांना बळ

प्रीनेटल डायग्नोसिस (PND) सुविधा सुरू झाल्याने सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांच्या संदर्भात आवश्यक वैद्यकीय निदान आणि तज्ज्ञ समुपदेशनाची सुविधा अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि कुटुंबांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन देण्याच्या प्रयत्नांनाही बळ मिळणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल व थालेसेमिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग, ICMR आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या या सुविधा अनुवंशिक रक्तविकारांच्या सर्वसमावेशक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक पाऊल ठरणार आहेत.

जिल्ह्यातील पात्र रुग्णांनी या आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा. तसेच सिकलसेल व थालेसेमियाबाबत नियमित तपासणी करून घ्यावी आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला व समुपदेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००

Friday, 21 August 2026

सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत



 

सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा  – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø गणेश मंडळांना वेळेत परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवा

Ø स्वच्छता, निर्माल्य व्यवस्थापन आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर

Ø सोशल मीडियावर सायबर टीमची 24x7 नजर; लेझर लाईटला पूर्णपणे बंदी

चंद्रपूर, दि. 21 : चंद्रपूर जिल्ह्याने नेहमीच सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली आहे. आगामी ईद, जन्माष्टमी, रक्षाबंधन, पोळा, गणेशोत्सव आदी सण-उत्सव सर्वांनी परस्पर सहकार्य, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत. तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना स्वच्छता आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

नियोजन भवन येथे शुक्रवारी (दि.21) आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, मनपाचे उपायुक्त संजय चिद्रावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, शांतता समिती व दक्षता समितीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, महानगरपालिका क्षेत्रात गणेश मंडळांच्या विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू असणार आहे. जिल्ह्यातील इतर नगर परिषदांनीही अशी व्यवस्था सुरू करून गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या वेळेत द्याव्यात. ध्वनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावेत.

गणेशोत्सव काळात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि गणेश मंडळांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. निर्माल्य आणि इतर कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था करावी. गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम विसर्जन टँकची माहिती नागरिकांना आधीच उपलब्ध करून द्यावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मंडळांनी किमान दोन सीसीटीव्ही लावावेत – पोलिस अधीक्षक आयुष नोपानी

जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी म्हणाले की, कोणताही कार्यक्रम पूर्व परवानगीशिवाय आयोजित करू नये. मंडप किंवा होर्डिंग उभारताना सार्वजनिक जागा व्यापली जाणार नाही, तसेच नागरिक आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर रोखण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करावे. मूर्तीचे विडंबन होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून समाजकंटकांना ओळखण्यासाठी चंद्रपूर पोलिस प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा हद्दीत घोषित करण्यात आलेल्या ‘सायलेंट झोन’मध्ये ध्वनी प्रदूषण खपवून घेतले जाणार नाही. सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांनी संबंधित नगर परिषदांशी समन्वय साधून तालुका स्तरावर सायलेंट झोन निश्चित करावेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर टीम 24x7 कार्यरत आहे. लेझर लाईटच्या वापराला पूर्णपणे बंदी असून उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. नोपानी यांनी केले.

नागरिकांनी मांडल्या सुचना : बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. विसर्जनाची योग्य व्यवस्था करणे, भूमिगत गटारांच्या कामामुळे रस्त्यांवर अडथळा निर्माण होऊ न देणे, डीजेचा वापर टाळणे, गावपातळीवर चोख बंदोबस्त ठेवणे, अफवांवर विश्वास न ठेवणे व त्या पसरू न देणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, गर्दीचे योग्य नियोजन करणे, पीओपीच्या मूर्ती टाळणे आणि संशयास्पद व्यक्ती अथवा असामाजिक तत्त्वांची माहिती तातडीने पोलिसांना देणे, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करणे आणि सण-उत्सवांच्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत राहील याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, आदी सूचनांचा यात समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम गव्हाणे यांनी केले. संचालन मंगला आसुटकर यांनी केले, तर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी आभार मानले.

०००००