Search This Blog

Sunday 31 July 2022

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत मूल मध्ये ऊर्जा विभागाचा जागर

 

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत मूल मध्ये ऊर्जा विभागाचा जागर

Ø  ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि 2047 पर्यंतचे ध्येय निश्चित

चंद्रपूर, दि. 31 जुलै : आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन "उज्वल भारत, उज्वल भविष्य - पॉवर @2047" याअभियानांतर्गत महावितरण चंद्रपूर मंडळाद्वारे ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि 2047 पर्यंतचे ध्येय हा कार्यक्रम मूल येथील कन्नमवर सभागृहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, भद्रावती येथील पावरग्रीडचे मुख्य महाव्यवस्थापक अरींधम सेनसर्मा, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता हरीचंद्र बालपांडे, प्र.कार्यकारी अभियंता सुहास पडोळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जोरगेवार म्हणाले, रोटी, कपडा और मकान या तीन प्राथमिक गरजांशिवाय आता वीज ही चवथी प्राथमिक गरज निर्माण झाली आहे. विजेशिवाय जगणे कठीण आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सहा लाख वीज ग्राहक असून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करणे कठीण काम असून महावितरण जिल्ह्यात चांगले काम करत आहे.

प्रास्ताविकातून श्रीमती चिवंडे यांनी वीज ही विकासाची जननी असून वीज यंत्रणेच्या विकासाठी आपण कटीबध्द आहोत. जिल्ह्यात वीज योजनेचे विस्तारीकरण, बळकटीकरण , भुमिगतीकरण सुरू आहे. चंद्रपूर मंडळात गेल्या आठ वर्षात ३५ नवीन उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या विविध योजना जसे एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम, गतिमान विद्युत विकास कार्यक्रम, कुसुम योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली योजना, नवीन कृषी ऊर्जा धोरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, ग्रामस्वराज्य अभियान, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण विद्युतीकरण योजना, छतावरील सौर निर्मिती प्रकल्प आदी योजनांची माहिती दिली.

यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करून त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेचे लाभार्थी श्री. रामटेके, प्रवीण गेडाम, जीवन सोयाम, देवानंद देवगडे, जिल्हा विकास नियोजन समिती योजनेतून दिपक रामटेके, भारत कुंभारे, सौर वीज जोडणी अंतर्गत सुरेश मडावी, उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत भावना देवगडे, सौभाग्य योजना अंतर्गत वैष्णवी सिडाम यांचा लाभार्थ्यांचा समावेश होता.

आदिवासी बालविकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी लोकनृत्य सादर केले. तसेच अभिनय सूत्रम अभिनय ग्रुप यांनी ऊर्जा संवर्धन व ऊर्जा क्रांती या विषयावर पथनाट्य सादर केले.

तत्पुर्वी कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व मा. सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून तसेच दीप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे संचालन सुशील सहारे यांनी तर आभार उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास कुर्रा यांनी मानले. यावेळी प्र. कार्यकारी अभियंता विजय राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक राकेश बोरीवर, उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया, सहाय्यक अभियंता अमित बिरमवार आदी उपस्थित होते.

00000


Friday 29 July 2022

पर्यावरणपूरक जीवनपद्धती आणि पायाभूत विकासासाठी सरकार कटिबध्द - केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव

 











पर्यावरणपूरक जीवनपद्धती आणि पायाभूत विकासासाठी सरकार कटिबध्द - केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव

Ø वन अकादमी येथे जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन

Ø भारतातील 52 व्याघ्र प्रकल्पांपैकी 17 प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त

चंद्रपूर, दि. 29 जुलै : मानवी जीवनात जंगलांचे अनन्यसाधारण महत्व असून जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक प्रमाणात मिळाले आहेत. तसेच निसर्गाच्या चक्रात वाघ, सिंह व वन्यजीव यांचेसुध्दा प्रमुख स्थान आहे. निसर्गाचे संतुलन राखून आपल्याला विकासाच्या क्षेत्रात भरारी घ्यायची आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब करून पायाभुत विकासासाठी केंद्र सरकार काम करीत आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भुपेंदर यादव यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन अकादमी, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणचे सचिव तथा अतिरिक्त महानिदेशक एस.पी.यादव, अतिरिक्त महासंचालक (वन्यजीव) विभाष रंजन, महाराष्ट्राचे वनबल प्रमुख डॉ. वाय.एल.पी.राव, महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अमित मलिक आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार, विकास, विज्ञान, व्याघ्र सुरक्षा, आदिवासींचे संरक्षण, अनुकूल वातावरण निर्मिती, जैवविविधता संरक्षण, जलवायू वाढविण्यासाठी उपाययोजना तसेच स्थानिकांना घेऊन वनांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण या क्षेत्रात भरीव काम करीत आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. भुपेंदर यादव म्हणाले, जगातील 75 टक्के वाघ भारतात सुरक्षित आहेत. देशात सद्यस्थितीत 52 व्याघ्र संरक्षण प्रकल्प असून यापैकी 17 प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे. याचे श्रेय वन विभागासोबतच जंगलालगत राहणा-या लोकांनासुध्दा आहे. पर्यावरण बदलाच्या संदर्भात नवीन संशोधन आणि संकल्पना घेऊन आपल्याला वन क्षेत्रांचे संरक्षण करायचे आहे. केंद्र सरकारतर्फे वन्यजीव संरक्षण कायदा, जैवविविधता कायदा, वनहक्‍क कायदा याबाबत मोठे काम होत आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या तुलनेत जवळपास 17 टक्के असून आपल्या देशात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 4 टक्के आहे. तर आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशांचे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 60 टक्क्यांच्या जवळपास आहे.

पुढे श्री. यादव म्हणाले, मूळ वनवासी लोकांशिवाय जंगलांचे संरक्षण शक्य नाही. त्यामुळे या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पर्यावरण व वन विभागातर्फे वनहक्‍क कायद्याअंतर्गत चांगले काम सुरू आहे. वन विभागाने वन्यजीवांचे संरक्षण करण्याकरिता प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करावे. तसेच स्थानिकांना घेऊन पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. भाषणाच्या सुरवातीलाच केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी चंद्रपूर येथील शहीद झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांना श्रध्दांजली अर्पण केली.

केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री श्री. चौबे म्हणाले, दरवर्षी 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगात वाघांच्या 9 प्रजातींपैकी 3 नामशेष झाल्या असून 13 देशात 6 प्रजाती शिल्लक आहेत. यापैकी 70 टक्के प्रजाती भारतात आढळतात. भारतात वाघांची संख्या वाढत आहे, हे अतिशय चांगले लक्षण आहे. वाघ सुरक्षित तर जंगल सुरक्षित. वनांशिवाय जीवन नाही. वन, वन्यजीव आपला नैसर्गिक वारसा आहे. त्याचे जतन करा. ‘नेचर आणि कल्चर’ सोबत घेऊन आपल्याला विकास साधायचा आहे. वाघांच्या संरक्षणासाठी भारताची भूमिका आग्रही राहिली आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या शिकारीविरोधात केंद्र सरकारची कठोर भुमिका आहे. टायगर, टी – गार्डन आणि ताजमहल या तीन ‘टी’ मुळे देशाची विशेष ओळख आहे, असेही ते म्हणाले.

 

व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे सचिव श्री. यादव म्हणाले, 2010 मध्ये रशियातील पिट्सबर्ग येथे आयोजित एका सेमीनारमध्ये ठरले की, दरवर्षी 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात यावा. वाघ हा पर्यावरणाचे संरक्षण करीत असून त्यामुळे आपले जंगल सुरक्षित आहे. 2010 मध्ये वाघांची जेवढी संख्या होती ती 2022 पर्यंत दुप्पट झाली पाहिजे, असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट भारताने 2018 मध्येच पूर्ण केले. भारत, नेपाळ, भुटान, रशिया या देशात वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे पेरीयार (केरळ) येथील वनअधिकारी गणेश एम., कान्हा (मध्यप्रदेश) येथील मेहरूसिंग मेहरापे, कान्हा येथील जोधासिंग बघेल, सातपुडा (मध्यप्रदेश) येथील अनिल चव्हाण, केरळ येथील धीरू कोमल, तामिळनाडू येथील तिरू मधान आणि मिना कालन यांचा रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार अमित मलिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरवातीला परेड संचलन तर सांगता राष्ट्रगिताने झाली. कार्यक्रमाला  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण लोणकर, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक जितेश मल्होत्रा यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००००

Thursday 28 July 2022

नगर परिषद / पंचायत आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 1 ऑगस्टपर्यंत आमंत्रित

 

नगर परिषद / पंचायत आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 1 ऑगस्टपर्यंत आमंत्रित

चंद्रपूर, दि. 28 जुलै : जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, राजुरा, मूल, चिमूर, घुग्घुस,  नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी या नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने 28 जुलै 2022 रोजी निश्चित करण्यात आलेले आहेत.

सदर आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत संबंधित नगर परिषद / नगर पंचायत कार्यालयात मागविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

०००००००

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

चंद्रपूर, दि. 28 जुलै : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर, 2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दि. 1 ऑक्टोर 2022 रोजी सुचना प्रसिद्ध होईल.  दि. 15 ऑक्टोबर 2022 ला मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीचे प्रथम पुर्नप्रसिद्धी करण्यात येणार. 

25 ऑक्टोबर 2022 ला मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4)  अन्वये वर्तमानपत्रातील नोटिची द्वितीय पुर्नप्रसिद्धी करण्यात येणार. नमुना-19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दि. 7 नोव्हेंबर 2022 असेल. 19 नोव्हेंबर 2022 रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी तर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 असेल. दि. 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येईल. दि.30 डिसेंबर 2022 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल. शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचा कार्यक्रम सुरू होत असल्याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

०००००००

जिल्ह्यात 25 जुलैपासून ‘हर घर जल’ विशेष मोहीम

 

जिल्ह्यात 25 जुलैपासून ‘हर घर जल’ विशेष मोहीम

Ø 2 ऑगष्टला विशेष ग्रामसभा

चंद्रपूर, दि. 28 जुलै : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयात दि. 25 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर जल’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 2 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली.

           डॉ. सेठी म्हणाल्या, जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाव्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत 100 टक्के वैयक्तीक व संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणा-या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबाना प्रति दिन प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे शुध्द व शास्वत पाणी पुरवठा प्रदान करणे आहे.

            या उपक्रमात विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत ‘हर घर जल’ घोषित करण्याचा ठराव करणे, त्यानंतर गावात समारंभ घेउन ‘हर घर जल’ उत्सव साजरा करणे, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे, जनजागृतीसाठी पथनाटयांचे आयोजन करणे, लोककलांचा वापर करून जनजागृती करणे, पाणी गुणवत्ता तपासणीसाठी एफटीके कीटव्दारे पाणी नमुणे तपासणी विशेष मोहीम राबविणे, हर घर जल उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदी घटकांना सहभागी करुन घेणे.

            संस्थात्मक नळजोडणीमध्ये ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणी नळ जोडणी देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे गावचे सरपंच , ग्रामसेवक, पदाधिकारी , सामाजिक संस्था व लोककलावंत यांनी हर घर जल उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

००००००

उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2022

 

उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2022

Ø फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश निर्गमित

चंद्रपूर, दि. 28 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 जुलै  ते 12 ऑगस्ट 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याचे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय मंडळ, नागपूर यांनी कळविले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2022 मधील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 100 मीटर परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 100 मीटर परिसरातंर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही.

सदर परीक्षेमधील परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातंर्गत, क्षेत्रांतर्गत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नियमित व रोजच्या वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2022 मधील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स,  एस.टी.डी. बूथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील उपरोक्त परीक्षेच्या सर्व परीक्षा केंद्रांना लागू राहील.

हा आदेश 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अमलांत राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षक पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात  नमूद आहे.

००००००

29 जुलै रोजी वन प्रबोधिनी येथे जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन

 

29 जुलै रोजी वन प्रबोधिनी येथे जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन

Ø केंद्रीय मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चंद्रपूर,दि. 28 जुलै : राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण तसेच पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने दि. 29 जुलै रोजी वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंदर यादव व केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे तसेच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेले विशेष व्याघ्र संरक्षण दलाची परेड व सलामी होणार असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. 29 जुलै रोजी वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची 21 वी बैठक, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची 69 वी सभा तसेच मंत्री महोदयांसोबत देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक यांच्यासोबत खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००

केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव आज चंद्रपूरात

 केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव 29 जुलै  रोजी चंद्रपूरात

चंद्रपूर, दि. 28 जुलै : केंद्रीय कामगार,रोजगार, पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भुपेंदर यादव चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

29 जुलै 2022 रोजी सकाळी 4.30 ते 7.30 वाजेपर्यंत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट. सकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. सकाळी 10 ते 1.30 वाजेपर्यंत जागतिक व्याघ्र दिन व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची 21 व्या बैठकीला उपस्थिती.

००००००

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 जुलै : आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती संस्कृती जतन करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 दि.9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या नृत्य स्पर्धेला सर्व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.

००००००

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत तांत्रिक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना


 मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत तांत्रिक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना

चंद्रपूर, दि. 28 जुलै : अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय, मुंबई अंगिकृत मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीकरीता या महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता तांत्रिक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी www.mamls.maharashtra.gov.in / www.mamfdc.org या वेबसाईटवर तथा रूम नं. 8 छोटी मस्जिद कॉम्प्लेक्स, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, कस्तुरबा रोड, चंद्रपूर या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नफीस शेख यांनी कळविले आहे.

०००००

Wednesday 27 July 2022

खरीप हगांम पिक स्पर्धा-2022

 

खरीप हगांम पिक स्पर्धा-2022

Ø जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.27 जुलै : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल तसेच अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी:

पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिके स्पर्धेत समाविष्ट आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या ही सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 राहील. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पिक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या  सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 राहील. 

स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.  प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीक निहाय प्रत्येकी रक्कम रु. 300  राहील.  अर्ज सादर करण्याची तारीख मूग व उडीद पीकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पीकांसाठी 31 ऑगस्ट 2022 राहील. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) आदी कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे.

पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिसाचे स्वरुप:

पिक स्पर्धा विजेत्यांसाठी तालुका पातळीवर बक्षिसांचे स्वरूप सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रु.5 हजार, दुसरे 3 हजार, तर तिसरे बक्षीस रु. 2 हजार, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस रु. 10 हजार, दुसरे 7 हजार, तर तिसरे बक्षीस रु.5 हजार असेल. विभाग पातळीवर पहिले बक्षीस रु. 25 हजार, दुसरे 20 हजार तर तिसरे बक्षीस रु. 15 हजार असेल, राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रु. 50 हजार, दुसरे बक्षीस रु.40 हजार तर तिसरे बक्षीस रु. 30 हजार याप्रमाणे देय राहील.

पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

रब्बी हंगाम-2020 तसेच खरीप व रब्बी हंगाम 2021-22 मध्ये पीक स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे खरीप हंगाम-2022 मध्ये देखील जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै 2022 पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी दि. 31 ऑगस्ट 2022 पुर्वी अर्ज सादर करुन पिक स्पर्धेमध्ये मोठया प्रमाणात सहभागी व्हावे,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

000000

इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

 इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

चंद्रपूर, दि.27 जुलै :महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र घटकांसाठी शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा जिल्हयातील इच्छुक पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लाखापर्यंत):

योजनेची महत्तम कर्ज मर्यादा 10 लक्ष रुपयापर्यंत असून बँकेने रु. 10 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या प्रकरणात उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तर परतफेडीचा कालावधी हा बँक निकषानुसार राहील.

गट कर्ज व्याज परतावा योजना( रु. 10 ते 50 लाखापर्यंत):

सदर योजना महामंडळ निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एल.एल.पी, एफ.पी.ओ अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. बँकेकडून प्रती गटास कमीत कमी रु. 10 लक्ष ते जास्तीत जास्त 50 लक्षपर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणी करिता अर्थसहाय्य मिळेल. तसेच मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि 15 लक्ष रुपयाच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

योजनेचे निकष:

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता रु. 8 लाखापर्यंतच्या मर्यादेत असावे. अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड न केल्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.

योजनेच्या अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरीजवळ, जल नगर वार्ड, चंद्रपूर अथवा 07172-262420 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 27 जुलै: केंद्रीय पर्यावरण, वन, वातावरणीय बदल, ग्राहक घडामोडी, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

28 जुलै रोजी रात्री 10.15 वाजता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम. 29 जुलै रोजी सकाळी 4.30 ते 7.30 वाजेपर्यंत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट. सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या 21 व्या बैठकीला उपस्थिती. दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे हेच महावितरणचे ध्येय -मुख्य अभियंता देशपांडे

 








ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे हेच महावितरणचे ध्येय

-मुख्य अभियंता देशपांडे

Ø चिमूर येथे उज्वल भारत, उज्वल भविष्य, ऊर्जा महोत्सवाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 27 जुलै : अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच वीज ही मनुष्याची प्राथमिक गरज आहे. त्यामुळेच ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे, हे महावितरण कंपनीचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले.  चिमूर येथे ऊर्जा विभागाच्या वतीने आयोजित  उज्वल भारत, उज्वल भविष्य या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर भद्रावती पॉवर ग्रीडचे मुख्य महाप्रबंधक अरिंदम सेन शर्मा, चंद्रपूर मंडळाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता प्रफुल अवघड, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऊर्जा विभागाच्यावतीने 25 ते 30 जुलै या कालावधीत संपूर्ण देशात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असे सांगून मुख्य अभियंता श्री. देशपांडे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरला शहीद क्रांतीचा मोठा वारसा लाभल्यामुळे या ऊर्जा महोत्सवासाठी चिमूरची निवड करण्यात आली आहे. आजच्या काळात वीज ही नागरिकांची प्राथमिक गरज आहे. महावितरण ही ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे, हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे. गत आठवड्यात चिमूरमध्ये आलेल्या पूर परिस्थितीत महावितरणच्या सर्व अधिकारी - कर्माचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अखंड सेवा दिली. हे नक्कीच कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.

यावेळी प्रफुल अवघड म्हणाले, विभागाचे चांगले काम लोकांपर्यंत गेले पाहिजे, ग्राहकांना चांगली सेवा देणे, हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे कंपनीची प्रतिमा आणखी चांगली होईल.

अरिन्दमसेन शर्मा म्हणाले, ऊर्जाक्षेत्रात केंद्र सरकारने मोठी मजल मारली आहे. आज भारत, शेजारी देशातसुद्धा विजेची निर्यात करतो. 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेचे गाठावयाचे लक्ष भारताने 2021 मध्येच पूर्ण केले आहे, असे त्यांनी सांगितले. तर उपविभागीय अधिकारी श्री. संकपाळ म्हणाले, चंद्रपूर हा ऊर्जा निर्माण करणारा जिल्हा आहे. येथे विद्युत विभागाचे काम चांगले असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी आहेत. ही बाब अभिनंदनीय असून ग्राहकांना आणखी चांगली सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्नशील राहावे. तसेच नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकातून अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे म्हणाल्या, उज्वल भारत, उज्वल भविष्य ऊर्जा महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात चिमूर आणि मूल (30 जुलै) या दोन ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील 2047 पर्यंत ध्येय निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी संगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्युत विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यात जितेंद्र गोनेवार, विठोबा झिंगरे, किसन मांडवकर, लिलाधर जांभूळे, अजहर शेख आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि शहीद बालाजी रायपुरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह येथील मूलींनी स्वागतनृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे संचालन सुशील सहारे यांनी केले. यावेळी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन घडोले (वरोरा), सुहास पडोळे (चंद्रपूर), विजय राठोड, उपकार्यकारी अभियंता संजय जळगावकर यांच्यासह सर्व अभियंते, शाखा अभियंते, उपअभियंते, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आदिवासी नृत्याने झाली.

00000

Tuesday 26 July 2022

13 ते 15 ऑगस्ट रात्रीसुध्दा फडकणार घरावर झेंडा

 





13 ते 15 ऑगस्ट रात्रीसुध्दा फडकणार घरावर झेंडा

Ø जिल्हाधिका-यांकडून हर घर झेंडा अभियानचा आढावा

चंद्रपूर, दि. 26 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येत आहे. या तीन दिवसांत घरावरील तिरंगा झेंडा रात्रीसुद्धा डौलाने फडकवत ठेवता येणार आहे. मात्र शासकीय इमारतींवरील झेंडा ध्वज संहितेनुसार सुर्यास्तापूर्वी काढण्याच्या अटी व शर्ती कायम आहेत, अशी माहिती  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

 जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हर घर झेंडा’ अभियानाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, तहसीलदार प्रिती डुडूलकर, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके आदी उपस्थित होते.

याबाबत जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, फक्त 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसात घरावर लावण्यात आलेला तिरंगा झेंडा रात्री खाली उतरविण्याची गरज नाही. याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा तसेच तालुका स्तरावर 75 फूट ध्वज उभारण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेने त्वरीत जागा निश्चित करावी. ग्रामीण भागात ध्वजांची विक्री ही बचत गट किंवा स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबत जिल्हा परिषदेने नियोजन करावे, अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

घरोघरी लावण्यात येणा-या ध्वजा संदर्भात सर्वसाधारण अटी व शर्ती : राष्ट्रध्वज आयाताकृती आकाराचा असेल व त्याची लांबी व रुंदी 3:2 इतके राहील. बोधचिन्ह व नावे अधिनियम 1950 चा भंग करून विणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही. खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाही. कोणतीही वस्तु घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा जमिनीची स्पर्श होऊ देऊ  नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल, अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावला पाहिजे. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावू नये. राष्ट्रध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये.

राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये. तसेच ज्या काठीवर ध्वज फडकवत ठेवला असेल त्या काठीवर किंवा काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तु ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्‍य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. जेव्हा ध्वज मोकळ्या जागेत लावायचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लावण्यात यावा. ध्वज फाटेल अशा कोणत्याही रितीने लावू नये किंवा बांधू नये आणि जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल, अशा अन्य कोणत्याही पध्दतीने तो खाजगीरित्या संपूर्णपणे नष्ट करावा.

या व्यतिरिक्त इतर आवश्यक सूचना, अटी व शर्तीसाठी ध्वज संहिता 2006 चे अवलोकन करावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

००००००००