घोडनकप्पीच्या बारमाही दळणवळणासाठी प्रशासनाचे ठोस पाऊल
Ø 57.46 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त
Ø दुर्गम गावाला मिळणार सुरक्षित आणि बारमाही रस्त्याची सुविधा
चंद्रपूर, दि.19 : जिवती तालुक्यातील दुर्गम घोडनकप्पी गावाच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. कोलमगुडा ते घोडनकप्पी या सुमारे 0.60 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रस्त्याच्या प्राथमिक कामासाठी 12.76 लक्ष रुपये तर उर्वरित कामासाठी खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत 44.70 लक्ष रुपये, अशी एकूण 57.46 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
घोडनकप्पी हे भारी ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे दुर्गम गाव असून त्याची नोंदणीकृत लोकसंख्या 208 आहे. प्रत्यक्षात गावात सुमारे 15 ते 20 घरे आहेत. डोंगराळ भागात वसलेल्या या गावातील नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने रस्त्याच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. सदर रस्ता सध्या अवर्गीकृत व योजनाबाह्य असून तो वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रातून जातो. त्यामुळे रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक वनविषयक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी वन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून आवश्यक परवानगी लवकर प्राप्त व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
57.46 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता : रस्त्याच्या प्राथमिक विकासासाठी 15 ऑगस्ट 2026 रोजी विकसीत भारत ग्रामीण रोजगार आणि आजिविका हमी योजना (व्हीबी – जी- राम- जी) लेखाशिर्षांतर्गत 12.76 लक्ष रुपयांच्या मातीकाम व मुरूम स्तरापर्यंतच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी अंदाजपत्रक तयार करून 17 ऑगस्ट 2026 रोजी 44.70 लक्ष रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे सादर करण्यात आला. 19 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी सदर रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली. भारी गाव खनिजबाधित क्षेत्रात समाविष्ट असल्याने उपलब्ध निधीतून या परिसरातील मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे आवश्यक परवानग्या प्राप्त होताच नियमानुसार प्रत्यक्ष कामाला गती देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
टिकाऊ रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीटचा पर्याय : घोडनकप्पी हे गाव कोलमगुडा गावाच्या डोंगराच्या खालच्या बाजूस वसले आहे. येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सरळ रेषेत रस्ता करणे व्यवहार्य नसल्याने आवश्यकतेनुसार वळणदार संरेखनाद्वारे सुरक्षित रस्ता विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे केवळ डांबरीकरण केल्यास रस्त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक पर्जन्यमान आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सिमेंट काँक्रीट रस्ता विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे पावसाळ्यातही नागरिकांना अधिक सुरक्षित आणि टिकाऊ दळणवळण सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
वन विभागाची आवश्यक परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही नियमानुसार करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर घोडनकप्पीतील नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. दुर्गम व डोंगराळ भागातील शेवटच्या गावापर्यंत मूलभूत पायाभूत सुविधा पोहचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन कटिबध्द असून या रस्त्यामुळे आणखी बळ मिळणार आहे, असे जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनदयाल मटाले यांनी स्पष्ट केले आहे.
०००००

No comments:
Post a Comment