Search This Blog

Sunday, 16 August 2026

दुर्गम घोडणकप्पीतील अतिजोखीम गरोदर मातेचे सुरक्षित स्थलांतर


 

दुर्गम घोडणकप्पीतील अतिजोखीम गरोदर मातेचे सुरक्षित स्थलांतर

Ø डोंगर-दऱ्या, निसरडी वाट अन् भाषेचा अडसर पार करत आरोग्य पोहचले गावात

Ø दुभाषकाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा गरोदर मातेशी संवाद

चंद्रपूर, दि. 16 : डोंगराच्या कुशीत वसलेले गाव... गावापर्यंत वाहन पोहोचू शकेल, असा रस्ता नाही... पावसाळ्यात अधिकच जीवघेणी होणारी दगड-गोट्यांची वाट... मराठी भाषेचा अडसर आणि त्यात अतिजोखीम गरोदरपण. अशा अनेक अडचणींनी वेढलेल्या जिवती तालुक्यातील दुर्गम घोडणकप्पी (वरची) येथील गरोदर मातेपर्यंत आरोग्य पथक पोहोचले आणि तिचा विश्वास संपादन करून तिला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे दाखल केले.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) या महिलेची आयुष्मान भारत केंद्र, पाटण येथे भेट घेतली. तसेच दुभाषकाच्या माध्यमातून संवाद साधून महिलेच्या तब्बेतीची विचारपूस केली.

घोडणकप्पी हे पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुमारे 20 किलोमीटर, तर नंदप्पा उपकेंद्रापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेले आदिवासी गाव. येथे प्रामुख्याने आदिम कोलाम समाजाचे वास्तव्य आहे. गावाकडे जाणाऱ्या मार्गातील सुमारे 800 मीटरची डोंगराळ, दगड-गोट्यांची बिकट वाट वाहनांसाठी अडथळा ठरते. पावसाळ्यात ही वाट आणखी निसरडी आणि धोकादायक होते. त्यात भाषेची अडचण असल्याने काही मातांच्या मनात आरोग्य तपासणी व रुग्णालयाबाबत भीती असते.

एका दुर्घटनेने वाढवली होती चिंता : याच गावात 14 जून 2026 रोजी दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या संगीता तुळशीराम गेडाम यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर डोंगर उतरवित असताना अतिरक्तस्रावाने वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर घोडणकप्पी येथील इंदिराबाई रामा जुमनाके यांचे पाचवे गरोदरपण असल्याने त्यांची अतिजोखीम गरोदर माता म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या यापूर्वीच्या गरोदरपणातील वैद्यकीय इतिहास लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रसूतीपूर्वीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक होते. त्यांचा रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन (10.7 ग्रॅम) तसेच दोन सोनोग्राफी तपासण्या सामान्य असल्या तरी, सोनोग्राफीनुसार 25 ऑगस्ट 2026, तर मासिक पाळीच्या नोंदीनुसार 8 सप्टेंबर 2026 ही संभाव्य प्रसूती तारीख आहे.

आरोग्य पथक थेट पोहोचले मातेच्या घरी : डोंगराळ भूप्रदेश, पावसाळ्यातील निसरडी वाट, वाहनांची अनुपलब्धता आणि प्रसूतीच्या वेळी डोंगर उतरविताना निर्माण होऊ शकणारा धोका लक्षात घेऊन 10 ऑगस्ट 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटणचे पथक घोडणकप्पी येथे पोहोचले. आव्हान केवळ डोंगराचे नव्हते. इंदिराबाईंना मराठी भाषा समजण्यात अडचण असल्याने त्यांच्याशी संवाद साधणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक होते. अशा वेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माता सखी’ने द्विभाषिक दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. माता सखीने इंदिराबाई आणि त्यांच्या कुटुंबाशी त्यांच्या परिचित भाषेत संवाद साधत संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व समजावून सांगितले.

बुडीत मजुरी आणि मुलांची चिंता करू नका...’ : पालकमंत्री डॉ. उईके

गरोदर मातेच्या मनातील चिंता केवळ स्वतःच्या आरोग्याची नव्हती. रुग्णालयात गेल्यानंतर घरी असलेल्या मुलांचे काय, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी होणार आणि पतीची रोजंदारी बुडाल्यास कुटुंब कसे चालणार, अशा व्यावहारिक प्रश्नांमुळेही कुटुंब साशंक होते. ही अडचण लक्षात घेत काल (दि.15) पालकमंत्री डॉ. उईके यांनी या कुटुंकाला दिलासा दिला. प्रसुती होईपर्यंत मातेच्या रुग्णालयातील वास्तव्यात तिच्या मुलांसाठी पाटण येथील आश्रमशाळेत एका खोलीची, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्याचे तसेच पतीच्या बुडणाऱ्या मजुरीबाबतही मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग, जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, पाटणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता महेश शर्मा, डॉ. छाया शेडमाके, स्टाफ नर्स सुषमा शिरभये, अनुसया येमले, पल्लवी फुलझेले, सुपरवायझर यशोदा राठोड आदी उपस्थित होते.

जिवती -घोडनकप्पी रस्त्यासाठी प्रशासनाचा पुढाकार : घोडनकप्पी हे गाव मौजा कोलमगुडा परिसरास जोडलेले असून, सदर गावास जाण्यासाठी घोडनकप्पी पोचमार्ग हा रस्ता अस्तित्वात आहे. सदर रस्ता वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रातून जात असल्याने, रस्त्याच्या विकासासाठी संबंधित वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. घोडनकप्पी हे कोलमगुडा गावाच्या डोंगराच्या खालच्या बाजूस वसलेले आहे. सदर भागामध्ये पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने, केवळ डांबरीकरण केल्यास रस्त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक भौगोलिक व पर्जन्यमानाच्या परिस्थितीचा विचार करून, त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता प्रस्तावित असून 52.97 लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment